डेटाक्रांती २.० (सुश्रुत कुलकर्णी)

sushrut kulkarni
sushrut kulkarni

रिलायन्स जिओनं नवीन फायबर सेवेची घोषणा केली आहे. कदाचित अशा प्रकारची सेवा इतर कंपन्याही देतील, स्पर्धा वाढेल; पण एकूणच या निमित्तानं रंजनाच्या सवयींपासून, कौटुंबिक व्यवस्थेपर्यंत आणि तांत्रिक गोष्टी बदलण्यापासून ‘डेटा’ची भूक वाढल्यानं होऊ घातलेल्या बदलांपर्यंत अनेक गोष्टींवर परिणाम होऊ घातले आहेत. एक नवी ‘डेटा’शाही आता प्रस्थापित होऊ घातली आहे. नवीन व्यवस्थेतली ही ‘डेटा’गिरी कुठपर्यंत जाऊ शकेल याचा वेध.

आज कॉम्प्युटर तंत्रज्ञानानं सगळ्या जगाला बदलून टाकलं आहे. एकेकाळी केवळ गुंतागुंतीची कामं करण्यासाठी वापरले जाणारे कॉम्प्युटर आता मोबाईल फोनच्या रूपात प्रत्येकाच्या खिशापर्यंत पोचलेले आहेत. इतकंच काय, खिशातल्या या मोबाईल फोनवर इंटरनेट सुविधाही हमखास असतेच. आता डिजिटल माध्यमाशिवाय बहुतांश कामं होऊ शकत नाहीत किंवा आर्थिक व्यवहारही सुलभतेनं होऊ शकत नाहीत. डिजिटल युगातला प्राणवायू म्हणजे इंटरनेट. ते जितक्या अधिक प्रमाणात उपलब्ध असेल, तितकी माहितीची देवाणघेवाण चांगल्या पद्धतीनं होते. गेल्या तीन वर्षांपूर्वीपर्यंत इंटरनेटचे दर खूप जास्त म्हणजे एक जीबी डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी २५० रुपये इतके होते; मात्र या क्षेत्रात मोठी स्पर्धा सुरू झाल्यामुळे त्याच रकमेत आता महिन्याला ५०पट डेटाची देवाणघेवाण करणं शक्य झालेलं आहे.
परदेशामध्ये तुलनेनं लोकसंख्या विरळ असल्यानं तिथं सेवांचे दर अधिक असतात. त्याउलट भारतातल्या शहरी भागांत दाट लोकवस्ती असल्यानं तितक्याच पायाभूत सुविधांमध्ये कित्येक पट ग्राहकांना सेवेचा लाभ होऊ शकतो. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपेक्षा भारतातल्या इंटरनेट सुविधांचे दर एक दशांश इतके कमी आहेत. गेली ३ वर्षं मुबलकपणे मिळणाऱ्या या डेटाचा वापर नेमका कशासाठी होतो?- तो होतो कार्यालयीन वापरासाठी व मनोरंजनासाठी. आजवर इंटरनेट कमी वेगानं चालत असल्यानं आणि सोबतच ते महाग असल्यानं त्याचा वापर मुख्यत: शब्द आणि अंक यांची देवाणघेवाण करण्यासाठीच केला जात असे. ध्वनी आणि प्रतिमा यांच्या देवाणघेवाणीमध्ये मोठ्या प्रमाणावर डेटा लागत असल्यानं महागडं इंटरनेट यासाठी वापरणं ही ‘चैनी’ची गोष्ट होती. डेटाक्रांतीच्या पहिल्या टप्प्यात इंटरनेटचं शुल्क खाली आल्यामुळं संगीत आणि व्हिडिओ यांचं वितरण मोठ्या प्रमाणावर सुरू झालं. पूर्वीच्या केबल आणि डिश टीव्हीऐवजी युट्यूब, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, झी ५, अल्ट बालाजी, हॉटस्टार यांसारख्या वेबवरून मनोरंजन पुरवणाऱ्या माध्यमांची (ओटीटी) लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर वाढू लागली. नुसतं मनोरंजनच नव्हे, तर चित्र आणि ध्वनी यांची गुणवत्ताही चांगली असावी, याकरता कंपन्या झटू लागल्या. त्यातच ऑनलाईन शॉपिंगसाठी इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. तीन वर्षांपूर्वी वेगवान वाटणारं ४-जी तंत्रज्ञान आता अपुरं पडू लागलं आहे. आता पुढचा टप्पा आहे तो याहूनही वेगवान इंटरनेट जोडणीचा.

येत्या ५ सप्टेंबरला रिलायन्स समूहातली जिओ ही कंपनी आपली ‘फायबर टू द होम’ (FTTH) ही सेवा भारतभर सुरू करणार आहे. वेगवान इंटरनेट हे या सेवेचं वैशिष्ट्य तर असेलच; पण याखेरीज नुसताच अधिक वेग देऊन ही सेवा थांबणार नाही, तर त्यासोबतच क्रांतिकारक बदल भारतीयांच्या डिजिटल उपकरणांच्या वापरामध्ये होणार आहेत. सध्याच्या इंटरनेटच्या वेगामुळं ज्या गोष्टी करणं शक्य नव्हतं त्या गोष्टी यामुळं साध्य होतील. अमेरिकेमध्ये इंटरनेटचा सरासरी वेग सेकंदाला ९० मेगाबिट्स इतका असतो, भारतात नव्यानं सुरू होणाऱ्या या सेवेचा किमान वेग सेकंदाला १०० मेगाबिट्सपासून ते तब्बल १,००० मेगाबिट्सइतका (१ गिगाबिट ) प्रचंड असणार आहे. यावर केवळ इंटरनेटच नव्हे, तर मोठ्या पडद्यावर टीव्ही किंवा चित्रपटही पाहता येतील. म्हणजेच एकाच फायबर ऑप्टिक केबलमधून इंटरनेट आणि मनोरंजनाची केबल चॅनेल्स या दोन्हीही सुविधा उपलब्ध होतील. मालिका, बातम्या आणि चित्रपट पाहण्यासाठी सोबतच सेटटॉप बॉक्सदेखील उपलब्ध करून दिला जाणार आहे.
सोबतच टेलिफोनसेवादेखील FTTHमध्ये उपलब्ध असेलच. या सेवेवरून भारतातल्या कुठल्याही टेलिफोन ऑपरेटरला, मोबाईल किंवा लॅण्डलाईन नि:शुल्क कॉल करता येतील. तसंच अमेरिका आणि कॅनडा या देशांत प्रचलित दरांपेक्षा सुमारे पाचपट कमी किंमतीत फोन कॉल्स करता येणार आहेत. FTTH सुविधा वापरून जगभरात एकावेळी एकाहून अधिक लोकांसोबत ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ करणंदेखील शक्य होणार आहे. आजवर व्हिडिओ कॉन्फरन्स करण्याकरता महागडी उपकरणे घेण्यावर हजारो रुपये खर्च होत असत, मात्र नव्या तंत्रज्ञानामुळं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आपल्या मासिक इंटरनेटच्या खर्चातच करणं शक्य आहे.

जिओ गिगा फायबर जोडणीमध्ये आभासी तंत्रज्ञान सुविधेचा मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना फायदा मिळेल. उदाहरणार्थ, ऑनलाईन शॉपिंगमधे एखादा कपडा खरेदी करताना तो परिधान करणाऱ्या मॉडेलच्या अंगावर तर चांगला दिसतो; पण आपल्या अंगावर तो चांगला दिसेल की नाही याबद्दल खात्री नसते. आभासी वास्तवात म्हणजेच सत्य आणि आभासी यांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या मिक्स रिअॅलिटीमध्ये आपल्याला आपलाच चेहरा असणारी त्रिमितीय आकृती स्क्रीनवर दिसेल. या आपल्या आभासी प्रतिमेला एखादा कपडा कसा शोभून दिसेल अथवा नाही हे स्क्रीनवर खरेदी करण्याआधीच ताडून पाहता येईल. (यात वापरलं गेलेलं अशा प्रकारचं ग्राहकाचा चेहरा असणारी आभासी प्रतिमा निर्माण करून ती विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या वस्तूशी जोडण्याचं त्रिमिती तंत्रज्ञान भारतातल्या टेसरअॅक्ट या स्टार्टअपनं विकसित केलं आहे.)

‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ शक्य
आता वेगवेगळ्या स्मार्ट गोष्टी परस्परांना इंटरनेटद्वारे जोडण्याचं प्रमाण वेगानं वाढतं आहे. परस्परांशी जोडल्या गेलेल्या अशा गोष्टींचं वस्तुजाल म्हणजेच ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ तयार होतं. स्मार्ट घड्याळ, मोबाईल फोन, वाहन आणि दरवाजातून आत प्रवेश करू देणारी घराची सुरक्षायंत्रणा एकमेकांना सहजी जोडता येणं डिजिटल युगात शक्य झालेलं आहे. आता वेगवान आणि कमी ऊर्जा लागणाऱ्या इंटरनेट जोडणीमुळं परस्परांपासून नजीक असणाऱ्या स्मार्ट वस्तूंचं (नॅरोबॅंड) वस्तुजाल निर्माण करणं आता मोठ्या प्रमाणात झालेलं दिसेल.

जिओनं जगातल्या सर्वांत मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणना होणाऱ्या असणाऱ्या मायक्रोसॉफ्ट कंपनीशी करार केलेला आहे. सध्या प्रचलित असणारं मायक्रोसॉफ्टचे अॅज्युअर (Azure) हे क्लाऊड तंत्रज्ञान वापरून भारतामधल्या डेटा सेंटरद्वारे ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येईल. हल्ली भारतामधल्या ग्राहकांचा डेटा चीनसारख्या परदेशातल्या डेटा सेंटरमधे साठवला जाऊ नये याबद्दल सगळ्यांना मोठी चिंता वाटत असते. देशांतर्गत डेटा सेंटरमुळं या डेटाचं व्यवस्थापन भारतीय करतील आणि डेटा देशातच राहील. या डेटा सेंटरद्वारे पुरवल्या जाणाऱ्या क्लाऊड तंत्रज्ञानापासून ते सर्वसामान्य ग्राहक दररोज वापरत असलेल्या मायक्रोसॉफ्ट ऑफिसपर्यंत अनेक सॉफ्टवेअर अल्प मासिक शुल्क भरून वापरता येणार आहेत. विशेष म्हणजे स्टार्टअप कंपन्यांना अनेक सेवा नि:शुल्क उपलब्ध असतील. मध्यम आकाराच्या कंपन्यांना क्लाऊड सेवा केवळ दीड हजार रुपये प्रतिमहिना इतक्या कमी दरात वापरता येणार आहे.

उच्च तंत्रज्ञान केवळ मूठभर श्रीमंतांसाठी विकसित झालं, तर त्याचा खऱ्या अर्थानं फायदा झाला असं म्हणता येणार नाही. त्याचा वापर जर बहुसंख्य वापरकर्त्यांना करता आला, तरच ते उपयुक्त आहे, असं म्हणता येतं. मुख्य म्हणजे ते भारतासारख्या विकसनशील देशातील नागरिकांना परवडण्याजोगंही हवं. आपल्या देशात सुमारे देशात तीस ते पन्नास लाख छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्या आहेत. FTTHद्वारे इंटरनेटमध्ये येणाऱ्या या नव्या क्रांतीमुळं मध्यम आणि लघुउद्योगांना फायदा तर होईलच. सोबतच छोट्या दुकानदारांना किंवा कॉम्प्युटरवर आधारित उद्योग करणाऱ्या कुणालाही वेगवान इंटरनेटमुळं आपली उत्पादनं जगभर पोचवता येतील. घरून एकेकटं काम करणाऱ्या सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना, वेबसाईट डिझायनर्सना किंवा दोन-तीन जणांच्या छोट्या व्यवसायाला वेगवान इंटरनेटसोबतच, व्हॉईसकॉल, मार्केटिंग, विक्री आणि डेटा सिक्युरिटी या सुविधा मिळतील.
माहिती तंत्रज्ञानातल्या क्रांतीचा पहिला टप्पा संगणकीकरणातून आपण अनुभवला. त्या लाटेवर स्वार होऊन भारत सॉफ्टवेअर क्षेत्रात जगातला एक अग्रगण्य देश बनला. आता अनेक माध्यमांना एकत्र आणणाऱ्या या नव्या तंत्रज्ञानामुळं डेटाक्रांतीचा दुसऱ्या टप्प्याला सामोरं जाणं आणि तिचा मनोरंजन आणि व्यवसाय या दोन्हींकरता लाभ कसा घ्यायचा, ते आपल्या हातात आहे.

चांगले परिणाम
- अल्पदरात वेगवान इंटरनेट जोडणी
- केवळ इंटरनेट आणि टेलिफोनच नव्हे, तर दूरचित्रवाणी मालिका, वेबसिरीज, चित्रपट, क्रीडा, संगीत, शॉपिंग, गेमिंग, एकाच वेळी अनेक लोकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यांसारख्या अनेक सुविधा
- देशांतर्गत डेटा सेंटरमुळं भारतीयांची माहिती परदेशात साठवली जाणार नाही
- वस्तुजाल म्हणजेच ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चा मोठ्या प्रमाणात विस्तार

हेही होणार
- केबल आणि वायरलेसद्वारे इंटरनेट सेवा देणाऱ्या अन्य पुरवठादारांना कंपन्यांना मोठी स्पर्धा
- अशा छोट्या कंपन्यांचे विलीनीकरण होण्याची किंवा त्या बंद पडण्याची शक्यता
- डिश अॅन्टेनाद्वारे चॅनेल्स पुरवणाऱ्या टाटा स्कायसारख्या कंपन्यांनाही मोठा फटका
- एअरटेल, बीएसएनएल, एमटीएनल या लॅंडलाईन टेलिफोन कंपन्यांसमोर नवे आव्हान
- पहिल्याच दिवशी नवे चित्रपट घरीच पाहण्याच्या सुविधेमुळं मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांना फटका बसण्याची शक्यता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com