आनंदाचा "पत्ता' (वंदना धर्माधिकारी)

vandana dharmadhikari
vandana dharmadhikari

कोरोनाच्या संसर्गामुळे सगळे जण घरोघरी बसून आहेत, त्यामुळे पत्त्यांचे डाव छानपैकी रंगत आहेत. सहकुटुंब खेळले जाणारे पत्ते म्हणजे खरं तर आनंदाचा ठेवा आहे. अगदी "भिकार-सावकार'पासून "लॅडीज'पर्यंत पत्त्यांचे किती तरी खेळ खूप मजा आणतातच; पण वेगवेगळ्या प्रकारची शिकवणही देतात.

कोरोनाच्या संसर्गामुळे सगळेच सध्या घरात बसून आहोत. कारण काही असो, घरातले सगळे एकत्र असतात, तेव्हा पत्त्याचे डाव टाकलेच पाहिजेत, नसेल तर आता टाका. एका पिढीकडून पत्त्यांचे नवेजुने प्रकार दिले-घेतले जातात. खूप गंमत येते, भांडण होतात; पण मज्जा विचारूच नका. पत्त्याच्या खेळातली भांडणं एका डावात विरघळतात. एकेक खेळ खेळता खेळता पत्ते संस्कारही देतात, हे माझं अगदी ठाम मत आहे. सांगतेच प्रत्येक खेळात लपलेली शिकवण.

"भिकार सावकार' एकटे किंवा जोडीदाराबरोबर खेळताना हरलो, की हार स्वीकारायची असते. कधी कफल्लक, तर कधी खूप पत्ते, अगदी हातात मावणार नाहीत म्हणजे श्रीमंतच! काय शिकविणार मुलांना ः "बाळा, सगळे दिवस सारखे नसतात. गरिबीमागून श्रीमंती येते. आता कमी पत्ते, पुढच्या वेळेला खूप मिळतील. धीर धर. आहे ते तर तुझेच आहेत.' हाच पहिला डाव आणि पहिली स्वीकाराची शिकवण- तीही अतिशय प्रामाणिकपणे. दोन-तीन वर्षाच्या बालकाशी खेळतानाही हे सांगता येतं.
तिघांत खेळायचे "पाच-तीन-दोन!' सोपा, ओढाओढीचा, हुकमाच्या लॉटरीचा खेळ आहे. प्रत्येकानं एकेक पान टाकल्यावर ज्याचं पान भारी त्याचा तो हात समजतात. कमी-जास्त होतात हात, तेव्हा दुसऱ्याचं ओढायचे आणि कमी झाले तर दुसऱ्याने हात ओढले समजायचं. हात अधिकाधिक करायचा प्रयत्न म्हणजे आपली ठेव वाढवायची. "मी कमावलेलं फक्त माझंच नाही, तर त्यावर इतरांचासुद्धा हक्क आहेच. मागील देणे स्वखुषीने द्यायचे.' हात ओढण्यात मजा येते, वरून तिसरं की शेवटी हात देणार? त्यानुसार दुसऱ्याला विचारून वसुली करायची म्हणजे वसुली हवीच. आयुष्यात कधी काही मागायची वेळ आलीच तर बिनधास्त मागायचं.

"बदाम सात' बघू यात सांगतात? बदाम सत्ती प्रथम, नंतर इतर पत्ते. सत्तीला तिचा मान द्यायचा. बाकीच्या सत्त्या नंतर. सत्तीमागे छक्की, पुढे अठ्ठी लावायची. यांच्याशिवाय इतरांना यायला बंदी. प्रत्येकानं आपली पत ओळखून राहावं. उद्या झरोका म्हणाला, "मला खिडकीइतकं मोठं व्हायचं, तर चालेल का?' कित्ती चुकीचं! कधी कुठल्या रांगेत उभे राहिलात, तर आपला नंबर आल्याशिवाय मध्ये घुसायचं नाही. साधी आवश्‍यक शिकवण आहे यात.
"लॅडिज'मधून वख्खई डाव चार/सहा/आठ गड्यांमध्ये मस्त रंगतो. हा खेळ सांगतो, की कुठल्याही परिस्थितीत आपल्या जोडीदाराला साथ द्यायची. वख्खई नावाची सुरेख संधी पटकन पकडायची. एकदा हुकली तर संधी गेलीच म्हणून समजा. म्हणा दुसऱ्या प्रकारे दुसरी संधी येतेच परतपरत. शिकायचं, की आलेली संधी सोडायची नसते, तिचं सोनं करता आलं तर छानच होणार!

बऱ्याच खेळांमध्ये हुकमाला महत्व असते. थोडेसे डाव खेळल्यावर हुकमाची दुर्रीदेखील कशी कामास येते ते समजतं. आपल्या सहवासात एखाद-दुसरं हक्काचं माणूस, हुकमाचं जपायचं असतं जवळ. ते ओळखायचं. अशीच माणसं प्रसंगी मदतीला येतात हुकमाच्या दुर्रीतिर्रीसारखी. शोधा कोण आहे तुमच्या पाठीशी उभं राहणारं?
पत्त्यात कोणी तरी गाढवही होतं. गाढव म्हटल्यावर वाईट वाटतं ना! काही तर रडतात लगेच. खेळण्यातलं गाढव त्यात रडायचं काय? खरंखुरं थोडंच, मग कशाला चिडायचं. उलट, पुढल्या डावात दुसऱ्याला गाढव बनवायचं आणि आपण सुटायचं. कोणी चेष्टा केली, चिडवलं तर रडायचं नाही आणि वाईट वाटून घ्यायचं नाही. एकप्रकारे झालेला अपमान गिळायला इथंच शिकवलं जाते. पत्त्यातले गाढव स्वीकारले की आयुष्यात आपोआप आपली फजिती झाली तरी त्रास होत नाही. कमीपणा सहजगत्या घ्यायला जमतं. "झब्बू', "चॅलेंज'," गुपचूप' म्हणजे "स्पून डॉंकी'सारख्या खेळात गाढव व्हावंच लागतं. मग, गाढवाचा आवाज काढतं पत्ते वाटायचे.

"चल उचल. खोटं पान लावलंस ना. चॅलेंज तुला. कसं पडकलं मी.' अतिशय मोलाची शिकवण देणारा खेळ. चुकीचं कोणी वागताना, काही करताना दिसलं/समजलं, तर त्याला अडवलंच पाहिजे. अगदी समोर दिसतं असतं, की यामध्ये कोणाचंतरी वाईट हा माणूस करत आहे, तरी त्याला विचारायचं नाही? प्रतिबंध करायचा नाही? मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ही अवस्था. आजूबाजूला आजकाल कोणी कोणाला काहीही बोलत नाहीत. माझं काय त्यात? झाले पायउतार. बरोबर नसतं असं वागणं.
लहानपणी स्मरणशक्तीला खतपाणी घालणारे पत्तेच असतात. सगळे पत्ते जमिनीवर पालथे, आणि एकेक उचलून जोड्या लावायच्या. आधीचा पत्ता कुठे पालथा टाकला तोच लक्षात ठेवून उचलायचा. गजबजलेल्या या दुनियेत माझा मित्र, जोडीदार कुठे बरं गेला? ताण द्यायचा स्मरणशक्तीला. सापडला!

कोणाकडे काय पत्ते गेले होते ते लक्षात ठेवून पत्ते मागून जोड्या जमवून परत जोड्या आठवायच्या असा खेळ फारच सुंदर आहे "नाटे ठोंब.' "राजा' व्हायचं ध्येय ठेवून खेळायचं. संपूर्ण लक्ष खेळात हवं. आठवून विचारांती, पान कोणाकडून कोणाकडे गेलं त्यानुसार मागणी करायची. कोणाकडे काय आहे, कोणी कशाला नाही म्हटलं, याचा संबंध कसा लावायचा ते जमलं पाहिजे. असलेलं पान मागितलं, की लगेच दिलं. स्वत:कडची एखादी वस्तू दुसऱ्याला दिल्यावर घेणाऱ्याचा चेहरा पाहताच देण्यातलं सुख जाणवतं. आपल्याला जर कशाची गरज भासली आणि ते आपल्याकडे नाही तर सरळ शेजाऱ्याकडून मागून आणावं. काही बिघडत नाही. ही एक शिकवण झाली. शेजार यासाठीच असतो. त्यानं तर आपलेपणाचं नातं प्रस्थापित होऊन मुरतं. उगीचच कशाला, काय म्हणतील, असं म्हणत शिष्टपणे वागू नये. आज तुम्हाला गरज लागली, उद्या जर त्यांना लागली आणि मागितलं काही तर नक्कीच मदत करा. शेजारधर्म हाच! सर्वांत महत्त्वाचं "नाही' म्हणता आलं पाहिजे. "नाही' म्हणायला धाडस, ताकद, मनोनिग्रह, स्पष्टवक्तेपणा लागतो. नाहीतर आहेच वाहत्या पाण्यासारखे प्रवाहपतित होणं नशिबी. "नाटे-ठोंब'मध्ये डोक्‍यात विचारांची गती वाढते, त्याची सवय इथं लागते. गट्‌स मुरवणं, वाढवणं आणि वेळोवेळी वापरणं इथंच शिकायचं. मुलांची हुशारी हळूहळू नक्कीच वाढत जाते.

खेळात हुशारी लागणारा खेळ आहे "तीनशे चार.' कस लागतो एकेकाच्या विचारसरणीचा, डावपेचांचा, अंदाज बांधण्याचा. तोंडी बेरीज-वजाबाकी भरभर करायची सवय लागते. आकडेमोड ठराविक चौकटीत बसवायची असते, चौकटीबाहेर पडायचं नाही. व्यवहारचातुर्य अंगी रुजवायचं आणि यशाच्या पायऱ्या चढत पुढं सरकायचे. त्यानुसार मिळतात बिल्ले, तुमचा डाव झाल्यावर लाल बिल्ले नाहीतर काळे बिल्ले. खेळातली महत्त्वाची व्हीआयएमपी असते जोडी. पेअर! लग्न! मॅरेज! जी राणी तोच राजा असले, की आदर मानसन्मान मिळतो. चौकटच्या राजाला एकच डोळा आहे, तरी चौकटची राणी त्याच्याबरोबर असते. गडबडगोंधळ, लपवाछपवी, विश्वासघात, मनस्ताप, पश्‍चाताप, डोकेदुखी... नको रे बाबा! पण, कशाला धावावं दुसरीकडे? जो जोडीदार आहे, त्याबरोबर स्वत: नांदावं शिवाय नांदतानांदता दुसऱ्याला नांदायला लावावं.

अत्यंत महत्त्वाचं तंत्र पाळायचं सांगते ते म्हणजे पैसे लावून, काही पणास लावून कधीही पत्ते खेळायचे नाहीत. रमी मस्त टाईमपास असते. एक प्युअर सिक्वेन्स लागतोच. डोकं लागतं चालवायला. ब्रिज खूप विचार करून, अनेक नियमांत बांधून खेळायचा खेळ आहे. विचारपूर्वक, शांतपणे, दुसऱ्याचा अंदाज घेतघेत खेळी करणं आलं. एकुणात काय तर पत्त्यांचे खेळ मेंदूला चालना देतात, परिस्थितीचा विचार करून तोल सांभाळायला शिकवतात. त्याबरोबर मनोरंजन, दंगामस्ती, भांडाभांडी, एकत्र येणं, गट्टी जमणं, खूप काही शिकणं, अंगतपंगत, भेळपार्टी, आणखीन काहीही होतं तिथंच. विचारूच नका.

झब्बूचे प्रकार किती तरी. गड्ड्या, एकपानी, खुला आणि काहीतरी. इथं कधी एकच पत्ता द्यायचा, तर कधी खूप पत्ते द्यायचे. नियमानुसार असेल तसं. कधीकधी वाटते, खूप द्यावेत; पण नाही करता येत. संयम हवा हीच शिकवण झाली. शिवाय, ओपन झब्बूत पटापट बेरीज करावी लागते. शेवटी राहतो तो गाढव. त्याला लावा शेपूट.
"मेंढीकोट', "गुलामचोर', "सातआठ' यांची मज्जा औरच असते. "सिक्वेन्स' आठ-दहा जणांना खेळता येतो. चौफेर लक्ष, कुठं काय हवं, काय संपलं, अडवाअडवी डावपेच आलेच. त्यावर जिंकणं अवलंबून. मस्त रंगतो याचा डाव. बंगला बांधणं, डाव लावणं हे तर एकटेपणाचे खेळ वेळ घालवायला. ऑनलाईनही खेळता येतात काही खेळ.
अजूनही खूप काही सांगता येईल. पत्त्यांची माहिती तर दिलीच नाही. महत्त्वाची संस्कारांची बीज रुजवात सांगितली. माणसाला माणूस म्हणून जगताना सुसंस्कारीत मार्गावरची महत्त्वाची पायरी पत्ते आहेत. संस्कारांची अमूल्य शिकवण पत्ते मुलांना देऊन सक्षम सुसंस्कारित करत राहतात. प्रत्येकातून आपण काय घेतो यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरी आहात तर घ्या हेच संस्कार मोती ओंजळी भरभरून कायम सांभाळण्यासाठी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com