esakal | खडकातला मंजूळ झरा (अनिता पाध्ये)
sakal

बोलून बातमी शोधा

anita padhye

खडकातला मंजूळ झरा (अनिता पाध्ये)

sakal_logo
By
अनिता पाध्ये anitaapadhye@gmail.com

प्रतिभावंत संगीतकार खय्याम यांचं नुकतंच (ता. १९ ऑगस्ट) निधन झालं. त्यांच्यातल्या माणुसकीच्या विविध पैलूंचं दर्शन सिनेपत्रकाराच्या नजरेतून...

सिनेपत्रकारितेत कारकीर्द सुरू केल्यानंतर ‘जान-ए-वफा’ या चित्रपटाच्या रेकॉर्डिंगच्या वेळी खय्यामसाहेबांना मी प्रथम भेटले होते. आजही तो प्रसंग मला जशाच्या तसा आठवतो. स्टुडिओतल्या रेकॉर्डिंग रूममध्ये मी पाऊल टाकत नाही तोच, रेकॉर्डिस्टला काही सूचना देत असलेल्या, खय्यामसाहेबांनी मान वळवून माझ्याकडं पाहिलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ‘ही कोण आहे? कशाला आली आहे?’ असे त्रासिक भाव अगदी स्पष्टपणे मला दिसले होते. आपलं येणं यांना आवडलेलं दिसत नाही...मला वाटून गेलं आणि मनातून मी थोडीशी खट्टू झाले.

‘‘अच्छा, ठीक है। बैठिए, रेकॉर्डिंग होने के बाद ही मैं बात करूँगा।’’ स्वत:ची ओळख करून देत माझ्या येण्याचं कारण सांगितल्यावर रुक्ष; पण सौम्य स्वरात त्यांनी मला सांगितलं. रेकॉर्डिंग संपल्यावर मात्र रेकॉर्ड झालेल्या गाण्याविषयी, चित्रपटाच्या संगीताविषयी बोलण्यातच ते मग्न होऊन गेले.

या भेटीनंतर खय्यामसाहेबांशी पुन्हा भेट झाली ती सन २००२ मध्ये. लेखक-दिग्दर्शक कमाल अमरोही व मीनाकुमारी यांच्या जीवनावर आधारित ‘इष्काचा जहरी प्याला’ या पुस्तकावर मी काम करत होते व त्यासाठी एक दिवस खय्यामसाहेबांना फोन केला.
‘‘आप संडे दोपहर बारा बजे घर आ जाइए, मैं सिर्फ बीस मिनट बात करूँगा। आप को जो पूछना है बीस मिनट में पूछिए, और हाँ...मुझे देरी पसंद नहीं, आप ठीक बारा बजे आ जाना...’’ इतकं बोलून फोन खाडकन् बंद झाला.

पुस्तकासाठी सविस्तर, बारकाव्यांसह माहिती मिळणं गरजेचं असतं असं मला वाटतं. वीस मिनिटांमध्ये सविस्तर बोलणं कसं शक्य होईल, असा विचार करतच रविवारी दुपारी ठीक १२ वाजता मी खय्यामसाहेबांच्या घरी गेले. काही मिनिटांतच खय्यामसाहेब हॉलमध्ये आले. त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वात असलेला एक प्रकारचा दबदबा मला पुन्हा एकदा जाणवला. दोन-चार वाक्यांत पुस्तकाविषयीची माहिती देत मी त्यांचं बोलणं रेकॉर्ड करू लागले. ते अतिशय तन्मयतेनं, मनापासून
मीनाकुमारीविषयी व कमाल अमरोहींविषयी बोलत होते. हॉलमधल्या भिंतीवर लटकत असलेल्या मोठ्या घडाळ्यावर काही वेळानं माझी नजर गेली. दोन वाजायला पाच मिनिटं बाकी होती! खय्यामसाहेबांनी मला केवळ वीसच मिनिटं वेळ दिला असला तरी तब्बल दोन तास आमचं बोलणं झालं होतं. बोलणं पूर्ण होताच त्यांनी पत्नी जगजितजींना (गायिका जगजितकौर) यांना हाक मारली तशा त्या हॉलमध्ये आल्या.
‘‘ये अनिता है, कमालसाब और मीनाजीपर
कि़ताब लिख रही है। बड़ी होनहार बच्ची है। बहोत मालुमात रखती है।" त्यांनी जगजितजींना सांगितलं.
इतक्यात त्यांचा मुलगा प्रदीप हासुद्धा हॉलमध्ये प्रवेशला आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या.

‘‘रेकॉर्डिंग सुनने के बाद कुछ डिफिकल्टी होगी या कुछ और जानकारी चाहिए होगी तो मैं फिर फोन कर सकती हूँ ना?’’ निघताना मी विचारलं.
‘‘बिल्कूल, बिल्कूल। तुम्हे और भी कुछ पूछना होगा तो फोन कर के आ जाना। मैं जरूर मिलूंगा,’’ खय्यामसाहेबांच्या त्या वाक्यानं मला निश्चिंत केलं.
त्यानंतर त्या पुस्तकाची प्रस्तावना खय्यामसाहेबांनीच लिहिली आणि पुस्तकाचं प्रकाशनही त्यांच्याच हस्ते झालं.
मला आठवतंय की समारंभ संपल्याचं निवेदकानं जाहीर करताच समारंभाला उपस्थित असलेल्या मंडळींपैकी अनेकांनी स्वाक्षरी घेण्यासाठी, दोन शब्द बोलण्यासाठी खय्यामसाहेबांभोवती इतका गराडा घातला की त्यांना स्टेजवरून हलताच येईना. ते प्रत्येकाशी बोलत होते, स्वाक्षरी देत होते. शेवटी अर्ध्या तासानं लोकांना बळे बळे दूर करत आम्ही खय्यामसाहेबांना रेस्टरूममध्ये नेलं. समारंभ संपल्यानंतर खय्यामसाहेबांनी खाण्याचे पदार्थ तर दूरच; परंतु चहा-कॉफी घेण्यासही नकार दिला. प्रकाशनसोहळ्यासाठी ते संध्याकाळी साडेचार वाजता बाहेर पडले होते आणि एव्हाना नऊ वाजले होते. या साडेचार तासांत त्यांनी एक ग्लास पाणीसुद्धा प्यायलं नव्हतं.
‘‘नहीं बिटिया, हर शाम मैं शिवजी की पूजा करता हूँ और पूजा होनेतक पानी भी नही पीता। अब घर जाकर नहाऊंगा, पूजा करूँगा और फिर खाना खाऊँगा...।’’ खय्यामसाहेब म्हणाले.
होय, ते शिवभक्त होते, शंकरभक्त होते. रोज संध्याकाळी शंकराची पूजा करूनच ते जेवण करत असत.
त्या पुस्तकामुळे खय्यामसाहेबांशी माझे अगदी कौटुंबिक संबंध निर्माण झाले ते अगदी शेवटपर्यंत.
* * *

सन २०११ च्या ऑक्टोबरची ही घटना. एका सकाळी अकरा-साडे अकराच्या सुमारास खय्यामसाहेबांना भेटायला मी त्यांच्या घरी गेले होते. प्रदीप यांच्याशी बोलणं सुरू असतानाच वयाची तिशी पार केलेली जीन्स-टी शर्ट अशा पेहरावातल्या एका महिलेनं आतल्या खोलीतून हॉलमध्ये प्रवेश केला आणि सोफ्यावर माझ्या शेजारी येऊन बसत तिनं स्वत:ची ओळख करून दिली. ती होती प्रदीप यांची पत्नी. पंजाबी नवविवाहित महिला परिधान करतात तसा काचेचा चुडा तिनं दोन्ही हातांत मनगटापर्यंत घातला होता. त्यामुळे, दोघांचा विवाह होऊन फार दिवस झाले नसावेत हे माझ्या लक्षात आलं.
‘‘आज अनिता येणार आहे,’’ असं सकाळी प्रदीपनं मला सांगितलं तेव्हा मी त्याला म्हटलं की मलाही तिला भेटायचं आहे,’’ ती म्हणाली.
हिला मला का भेटायचयं असावं हे मला कळेना.
‘‘पापाजी (खय्यामसाहेब) तुमचं खूप कौतुक करत होते. मला काल म्हणाले की ही मुलगी खूप हुशार आहे, धाडसी आहे...आणि इतने दिनों के एक्स्पिरिअन्स से मैं ये जान गयी हूँ की पापाजी ऐसे ही किसी की तारीफ नहीं करते। अगर वो तारीफ करें तो समझें की वो इन्सान सचमुच तारीफ का हकदार है, इसलिए मुझे आप को देखना था।’’ प्रदीप यांची पत्नी म्हणाली.
खय्यामसाहेबांविषयी तिनं जे सांगितलं त्यात तथ्य होतं. अनेक भेटींदरम्यान एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली होती की खय्यामसाहेब सहजासहजी कुणाचं कौतुक करत नसत. चित्रपटसृष्टीत दबदबा असलेल्या व्यक्तींचंही विनाकारण तोंडदेखलं कौतुक ते करत नसत हे मी पाहिलं होतं. त्यांची स्वत:ची तत्त्वं, स्वतःचे
विचार होते व त्यांवर त्यांची नितांत श्रद्धा होती. खय्यामसाहेबांनी जे यश मिळवलं ते अत्यंत मेहनत, प्रामाणिकपणा व प्रतिभा या गुणांवरच. काम मिळवण्यासाठी त्यांनी कधीही घाणेरडं राजकारण केलं नाही. म्हणूनच कुणाची अवास्तव स्तुती करणं, भलावण करणं हे प्रकार त्यांनी केले नाहीत. त्यामुळे माझ्या अनुपस्थितीत त्यांनी माझी प्रशंसा करणं ही गोष्ट मला नक्कीच अभिमानास्पद होती.
कामाच्या व्यग्रतेमुळे पुढचे अनेक महिने मी खय्यामसाहेबांना भेटू शकले नाही. ...आणि ता. २५ मार्च २०१२ च्या संध्याकाळी माझ्या मोबाईलवर आलेला मेसेज वाचून मला कमालीचा धक्का बसला. त्या दिवशी सकाळी प्रदीप खय्याम यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाल्याविषयीचा तो मेसेज होता.
खय्यामसाहेब-जगजितजींना भेटायला जाण्याचा मला धीरच होईना. प्रदीप हा खय्याम यांचा एकुलता एक मुलगा होता. तो अत्यंत सज्जन, मृदुभाषी, मवाळ स्वभावाचा होता. तो आई-वडिलांबरोबर प्रत्येक ठिकाणी सावलीसारखा जात असे. आपल्या हयातीत आपल्याच अपत्याचं निधन होणं याचं मरणप्राय दुःख प्रत्येक आई-वडिलांना होत असतं. प्रदीप यांचं अचानक जाणं खय्याम पती-पत्नी कसं सहन करू शकतील हा विचार मला अस्वस्थ करत होता. त्या दोघांना भेटून त्यांचं सांत्वन मी कशा प्रकारे करू शकेन हे मला कळत नव्हतं.

त्यामुळे दोन दिवसांनी मी खय्यामसाहेबांच्या घरी फोन केला. सकाळच्या वेळी ते वाचन करतात हे मला माहीत असल्यानं मी मुद्दामच ती वेळ साधली होती. त्या दिवशी फोन उचलायला आता प्रदीप नव्हते. जगजितजींनी फोन उचलला. बराच वेळ त्या माझ्याशी बोलत राहिल्या. डोळ्यांसमक्ष मृत्यू पावलेल्या मुलाच्या आईच्या मनाची घालमेल, दु:ख मला जाणवत होतं. त्यांना धीर देणारी, सांत्वनाची वाक्यं बोलून मी फोन ठेवून दिला. त्यानंतर दोन-तीन महिन्यांनी खय्याम दांपत्याला भेटायला मी त्यांच्या घरी गेले होते.
मुलाच्या निधनाचं दुःख मनातल्या मनात सोसत राहिल्यामुळं हळूहळू खय्यामसाहेबांच्या शरीराच्या तक्रारी सुरू झाल्या आणि सन २०१३ ते २०१६ दरम्यान त्यांच्यावर तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र, तशा परिस्थितीतही ‘दहा क्लासिक्स’ या माझ्या पुस्तकाच्या निर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान ‘उमराव जान’ चित्रपटाच्या अजरामर संगीताविषयी बोलण्यासाठी त्यांनी मला भरपूर वेळ दिला. भरपूर माहिती दिली. इतकंच नव्हे तर, पुस्तकाच्या प्रोमोसाठी केलेल्या चित्रीकरणात, नेहमीप्रमाणे ‘अनिता बिटिया’ असं मला संबोधून माझी प्रशंसाही केली व पुस्तकाच्या यशासाठी मला तोंडभरून आशीर्वाद दिला.

प्रदीप यांच्या निधनानंतर खय्यामसाहेबांनी एक ट्रस्ट स्थापन केला.
वादक-कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांना साह्य करण्यासाठी प्रदीप व जगजितजी यांच्या नावानं हा ट्रस्ट स्थापन करण्यात आला. या ट्रस्टच्या कामात व नवनव्या चाली तयार करण्यात खय्यामसाहेबांनी स्वत:ला व्यग्र ठेवलं असलं तरी प्रदीप यांच्या जाण्यानं खय्यामसाहेब व जगजितजी यांचं विश्व उजाड झालं होतं हे नक्की. वार्धक्य व मुलाच्या निधनाचं दु:ख याचा परिणाम खय्यामसाहेबांच्या प्रकृतीवर झाला होता. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बरे होऊन ते घरी परततील असं वाटत होतं: परंतु दुर्दैवानं तसं झालं नाही. खय्यामसाहेब आज आपल्यात नाहीत; परंतु त्यांच्या सुमधुर गाण्यांच्या माध्यमातून ते यापुढंही आपल्यात वावरतच राहतील...

loading image
go to top