कोरोना आणि घर (विद्या सुर्वे-बोरसे)

विद्या सुर्वे-बोरसे vidyasurve99@rediffmail.com
Sunday, 22 March 2020

कोरोना विषाणू वाईटच; पण त्यानं लहान-मोठ्यांना घरात बसवून ठेवलं ही एक संधी आहे हे लक्षात घेऊन दुपारच्या वेळी आम्ही घरातल्या घरात कितीतरी नव्या अॅक्टिव्हिटीज् केल्या...विज्ञानखेळणी तयार केली...विषाणूंचा इतिहास मुलांना शोधायला लावला...जैविक अस्त्रांची माहिती जमवली...

कोरोना विषाणू वाईटच; पण त्यानं लहान-मोठ्यांना घरात बसवून ठेवलं ही एक संधी आहे हे लक्षात घेऊन दुपारच्या वेळी आम्ही घरातल्या घरात कितीतरी नव्या अॅक्टिव्हिटीज् केल्या...विज्ञानखेळणी तयार केली...विषाणूंचा इतिहास मुलांना शोधायला लावला...जैविक अस्त्रांची माहिती जमवली...मुलांच्या सोबतीनं घर स्वच्छ केलं... राहत्या परिसरातल्या गावाविषयी, तिथल्या उत्पादनांविषयी माहिती घेतली...शब्दकोडी सोडवली...गावांच्या-देशांच्या नावांच्या भेंड्या खेळल्या... नकाशावाचन केलं... मोबाईल बंद करून, जुने विसरून गेलेले खेळ आठवून ते खेळले...

ही घटना तीन आठवड्यांपूर्वी घडली. फेब्रुवारीच्या अखेरच्या दिवसांत शाळेतून येताच माझा मुलगा साई म्हणाला : ‘‘आज आपण बाजारातून मास्क घेऊन येऊ. उद्या शाळेला जाताना मी मास्क लावून जाणार.’’
साईला शाळेतल्या शिक्षकांनी मास्कच्या आणि सॅनिटायझरच्या वापराविषयी सूचना दिल्या होत्या. कोरोना या विषाणूविषयी थोडी माहितीही दिली होती. आम्ही नेहमीच सॅनिटायझरचा वापर करतो. साईच्या दप्तरात-गाडीत-घरात ते असतंच. त्यामुळे आता त्याला मास्क हवा होता. तोपर्यंत स्वामीनं मास्क आणि त्याच्या प्रकारांविषयीची माहिती गुगलवर सर्च करून मिळवली. स्वामी वयानं थोडा मोठा आहे. तो शालान्त परीक्षेच्या अभ्यासात गुंतलेला होता.

नंतर होळी आली. रंग खेळले गेले...पण त्यात नेहमीचा उत्साह नव्हता. प्री-प्रायमरीत जाणारा साईचा छोटा मित्र म्हणाला : ‘‘रंगात बारीक किडा आहे, तो डोळ्यांना दिसत नाही; पण त्यामुळे आपण आजारी पडतो.’’
तो कोरोनाबद्दल बोलत होता, म्हणजे त्याच्याही टीचरनं वर्गात खबरदारीच्या सूचना दिल्या होत्या. पुढं शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. विदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणीमोहीम सुरू झाली. अगोदर पुण्यात व नंतर इतर शहरांत आणि शेवटी ग्रामीण भागातल्या शाळांनाही सुटी मिळाली. शिकवणीवर्ग बंद करण्याच्या सूचना आल्या. जमावबंदी लागू झाली. वसतिगृहं रिकामी करण्यात आली. उद्यानं, मंगलकार्यालयं, चित्रपटगृह, शॉपिंग मॉल...एकेक करत
बंद केले गेले. परीक्षा पुढं ढकलण्यात आल्या. वर्तमानपत्रांतून, दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवरून जगभरच्या बातम्या आदळत राहिल्या. आपल्याकडे महाराष्ट्र सरकारनं अत्यंत काळजीपूर्वक नियोजन केलं. मुख्यमंत्र्यांनी, आरोग्यमंत्र्यांनी जनतेला गर्दी न करण्याचं, धीर धरण्याचं, काळजी घेण्याचं आवाहन सातत्यानं केलं. अफवा पसरवल्या जाऊ नयेत याबद्दल पोलिस प्रशासन दक्ष राहिलं. ठिकठिकाणच्या डॉक्टरांनी दक्षतेचे योग्य ते संदेश दिले आणि कोरोनाविषयी जनजागृती केली. दुसरीकडे जगभरात हजारो लोक मृत्युमुखी पडल्याचं बातम्यांमधून समजत राहिलं.

ज्याची कल्पना कुणी स्वप्नातही केली नसेल असं चित्र गेल्या पंधरा दिवसांत जगभर निर्माण झालं. चीन, इराण, इटलीविषयीच्या बातम्या ऐकतानाही अंगावर काटा आला. सगळं जग ठप्प झाल्यासारखं झालं आहे. आपल्याकडे मुलं आणि पालक दोघंही घरात अडकून पडले आहेत. शाळा, उद्यानं, मैदानं, ग्रंथालयं, व्यायामशाळा बंद आहेत. मुलांना घरात बसण्याशिवाय पर्याय नाही. बहुतेक पालकही घरीच आहेत. पाळणाघरं, डे-केअर सेंटर बंद आहेत. पालकांना आता मुलांसाठी वेळ देण्याशिवाय पर्याय नाही! कामावरून परतलेली आणि दिवसभर मोबाईलवर बोलणारी आई वैतागून गेली आहे. ऑफिसचं काम करत घरातही लॅपटॉपला चिकटून बसणारे बाबा चिडचिड करू लागले आहेत. या मुलांचं करायचं काय? त्यांच्यापुढं मोठा पेच आहे. ऑफिसमधले अधिकारी, शाळा-महाविद्यालयांतले अध्यापक, निरनिराळ्या कार्यालयांत राबणाऱ्या महिला या सर्वांपुढं कोरोनानं जणू एक वेगळंच संकट उभं केलं आहे. दिवसभर घरात असणाऱ्या
बच्चेकंपनीला समजवायचं कसं? आणि हा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. वैतागलेल्या चिंताक्रांत पालकांचे याबाबत सोशल मीडियातून कितीतरी संदेश फिरत आहेत.
काय झालं आहे माहितीय?

गेल्या अनेक वर्षांत आपण आपल्या मुलांशी संवाद करणंच विसरलो आहोत, त्यामुळे आपल्याला त्यांच्याशी बोलताच येत नाहीय. झोपेतून उठल्यापासून पुन्हा रात्री झोपेपर्यंत आपण आपले पाल्य शाळेच्या, कोचिंग क्लासेसच्या आणि छंदवर्गांच्या हवाली केले आहेत. आपण आपल्या पाल्यांना सतत पुस्तकांत बुडताना, होमवर्क, असाईन्मेंट करताना पाहिलं आहे. गुणपत्रकावर सही करताना आपण त्यांच्याशी केवळ दोन शब्दांची देवाण-घेवाण केली आहे. आपण जेव्हा जेव्हा काही सांगण्यासाठी तोंड उघडलं तेव्हा तेव्हा पाल्याला त्याच्या ध्येयाची, वर्गात पहिला येण्याची, सर्वाधिक गुण मिळवण्याची, डॉक्टर-कलेक्टर होण्याची शिकवण देण्यासाठीच शब्द खर्च केले आहेत. आपण त्याला केवळ उपदेश केला आहे. म्हणून आता बहुतेक पालकांची अडचण झाली आहे.
मी पालकांना दोष देत नाही. आजूबाजूला जे कडवट वास्तव दिसत आहे तेच पुन्हा दाखवत आहे.

पालक म्हणून आपण आपला स्वत:चा पडताळा घेऊ या. गेल्या दोन-चार महिन्यांत, वर्षात आपण आपल्या पाल्यांना किती वेळ दिला आहे? आपण घरात येतो तेव्हा मोबाईलवर किती बोलतो, किती चॅटिंग करतो, सोशल मीडियाच्या पोस्ट वाचतो? मोबाईल बंद करून आपण आपल्या मुलांना गोष्ट सांगितली त्याला किती वर्षं झाली? एखादं गाणं म्हणत मुलांसोबत मुक्तपणे वेडावाकडा नाच केला त्याला किती महिने झाले? मुलांसोबत क्रिकेट, कॅरम, बुद्धिबळ खेळलो त्याला किती काळ लोटला? आपण आपल्या पाल्यांसमवेत दिवाळीला किल्ला तयार केला का? किमान वाळूत खोपा तयार केला का? अंधाऱ्या रात्री घराच्या छतावर अथवा गच्चीत बसून त्यांना आपण नक्षत्रांविषयी माहिती दिली का? यातलं आपण काय केलं? की कधीच काहीही केलं नाही?
कोरोना हा नक्कीच भयावह संसर्गजन्य आजार असणार. त्याशिवाय अशा युद्धपातळीवर योजना आखल्या गेल्या नसत्या. त्याचा संसर्ग आपल्या प्रदेशात होऊ नये, त्याला अटकाव घातला जावा यासाठी पालक म्हणून आपण जागरूकपणे कोणते उपाय केले आहेत? घटनेचं गांभीर्यदेखील लक्षात न घेता लोक इकडे-तिकडे भटकत आहेत, याला काय म्हणायचं? ‘इतरांशी संपर्क टाळा, कोरोनाचा संसर्ग टाळा’ इतकं साधं सांगणं आहे डॉक्टरांचं आणि सरकारचं. आणि, सगळीच नसली तरी काही मंडळी मात्र हा काळ सुटीचा समजून गेट टुगेदर करत सुटली आहेत, फिरायला जात आहेत, नको तिथं गर्दी करत आहेत...
शिंकायचं कसं? खोकला आला तर खोकायचं कसं? श्वासोच्छवासाला त्रास होत असेल तर करायचं काय? याविषयीच्या सूचना सतत दिल्या जात आहेत आणि आपल्यातले बहुसंख्य लोक त्या सूचनांकडे चक्क दुर्लक्ष करत आहेत. आपण आपल्याही प्रकृतीविषयी जागरूक असू नये याला काय म्हणावं? आपली मुलं आपलंच अनुकरण करत असतात, आपत्तीच्या काळात कसं वागायचं असतं याबद्दलचा हाच आदर्श आपल्या मुला-बाळांनी आपल्याकडून घ्यावा असं आपल्याला वाटतं काय?
***

‘खजिना आनंदकथांचा’ नावाच्या एका छोट्या पुस्तकात एका शाळकरी मुलाची आणि सतत कार्यमग्न असणाऱ्या त्याच्या वडिलांची लघुकथा आहे. या कथेतला मुलगा वडिलांना विचारतो : ‘एका तासात तुम्हाला किती रुपये मिळतात?’ वडील त्याला एक रक्कम सांगतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मातीच्या गल्ल्यातून काढून मुलगा तेवढी विशिष्ट रक्कम वडिलांच्या हातावर ठेवतो आणि विचारतो: ‘आज संध्याकाळी तुम्ही तुमचा एक तास मला विकत द्याल का? मला तुमच्याबरोबर जेवण करायचं आहे...’
ही कल्पित कथा नाहीय. आपण जर विचार केला तर कळून येईल की ही आपलीच गोष्ट आहे! गेल्या अनेक दिवसांत घरातल्या घरात आपण मुलांबरोबर एकत्र जेवण केलेलं नाही. आपण खूप व्यग्र झालेलो आहोत हे मान्य; पण ही सगळी धावाधाव कुणासाठी, कशासाठी याबद्दलही आपण थोडं जागरूक व्हायला हवं. आपण मुलांना वेळ देणं गरजेचं आहे, आपण मुलांना वेळ दिला की आपल्याला आपलाच मुलगा, आपलीच मुलगी नव्यानं कळून येईल. मुलीच्या डोळ्यांतल्या चांदण्या आपल्याला वाचता येतील, वेचताही येतील.

बाबाराव मुसळे हे मराठीतले ज्येष्ठ कादंबरीकार आहेत. विदर्भातलं ग्रामजीवन हा त्यांच्या कादंबऱ्यांचा विषय. ‘हाल्या हाल्या दुधू दे’सारखी महत्त्वाची कादंबरी मुसळे यांचीच. सोशल मीडियावर ते सक्रिय असतात. शाळेत जाणाऱ्या त्यांच्या नातीची हालचाल त्यांनी अलीकडेच शब्दबद्ध केली आहे. त्यांनी लिहिलं आहे : ‘उन्हात कोरोनाचे जंतू मरतात (असं तिला कुणीतरी सांगितलं) म्हणून नात वेळ मिळाला की उन्हात जाऊन उभी राहते.’ वरवर ही घटना फार साधी वाटते; पण त्यातून बालकांचं मनोविश्व व्यक्त होतं.
लहान मुलं शाळेतल्या शिक्षकांचं जेवढं ऐकतात तेवढं ते इतरांचं ऐकत नाहीत. त्यामुळे शाळेतल्या, विशेषत: प्राथमिक शाळेतल्या, शिक्षकांची जबाबदारी किती मोठी आहे हेही लक्षात येतं.

कोरोनाची आत्ता जशी साथ आली आहे तशी अन्य विषाणूंचीही साथ यापूर्वीसुद्धा अनेकदा आली आहे. स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, इबोला या अलीकडच्या काळातल्या काही साथी. पूर्वी प्लेगची साथ अशीच येई. देवी येत. गावंच्या गावं रिकामी होत. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा संदर्भ जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा प्लेगच्या साथीत त्यांनी केलेलं कार्यही स्मरतं. मी उत्सुकता म्हणून मराठी बालकुमार साहित्याचा आढावा घेते...अशा साथजन्य विषाणूसंदर्भात एखादा अनुभव, एखादी गोष्ट मराठीत आहे का याचा शोध घेते तेव्हा हाती निराशा येते. मुलांना सांगावी अशी विषाणूची एकही गोष्ट माझ्याजवळ नाही. म्हणून मी शालान्त परीक्षा देणाऱ्या स्वामीलाच कोरोनाच्या विलक्षण वेगळ्या बातम्या सांगायला लावते. हे किस्से मला दोन बाबींची जाणीव करून देतात. कोरोनानं पसरवलेली दहशत आणि नव्या पिढीला ठाऊक असणारी आवश्यक ती खबरदारी या त्या दोन बाबी.

दुपारच्या वेळी घरातल्या घरात आम्ही कितीतरी नव्या अॅक्टिव्हिटीज् केल्या...विज्ञानखेळणी तयार केली...विषाणूंचा इतिहास मुलांना शोधायला लावला...जैविक अस्त्रांची माहिती जमवली...मुलांच्या सोबतीनं घर स्वच्छ केलं...आम्ही राहतो त्या नाशिक-धुळे पट्ट्यातल्या गावांविषयी, तिथल्या उत्पादनांविषयी माहिती घेतली... शब्दकोडी सोडवली...गावांच्या-देशांच्या नावांच्या भेंड्या खेळल्या... नकाशावाचन केलं...मोबाईल बंद करून, जुने विसरून गेलेले खेळ आठवून ते खेळले...

कोरोना विषाणू वाईटच. मात्र, त्यानं आपल्याला घरात बसवून ठेवलं ही एक संधी आहे हे लक्षात घेऊन घरातले सगळे सदस्य एकत्र आले. त्यांनी एकमेकांसाठी भरपूर वेळ दिला. कोरोना येत्या काळात संपेल, नष्ट होईल; पण त्यानिमित्तानं एकत्र आलेलं घर आणि सदस्यांमधला विश्वास, प्रेम, आपुलकी दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाईल अशी खात्री बाळगायला काहीच हरकत नाही.
या आठवड्यात नवं वर्ष सुरू होत आहे, या चैत्री पाडव्याला, गुढी पाडव्याला आपणही बालक-पालक नात्याची नवी सुरवात करू या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang vidya surve borse write balguj article