भारतात चित्ता पुन्हा धावेल? (सुनील लिमये)

sunil limaye
sunil limaye

भारतातल्या सुयोग्य आणि अनुकूल जंगलांमध्ये आफ्रिकी चित्ते आणून त्यांचं पुनर्वसन करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नुकतीच परवानगी दिली आहे. या प्रयोगामुळं भारतातून सध्या नामशेष झालेला चित्ता पुनर्स्थापित होईल का, आधीच्या प्रयोगांचं किंवा अभ्यासांचं नेमकं स्वरूप काय होतं, भारतात चित्ते धावणं कशासाठी महत्त्वाचं आहे, त्यात अडचणी काय आहेत आदी सर्व गोष्टींबाबत मंथन.

आपल्या सर्वांना १९४७ हे वर्ष भारताला स्वातंत्र मिळालं म्हणून कायमचं लक्षात आहे. परंतु उपलब्ध माहितीनुसार, याच वर्षी भारतातले शेवटचे तीन चित्ते मध्य प्रदेशातल्या सरगुजा जिल्ह्यात महाराजा रामानुज प्रतापसिंह देव यांच्याकडून मारले गेले होते, हे फारच कमी लोकांना माहीत असेल. त्यातूनच आता अचानक वृत्तपत्रात आलेली ‘सर्वोच्च न्यायालयानं आफ्रिकी चित्ता भारतात विशिष्ट ठिकाणी आणण्यास प्रायोगिक तत्त्वावर परवानगी दिली,’ हे वाचून कोणाच्याही मनात हा प्रश्न येणारच, की चित्ता भारतात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी का? कारण चित्ता आणि सिंह (दोन्ही आशियातले प्राणी) हे एकाच जागी राहू शकत नाहीत, असं काही ‘तज्ज्ञांचं’ म्हणणं होतं, (आफ्रिकेत मात्र सिंह आणि चित्ता सर्वत्र दिसतात) आणि तसं त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. (या आधीच गुजरातमधून कुनो इथं सिंह न्यायचे आणि त्याचं संवर्धन करायचं चाललं होतं. कारण भारतात फक्त गिरमध्ये असलेले सिंह एखाद्या साथीच्या रोगानं समूळ नष्ट होऊ नयेत म्हणून भारतात सिंहासाठी योग्य असलेल्या ठिकाणी स्थलांतरित करायचं ठरलं होतं.) त्यामुळं या तज्ज्ञांनी चित्त्यांच्या पुनर्प्रसारण प्रकल्पामुळे सिंहाच्या कुनो इथल्या स्थलांतरात अडचण येऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि त्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं चित्त्याचं भारतात आणणं तात्पुरतं थांबवलं होतं. मात्र, आता राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणानं आफ्रिकी चित्ता नामिबियातून आणणार आणि मध्य प्रदेशामधल्या नौरादेही इथं त्याला ठेवता येईल, असं सर्वोच्च न्यायालयास पटवून दिल्यानं आणि यासाठी IUCNनं ‘ना हरकत’ दिल्याचं सांगितल्यानं आता हा प्रकल्प मार्गी लागत आहे.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत आपल्याकडे मिळणारा आशियायी चित्ता इस्राईल, अरब द्वीपकल्पपासून इराण, अफगाणिस्तान आणि भारतामध्ये आढळून येत होता. भारतामध्ये तर तो दक्षिणेकडच्या तमिळनाडू राज्यातल्या तिरुनेलवेल्ली जिल्ह्यातही आढळून येत होता. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बऱ्याचशा राजेमहाराजांनी काळविटांची आणि इतर कुरंगांची शिकार करण्यासाठी चित्ते बाळगले होते. जुन्‍या कागदपत्रांत असाही उल्लेख आहे, की मुघल बादशाह अकबराकडे सुमारे एक हजारच्या आसपास खास शिकारीसाठी राखीव ठेवलेले चित्ते होते. एकंदरीत सर्व चित्त्यांचा उपयोग राजेमहाराजांनी त्याचा शिकारीचा शौक पुरा करण्यासाठी वापर करून घेतला होता. या चित्त्यांच्या बाहेरच्‍या अधिवासातल्या वा बंदिस्‍त स्थितीतल्या (captive breeding) प्रजननाबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. विशेषत: captive breedingमध्ये चित्त्यांनी पिल्लांना जन्म दिल्याच्या घटना नोंदल्या गेलेल्या नाहीत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला चित्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास सुरुवात झाली होती. चित्त्यांना जो अधिवास त्यांच्यासाठी हवा असतो तो म्हणजेच गवताळ प्रदेश आणि ते विविध कारणांनी कमी होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळं एकंदरीतच विसाव्या शतकाची सुरवात ही चित्ते नामशेष होण्याची सुरुवात म्हणून झालेली होती. सन १९५१ मध्ये सध्याच्या छत्तीसगड राज्यात एक मादी चित्ता आढळल्याची नोंद दिसून येते. मात्र, त्याबाबत निश्चित अशी माहिती नाही. त्यामुळं त्या अर्थानं १९५२ पासून भारतातून चित्ता नामशेष झाला, असंच म्हणावं लागेल. त्याची महत्त्वाची कारणं म्हणजे या गवताळ प्रदेशांच्या आजूबाजूच्या गावातले गाय, म्हैस इत्यादी पाळीव जनावरांकडून गवताळ प्रदेशात झालेली अनियंत्रित चराई, या भागात मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेली शेती आणि चित्त्यांचं भक्ष्य असलेल्या काळवीट आणि कुरुंगाची शिकार ही होती.
चित्ता भारतात पुनर्स्थापित का करायचा, हाही प्रश्न काही जणांना पडू शकतो. चित्ते भारतात आणून त्यांचं संवर्धन करण्याचा हा प्रयत्न ज्याला reintroduction असं म्हणतात. हे म्हणजे नक्की काय, तर जेव्हा एखादी प्रजाती ज्या अधिवासामध्ये राहू शकते, तिथं ती आणून तिचं संवर्धन करणं. तेच आता करायचं आहे. आपल्याकडं मार्जार कुळातले सिंह, वाघ, बिबट्या हे इतर मोठे वन्यप्राणी चांगल्या प्रकारे जगत असताना चित्त्यासारखा अतिशय डौलदार प्राणी नष्ट होणं ही काही निश्चितच अभिमानाची गोष्ट नव्हती. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की कमी अंतरापर्यंत (दोनशे-तीनशे मीटर) पळण्यामध्ये चित्त्याच्या वेगाची कोणीच बरोबरी करू शकत नाही. कुत्र्यांमधले अतिशय वेगानं पळणारे जे शिकारी कुत्रे आहेत- उदाहरणार्थ, ग्रे हाऊंड किंवा कांगारू हाऊंड- हेसुद्धा चित्त्याशी बरोबरी करू शकत नाहीत. कारण ते चिंकारा किंवा काळविटांसारख्या प्राण्यांचा पाठलाग करून पकडू शकत नाहीत. हे चित्ते कधी काळी भारतात विपुल प्रमाणात होते आणि आजही त्याच्यासाठी आवश्यक असलेला अधिवास भारतात आहे. या सर्व कारणांमुळंच भारतामध्ये चित्त्यांचं पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीनं निसर्गप्रेमी आणि सरकारच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर हालचाल सुरू झाली. सप्टेंबर २००९ मध्ये राजस्थानातल्या गजनेर इथं दिव्यभानुसिंग चावडा आणि एम. के. रणजित सिंह यांच्यासारख्या या विषयातल्या तज्ज्ञांनी भारतात चित्ता कशा प्रकारे आणून त्‍याचं संवर्धन करता येईल, यासंबंधी विचार मांडले. त्यांना गजनेर अभयारण्यामध्ये चित्त्यांना आणून त्यांचं पोषण आणि संवर्धन सुरू करायचं होतं. त्याच वेळी भारतानं इराणशी चर्चा करून तिथून एक चित्त्याची जोडी आणण्याचेही प्रयत्न सुरू केले होते. या आधीही सन २००१ मध्ये भारतातल्या DNA finger printing चे जनक लालजीसिंग यांनी तर इराणमध्ये जाऊन एक मोठा जनुकीय प्रस्ताव दिला होता. त्यांनी तिथल्या आशियन चित्त्याचं वीर्य आणि त्याच्या काही पेशी यांची मागणी केली होती- ज्याद्वारे ते क्लोनिंगचा प्रयत्न करून पाहणार होते. त्यासाठी ते एका भारतीय मादी बिबट्याचा ‘भाडोत्री आई’ (surrogate mother) म्हणून उपयोग करणार होते. मात्र, इराणनं तो प्रस्ताव फेटाळला होता. इराणकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं यानंतर आफ्रिकेतून चित्ता आणण्याविषयी जोरात विचार सुरू झाला.

वन्यजीव संवर्धन आणि व्यवस्थापनात राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या भारतीय वन्यजीव संस्थेनं या चित्ता पुनर्वसनासाठी सन २०१२ मध्ये २६० कोटी रुपयाचा एक आराखडा तयार केला आणि त्यामध्ये चित्त्यांच्या संवर्धनासाठी त्याला आवश्यक असणाऱ्या अधिवासाचं क्षेत्र असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांचा विचार केला होता. मध्य प्रदेशमध्ये कुनो-पालपूर आणि नौरादेही अभयारण्याचा, तर राजस्थानमधल्या जैसलमेरमधल्या शाहगड इथल्या वनक्षेत्राचा चित्त्यांसाठी एक चांगला अधिवास म्हणून विचार सुरू गेला होता. मात्र, त्याच सुमारास गिरमधल्या सिहांचं कुनो अभयारण्यामध्ये स्थानांतर करून त्यांचं संवर्धन करण्याचाही एक प्रयत्न राष्ट्रीय स्तरावर नजरेसमोर असल्यानं चित्ता पुनर्वसनाचा हा प्रकल्प सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर थांबला होता.

कुनो अभयारण्यामध्ये आधी सिहांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू झाले हाते आणि त्याच दरम्यान बाहेरून चित्ते भारतात आणून ते कुनो अभयारण्यामध्ये संवर्धित करण्याचा विचार पुढं आला होता. त्यामुळं काही वन्यजीव प्रेमींनी एक मुद्दा पुढं आणला, की कुनोमध्ये चित्त्यांचं संवर्धन करायचं झाल्यास आधी ठरल्याप्रमाणं गिरमधून इथं सिंहांना आणून त्यांना पुनर्वसित करायचा प्रयत्न मागं पडेल आणि त्यामुळंच चित्ता पुनर्वसन काही कालावधीसाठी थांबलं. त्याचबरेाबर आफ्रिकन चित्यासाठी एक हजार चौरस किलोमीटरच्या आसपास असलेले हे भारतीय अधिवास पुरेसे आहेत का, याबाबतीतही शंका उपस्थित करण्यात आली. कारण या चित्यांचं खाद्य असणारे कुरंग हे मोठ्या गवताळ प्रदेशातले प्राणी आहेत. (सेरेनगेरी हे टांझानियातलं राष्ट्रीय उद्यान सुमारे पंधरा हजार चौरस किलोमीटरवर पसरलेलं आहे.) चित्त्यांच्या संवर्धनातदेखील नक्की आशियन चित्ताच आणायचा, की आफ्रिकन चित्ता आणायचा यामध्येदेखील वन्यजीव प्रेमींमध्ये शंका होती. कारण IUCNच्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणं एखाद्या देशाबाहेरली वन्यजीव प्रजाती (exotic) त्या देशामध्ये आणून त्यांचं संवर्धन करणं योग्य नाही. यापूर्वी आफ्रिकन चित्ता भारतामध्ये कधीही नव्हता. याच अनुषंगानं दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया या देशांमध्येसुद्धा बाहेरून आणलेल्या वन्यजीव प्रजाती त्यांच्या देशातून हटवण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. मात्र, अमेरिकेच्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या, जनुकीय विविधता प्रयोगशाळेच्या डॉ. स्टीफन ओ’ब्रायन यांनी जनुकीय अभ्यासातून सन २००९ मध्ये दाखवून दिलं, की आशियन चित्ता आणि आफ्रिकन चित्ता हे जनुकीय आधारावर खूपसे एकसारखे आहेत आणि साधारणत: पाच हजार वर्षांपूर्वी वेगवेगळे झाले आहेत. या माहितीमुळं आफ्रिकन चित्ता भारतात आणून त्याचं पुनर्वसन करायचं निश्चित झालं.

सर्वोच्च न्यायालयानं ता. २८ जानेवारीला आफ्रिकन चित्ता भारतात आणून योग्य त्या अधिवासाची निवड करून तिथं संवर्धनासाठी परवानगी केंद्र सरकारला दिली आहे. या संदर्भात राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणानं नामिबियामधून आफ्रिकन चित्ते आणून भारतातल्या योग्य त्या अधिवासात सोडण्याबाबत परवानगी द्यावी, म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडं ही परवानगी मागितली होती. सर्वोच्च न्यायालयानं आता यासाठी तीन तज्ज्ञांच्या समितीची स्थापना केली असून, ती या प्रकल्पाच्या पूर्तीसाठी राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणास मदत आणि मार्गदर्शन करेल.

तसं पाहिलं, तर याआधीही हा आफ्रिकन चित्ता आणल्यानंतर त्याच्या संवर्धनासाठी कोणता अधिवास चांगला असेल, यासाठी अभ्यास करण्यात आलेला आहे. मध्य प्रदेशमधलं कुनो-पालपूर अभयारण्य (आता राष्ट्रीय उद्यान) ही एक अशी जागा आहे, की जिथं भारतातले चारही मोठे प्राणी- वाघ, बिबट्या, सिंह आणि चित्ता- एकत्र राहू शकतात. कारण हे चारही प्राणी अशा अधिवासात आढळून येत होते. राजस्थानातल्या शाहगड इथला अधिवास हा भारत-पाकिस्तानच्या सरहद्दीवर असून तो जागोजागी मोठ्या प्रमाणावर कुंपण घालून सुरक्षित केलेला आहे, तर मध्य प्रदेशातलं सुमारे बाराशे चौरस किलोमीटरमध्ये पसरलेलं नौरादेही अभयारण्य हे त्या परिसरातल्या सुमारे ५५०० चौरस किलोमीटर वनक्षेत्राचा भाग असल्यानं आणि तिथंही दाट झाडी नसल्यानं हासुद्धा चित्त्यासाठी एक चांगला अधिवास होऊ शकतो. या व्यतिरिक्त गुजरातमधलं ‘वेलावदार राष्ट्रीय उद्यान’ आणि राजस्थानमधलं ‘ताल छापर अभयारण्य’ याही चित्त्याच्या अधिवासायोग्य जागा आहेत. एकदा का चित्त्याचं सुरळीतपणे संवर्धन सुरू झालं, तर राजस्थानमधल्या ‘बन्नी’चा गवताळ प्रदेश; तसंच जैसलमेरचं ‘डेझर्ट नॅशनल पार्क’देखील चित्त्यासाठी उपयुक्त अधिवास ठरणार आहे. यापूर्वी तमिळनाडूमध्येसुद्धा चित्त्याचा वावर दिसून आला असल्यानं तमिळनाडूमधल्या सत्यमंगलम वन क्षेत्रामधल्या (जे निलगिरी बायोस्फीअर रिझर्व्हचा भाग आहे) मोयार नदीच्या खोऱ्यातसुद्धा चित्त्यांचा चांगला अधिवास होऊ शकतो.

चित्त्यांना अशा प्रकारे पुनर्स्थापित करण्याबाबत आजवर खूप विचार झालेला आहे. चित्त्यांना पुन्हा भारतात आणून त्यांचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले, त्यावेळी भारताच्या नजरेसमोर नामिबिया, दक्षिणअफ्रिका, बोटस्वाना, केनिया, टांझानिया आदी देश होते. दरवर्षी या देशांतून पाच ते दहा चित्ते पुढील पाच ते दहा वर्षांपर्यंत आणून त्यांचं पालनपोषण आणि संवर्धन करावं, असा पहिला विचार होता. मात्र, तो काही ना काही कारणानं मूर्तस्वरूपात येऊ शकला नाही. खरं तर इराणमधले चित्ते- जे आशियन चित्ते आहेत ते- भारतात आणून त्यांचं संवर्धन करणं जास्त योग्य ठरलं असतं. मात्र, इराणमध्येही सन १९९० मध्ये असलेल्या चित्त्यांची संख्या चारशेवरून आता पन्नासच्या आसपास येऊन पोचली आहे. त्यासाठी चित्त्यांची होणारी हत्या, चित्त्यांचं भक्ष्य असलेल्या प्रजातींचा नाश आणि चित्त्यांच्या अधिवासांचा नाश या बाबी कारणीभूत झालेल्या आहेत. त्यामुळं आता आपण सर्वांनीच आशा बाळगूया, की हा चित्त्यांच्या पुनर्वसनाचा प्रयोग यशस्वी होऊन भारतात सिंह, वाघ, बिबट्या आणि चित्ता ही चार मोठी, देखणी जनावरं पुन्हा धावू लागतील. फक्त या प्राण्यांना जगण्यासाठी आवश्यक असलेला अधिवास/ जागा (space) मात्र आपण अजिबात बळकावणार नाही, याची दक्षता आपण सर्वांनी घेणं आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com