बालकांची भाषा (विद्या सुर्वे-बोरसे)

vidya surve borse
vidya surve borse

बालकांची भाषा समजून घेताना लक्षात येतं, की बालकं सरळ मुद्द्याला हात घालतात. एखादी गोष्ट फिरवून मांडणं त्यांच्या सूत्रात बसत नाही. प्रत्येक बाबीविषयी त्यांची मतं असतात, ती स्वतंत्र असतात, ठाम असतात आणि ती मतं स्वीकारली जावीत ही त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे त्यांच्याजवळ लगेच प्रश्न-प्रतिप्रश्न तयार असतात.

लिंग, वर्ग, व्यवसाय, वय, शिक्षण, परिसर या सगळ्यांचे संस्कार व्यक्तीच्या बोलीवरती होत असतात. समाजभाषावैज्ञानिकांनी यासंदर्भात पुष्कळ विचारमंथन केलं आहे. बालकांची भाषा इतरांपेक्षा निराळी होते, त्याचं पहिलं कारण बालकांचं वय हे आहे. ‘बालभाषा’ अशी संज्ञा आपण वापरत आलेलो आहोत. शिशुबोली, बालभाषा, बालकांची भाषा, किशोरवयीन आणि कुमारवयीन यांची भाषा, तरुण-तरुणींची भाषा असे विविध भेद बालकांच्या भाषेसंदर्भात दाखवता येऊ शकतील. या भिन्न भिन्न वयोगटांतल्या व्यक्तींची भाषा प्रौढांपेक्षा जशी निराळी आहे तद्वतच ती इतर गटांपेक्षाही वेगळी आहे. बाळाचे बोबडे बोल, भाषेची समज वाढीस लागल्यानंतरचे त्याचे उच्चार आणि किशोरवयात संदेशन-संप्रेशनासाठी ते करत असलेली शब्दांची निवड या सगळ्यांतून त्याच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख ठळक होत जाते.
बालकाच्या भाषेबाबत वय हाच केवळ एकमेव घटक आहे असं नाही, तर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीचादेखील परिणाम बालकाच्या बोलीवर होत असतो. मध्यमवर्गीय, निम्नमध्यमवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि उच्चवर्गीय मुलं यांची भाषा एकसारखी असत नाही. बालकांच्या बोलण्यात येणाऱ्या प्रतिमासृष्टीवर या बाबींचा प्रभाव पडतो.

कोसळणारा धबधबा पाहून ‘आई, हे बघ पाणी घसरगुंडी खेळतंय’ असं म्हणणारं मूल (‘भाषा आणि जीवन’मध्ये प्रकाशित उदाहरण) आणि ‘आय हाय! तू ने तो कंबख्त अच्छा आदमी पटेला है रे! मजे में रहती होगी इस के साथ! दस रुपये देने से क्या मजा कम होगा तेरा? चिकना आदमी है तेरा!’ असं म्हणणारी नऊ वर्षांची मुलगी (हेमा लेले यांच्या ‘मुलांची भाषा’ या पुस्तकातलं उदाहरण) ही दोन्ही बालकं एकाच परिस्थितीची अपत्यं नाहीत हे कुणाच्याही लक्षात येईल.

बालकांची भाषा समजून घेण्यासाठी पुस्तकांकडे नव्हे, तर आपल्या घरातल्या आणि आजूबाजूला बागडणाऱ्या मुलांकडे जाण्याची गरज आहे. आपली निरीक्षणं ही पुस्तकांपेक्षा अधिक प्रमाण आहेत. एक वर्षाचं झालं की बाळ आपल्या तोंडातून उद्गार काढून आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींशी आणि पशू-पक्ष्यांशीही संवाद साधायला लागतं. कुटुंबात जी बोली बोलली जाते तिचे संस्कार बालकावर सर्वाधिक होत असतात. हेल, उच्चार, ठेका या सगळ्याच बाबतींत बालक घरातल्या ज्येष्ठांचं अनुकरण करत असतं. ‘र’ आणि ‘ळ’ ही व्यंजनं शिकण्यासाठी बालकाच्या बाबतीत कधी कधी थोडा अधिक काळ जावा लागतो. ‘ल’, ‘य’ असं करत तिसऱ्या-चौथ्या वर्षी त्याची गाडी ‘ळ’ आणि ‘र’च्या रुळावर स्थिरावते. याच वयात साधे साधे जोडशब्दही ते उच्चारू लागतं. अभ्यस्त शब्दांचा लळा या काळात त्याला हवाहवासा वाटतो. नादानुकारी शब्द ऐकणं आणि उच्चारणं यांत त्याला गंमत वाटते. या वयातल्या बालकाच्या भाषेत कवितेची लय आपसूक अवतरलेली दिसेल. उदाहरणार्थ : तुम्ही ‘टाटा’ असा शब्द उच्चारला तर बालक ‘खाटा’, ‘पाटा’, ‘बाटा’, ‘काटा’, ‘साटा’ असे शब्द स्वत:हून उच्चारून त्यातल्या नादाशी समरस होताना दिसेल. वाढत्या वयासोबत त्याच्या बोलीवर पुस्तकी भाषेचा संस्कार होतो. शिक्षक, वर्गमित्र आणि टीव्हीच्या भाषेचेही संस्कार होतात. पूर्ण वाक्य उच्चारणं, समोरच्याची कृती पूर्णतः समजून घेणं, काळ-वेग-वेळ यांची मापकं लक्षात घेऊन त्यांचं उपयोजन या सुमारास होऊ लागतं. ‘प्ले ग्रुप’ किंवा अंगणवाडीपासून या क्रियेला सुरुवात होते आणि सातव्या-आठव्या इयत्तेपर्यंत ही प्रक्रिया चालत राहते. भोवताल समजून घेण्याच्या बालकाच्या धडपडीतून ज्येष्ठ हैराण होतील असे प्रश्नोपप्रश्न बालकाकडून विचारले जाऊ लागतात. बालकाच्या भाषेची घडण होणारा हा काळ गमतीचा असतो. संस्कार आणि भाषावापर यांची सांगड ते घालत असतं. ज्येष्ठांच्या खोटं बोलण्याचं अनुकरणही याच काळात ते करू लागतं. ज्या वयात शब्दांचे अर्थाही ठाऊक नसतात अशा वयात त्याला पाठ झालेले ‘जॉनी जॉनी, एस पप्पा, ईटिंग शुगर, नो पप्पा’सारखं गाणं त्याला पुढं काही वर्षांनंतर समजून येतं.

बालकाकडे जी भूतदया असते, जे उपजत चांगुलपण असतं ते त्याच्या बोलीतून व्यक्त होताना दिसतं. दगड, बाहुली, टेडी, डॉगी, कॅट, चिऊ-काऊ, पीजन, टायगर, लायन या सगळ्यांनाच त्याच्या भावविश्वात महत्त्वाचं स्थान असतं. या सगळ्याच बाबी त्याच्यासाठी चैतन्यदायी, सजीव असतात आणि या सगळ्याशी बालक बिनदिक्कत संवाद साधत असतं. लंगडत चालणारी गाय, मार लागलेला कावळा, हडाडलेलं कुत्रं, भ्यायलेली मांजर याबद्दल निघालेले त्याचे कणवेचे उद्गार हे त्याची भाषा व विचार प्रौढ बनवत असतात. जुन्या काळात बाहुल्यांशी बोलणारी बालकं आजच्या काळात टेडी बिअरशी संवाद साधताना दिसतील. व्यक्त होण्यासाठी त्यांना सोबत्याची गरज जाणवू लागली की आणि घरात ज्येष्ठांकडून त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं की ‘टेडी’ हाच बालकाला आपला आधार वाटू लागतो.

भाषेचा द्वयर्थी वापर, तिरकस बोलणं, लक्ष्यार्थ अथवा व्यंग्यार्थ, कोटी किंवा श्लेष या बाबी बालकांच्या लक्षात येत नाहीत. त्यांच्या आकलनाचा भर असतो तो प्रामुख्यानं मुख्यार्थावर. त्यामुळे जेवढ्या सहजपणे बालक श्लोक अथवा प्रार्थना शिकून घेतं त्याच सहजपणे ते शिव्याही शिकून घेतं. शब्दाच्या अर्थापेक्षा त्यातून होणाऱ्या परिणामाकडे आणि नादाकडे त्याचं लक्ष असतं.
‘अरे बाप रे, नऊ वाजले, किती उशीर. लवकर निघायला हवं,’ या वाक्यातून ‘नऊ वाजणं’ हा ‘उशीर झाला’ या अवतरणाचा समानार्थी शब्द आहे एवढंच बालकाच्या लक्षात येतं आणि त्यामुळे भर दुपारीही, कंटाळा आला की बालकाचे नऊ वाजू शकतात.

‘आई, नऊ वाजले’ असं ते जेव्हा जेव्हा म्हणतं तेव्हा तेव्हा ‘आई, उशीर झालाय, जाऊ या.’ असं त्याला सांगायचं असतं. कदाचित, त्या वेळी घड्याळात दुपारचे तीन किंवा सायंकाळचे सातही वाजलेले असू शकतात. ‘साहेब’ या शब्दाचा ‘वेडा माणूस’ असा अर्थ घेणारी बालकंही माझ्या पाहण्यात आहेत. कारण, साहेबांविषयी साहेबांच्या माघारी व्यक्त झालेली प्रतिक्रिया त्यानं ऐकलेली असते. जेवण करायचं नसेल तर अर्धं ताट संपल्यानंतर ‘आज माझा उपवास आहे’ असं वाक्य बालकाच्या तोंडी सहज येऊ शकतं.
विद्यमान काळात मुलांची भाषा ‘मिश्र’ होताना दिसत आहे. इंग्लिश, मराठी, हिंदी या सगळ्यांची भेसळ त्यांच्या बोलण्यात असते. शाळेत जाणाऱ्या बालकांची भाषा अशी आहे. त्यातही किशोरवयीन वा कुमारवयीन मुला-मुलींची भाषा ही सिनेमामुळे अधिकच ‘थेट’ झाल्याचं दिसतं. ‘गँग’, ‘टेरर’, ‘बिंदास’, ‘कल्टी’, ‘पतली गली’, ‘फुल टू’ असे अनेक शब्द किशोरांच्या-कुमारांच्या आणि पौगंडावस्थेतल्या मुलांच्या बोलीचा भाग झाल्याचे दिसत आहेत. ‘छोटा भीम’, ‘डोरोमान’, ‘लिटल सिंघम’, ‘सुपर कॉप विरू’ या छोट्या पडद्यावरच्या मालिकांच्या भाषेचेही संस्कार बालकांच्या बोलीवर झालेले आढळतील. विशिष्ट प्रसंगी बालकांनी आपली भाषा पूर्णत: बदललेली आढळेल. उदाहरणार्थ : इंग्लिश माध्यमातली बालकं घरात वावरताना मराठी बोलतील, खेळताना हिंदीचा सहज वापर करतील आणि अभ्यासाला बसल्यावर इंग्लिशचा स्वीकार करतील आणि हे अगदी सहजपणे घडतंय असं चित्र आहे.

बालकांच्या भाषेच्या पार्श्वभूमीवर, आपल्या बालसाहित्याची भाषाही समजून घेणं गरजेचं आहे. वर्णमाला अथवा अंक समजून घेण्यासाठी व परिसराचं ज्ञान संवर्धित करण्यासाठी इंग्लिशमध्ये जशा असंख्य तालिका आहेत, त्या तुलनेत मराठी तालिकांची संख्या अगदीच नगण्य आहे. त्यामुळे ‘अ... अननसाचा’, ‘क...कमळाचा’ असंच उत्तर कोणत्याही मराठीभाषक मुलाकडून येतं. ‘अ’ शिकवताना अक्षर, अगडबंब, अगळ, अडकित्ता, अरण्य, अरब, अलमारी, अळू अशी इतर उदाहरणं देता येऊ शकतील. फळं, फुलं, वस्तू, प्राणी, कीटक, नातेसंबंधदर्शक शब्द यांचं नीट उपयोजन करून नव्या तालिका घडवणं गरजेचं आहे. शिशुगीतं आणि बडबडगीतं यांचं बालकांच्या भाषाविकासात महत्त्‍वाचं स्थान आहे. नाद, लय, ताल आणि ठेका यांच्यासोबतच छोट्या छोट्या बाबींचे संस्कार शिशुगीतांतून होत असतात.

ज्येष्ठांनी लिहिलेल्या बालसाहित्यापेक्षा बालकांच्या लेखणीतून भाषेची जिवंत रूपं अधिक ठळकपणे नजरेस पडत राहतात. याचं एक कारण ज्येष्ठांच्या लेखनातून संस्कार, आदर्श यांचा होणारा भडिमार लहानांच्या लेखनात नावालाही सापडत नाही.
स्वरा वैभव कुलकर्णी नावाची तिसरी-चौथीतली मुलगी दैनंदिनी लिहिते. त्या दैनंदिनीचे काही भाग ‘फेसबुक’वर आहेत. ‘दीदीज् डायरी’चे काही तुकडे बालभाषा व बालविश्व समजून घेण्यासाठी मदतीचे ठरू शकतील. स्वरा लिहिते : ‘मी मोठी झाल्यावर टीचर होणार; पण अभ्यासाची नाही. ड्रॉइंगची. मी मुलांना अभ्यास देणार नाही. कारण, मलाच अभ्यास करायला आवडत नाही...‘मला बॉलपेन खूप आवडतं; पण आमच्या शाळेत बॉलपेन अलाउड नाही. फक्त फाउंटन पेन आणि जेल पेनच अलाउड आहे; पण मला खरंच खरंच जेल पेन बिलकूल आवडत नाही आणि जर फाउंटन पेन वापरलं तर निब तुटतं. कुठलंही पेन वापरलं तरी पंचाईत. मग शाळेत नेऊ कोणतं पेन?’
बालकांची भाषा समजून घेताना लक्षात येतं, की बालकं सरळ मुद्द्याला हात घालतात. एखादी गोष्ट फिरवून मांडणं त्यांच्या सूत्रात बसत नाही. प्रत्येक बाबीविषयी त्यांची मतं असतात, ती स्वतंत्र असतात, ठाम असतात आणि ती मतं स्वीकारली जावीत ही त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे त्यांच्याजवळ लगेच प्रश्न-प्रतिप्रश्न तयार असतात.

कवयित्री आणि भाषाभ्यासक हेमा लेले यांनी मुलांच्या भाषेविषयी नोंदवलेले निष्कर्ष लक्षात घेण्याजोगे आहेत. मुलांच्या भाषेवर कुटुंबातलं वातावरण, सामाजिक अभिसरण आणि सांपत्तिक स्तर यांचा परिणाम होतो. ‘मुलांच्या जगण्याचा सूर त्यांच्या भाषेतून व्यक्त होतो आणि वाढत्या वयात भाषेवरचा त्यांचा हक्क वाढीस लागून ते विविध प्रयोग करू लागतात,’ असं लेले यांनी म्हटलं आहे. बालकांची भाषा आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या अथवा त्यांनी लिहिलेल्या लेखनाची भाषा यांवर नजर टाकली तर हेच निष्कर्ष पुन्हा आपल्या हाती येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com