esakal | बालकुमार-कवितेतला पाऊस (विद्या सुर्वे-बोरसे)
sakal

बोलून बातमी शोधा

vidya surve borse

पाऊस...धरित्रीच्या चैतन्याचं रूप. झाडा-वेलींना, पशू-पक्ष्यांना आणि आबाल-वृद्धांना मोहवून टाकणारा सृष्टीचा चमत्कार. ज्याला पाऊस आवडत नाही, जो पावसात भिजू इच्छित नाही, अंगावर कोसळणारे पाऊसथेंब ज्याला सुखावत नाहीत असा कुणी तरी असेल का? असा नसेलच कुणी!

बालकुमार-कवितेतला पाऊस (विद्या सुर्वे-बोरसे)

sakal_logo
By
विद्या सुर्वे-बोरसे

पाऊस...धरित्रीच्या चैतन्याचं रूप. झाडा-वेलींना, पशू-पक्ष्यांना आणि आबाल-वृद्धांना मोहवून टाकणारा सृष्टीचा चमत्कार. ज्याला पाऊस आवडत नाही, जो पावसात भिजू इच्छित नाही, अंगावर कोसळणारे पाऊसथेंब ज्याला सुखावत नाहीत असा कुणी तरी असेल का? असा नसेलच कुणी!

शरीर घामानं अगदी ओलं झालेलं असतं. घरभर नुसती तगमग असते. पंख्यातूनही गरम हवा येत असते. असं वाटतं की पिंप भरून पाणी काढावं आणि त्यात डुंबत राहावं. सर्वत्र शुष्क रखरख असते. कोरडेपणा व्यापून असतो. घसा कोरडा, माठ कोरडा, शेत कोरडं, नदीचं पात्र कोरडं, विहिरीचा तळ कोरडा. कोरडेपणा दहा दिशांनी अंगावर चाल करून येतो. अशा वेळी आंब्याची मस्त गार सावली खुणावत नाही, कोकिळेची साद ऐकू येत नाही, हळूहळू फुलत चाललेला गुलमोहर लक्ष वेधून घेत नाही. उन्हाळी दुपार खायला उठते आणि अचानक पश्चिमेच्या आसमंतात एखादा पांढरा ढग तरंगू लागतो. जवळ येत जातो. अगदी माथ्यावर. उगीच वाटतं, ऊन्ह जरा मऊ झालं आहे, लोण्यासारखं. हलकं हलकं झालं आहे कापसासारखं. थांबलेला वारा वाहू लागतो. ही वाऱ्याची गार झुळुक मोहवून टाकते. ढग आकार बदलत राहतो. कधी ससा, कधी सुसर, कधी हत्ती, कधी ड्रॅगन, कधी डायनासोर. ढगाचा रंगही बदलतो. पांढराशुभ्र ढग काळवंडतो. अचानक गडगडू लागतो. बरसू लागतो. साऱ्या आसमंतात मृद्गंध भरून राहतो. पाऊस येतो.
पाऊस... धरित्रीच्या चैतन्याचं रूप. झाडा-वेलींना, पशू-पक्ष्यांना आणि आबाल-वृद्धांना मोहवून टाकणारा सृष्टीचा चमत्कार. ज्याला पाऊस आवडत नाही, जो पावसात भिजू इच्छित नाही, अंगावर कोसळणारे पाऊसथेंब ज्याला सुखावत नाहीत असा कुणी तरी असेल का? असा नसेलच कुणी!

ढग पाहताच मुलं अंगणात पळालेली असतात. त्याच्या स्वागतासाठी गाणं गात असतात, ‘ये रे, ये रे, पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाउस आला मोठा’ हे गाणं म्हटलं नाही असा एकतरी मराठी माणूस सापडेल काय? मोठे झालेले लोकही कधी ना कधी मूल होतेच. मोठ्या झालेल्या लोकांतही एक मूल दडलेलं असतंच. बाहेर रिमझिम सुरू झाली की मनात पावसाची गाणी वाजू लागतात. ‘आला आला वारा, संगे पावसाच्या धारा’ (सुधीर मोघे) या गाण्यासोबत मोठे लोक त्यांचा भूतकाळ फिरून येतात. या भूतकाळाला कवीशी, गीतकाराशी सहसा काही घेणं-देणं नसतं; पण गायक-गायिकेचा आवाज आणि संगीत मात्र त्याला ठाऊक असतं! पावसाची अशी गाणी मनात रुंजी घालतात.

‘पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने’ (ग्रेस) असं म्हणणारा आवाज, ‘ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादात होता.’(ग्रेस) ही धीरगंभीर गाज, ना. धों. महानोरांच्या पावसाळी कविता, विठ्ठल वाघ यांची ‘तिफन’, कुसुमाग्रजांची गाणी, बालकवी ते सौमित्र आणि इंदिरा संत यांचे ‘नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी’ अशा कितीतरी कविता, गाणी पावसाबरोबरच मनात रिमझिमत राहतात.

पावसाची विलक्षण रूपं मराठी कवितेत शब्दबद्ध झाली आहेत. पावसावर कविता लिहिली नाही असा कवी अपवादात्मकच म्हणावा लागेल. पाऊस मानवी स्मृतिपटलावर आदिबंधासारखा कोरला गेलेला असल्यामुळे तो त्याच्या विविध कंगोऱ्यांसह व्यक्त होत राहिला आहे. अवर्षणात त्याचा अभाव आणि अतिवृष्टीतही त्यालाच भाव आहे. कधी तो आनंदाचा सखा, तर कधी दु:खाचा सोबती आहे. डोळ्यांतून कोसळणारा पाऊस हा नकोसाच असतो. कधी तो बालकासारखा हट्टी आहे आणि कुठं तो आर्जवाची नोंद घेणारा मायाळू बापही आहे. ‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही’ (यशवंत मनोहर) असे उद्गार जिथं एकीकडे त्याची संपन्नता नोंदवतात, तिथंच सामाजिक दुभंगलेपणही अधोरेखित करतात.
श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनि ऊन पडे

या बालकवींच्या कवितेत श्रावणाचं मनमोहक, रम्य निसर्गचित्र आहे. आकाशातलं इंद्रधनुष्याचं तोरण, ओले पंख सावरणारे पक्षी, हिरव्या कुरणात बागडणारी हरणं, रानात चरणारी गाई-गुरं, आजूबाजूला फुललेली सुंदर आणि सुवासिक फुलं, देवदर्शनाला निघालेल्या, स्मितहास्य करणाऱ्या तरुणी हे सगळे या निसर्गचित्राचे घटक आहेत. श्रावणाचं देखणं रूप बालकवी घेऊन येतात आणि दुसऱ्या बाजूला रविचंद्र हडसनकर यांची कविता झोपेतून खाडकन् जागं करते.
सरावन महिना आला की
असाच जीव भंडावून जाते
आभाळ फाटल्यावानी सांडू लागलं की
आपली झोपडी पुळू पुळू लडू लागते.

श्रावण येतो तेव्हा श्रमिकांसाठी काय घेऊन येतो? त्यांच्या दारिद्र्याला कसा हसत येतो, त्यांना हतबल, अधिक हतबल कसा करत जातो, त्यांची पोटभर जेवण्याची स्वप्नं कशी हिरावून नेतो याचं काळीज पिळवटून टाकणारं चित्रण हडसनकर यांनी ‘देणगी’ या संग्रहातल्या कवितेतून केलं आहे.
मंग माय एकदम आडर सोडते :
‘जात्याजवळ थाळ्या ठेव
भानोस्याजवळ डेचकी ठेव
उखळाजवळ तांब्या ठेव
आड्याखाली बट्टू ठेव
धारनाच्या कोट्यात पव्हऱ्या ठेव
दिव्याच्या देवळीकडं काथोट ठेव
इकडं तिकडं समदे बासनं सरतात
तरी झोपडी लडूच लागते टप...टप...टप...

बाकी, मुलांच्या भावविश्वातला पाऊस मात्र निराळा आहे. तिथं कागदी होड्यांचं साम्राज्य आहे. अशा कागदी होडीत बसून मुलं सात समुद्र फिरून येतात, अवघं जग पाहून येतात. ‘सांग ना गं आई, रात्रभर ओरडूनसुद्धा, बेडकाचा आवाज का बसत नाही?’ हा, उत्तर देता येणार नाही, असा प्रश्न तिथं आहे. आणि
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? (मंगेश पाडगावकर)
अशी इच्छा म्हणा किंवा प्रार्थना म्हणा, आहेच. खरं तर पाऊस आणि प्रार्थना यांचं नातं अतूट आहे. तो जशी मोठ्यांना प्रार्थना करायला लावतो, तशीच छोट्यांनासुद्धा करायला लावतो. कधी ही प्रार्थना पावसाची आहे, कधी निर्मिकाची आहे तर कधी आई-बाबांची आहे.
ए आई, मला पावसात जाऊ दे
एकदाच गं भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे
धारेखाली उभा राहुनी, पायाने मी उडवीन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी वाट्टेल ते होऊ दे
(वंदना विटणकर)
या आर्जवातली गंमत, काळ उलटला तरी, न संपणारी आहे. कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही कविता बहुतेकांना पाठ असते.
मोडून पडला संसार जरी
मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून
फक्त लढ म्हणा
हा तिचा संदेश कालातीत आहे.
कुसुमाग्रजांनी पावसावर लिहिलेल्या कवितांची संख्याही मोठी आहे. त्यांच्या एका संग्रहाचं नावच ‘श्रावण’ असं आहे.
हासरा नाचरा
जरासा लाजरा
सुंदर साजरा
श्रावण आला
असं त्याचं रंगबावरं रूप कुसुमाग्रजांनी रेखाटलं आहे.
बा. सी. मर्ढेकर हे मराठी नवकवितेचे प्रवर्तक. दुर्बोधतेचा शिक्का त्यांच्या अनेक कवितांवर मारण्यात आला. ‘आला आषाढ श्रावण’ ही त्यांची विलोभनीय रचना आहे. तीतही एक दृश्य आहेच; पण ते बालकवींच्या किंवा कुसुमाग्रजांच्या कवितेतल्याप्रमाणे नाही.
त्याला खास मर्ढेकरांचा स्पर्श आहे.

काळ्या ढेकळांचा गेला
गंध भरून कळ्यांत
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत

चाळीचाळीतून चिंब
ओली चिरगुटे झाली
ओल्या कौलारकौलारी
मेघ हुंगतात लाली

असं चकचकीत ओलसर गोड क्षणांचं दृश्य ही कविता डोळ्यांपुढे उभे करते.

पावसाच्या बडबडगीतांची एक गंमत असते. त्यांत नाद, ताल आणि चमत्कृती असते. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या करताना ती मुलांची सोबत करायला धावून येतात. ही गाणी कुणी मुद्दाम पाठ केलेली नसतात, जाणीवपूर्वक शिकवली गेलेली नसतात, एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे ती पावसासारखी प्रवाहित होत जातात.
वीज चमकली चक चक चक
जिकडे तिकडे लख लख लख
पाउस आला धो धो धो
पाणी वाहिलं सो सो सो
पाण्यात बोट सोडली सोडली
हातभर जाऊन बुडली बुडली

बोटीवर बसला बेडूक
तो ओरडला डराव डूक

‘धोंडी धोंडी पाणी दे’च्या लोकगाण्यातही हाच नाद आपल्याला सापडेल. भुलाबाईच्या गीतांतही सापडेल. पाऊस हा शब्द निव्वळ ऐकला तरी पटापट कविता आठवत जातात.
‘पर्जन्ये पडावे आपुल्या स्वभावे’ असं सांगणाऱ्या संत तुकाराममहाराजांपासून ते
आला पाऊस पाऊस
आला ललकारी ठोकत
पोरं निघाली भिजत
दारी चिल्लया मारत’

या बहिणाबाई चौधरी यांच्या रचनेपर्यंत, ‘ग्रीष्मातल्या सकाळी आले भरून मेघ’ (पद्मा गोळे) पासून ते ‘भरू दे यंदा मृगाचं आभाळ, नावाच्या तुझ्या यळकोट करीन’ (प्रकाश होळकर)पर्यंत. शिरीष पै, शान्ता शेळके यांनी भाषांतरित केलेल्या हायकूंपासून ते
‘पाऊस नसतानाही पावसाचे गीत
मी माझ्या हुंदक्यांनी ऐकत असते
(अनुराधा पाटील) या रचनेपर्यंत सर्वत्र पाऊस भरून राहिलेला असतो.

आता काळ बदलला, भाषा बदलली, बालकांची प्रतिमासृष्टी बदलली...पण पाऊस? तो नाही बदलला, त्याच्याविषयी असणारं आकर्षणही नाही बदललं. कवी दासू वैद्य यांनी हा पाऊस अलगद पकडला आहे :
आभाळाचा कर शॉवर
मैदानाचा भरू दे पॉट
पाण्याखाली बुडव एकदा
शाळेची ही रुटीन वाट
रे पावसा ...

आजच्या मुलांच्या मनातलं हे गाणं आहे. मुलं जेव्हा पावसाचं गाणं गात असतात तेव्हा पालकांनीही आपला आवाज त्यांच्या सुरात मिसळायला काय हरकत आहे?