यू टर्न (वसुंधरा अर्जुनवाडकर)

वसुंधरा अर्जुनवाडकर
रविवार, 8 डिसेंबर 2019

दुःखद बातमी कळल्‍यानंतर दोन्ही मुलं येऊन गेली. वडील गेल्याचं दुःख नीरज-नेत्राला झालंच; पण दोघंही चटकन्‌ सावरले. तिला मात्र सावरायला साहजिकच काहीसा वेळ लागला. आयुष्यभराचा जोडीदार असा एका रात्रीत अचानक कायमचाच निघून जातो हा धक्का तसा पचण्यासारखा नव्हताच...

दुःखद बातमी कळल्‍यानंतर दोन्ही मुलं येऊन गेली. वडील गेल्याचं दुःख नीरज-नेत्राला झालंच; पण दोघंही चटकन्‌ सावरले. तिला मात्र सावरायला साहजिकच काहीसा वेळ लागला. आयुष्यभराचा जोडीदार असा एका रात्रीत अचानक कायमचाच निघून जातो हा धक्का तसा पचण्यासारखा नव्हताच...

संध्याकाळचे पाच वाजले तशी ती उठली. फ्रेश झाली. अंगातला पंजाबी ड्रेस बदलला. बॉब कट केलेल्या केसांवरून एक हलकासा कंगवा फिरवला आणि ती मंदिराकडे निघाली. मंदिरात शिरताना दारातल्या फुलवाल्यानं नेहमीप्रमाणे तिच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेतलं कौतुकमिश्रित आश्चर्य तिच्या आता परिचयाचं झालं होतं.
इतकी वर्षं परदेशात राहून औदुंबरसारख्या गावात ती येऊन राहिली
याबद्दल सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटत होतं. खरं तर तिलाही काही वर्षांपूर्वी असं तिच्याबद्दल कुणी सांगितलं असतं तर तिनं विश्वास ठेवला नसता. देवाचं दर्शन घेऊन ती निवांतपणे नदीकाठावरच्या पायऱ्यांवर बसली. कृष्णेच्या संथ पाण्याचा प्रवाह बघून तृप्त झाली.

खरं तर लग्नानंतर ती पुण्यातच राहिली होती; पण मधून मधून ती औदुंबरला सासरी स्वप्नीलच्या आई-बाबांकडे यायची. याच नदीकाठावर स्वप्नीलबरोबर ती अनेकदा फिरली होती. पुढच्या आयुष्याची अनेक स्वप्नं त्या दोघांनी याच नदीकाठावर पाहिली होती. स्वप्नीलच्या बुद्धिमत्तेला अमेरिका खुणावू लागली आणि एक दिवस तिकडे जाण्याचा निर्णय त्यानं घेतला. गावी औदुंबरला येऊन
त्यानं आई-बाबांना तसं सांगितलं. त्यांच्या डोळ्यांत लेकाबद्दलचं, त्याच्या हुशारीबद्दलचं कौतुक दाटून आलं. दोघं इतक्या लांब सातासमुद्रापार जाणार म्हटल्यावर त्यांना थोडं वाईट वाटलं आणि बरीचशी काळजीही वाटली; पण त्यांनी त्यांना अडवलं नाही.
मुलगा इतक्या लांब जातोय याचं त्यांनी भांडवल केलं नाही, उलट प्रोत्साहनच दिलं. पहिल्यांदा ते फक्त दोनच वर्षांसाठी जाणार होते. हळूहळू दोनाची पाच वर्षं झाली आणि नंतर ते कायमचेच तिथले झाले. पहिल्यांदा गेले तेव्हा थोरला नीरज फक्त दीड वर्षाचा होता. काही दिवसांनी नेत्राचा जन्म झाला. हळूहळू दोघं तिथंच रमले. दोन-तीन वर्षांनी ते आई-बाबांना भेटायला येत. महिनाभर सवड काढून राहत.
तिला सासू-सासरे आई-बाबांसारखेच वाटत. सासूबाईंना ती तिथल्या अनेक गोष्टी सांगे. तिकडे येण्याचा आग्रह करी. कुतूहलापोटी ते एकदा तिकडे गेलेसुद्धा. तिकडचं जग त्यांनी आश्चर्यचकित नजरेनं पाहिलं; पण ते तिथं रमले मात्र नाहीत. त्यांना आपलं आपल्या गावीच बरं वाटे. ते गावी परतले.
***

स्वप्नीलचं भारतात येणं हळूहळू लाबंत गेलं. मुलांच्या परीक्षा आणि इतरही अनेक कारणं आडवी येत राहिली. त्यातच तिनंही छोटीशी नोकरी स्वीकारली. हे सगळं करता करता किती तरी वर्षं भर्रकन्‌ निघून गेली; पण ती सासू-सासऱ्यांना मात्र वरचे वर आठवणीनं फोन करत असे. त्यांच्या तब्येतीबद्दल काळजी घ्यायला सांगत असे. तिथल्या डॉक्टरांसोबत फोनवर बोलून त्यांच्या तब्येतीविषयी जाणून घेत असे. सासूबाई चेष्टेनं म्हणायच्या :‘‘अगं, तिथं राहून तू मनानं इथंच आहेस की काय!’ यावर तीही प्रसन्नपणे हसायची.
सासरे अचानक गेले. त्यांचं अंत्यदर्शनही तिला घेता आलं नाही. स्वप्नील एकटाच पुढं गेला होता. ती दोन्ही मुलांना घेऊन नंतर दोन दिवसांनी आली. सर्व आटोपल्यावर तिनं सासूबाईंना आपल्याबरोबर येण्याचा आग्रह केला; पण त्यांनी ठाम नकार दिला. ‘तब्येत चांगली आहे तोपर्यंत इथंच राहते’ म्हणाल्या. तिनंही त्यांना समजून घेतलं; पण पुढं त्या आजारी पडल्यावर मात्र ती सलग दोन महिने त्यांच्याजवळ राहिली. तिनं त्यांची मनापासून सेवा केली. आजूबाजूच्या बायका आश्चर्य करायच्या, तिचं कौतुक करायच्या. सासूबाईंच्या भाग्याचा हेवा करायच्या. त्या दोन महिन्यांत तिनं घराच्या बऱ्याच दुरुस्त्या करून घेतल्या, बऱ्याचशा सोई-सुविधा करून घेतल्या, रंगरंगोटी केली. सासूबाईंना अगदी भरून आलं. तिनं दाखवलेल्या आपुलकीनं त्यांनी समाधानानं डोळे मिटले.  
***

परत अमेरिकेत गेल्यावर ती पुन्हा तिच्या रुटीनमध्ये रमली. परत कामावर जाऊ लागली. मुलं मोठी होत होती. नीरजनं तिकडच्याच एका मुलीशी आंतरधर्मीय लग्न केलं. नेत्रानंही तिकडेच स्थायिक झालेल्या भारतीय तरुणाची जोडीदार म्हणून निवड केली. दोन्ही मुलं आपापल्या संसारात रमून गेली. ती आणि स्वप्नील मुलांशी व्हिडिओ कॉलवर बोलत असत. दोघांच्या नोकऱ्या, त्यांचा संसार, त्यातल्या अडचणी समजून घेत.
मैलोन्‌ मैल ड्राईव्ह करणं, कधी कधी सायकलवरून फिरून येणं यात स्वप्नीलचा आणि तिचा वेळ छान जाई...पण एक दिवस स्वप्नील रात्री झोपला तो उठलाच नाही! दुःखद बातमी कळल्‍यानंतर दोन्ही मुलं येऊन गेली. वडील गेल्याचं दुःख नीरज-नेत्राला झालंच; पण दोघंही चटकन्‌ सावरले. तिला मात्र सावरायला साहजिकच काहीसा वेळ लागला. आयुष्यभराचा जोडीदार असा एका रात्रीत अचानक कायमचाच निघून जातो हा धक्का तसा पचण्यासारखा नव्हताच...पण काळ हे सगळ्यावरचं औषध असतं म्हणतात...हळूहळू ती स्वतःला सावरत गेली.
***

आता ती एकटीच राहत होती. स्वतःला अनेक प्रकारे कार्यमग्न, व्यग्र ठेवत होती. बऱ्याच दिवसांनी तिच्या चुलत दिरांच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण आलं. तसा तिनं त्यानिमित्तानं भारतात चक्कर मारण्याचा निश्चय केला. नाहीतरी सासूबाई गेल्यावर ती तिकडे गेलीच नव्हती. तेवढाच बदल म्हणून ती भारतात आली. त्या समारंभात सहभागी झाली. ती आल्याचा सगळ्यांना फार आनंद झाला. नाहीतरी मधल्या काळात तिनं घर दुरुस्त करून घेतलंच होतं. तिथल्या समारंभात ती अमेरिकेतला एकटेपणा विसरून गेली. लग्नासाठी एक छान पैठणी घेऊन ती नेसून ती समारंभात मिरवली. तिला एक वेगळाच आनंद मिळाला.
***

समारंभ संपल्यावर मात्र ती पुन्हा अमेरिकेत परतली तेव्हा तिच्या नकळत तिच्या मानसिकतेत मोठाच बदल घडला होता. पूर्वी प्रत्येक गोष्ट ‘ऑटोमॅटिक’ होत असल्याचं, कुठल्याच कामाला कष्ट पडत नसल्याचं तिला अप्रूप वाटे; पण आता त्यातलं नवल संपलं होतं.
त्या कृत्रिम यंत्रांबरोबरचं राहणं तिला आता कंटाळवाणं वाटू लागलं होतं. तिला माणसांची ओढ वाटू लागली होती. आजूबाजूचे लोक फक्त हात उंचावून ‘हॅलो’ म्हणत; पण त्यात जिव्हाळ्याचं असं कुणीच नव्हतं. प्रत्येक गोष्ट तिला सुंदर वाटायची; पण जवळची वाटत नव्हती. मुलं अधूनमधून भेटायला येत. मुलं परतताना तिचे डोळे व्याकुळ होत. ही व्याकुळता तिला आता ओळखीची वाटू लागली! कारण, तिच्या लक्षात आलं की स्वप्नील आणि आपण भारतातून अमेरिकेत परतताना तिचे सासू-सासरेही त्यांच्याकडे अशाच व्याकुळ डोळ्यांनी बघायचे. त्या वेळी त्यांना काय वाटत असेल हे तिला आता जाणवू लागलं...
हळूहळू हा एकटेपणा तिला बोचायला लागला. अमेरिकेतल्या
निसर्गसौंदर्यानं पूर्वी ती भारावून जायची; पण आता त्यातलं नावीन्य ओसरलं होतं. तिथल्या स्वच्छतेचं तिला आश्चर्य वाटायचं, कौतुक वाटायचं; पण आता तिचं तिकडे लक्ष जात नव्हतं. ते रुटीन झालं होतं. या एकटेपणावर उपाय म्हणून ती काही क्लब्ज्‌मध्ये जाऊ लागली; पण त्या माणसांमधला कोरडेपणा तिला आता खटकू लागला. रस्त्यानं फिरताना जाणवणारी शांतता आता तिला भयाण वाटू लागली. ती विचार करू लागली, काही उपाय शोधायला लागली आणि अंधारात एखादा काजवा चमकावा तसा तिच्या मनात विचार आला आणि तिला एकदम हलकं हलकं वाटू लागलं. डोक्यातला गोंधळ कमी झाला. मनाला तरतरीत वाटू लागलं.
इतकी वर्षं ती अमेरिकेत होती तेव्हा तिची माणसं अवतीभवती वावरत होती. तिला त्यांची संगत-सोबत होती. आता ती माणसं सोबत नसल्यामुळे की काय तिचा उदासपणा आणि उदासीनताही वाढत गेली. मध्यंतरी भारतात येऊन गेल्यावर तिथल्या लोकांमधली एकमेकांबद्दलची आपुलकी तिला आठवली आणि आपण परत भारतात गेलो तर...असं तिच्या मनात आलं. प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? नाहीतरी इथं येताना तरी या देशाबद्दल, इथल्या लोकांबद्दल कुठं काय माहीत होतं आपल्याला? आणि तरी आपण इथं इतकी वर्ष राहिलोच की! आता तर परत भारतात गेल्यावर तो परिसर, ती माणसं माहीत तरी आहेत आपल्याला. करायचा का प्रयत्न?  बघू या तरी...
* * *

नीरज-नेत्राला तिनं तिचा निर्णय सांगितला. नीरजला तर तो एक वेडेपणाच वाटला.
‘‘अगं, इथल्या स्वच्छतेत राहिलेली तू, तिथलं प्रदूषण कशी काय सहन करशील? तू फार काळ तिथं रमणार नाहीस,’’ त्यानं ठामपणे सांगितलं; पण विरोध मात्र केला नाही.
नेत्रानं तिला समजून घेतलं
‘‘तुला वाटतंय ना? मग जाऊन ये एकदा; पण आमच्याशी आठवड्यातून एकदा तरी व्हिडिओ कॉलवर बोलत जा,’’ नेत्रा म्हणाली.
मग ती निश्चय करून भारतात परतली. औदुंबरच्या घरात राहू लागली.
सुरवातीचे एक-दोन महिने राहिल्यावर ती परत जाईल असं भाऊबंदांना वाटलं; पण ती कायमचीच राहायला आली आहे म्हटल्यावर ते चकितच झाले. त्यांना आनंदही झाला. पहिल्यांदा तिच्याशी दबकून वागणारे ते हळूहळू मोकळे होऊ लागले. घरात केलेला वेगळा पदार्थ तिला आवर्जून आणून देऊ लागले. छोट्या छोट्या कार्यक्रमांना बोलावू लागले, तर काही वेळा मुद्दाम गप्पा मारण्यासाठी तिच्याकडे येऊही लागले. ज्या आपुलकीला ती मुकली होती ती आपुलकी आता तिला मिळायला लागली होती. हळूहळू ती तिथल्या वातावरणात रमली. अमेरिकेत नायगारा बघताना ती भारावून गेली होती, दिपून गेली होती; पण इथला कृष्णेचा शांत प्रवाह तिला आता जास्त आपलासा वाटू लागला. अमेरिकेतले सुनसान रस्ते तिला एकटेपणाची जाणीव करून देत; पण इथली नीरव शांतता तिला समाधान देऊ लागली. म्हणजे, इतकी वर्षं परदेशात राहूनही आपण मनानं भारतीयच आहोत हे तिला जाणवलं. एक अतीव समाधान इथं आल्यावर तिला मिळालं होतं.
***

अंधार पडायला लागला होता. कुणाच्या तरी हाक मारण्यानं तिची तंद्री भंगली. ती घरातून बाहेर आली. भाऊबंदांपैकी एक मुलगा तिला भेटायला आला होता.
तो म्हणाला : ‘‘काकू, मला अमेरिकेत जॉब मिळालाय. पुढच्या महिन्यात मी जाणार आहे.’’
त्याच्या डोळ्यांत तिला स्वप्नं दिसली...स्वप्नीलनं आणि तिनं मिळून
एकेकाळी अशीच स्वप्नं पाहिली होती. ती प्रसन्न मनानं हसली. तिनं त्या मुलाला तोंडभरून आशीर्वाद दिला. त्याचं कौतुक केलं.
...आणि शांत मनानं ती घरात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang vasundhara arjunwadkar write u turn article