शालेय स्नेहसंमेलन आणि बालकुमार साहित्य संमेलन (विद्या सुर्वे-बोरसे)

vidya surve borse
vidya surve borse

दिवाळी संपली की महाराष्ट्रात विविध संमेलनांना प्रारंभ होतो, स्नेहसंमेलनंही सुरू होतात. शाळेची स्नेहसंमेलनं आणि मुलांची साहित्य संमेलनं यांचा मेळ घालून वाचनसंस्कृतीचं भरण-पोषण करता येऊ शकतं. शाळेच्या स्नेहसंमेलनाला छोट्या बालकुमार संस्कृती-संमेलनाचं स्वरूप जर ठिकठिकाणी देता आलं तर येत्या काही वर्षांत मुलांच्या अभिव्यक्तीचं चित्र बदललेलं असेल.

दिवाळी संपली आणि थंडी सुरू झाली की ऋतू एकदम हवाहवासा वाटू लागतो. निसर्गात एकीकडं शिशिर असतो आणि दुसरीकडं शाळा-महाविद्यालयांतही शिशिरोत्सवाला प्रारंभ होतो. नाताळ, नवं वर्ष, हळूहळू वाढत जाणारा गारठा आणि नंतर झाडा-वेलींवर उतरून येणारे वसंताचे रंग...पळसाच्या लाल-केशरी रंगापासून आंब्याच्या गुणगुणत्या मोहरापर्यंतचा सुगंधी प्रवास...सृष्टी अशी कूस बदलत असताना माणसांच्या जगात उत्साह असतो संमेलनांचा. अनेक छोटी-मोठी संमेलनं अवतीभवती सुरू होतात. साहित्य-संस्कृती-कला यांचा संगम घडवत ही संमेलनं आयोजिली जातात. समविचारी समुदायांचे मेळावे, तसंच चित्रकला, काष्ठशिल्पं यांची प्रदर्शनं भरतात. दिल्लीच्या मैदानात जागतिक पुस्तक मेळावा याच काळात असतो. आपल्याकडे अखिल भारतीय साहित्य संमेलनापासून, नाट्य संमेलनापासून ते संगीतसमारोहांपर्यंत सगळी धामधूम असते.

केंद्र आणि राज्य शासनाचे ग्रंथमहोत्सवही या दिवसांतच आयोजिले जातात. सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतं. वातावरणात आनंद भरून असतो. शाळाशाळांत स्नेहसंमेलनांचं आयोजन केलं जातं तेही याच काळात. अनोख्या लय-तालात शाळाही या दिवसांत रंगलेल्या असतात. कुठं विद्यार्थी चित्र काढत असतात, तर कुठं गाण्याचा रियाज सुरू असतो. कुठल्याशा वर्गखोलीत नृत्याचा सराव सुरू असतो, तर कुठं कुणी कवितावाचनाची, कथाकथनाची तयारी करत असतो. मैदानावर खेळांच्या स्पर्धा सुरू असतात. शिबिरं सुरू असतात. कार्यशाळा घेतल्या जातात. हा काळ म्हणजे तीन-चार महिन्यांचा एक महोत्सवच! कधीही न विसरला जाणारा. पुढच्या आयुष्यात जेव्हा केव्हा कुणालाही शाळेचे, महाविद्यालयाचे दिवस आठवतात तेव्हा हेच सगळे दिवस प्रत्येक व्यक्तीला प्राधान्यानं आठवतात. हे दिवस कायमस्वरूपी आठवणीतले दिवस असतात. संमेलनांचे दिवस म्हणजे सुरवंटातून फुलपाखरात आपलं परिवर्तन होत असण्याचे दिवस. कला आपल्याला पूर्णत्वाकडे घेऊन जात असते. आपल्याला कलेची दृष्टी प्राप्त होते. ही दृष्टी अपूर्व असते. हे नवं व्यक्तिमत्त्व आपल्याला स्वतंत्र चेहरा प्रदान करत असतं. स्वत:ची स्वत:शी नवी ओळख करून देणारा आणि स्वत:ची जगाला स्वतंत्र ओळख करून देणारा चेहरा संमेलनांच्या या काळात आपल्याला मिळतो आणि म्हणून, शाळा-महाविद्यालयांच्या पातळीवर या दिवसांचं काटेकोर, नेटकं आणि दूरदर्शी आयोजन केलं जाणं खूप महत्त्वाचं असतं.

बालकुमार साहित्य संमेलनं आणि मेळावे ही या दिवसांत आयोजित होत असणारी एक महत्त्वाची घटना असते. महाराष्ट्रातल्या बालसाहित्यिकांचं गेल्या चार महिन्यांचं कार्यवृत्त पाहिलं तरी महाराष्ट्राच्या सगळ्याच भागांत अशी संमेलनं आयोजित केली गेल्याचं दिसून येईल.
रत्नागिरी-रायगडपासून, अमरावती-नागपूरपर्यंत आणि कोल्हापूर- सांगलीपासून, उदगीर-अंबेजोगाईपर्यंत ठिकठिकाणी छोटी-मोठी बालकुमार साहित्य संमेलनं आयोजिली गेली. प्रवीण दवणे ते किशोर पाठक आणि मदन हजेरी ते सुरेश सावंत अशा मराठीतल्या ज्येष्ठ साहित्यिकांनी या संमेलनांची अध्यक्षपदं भूषवली. बालकुमार साहित्य संमेलन ही एक पर्वणी असते. पाठ्यपुस्तकातल्या लेखकांशी संवाद साधण्याची संधी यानिमित्तानं विद्यार्थ्यांना मिळत असते. ज्यांची कविता आपण वर्गात मोठ्यानं गातो-वाचतो किंवा ज्यांचे धडे वाचून आपण मुक्तपणे हसतो वा जे वाचून कधी कधी आपल्याला रडूही कोसळतं असं साहित्य निर्मिणाऱ्या कवी-लेखकांना भेटणं-बोलणं, त्यांची स्वाक्षरी मिळवणं, त्यांना एखादा प्रश्न विचारणं याचा आनंद अशी संमेलनं देत असतात.

सन १९४५ मध्ये पुण्यात ‘कुमार’ या मासिकाच्या पुढाकारातून शालेय विद्यार्थ्यांसाठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं गेलं होतं अशी एक नोंद सापडते. मुलांसाठी प्रसिद्ध होणारी नियतकालिकं आणि बालकुमार साहित्य संमेलन यांचं नातं हे तेव्हापासून घट्ट आहे. ‘छात्रप्रबोधन’, ‘मासिक ऋग्वेद’, ‘झंप्या’, ‘प्रज्वलित चांदणे’, ‘मन:शक्ती’, ‘पाणिनी’ ही महाराष्ट्राच्या विविध भागांतून मुलांसाठी प्रसिद्ध होणारी नियतकालिकं बालकुमार साहित्य संमेलनांच्या आयोजनात आजही पुढाकार घेताना दिसतात. ‘किशोर’, ‘वयम्’, ‘मुलांचे मासिक’, ‘खेळगडी’, ‘जडणघडण’, ‘साधना’, ‘पासवर्ड’, ‘निर्मळ रानवारा’ या अन्य नियतकालिकांचे संपादक छोट्यांच्या संमेलनांना आवर्जून उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी हितगुज साधत असतात.

सन १९७५ मध्ये अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेची स्थापना होऊन तिच्या वतीनं दरवर्षी मोठ्या पातळीवर बालकुमार साहित्य संमेलनं आयोजिण्यात येऊ लागली. भा. रा. भागवत, सुधाकर प्रभू, अमरेंद्र गाडगीळ, लीलाताई भागवत, निर्मला सारडा अशी बालसाहित्यातली मोठी नावं या संस्थेशी संबंधित होती. त्यांनी या संस्थेची उभारणी अत्यंत विचारपूर्वक केली व संस्था गावोगाव पोचवली. मुलांसोबत थेट नातं प्रस्थापित केलं. मुलांविषयी विचार करणारे, त्यांच्यात रमणारे कार्यकर्ते ठिकठिकाणी उभे केले. लिहिणाऱ्या लोकांना जोडून घेतलं. सानेगुरुजींच्या विचारांनुसार चालणाऱ्या या संस्थेनं महाराष्ट्रात काही काळ चैतन्य निर्माण केलं होतं. या संस्थेनं आयोजिलेल्या पंचवीस साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांच्या भाषणांचं संपादन मदन हजेरी यांनी गेल्या वर्षी प्रकाशित केलं आहे. या संस्थेच्या खंडित झालेल्या कार्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून ‘अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थे’नं पुढं चालवली आहे. अलीकडेच पुण्यात बालेवाडी इथं प्रवीण दवणे यांच्या अध्यक्षतेखाली या संस्थेचं अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन आयोजिलं गेलं होतं. ‘अमरेंद्र भास्कर संस्थे’नं गेल्या दोन-तीन वर्षांत राज्यव्यापी जाळं उभं केलं. ठिकठिकाणी प्रादेशिक संमेलनंही ही संस्था आयोजित करते.

साहित्य महामंडळाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांतले बालमेळावे हे बालकुमारांच्या आकर्षणाचं केंद्र असतं. ज्या ठिकाणी हे साहित्य संमेलन आयोजित होत असतं त्या त्या ठिकाणच्या परिसरातल्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी हे मेळावे म्हणजे मोठी पर्वणीच असते. कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, राजा मंगळवेढेकर असे दिग्गज कवी बालमेळ्यात सहभागी झालेले आहेत. उस्मानाबाद इथं झालेल्या बालमेळाव्यात जुन्या-नव्या लेखकांचा सुरेख संगम होता. सुरेश सावंत, सुमन नवलकर, पृथ्वीराज तौर, प्रशांत गौतम, माधव चुकेवाड, संजय ऐलवाड यांनी या मेळ्यात बालकुमारांशी गप्पा केल्या.

बाबा भांड यांच्यामुळे राज्य साहित्य संस्कृती मंडळानं मध्यंतरी विभागीय बालकुमार साहित्य संमेलनांना भरीव अर्थसाह्य केलं. परिणामी बुलढाणा, औरंगाबाद, चंदगड-कोल्हापूर अशा ठिकाणी मुलांची संमेलनं आयोजित केली जाऊ शकली. दासू वैद्य, ल. म. कडू आदी या संमेलनांचे अध्यक्ष होते.
महाराष्ट्र साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ, कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या जोडीनं जळगाव इथलं ‘सूर्योदय साहित्य संमेलन’ व इतर संस्था छोट्यांची संमेलनं आयोजित करत आहेत किंवा आपल्या अन्य संमेलनांच्या कार्यक्रमपत्रिकेत शालेय विद्यार्थ्यांसाठी वेळ राखून ठेवत आहेत ही आनंदाची बाब आहे. प्रौढ साहित्याच्या तुलनेत मराठीत बालसाहित्याकडे सदोदित दुर्लक्ष होत आलं आहे. अशा पार्श्वभूमीवर बालकुमारांसाठी होणारे हे प्रयत्न महत्त्वपूर्ण आहेत.

नाव जरी ‘बालकुमार साहित्य संमेलन’ असं असलं तरी वयानं ज्येष्ठ असणारे बालसाहित्यिक किंवा मुलांसाठी विचार करणारे कार्यकर्ते अशा संमेलनाचे अध्यक्ष असतात; पण मिरज-सांगली भागात शाळांकडून गेल्या अनेक वर्षांपासून संमेलनं आयोजिली जातात व अशा संमेलनाचं अध्यक्षपद एखादा विद्यार्थी-साहित्यिक भूषवतो ही भूषणावह गोष्ट होय. अभ्यासक्रमातल्या लेखकांच्या मुलाखती हे या संमेलनाचं वेगळेपण असतं आणि या मुलाखती विद्यार्थीच घेतात हा या संमेलनाचा आणखी एक विशेष.

दिवाळी संपली की महाराष्ट्रात विविध संमेलनांना प्रारंभ होतो, स्नेहसंमेलनंही सुरू होतात. शाळेची स्नेहसंमेलनं आणि मुलांची साहित्य संमेलनं यांचा मेळ घालून वाचनसंस्कृतीचं भरण-पोषण करता येऊ शकतं. शाळेच्या स्नेहसंमेलनाला छोट्या बालकुमार संस्कृती-संमेलनाचं स्वरूप जर ठिकठिकाणी देता आलं तर येत्या काही वर्षांत मुलांच्या अभिव्यक्तीचं चित्र बदललेलं असेल. या दिवसांत मुलांसाठी चित्रकारितेच्या कार्यशाळा आयोजित करणं आणि मुलांनी काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन आयोजित करणं, नृत्य-नाट्य-गायन-वादन यांचे स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करणं, विद्यार्थ्यांचं कविसंमेलन, कथाकथन आयोजित करणं असे विविध उपक्रम या संस्कृती-संमेलनात आयोजित करता येऊ शकतील. ‘संस्कारांचं व्यासपीठ’ म्हणून या कार्यक्रमांकडे पाहता येऊ शकेल. महाराष्ट्राची लोकपरंपरा यानिमित्तानं पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करता येईल. तिचं जतन-संवर्धन करता येईल. किमान त्यादृष्टीनं काही पावलं उचलली जातील. होत असलेल्या सध्याच्या प्रयत्नांना यामुळे बळकटी मिळेल. साहित्य हा कोणत्याही संस्कृतीचा उजळ चेहरा असतो. अशी ‘संस्कृती-संमेलनं' साहित्याविषयी आस्था निर्माण करतील.

आता आजूबाजूला शाळाशाळांत जी स्नेहसंमेलनं होत आहेत त्या बहुतेक ठिकाणचं चित्र काय आहे? ते फारसं आशादायक नाही. थिल्लर गाण्यांवर नाचण्यापेक्षा आणि उथळ विनोदांत रमण्यापेक्षा आम्ही आमच्या विद्यार्थ्यांची अभिरुची विकसित कशी होईल
यादृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी स्नेहसंमेलनाचं सध्याचं रूप बदलून ते ‘साहित्य संस्कृती-संमेलना’त परिवर्तित करणं आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com