‘सजग संवाद महत्त्वाचा’ (वैभव मांगले)

वैभव मांगले
रविवार, 19 जानेवारी 2020

पूर्वी मला सिगारेट ओढण्याची सवय होती. पौलोमी त्यावेळी सहा वर्षांची होती. मुलांसमोर नको म्हणून मी बाथरूममध्ये जाऊन सिगारेट ओढत असे. एकदा पौलोमीनं मला विचारलं : ‘‘बाबा, तू बाथरूममध्ये जाऊन काय करतोस?’’ काय सांगायचं याची मला मोठी पंचाईत पडली; पण तरीही खरं सांगायचं ठरवलं.

पूर्वी मला सिगारेट ओढण्याची सवय होती. पौलोमी त्यावेळी सहा वर्षांची होती. मुलांसमोर नको म्हणून मी बाथरूममध्ये जाऊन सिगारेट ओढत असे. एकदा पौलोमीनं मला विचारलं : ‘‘बाबा, तू बाथरूममध्ये जाऊन काय करतोस?’’ काय सांगायचं याची मला मोठी पंचाईत पडली; पण तरीही खरं सांगायचं ठरवलं. मी सांगितलं : ‘‘मी सिगारेट ओढतो.’’ तिचा पुढचा प्रश्न : ‘‘सिगारेट म्हणजे काय?’’ मी उत्तर सांगितल्यावर पुन्हा तिचा प्रश्न : ‘‘मग मी पण ओढली, तर चालेल ना?’’ मी उत्तरलो : ‘‘बाळा, लहान मुलं ओढत नाहीत.’’ ती लगेच म्हणाली : ‘‘मग मी मोठी झाल्यावर ओढली तर चालेल ना?’’ हे ऐकल्यावर माझे डोळे खाडकन् उघडले आणि त्या दिवसापासून मी सिगारेट सोडली.

माझा लहानपणीचा काळ हा १९७०-७५ चा होता. खेडेगाव होतं. पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा मी अनुभवला आहे; पण आपण तसं वागायचं नाही हे मोठा होत गेलो, तसं आपोआपच मनात नक्की होत गेलं. पालक म्हणून नेहमी मुलांशी संवाद पाहिजे. तुमच्यात मतभेद असले, तरी परस्परांतला संवाद हरवू देऊ नये. आज पालक म्हणून मला एक गोष्ट जाणवते, की संस्कार, रुढी-परंपरा इत्यादी गोष्टी ठराविक वयापर्यंत तुम्हाला मुलांना सांगता येतात. त्याच्या पलीकडं त्यांचं फार मोठं जग असतं. आजूबाजूला ती पाहत असतात, निरीक्षण करत असतात. जग कुठं चाललं आहे, याचा त्यांचा व्यवस्थित अभ्यास असतो आणि एका टप्यावर ती तुमचं ऐकत नाहीत. आम्हाला हे योग्य वाटतं, आम्ही हे करतो असं ती म्हणतात. एखादी गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे हे समजण्याइतपत संस्कार त्यांच्यामध्ये पालकांनी रुजवले पाहिजेत. योग्य-अयोग्य या गोष्टी तारतम्य भाव ठेवून मुलांना समजावून सांगत राहिलात, विवेक शाबूत ठेवून, अधिकार बाजूला ठेवून मुलांना सांगत राहिलात, तर मुलंदेखील तारतम्य भाव शिकतात. सामाजाचं, परिस्थितीचं भान ठेवून मुलं व्यवस्थित वागतात.  

याउलट तुम्ही आतताईपणा, हेकेखोरपणा केलात, तर मुलं तेच शिकतात. तोच संस्कार त्यांच्यावर होतो आणि मग आपण म्हणतो त्याप्रमाणं मुलं बिघडतात. मुलं कधीच आपली आपण बिघडत नाहीत. त्याला पालकच जबाबदार आसतात.
प्रत्येक मुलाच्या आतमध्ये एक प्रेरणा असते. ती काय असते ते कुणीच सांगू शकत नाही. ती अंगभूत असते. ती बाहेरून घालता येत नाही. एकाच आई-वडिलांची मुलं असली, तरी प्रत्येकाच्या आतली प्रेरणा वेगवेगळी असू शकते. ती खूप व्यक्तिसापेक्ष असते. म्हणूनच एकाच आई-वडिलांची मुलं भिन्न स्वभावाची दिसून येतात. आपल्या मुलांमधली ही प्रेरणा पालकांना ओळखता येणं खूप महत्त्वाचं असतं. ते अवघड असतं; पण अशक्य नसतं. या प्रेरणेला खुलवणं, फुलवणं, हे पालकांचं काम असतं.
आपण सामाजिक प्राणी आहोत. त्यामुळं माणसांबदलचा, स्त्रियांबद्दलचा आदर मुलांना शिकवला पाहिजे. सामाजिक, पर्यावरणाचं भान ठेवणं शिकवलं पाहिजे. खेळणं, मनोरंजन किती महत्त्वाचं आहे याचा परिचय करून द्यावा लागतो. मुलं नशीब घेऊन येतात म्हणजे काय तर ते प्रेरणा घेऊन येतात. तिला फुलवणं हे पालकांचं काम असतं. मुलांना हवं ते जरूर घेऊन द्यावं; पण त्याची गरज किती आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. पैसे आहेत म्हणून वाटेल ते घेऊन देणं नाही चालणार. ते चुकीच्या पालकत्वात येतं. मुलाला जेवढं हवं आहे, तेवढंच किंबहुना त्यापेक्षा थोडंसं कमीच आणून द्यावं. आता कमतरता आहे, ही जाणीव त्यांना असली पाहिजे. ही कमतरता भरून काढण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, ही जाणीव मुलांमध्ये निर्माण होणं खूप गरजेचं असतं.

या वर्षाचा आमचा संकल्प याच विचारावर आधारित आहे. मी मुलांना सांगितलं, की तुम्हाला हवं ते मिळेल; पण आधी तुम्ही काम केलं पाहिजे. त्यासाठी अभ्यास चांगला करा, घरातली कामं करा, केर काढा, भांडी घासा; काही पण करा. उद्देश हाच, की काहीतरी केल्यावर काहीतरी मिळतं ही भावना त्यांच्यामध्ये रुजवणं खूप महत्त्वाचं असतं. अर्थात या सर्व गोष्टी खेळीमेळीनं करायच्या आहेत. कुठंही सक्ती नाही. एखादं काम चांगलं नाही करता आलं, तरी हरकत नाही; पण प्रयत्न केला, तर हवी ती वस्तू अवश्य द्यावी.
काही वेळा आम्ही घरात कृत्रिम आर्थिक मंदी जाहीर करतो. दोन दिवस, ‘‘आई भात एवढाच केलास का?’’ असं मुलांनी विचारलं, की सांगायचं : ‘‘अरे, तांदूळ संपलेत!’’ ‘‘आणायचे की,’’ असं मुलांनी म्हटलं, की मग आपण सांगायचं : ‘‘पैसे संपलेत. उद्या पगार झाला, की मग तांदूळ मिळेल.’’ थोडक्यात काय तर काम केल्यावर पैसे मिळतात, ही जाणीव त्यांना होणं खूप आवश्यक असतं. तसंच येणाऱ्या पैशांची आणि वस्तूंची किंमतही ती ठेवायला शिकतात. शेवटी आपण काही त्यांना आयुष्यभर पुरणार नसतो.  

मुलांसाठी प्रॉपर्टी करून ठेवणं अथवा पैसे जमा करून ठेवणं म्हणजे त्यांचं नुकसान करणं असं मला वाटतं. माझ्या पालकांनी अशी कुठलीही प्रॉपर्टी करून ठेवलेली नाही, म्हणून मी आज इथपर्यंत पोचलो. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. एखादं राहायचं घर, उत्तम शिक्षण एवढंच पालकांनी करावं. पुढचं सगळं त्यांचं त्यांनीच केलं पाहिजे. पालकांनी ते करूही दिलं पाहिजे.
याबरोबरच मुलांना स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल आदर ठेवायला शिकवले पाहिजे. खास करून स्त्रियांबद्दल. माझी मुलगी पौलोमी बारा वर्षांची आहे. तिला आम्ही आतापासूनच आदरभावना वाढव असं शिकवलं. मुलगा समिहन लहान आहे; पण त्यालाही ‘प्रत्येकाशी आदरानंच बोललं पाहिजे, अगदी घरात कामाला येणाऱ्या बाईंशीसुद्धा आदरानंच बोललं पाहिजे,’ असंच शिकवलं आहे. या गोष्टी लहानपणापासून मुलांना शिकवल्या, तर मोठेपणी ती नक्कीच चांगले माणूस बनतील.

पालकत्व ही फार मोठी जबाबदारी आहे; पण दुर्दैवानं आपल्या देशात त्याची खूप कमतरता दिसते. बरेचदा पालकच योग्य प्रकारे वागताना दिसत नाहीत. खरं तर पालकांचंच शिक्षण होण्याची गरज आहे, असं मला वाटतं. कारण आज सर्वत्र सामाजिक अनारोग्य वाढलेलं दिसतं. मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या शहरांचे उकिरडे करून ठेवल्याचं दिसतं. याला आपणच जबाबदार आहोत. आपल्याला सामाजिक भान नाही. आपण दुचाकी घेतो; पण हेल्मेट घालत नाही. गेल्या काही वर्षात आपण किती गोष्टींचं बकालीकरण करायला सुरुवात केलीये. नद्या, रस्ते, सार्वजनिक स्वच्छतागृहं हे बघून तो देश स्वतःबद्दल काय विचार करतो, याचा अंदाज येतो. ज्या देशात सार्वजनिक स्वच्छतागृहं स्वच्छ नाहीत, वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत, तो देश किती बेशिस्त आहे हे कळतं. जोपर्यंत आपण शिस्तीत वाढत नाही, तोपर्यंत विचारांत शिस्त येत नाही. परिणामी तुम्ही कुणाला जाब विचारात नाही आणि क्रांती घडत नाही. सध्याच्या काळात आपली परंपरा, आपला इतिहास याचा काही उपयोग नाहीये. या सगळ्या गोष्टी पालकांनी प्राथमिक आणि आवश्यक पातळीवर मुलांना शिकवायला पाहिजेत. मी स्वतः असे सर्व नियम पाळतो. त्यामुळं मुलांनाही आपोआपच नियम पाळण्याची सवय लागलेली आहे. आपल्याकडे महागड्या गाड्यांमधून जाणारे लोक गुटखा थुंकतात, पाण्याच्या बाटल्या रस्त्यावर फेकतात. कुठं चाललो आहोत आपण? या गोष्टींसंदर्भातलं भान मुलांना लहानपणापासून पालकांनी दिलं पाहिजे. एकदा मी मिठी नदीच्या जवळून जात होतो, तेव्हा मुलं म्हणाली : ‘‘बाबा, ही कचरा टाकण्याची जागा आहे का? केवढा कचरा आहे!!’’ मी म्हणालो : ‘‘नाही रे, ही नदी आहे.’’ लगेच त्यांचा पुढचा प्रश्न : ‘‘बाबा, नदी अशी असते?’’ मी सांगितलं : ‘‘नाही रे, माणसं तशी बनवतात; पण आपण नाही करायचं तसं. आपण सर्व प्रकारच्या कचऱ्याची योग्य प्रकारेच विल्हेवाट लावायची. अगदी छोटा कागदही कचराकुंडीतच टाकावा.’’ याबरोबरच ‘सार्वजनिक ठिकाणी मोठ्यानं बोलू नये, हॉर्न अगदी कमीत कमी वाजवायचा असतो,’ हे चांगला नागरिक होण्याचे धडे लहानपणापासूनच दिले पाहिजे. त्यासाठी मुलांशी सतत संवाद साधला पाहिजे. मुलांना तुम्ही काही दिलं नाही तरी चालेल; पण संवाद साधणं खूप गरजेचं असतं. मुलं खूप भावनिक असतात. त्यांना फक्त आई-वडील हेच विश्व असतं. केवळ लहान वयातच नाही, तर किशोर वयातही त्यांना आई-वडिलांची अतिशय गरज असते. या वयात मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. नेमकं काय होतय हे मुलांना कळत नाही. त्या काळात पालक त्यांच्याशी फटकून वागत असतील, तर मुलांना त्याच्यासारखं दुसरं दुःख नसतं. आपलं या जगात कुणीही नाही ही निराशाजनक भावना मुलांच्या मनात निर्माण होते. मग ती बाहेर आधार शोधतात. तो आधार सुदैवानं चांगला मिळाला, तर ठीक आहे; पण वाईट आधार मिळाला तर मुलांच्या आयुष्याची माती होते. म्हणून पालकांनी मुलांशी नेहमी मनमोकळा संवाद ठेवला पाहिजे. काही वेळा मुलं चुकतील; पण तुम्ही त्यांना चूक सुधारायची संधी दिलीत, तर खात्रीनं सांगतो - ती पुन्हा चुकीचं वागणार नाहीत. आपल्या परीनं आपण शंभर टक्के चांगले पालक होण्याचा प्रयत्न करायचा. यशस्वी होऊच असं नाही; पण एक चांगला नागरिक घडवण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे?  

बरेचदा मुलंही आपल्याला खूप गोष्टी शिकवत असतात. ती आपलं खूप सूक्ष्म निरीक्षण करत असतात. एकदा माझं आणि पत्नी मयूरीचं काही भांडण झालं होतं आणि परस्परांत अबोला सुरू होता. अशा परिस्थितीत मुलं खूप तणावाखाली असतात. त्याचा मुलांवर बराच परिणामदेखील होतो, असं माझं निरीक्षण आहे. त्यावेळी माझी मुलगी पौलोमी आम्हा दोघांना म्हणाली : ‘‘तुम्हीच आम्हाला शिकवता, की भांडण करायचं नाही. छान बोलायचं वगैरे! पण आता तुम्हीच असं वागत आहात!’’ हे ऐकल्यानंतर आम्हाला आमची चूक कळली. तेव्हापासून आमच्यात वाद झालं, तरी आम्ही ते लगेच मिटवून टाकतो. एकमेकांशी सकारात्मक संवाद साधतो. त्यामुळं आम्हाला फायदा तर झालाच; पण घरचं वातावरणही पूर्वीपेक्षा अधिक निखळ राहू लागलं.

पूर्वी मला सिगारेट ओढण्याची सवय होती. पौलोमी त्यावेळी सहा वर्षांची होती. मुलांसमोर नको म्हणून मी बाथरूममध्ये जाऊन सिगारेट ओढत असे. एकदा पौलोमीनं मला विचारलं : ‘‘बाबा, तू बाथरूममध्ये जाऊन काय करतोस?’’ काय सांगायचं याची मला मोठी पंचाईत पडली; पण तरीही खरं सांगायचं ठरवलं. मी सांगितलं : ‘‘मी सिगारेट ओढतो.’’ तिचा पुढचा प्रश्न : ‘‘सिगारेट म्हणजे काय?’’ मी सांगितलं : ‘‘अशी एक तंबाखू असलेली नळी असते. तिचा धूर ओढला, की छान वाटतं.’’ पुन्हा तिचा प्रश्न : ‘‘मग मी पण ओढली तर चालेल ना?’’ मी उत्तरलो : ‘‘बाळा, लहान मुलं ओढत नाहीत.’’ ती लगेच म्हणाली : ‘‘मग मी मोठी झाल्यावर ओढली तर चालेल ना?’’ हे ऐकल्यावर माझे डोळे खाडकन् उघडले आणि त्या दिवसापासून मी सिगारेट सोडली.

मुलं आपल्या वागण्याचं किती निरीक्षण करतात त्याचा एक अनुभव सांगतो. आम्ही एका मॉलमध्ये गेलो होतो. तिथं मयूरीनं दोन-चार कपडे घेतले, तर पौलोमीनं बरेच घेतले. त्यात तीन-चार फ्रॉक, चार-पाच टॉप, काही लेगिन्स वगैरेचा समावेश होता. मयूरी मला म्हणाली : ‘‘तू पण काहीतरी घे की.’’ ‘‘मला आता काही नकोय,’’ असं मी तिला सांगितलं. आम्ही बिल देण्यासाठी आलो, तेव्हा पौलोमीनं तीन फ्रॉक, दोन टॉप बाजूला काढून ठेवले. मी विचारलं : ‘‘बाळा, तू हे का काढून ठेवते आहेस?’’ त्यावर ती म्हणाली : ‘‘बाबा, मला एवढे कपडे खूप झालेत. आता यामध्ये तू स्वतःसाठी काहीतरी घे.’’ तिला वाटलं होतं, माझ्याकडं पैसे नाहीत आणि आपलं बिल जास्त झालं, म्हणून बाबा काही घेत नाही. मी तिला ‘तसं काही नाही,’ असं बरेचदा सांगितलं; पण तिनं मला एक शर्ट घ्यायलाच लवला. हा प्रसंग माझ्यासाठी खूप काही सांगणारा होता. लहान वयात मुलं आपल्यावर किती अवलंबून असतात. त्यात भावनिकरित्या जास्तच असतात. पालक या भावना कशा हाताळतात हे खूप महत्त्वाचं असतं. त्यांच्या भावनांचा गैरफायदा पालकांनी कधीच घेऊ नये. नुसतं भावनाप्रधान असूनही उपयोगाचं नसतं, हेदेखील आम्ही मुलांना समजावून सांगितलं. माणसं समजली पाहिजेत.

माझ्या व्यस्त वेळापत्रकामुळं मुलांबरोबर जास्त वेळ घालवता येत नाही; पण तरीही वेळ मिळेल, तेव्हा जास्तीत जास्त वेळ मी मुलांबरोबर घालवतो. अजून तरी मुलांना मोबाईलची सवय लागलेली नाही. मात्र, भविष्यात ती गरज पडेल, तेव्हा तो त्यांना द्यावाच लागेल. मात्र, त्यातही तो किती वापरायचा हे सांगणं पालकांचंच काम आहे. मी स्वतः व्हॉट्सअॕप सोडता कोणत्याही सोशल मीडियावर नाही. कामाची गरज म्हणून आम्ही व्हॉट्सअॕप वापरतो.  

मुलं मोठी होतात, तसं त्यांचं वावरण्याचं क्षेत्रही विस्तारतं. मित्र परिवार वाढतो. अशा वेळी अधिक सजग संवाद मुलांबरोबर असावा. मुलांचं म्हणणं ऐकून त्यांच्या पातळीवरून काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. बदलत्या काळाचा विचार करून त्यांचं म्हणणं स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. तुमच्यात दोन्ही बाजूंनी संवाद असेल, तर मुलं चुकण्याची शक्यता खूप कमी होते. शेवटी चुका या सापेक्ष असतात. चुकलेल्या मुलाला योग्य प्रकारे समजावून योग्य मार्गावर आणणं हेदेखील पालकत्वाचं महत्त्वाचं अंग आहेच. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही मुलांना कसा आणि कोणता सल्ला देतात यावर मुलांची संस्कारांची इमारत उभी असते. तेव्हा प्रत्येक वेळीच पालकांनी सजग राहिलं पाहिजे.
(शब्दांकन : मोना भावसार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang vaibhav mangle write parents article