व्हिडिओ गेम्सचा विळखा (डॉ. विद्याधर बापट)

dr vidyadhar bapat
dr vidyadhar bapat

‘पब्जी’ गेममुळं नुकतीच एका मुलानं आत्महत्या केली. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. व्हिडिओ गेम्सचा विळखा विशेषतः नव्या पिढीभोवती वेगानं आवळला जात असल्याचं दिसत आहे. हा विळखा कमी कसा करायचा, हे व्यसन वाढत गेलं तर कोणत्या प्रकारचे परिणाम होऊ शकतात, यातून बाहेर कसं पडायचं आदी गोष्टींबाबत ऊहापोह.

तो विलक्षण भारल्यासारखा त्या खेळात बुडाला होता. जणू काही जीवन मरणाचा प्रश्न होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते. कधी त्वेष, कधी भीतीदायक गोठल्यासारखा थंडपणा, कधी विजयोन्माद ,कधी विलक्षण हताश. त्याला आजूबाजूच्या जगाचं भान नव्हतं. तो फक्त त्याच्याच त्या कृत्रिम वास्तवात होता. त्याला खऱ्या वास्तवापासून जितकं लांब पळता येईल तेवढं पळायचं होतं.  
व्हिडिओ/ कॉम्प्युटर  गेम्सच्या व्यसनात अडकलेल्या अक्षयची ही कथा आहे. अक्षय, माझ्या मित्राचा मुलगा, दहावीत मेरिटमध्ये आलेला. अकरावीत आल्यापासून अभ्यास, क्लासमधलं लक्ष उडालेला. शांत, अबोल, वरकरणी समजूतदार वाटणारा; पण आता आई-वडिलांनी कितीही समजावलं, रागावलं तरीही गेम्स खेळणं थांबवू न शकणारा. गेम्सच्या मायावी काल्पनिक विश्वात अडकलेला. जे विश्व त्याला खोट्या आभासी ताकदीचा फील देतं. ज्या विश्वात भयानक वेग, गती, उत्सुकता, हिंसा, जिंकत जाण्याचा फील आहे. त्याला एकीकडे ठाऊक आहे हे सगळं खोटं आहे; पण त्यातली नशा त्याला पुनःपुन्हा खेळण्यासाठी प्रवृत्त करते
व्हिडिओ गेम्समधे आत्तापर्यंत खूप विविध गेम्स येऊन गेले. ज्यांना केवळ फावल्या वेळातलं मनोरंजन म्हणून त्यांच्याकडे पाहता आलं नाही अशा व्यक्ती या गेम्सच्या व्यसनात अडकल्या. खूप लहान मुलं, तरुण एवढंच नव्हे, तर मोठी माणसंही अडकली. अतोनात नुकसान झालं. काही काळापूर्वी, एक अतिशय देखण्या स्वरूपातला, म्हणजे आकर्षक इफेक्ट्स, लायटिंग, साउंड इफेक्ट्स आणि अद्ययावत ॲनिमेशन असलेला ‘पब्जी’ नावाचा गेम आलाय. सुरुवातीला पीसीवर असलेला हा गेम आता मोबाईलमध्ये आलाय.

एकट्यानं एका बेटावर उतरून शस्त्रं गोळा करत एकट्यानं किंवा तिथं उतरलेल्या गेमर्सची टीम करून समोरच्या शत्रूला मारत सुटायचं. प्रचंड वेग आणि हिंसा हे ‘पब्जी’ या गेमचं वैशिष्ट्य आहे. हिंसा करत जिंकत जाण्यातला विकृत आनंद हा गेम मिळवून देतो. विशेषत: टीनएजर्स याचे बळी ठरतायत. उन्मत्तपणा, क्रोध तेवढ्या वेळापुरताच त्यांच्यात राहत नाहीय, तर आता बाह्य वर्तनातही उतरायला लागलाय. काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या एका मुलानं आत्महत्या केली आणि करतानाचं चित्रीकरण केलं. सोशल मीडियासाठी. त्याला व्हिडिओ गेम्स- विशेषत: पब्जी गेम खेळायची सवय होती. एका पौगंडावस्थेतल्या मुलानं आपल्या पालकांची हत्या या गेमपायी केली. हा मुलगा या गेमच्या व्यसनात अडकला होता.

काही काळापूर्वी ‘ब्ल्यू व्हेल गेम’नं जगभर धुमाकूळ घातला होता. शेकडो मृत्यू झाले. मुंबईत एका चौदा वर्षांच्या कोवळ्या मुलानं उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. तो या गेमच्या क्लायमॅक्सचा भाग होता. गेम्सच्या एकोणपन्नास स्टेप्स पूर्ण करून पन्नासावी स्टेप म्हणजे आपणहून खरोखरचा मृत्यू स्वीकारायचा. कोणा विकृत व्यक्तीनं निर्माण केलेल्या या विषारी गेमचा हा शेवट! जगभरात अनेक बळी गेले. दुबळ्या व्यक्तिमत्त्वाच्या, नैराश्यात अडकलेल्या, काही कारणांमुळे जीवनातला रस संपलेल्या मुलांनी अविचारानं, बेभान होऊन मृत्यूला कवटाळलं. आता मुलं ‘पब्जी’ची बळी ठरतायत.
Addiction is the only prison where the locks are on the inside. व्हिडिओ गेम्सच्या व्यसनाच्या बाबतीत हेच म्हणता येईल.

आज व्हिडिओ/ कॉम्प्युटर गेम्सच्या व्यसनात अनेक मुलं अडकली आहेत, अडकत आहेत. मुलांच्या एकूण व्यक्तिमत्त्वावर पर्यायानं त्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम घडवू शकणारं हे व्यसन आहे. या मुलांच्या बाबतीत आतून म्हणजे त्यांची थिंकिंग प्रोसेस बदलूनच त्यांना यातून सोडवता येईल.
टेक्नॉलॉजीचा योग्य उपयोग नाही झाला, तर अल्बर्ट आईन्स्टाइनचा विचार खरा ठरेल : ‘It has become appallingly obvious that our Technology has exceeded our Humanity.’ अन् त्याचे दुष्परिणाम भोगायला लागतील.
साधारणपणे टीनएजर्स असताना व्हिडिओ/ कॉम्प्युटर गेम्सच्या व्यसनाची सुरुवात झालेली आढळते. यात दहावी-बारावीत मेरिट लिस्टमध्ये आलेली मुलंही आढळतात. साधारण अकरावीत आल्यापासून अभ्यास, क्लासमधलं लक्ष उडतं. बरीच मुलं शांत, अबोल, वरकरणी समजूतदार वाटणारी असतात; पण आता आई-वडिलांनी कितीही समजावलं, तरी रागावलं तरीही गेम्स खेळणं थांबवू शकत नाहीत. ही मुलं गेम्सच्या मायावी काल्पनिक विश्वात अडकलेली असतात. जे विश्व त्यांना खोट्या आभासी ताकदीचा फील देतं. ज्या विश्वात भयानक वेग, गती, उत्सुकता, हिंसा, जिंकत जाण्याचा फील आहे. त्यांना एकीकडे ठाऊक आहे हे सगळं खोटं आहे; पण त्यातली नशा त्यांना पुनःपुन्हा खेळण्यासाठी प्रवृत्त करते.  

आणि प्रत्यक्ष आयुष्यात काय घडतंय? अभ्यासातली एकाग्रता नाहीशी झालीय, मन:शांती हरवलीय, विलक्षण एकटेपणा जाणवतोय, झोपेचं, जेवणाखाण्याचं गणित बिघडून गेलंय. मेरिटमध्ये येण्याची शक्यता असलेला मुलगा नापास होतोय. आई-वडील अस्वस्थ झालेत. काय करावं त्यांना सुचत नाहीय.  
हीच गोष्ट अनेकांची झालीय. यातली बरीच मुलं शाळेला, कॉलेजला, क्लासला दांड्या मारतात. जेवणाखाण्याकडे लक्ष नाही. काळावेळाचं भान नाही. घरच्यांशी संवाद तुटत चाललाय. नजर चुकवतात. खोटं बोलण्याचं प्रमाण वाढलंय. काही विचारलं तर चिडतात, दुरुत्तर करतात. रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही. इंटरनेट काढून टाकलं, तर मोबाईल, नाही तर सायबर कॅफे चालू. अस्वस्थतेच्या आजाराचे बळी बनत चाललेत. काही जणांना पटकन् व खूप राग येतो. खोटं बोलतात. बाहेर पैसे खर्च करण्याचं प्रमाण वाढलंय. काही जणांचं सायबर कॅफे जणू दुसरं घर झालंय.  

ॲडिशन्स दोन प्रकारची
दोन प्रकारचे व्हिडिओ गेम्स असतात. म्हणूनच दोन प्रकारची addictions असतात. एका प्रकारात एक जण पूर्ण गेम खेळू शकतो. उदाहरणार्थ, प्रिन्सेसची सुटका वगैरे. म्हणजेच तिथं उद्दिष्ट स्वच्छ असतं. ते कमीत कमी वेळात पूर्ण करणं किंवा एखाद्या गेममध्ये जास्तीत जास्त, पूर्वी मिळवलेल्या पेक्षा जास्त मार्क्स मिळवणं एवढंच महत्त्वाचं असतं. दुसऱ्या प्रकारच्या गेम्समध्ये एकापेक्षा जास्त संख्येनं खेळाडू असतात. हे गेम्स ऑनलाइन असतात. म्हणजे जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी बसून लोक हे खेळ खेळतात. या गेम्सना बहुधा ठरलेला शेवट नसतो. त्या क्षणी जो पुढं असेल तो सर्वश्रेष्ठ असं मानलं जातं. अन् हेच विजेतेपद क्षणासाठी का होईना विजेत्याला बेभान करतं. आपण जगज्जेते असल्याची भावना त्याच्यासाठी निर्माण करतं. त्याच्यापेक्षा मागं असलेले खेळाडू मग ते जगज्जेतेपद हिसकावून घेण्यासाठी त्वेषानं खेळत रहातात. आजूबाजूचं वास्तव विसरलं जातं. माणूस त्या आभासी जगात स्वत:ला गुंतवून टाकतो. वास्तवापासून दूर पळतो. या पद्धतीच्या गेम्सचं ॲडिक्शन जास्त प्रमाणात आढळतं. हे ॲडिक्शन निर्माण होण्यामागं ज्या पद्धतीनं हे गेम्स डिझाईन केले जातात तेही कारणीभूत ठरतं. हे गेम्स अत्यंत आकर्षक रंगसंगतीबरोबरच पात्रांचे (कॅरेक्टर्स) आकार आणि वागण्याची पद्धत, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव असे ठेवलेले असतात, की तुम्ही त्यात गुंतून जावं. त्याचबरोबर गेम्समधलं चॅलेंज आणि उत्कंठा इतपतच ठेवली जाते, की आपण जिंकू शकू असं खेळणाऱ्याला वाटावं; पण उद्दिष्ट अशक्य वाटू नये आणि त्यानं गेम सोडून जाऊ नये. व्हिडिओ गेम्सचं आकर्षण आणि डिसॉर्डर हे जवळजवळ गँबलिंगचं आकर्षण आणि डिसॉर्डरसारखंच आहे.

या व्यसनात इतर व्यसनांप्रमाणंच जैविक कारणंही आहेत. खेळत असताना, वाढणारी मेंदूतली एंडॉर्फिन आणि इतर रासायनिक द्रव्यं एक सुखाचा, धुंदीचा फील देत राहतात. मग उन्माद वाटायला लागतो. त्याची सवय लागली, की खेळत नसतानाही त्याच्या स्मृती सुखावत राहतात. मग मेंदूत सतत ती नशेची धून राहतेच.    
व्हिडिओ गेम्सच्या व्यसनाची भावनिक, शारीरिक लक्षणं आणि परिणाम साधारण पुढीलप्रमाणं असू शकतात :
- काही कारणांमुळे गेम खेळता आला नाही, तर चिडचिड होते. विलक्षण अस्वस्थ व्हायला होतं.
- पूर्वी खेळलेल्या डावाची आठवण येत राहते किंवा भविष्यात खेळायच्या गेमविषयी मनात आडाखे चालू राहतात.
- आपण किती वेळ खेळलो याविषयी कुटुंबीयांशी किंवा मित्रांशी खोटं बोलणं सुरू होतं.
- सतत खेळायला मिळावं. त्यासाठी इतरांपासून दूर राहावं, कुणात मिसळू नये असं वाटतं.
- मानसिक थकवा, डोकं दुखणं, मायग्रेनसारखा त्रास.
- डोळ्यांवर ताण येणं.
- सतत संगणकाचा माऊस हाताळल्यामुळे Carpal Tunnel syndrome सारखे त्रास.
- स्वत:च्या शरीराच्या, कपड्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष.
- अपुरी झोप आणि खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष आणि त्यातून उद्भवणारे पचनाचे आणि इतर आजार.
- अभ्यासात पूर्ण दुर्लक्ष; शाळा, क्लास ,कॉलेजला दांड्या मारणं.
- सायबर कॅफेची सवय असेल, तर भरपूर पैसे खर्च करणं. पैसे न दिल्यास गैरमार्गानं मिळवणं.
- लहानसहान गोष्टींवरून प्रचंड राग येणं.
- लहानशा कारणांमुळे निराश होणं.
- Counter Strike सारख्या अनेक गेम्समधून हिंसात्मक प्रवृत्ती वाढत जाते. समोरच्याला संपवूनच आपण यश मिळवू शकतो अशी चुकीची भावना वाढीस लागते.
- इतर मैदानी खेळ खेळू नयेत असं वाटतं.
- भविष्याविषयी पूर्ण उदासीन राहणं. आपल्याला पुढं काय करायचं आहे याचा विचारच न करणं. तशी जाणीव करून दिली तर चिडणं किंवा निराश होणं.

उपाय काय?
या व्यसनाकडे वेळीच लक्ष द्यावं लागतं अन् ते थांबवावं लागतं. तज्ज्ञांची मदत वेळीच घ्यावी लागते. फक्त घरातलं इंटरनेट काढून उपयोग होत नाही. मुलांचं मन व्हिडिओ गेम्समधून काढून घेणं महत्त्वाचं आहे. या मुलांची अनेक सेशन्स करावी लागतात. आई-बाबांशी मुलांच्या बालपणाविषयी बोललं जातं. मुलांची भावनिक जडणघडण, व्यक्तिमत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. बऱ्याच केसेसमध्ये आढळतं, की ही मुलं इंट्रोव्हर्ट, लाजाळू, अबोल आहेत. त्यांच्यात विलक्षण न्यूनगंड आहे. बाहेरच्या परिस्थितीतली आव्हानं पेलण्याची त्यांची तयारी नाही. मग कृत्रिम वास्तवात म्हणजे गेम्समध्ये जगात भारी ठरता येतंय, याचं सुख त्यांना वारंवार हवंय. मात्र, त्याच वेळेला आपण आपला अभ्यासाचा महत्त्वाचा वेळ वाया घालवतोय हा अपराधगंड आहेच; पण ती हतबल झालीयत. गेम्स खेळणं थांबवू शकत नाहीत. एन्जॉयमेंट म्हणून ते आता खेळू शकत नाहीय. ते कंपल्शन बनलंय.   
या सर्व मुलांना वाचवायला हवं. त्यांना वास्तवात जगायची हिंमत द्यायला हवी. त्यांच्यावरचे ताणतणाव समजून घायला हवेत. त्यातून बाहेर पडण्याची ताकद त्यांना मिळवून द्यायला हवी. त्यांची मूल्यं दुरुस्त करायला हवीत. बाहेरचं जग खरं जग आहे. त्यातले आनंद, जय, पराजय, आव्हानं  स्वीकारण्यातली गंमत त्यांना समजून द्यायला हवी. काही काळ मग काही कटू निर्णय घ्यावे लागतील. गेम्सपासून त्यांना तोडावं लागेल; पण हे सगळं हळुवारपणे, त्यांना विश्वास देत देत करावं लागेल. CBT (Cognitive behavioural therapy), REBT (Rational emotive behavior therapy) यांसारख्या काही थेरपीजचा उपयोग होईल. समुपदेशन लागेल. आंतरिक शांततेच्या स्रोतांची, त्यांच्याशी भेट घडवून आणावी लागेल. मग परिस्थिती बदलेल. निश्चित बदलेल.  

अक्षयच्या बाबतीत आता परिस्थिती सुधारतेय. त्याचे आई-वडील, शिक्षक, तो आणि मी सगळ्यांनी मिळून टीम म्हणून काम केलं. व्हिडिओ गेमचा थोडा वेळ आनंद घेणं आणि व्यसनाधीन होऊन जाणं यातला फरक त्याच्या लक्षात आलाय. या पुनर्वसनाच्या निमित्तानं एक चांगली गोष्ट घडली. त्याच्या व्यक्तिमत्त्वामधले दोष, कमतरता लक्षात आल्या. त्यावर मात करून त्याला स्वत:ला आतून शांत आणि कणखर बनवण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू झाले.  

व्हिडिओ गेम्सच्या अजगराचा विळखा जगभर वेगात पसरतो आहे. बहुतांशी, न्यूनगंड असलेली, अंतर्मुख असलेली, सोशल नसलेली, मनानं दुर्बल असलेली मुलं आणि वयानं मोठ्या व्यक्तीसुद्धा या व्यसनात अडकताना दिसतायत. आपण सावध राहायला हवं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com