शब्दांनो, मागुते या! (विद्या सुर्वे-बोरसे)

vidya surve borse
vidya surve borse

आपल्या मुलांचं शिक्षण कोणत्या माध्यमात झालं पाहिजे, त्यांना कोणत्या माध्यमाच्या शाळेत दाखल करायचं हा निर्णय ज्या त्या पालकांनी घ्यावा, त्याबद्दल मला काही सांगायचं-म्हणायचं नाही. मात्र, मला सांगायचं आहे ते जग समजून घेण्याच्या मुलांच्या स्वाभाविक वृत्तीबद्दल. पालकांनी आपल्या मुलांना कोणत्याही अडथळ्याशिवाय जग पाहायला शिकवलं पाहिजे. जग अनुभवण्याची प्रक्रिया ही शब्दांतूनही होत असते, त्यासाठी ‘शब्दांनो, मागुते या’ हा अनुभव मुलांना स्वत:हून घेऊ दिला गेला पाहिजे.  

वाग्देवी शारदे गे! फिरवुनि अपुले शब्द पाचार येथें!
साहाय्यावीण त्यांच्या भजन तव कसें सांग साधेल मातें?
आशामेघालि चिन्तानल अजि विझवूं जाहलीसे तयार
शब्दांनो! मागुते या! बहार मम मनी नूतन येईल फार!

कविवर्य केशवसुत यांची ‘स्रग्धरा’ वृतातली ही कविता माझी थोरली बहीण अनितामाई मोठ्यानं वाचत होती. तिच्या अभ्यासक्रमात बहुधा ती कविता असावी. मी अद्याप 'पूर्व माध्यमिक’ला होते. ती बहुधा इयत्ता दहावी ओलांडून पुढं गेली असावी. ‘मोठ्यानं वाचन करा, त्यामुळे उच्चार स्पष्ट होतात’ असा आमच्या आईचा दंडक.
...तर माई वाचत होती आणि मी तेव्हा तिच्या जवळपासच असेन. या घटनेला आता तीस वर्षं उलटून गेली आहेत. मात्र, कानावर पडत असलेल्या त्या कवितेची लय आणि ‘शब्दांनो! मागुते या...’ ही ओळ अजूनही माझ्या लख्ख स्मरणात आहे. पुढं ही कविता माझ्याही वाचनात आली. कवितेची मुशाफिरी करताना केशवसुतांची भेट पुनःपुन्हा होत राहिली. त्यांनी शब्दांना केलेलं आवाहन निरनिराळ्या अर्थवलयांसह खुणावत राहिलं.
* * *

जुन्या मैत्रिणीशी फोनवर बोलत होते. ती म्हणाली : ‘नातवांना जरादेखील मराठी वाचता येत नाही. सगळे शब्द इंग्लिशमधून सांगावे लागतात. फळांची, झाडांची, फुलांची, भाज्यांची फक्त इंग्लिश नावंच त्यांना माहीत आहेत. ‘भेंडी’सुद्धा माहीत नाही. अंबाडीच्या भाजीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? सगळी दुपार डिक्शनरी शोधत बसले; पण इंग्लिश शब्द सापडलाच नाही.’
मैत्रिणीचं बोलणं ऐकताना मला गंमत वाटत राहिली. नातवांचं भाषिक पर्यावरण आणि त्यांचं अध्ययन-अध्यापन यात गल्लत होत जातेय असं वाटत राहिलं. मानवी मूल त्याच्या आजूबाजूच्या समाजातून त्याची भाषा आत्मसात करत असतं, त्याला भाषा अर्जित करावी लागते. ती त्याला जन्मजात वंशपरंपरेनं येत नाही. कुत्र्याचं पिल्लू वाघांबरोबर लहानाचं मोठं झालं तर ते डरकाळी फोडणार नाही, ते भुंकणारच. कारण, भुंकण्याची क्रिया ही कुत्र्याच्या बाबतीत नैसर्गिक आहे; पण वाघांबरोबर लहानाचं मोठं झालेलं माणसाचं मूल मात्र डरकाळीच्या भाषेत बोलू लागेल. कारण, त्यानं वाघाची भाषा आत्मसात केलेली असेल. म्हणूनच आपल्याला, म्हणजे माणसाला, कोणतीही मानवी भाषा शिकता येते, तिच्यातून व्यवहार करता येतो; पण म्हणून, आपण ज्या समूहात राहतो त्या समूहाची भाषा बालकांना न शिकवता दूरच्या समूहाची भाषा - भविष्यकालीन व्यापारी-उद्दिष्टं समोर ठेवून - बालकांवर लादणं हा अन्याय आहे. आणि त्यातही दुःखाची गोष्ट म्हणजे, आपल्यावर अन्याय केला जात आहे हे समजण्याचंदेखील बालकांचं वय नसतं.
* * *

भाषा ही केवळ संवादाचं साधन नाही, तर ती त्या त्या समाजाचं सांस्कृतिक संचित असते. बालकाचं समग्र भावविश्व, त्याची स्वप्नं, विचार, भाव-भावना, इच्छा-आकांक्षा असं सगळं काही भाषेद्वारेच अभिव्यक्त होत असतं. भाषा आहे म्हणून बालकाचा, पर्यायानं मानवाचा, प्रवास सुकर होत जातो.
भाषेचं संकल्पनाक्षेत्र आणि भाषिक भांडार यांची बालकाला त्याच्या अनुभवातून जाणीव झाली तर त्याच्या अभिव्यक्तीला कुठल्याच मर्यादा पडणार नाहीत. त्याची जीवनजाणीव त्यामुळे प्रगल्भ होईल. आपल्या मुलांची भाषा समृद्ध कशी होईल? शब्दकोश पाठ केल्यानं तर ती नक्कीच समृद्ध होणार नाही. शब्दांशी एकजीव झालेली, शब्दांशी एकरूप झालेली शब्दांमागची जी संकल्पना असते तिचा अनुभव पालकांनी मुलांना द्यायला हवा.
उदाहरणार्थ : जर कुणी फ्लॅटमध्ये वास्तव्य करत असेल तर अपार्टमेंट, बीएचके, ॲटॅच्ड् टॉयलेट-बाथरूम, बाल्कनी, पॅसेज, फ्लोअर, कॉमन पार्किंग, टेरेस, सोसायटी, मेन्टेनन्स, वॉचमन, मीटिंग-हॉल, किचन, बेडरूम असे शब्द बालकांच्या कानावर सतत पडत असणार; पण हेच कुटुंब जर गावाकडच्या वाड्यात राहत असेल तर? तर वापरात असलेले शब्द बदलतील. अंगण, चिरे, माळवद, बळद, लाकडी खण, परस, स्वयंपाकघर, ओसरी, बैठक, ढाळज, मोरी, न्हाणी, चौक असे वेगळे शब्द प्रत्येकाच्या तोंडी असतील. किचन आणि स्वयंपाकघर भाषिक पातळीवर सारखं असणार नाही. एकीकडे ओव्हन असेल, मिक्सर-ग्राइंडर असेल; तर दुसरीकडे उखळ, जातं, मुसळ, पाटा-वरवंटा असेल. गॅसच्या शेगडीसमवेत जसे लायटर आणि सिलिंडर हे शब्द येतात, त्याप्रमाणे चुलीसमवेत फुंकणी आणि सरपण हे शब्द येतात. सरपण हा शब्ददेखील सुटा येत नाही, तर आयचन, इचू-काटा, तुराट्या, लाकूडफाटा, कोळसे, काडेपेटी, अंगार असे इतरही शब्द त्याच्याबरोबर येतात. आपण एक शब्द वजा करतो तेव्हा त्यासोबत इतर दहा शब्द वजा होत असतात. केवळ शब्दच नव्हे, तर एक परंपरा विस्मरणात ढकलली जाते.

बदलता काळ नव्या गोष्टी घेऊन येणारच!
‘आपण पूर्वी गड-किल्ल्यांवर किंवा खूप पूर्वी डोंगरात, जंगलात-गुहेत राहत होतो. आपण आजही तसंच राहायला हवं काय? गड-किल्ल्यांबरोबर येणारे शब्दही वापरातून गेलेच की!’ अशी उत्तरं देणारे देतील. त्यांचं म्हणणं पटण्यासारखं आहे असं क्षणभर वाटतं; पण तसं नाही खरं. साधं उदाहरण घेऊ या गवताचं. आपल्या आजूबाजूला आपण गवत उगवून आलेलं पाहतो. हिरव्या लॉनवर आपण कधी कधी विश्रांती घेतो, गोल्फचं मैदान गवतानं अच्छादलेलं असतं. काही गवतांवर फुलं उमलून आलेली आपण पाहतो, कासचं पठार आणि तिथली फुलं - अनेकांनी प्रत्यक्षात पाहिलेली नसली तरी निदान - फोटोत पाहिलेली असतात. गाई-म्हशी जिथं चरतात त्याला कुरण म्हणतात, तेही गवताचंच असतं. गणपतीला दूर्वा वाहिल्या जातात...दूर्वा किंवा हरळी हेही गवतच आहे. आणि गवती चहा? आजूबाजूला दूरवर पसरलेल्या गवतातून चहासाठीचं गवत तुम्हाला शोधता येईल? हरळी निवडता येईल? सुगरण आणि चिमण्या याच गवतातून त्यांची घरटी तयार करतात. कुंदा, लव्हाळी, गाजरगवत, पाणकणीस, चिमणतारा, रुई, टारफुला, तांदुळचा, रानकांदा, आघाडा, घाणेरी, कुसळ, धामण असे गवताचे असंख्य प्रकार आहेत. इतकंच नव्हे तर गहू, मका, ज्वारी, बांबू, ऊस हेही एक प्रकारचं गवतच आहे. गवतापासून कागद तयार होतो आणि घरंसुद्धा उभारली जातात. मोठ्या वादळात जेव्हा पोलादी घरं कोसळतात तेव्हा बांबूची घरं तग धरून उभी असतात. गवत, त्याचे प्रकार ओळखू येण्यासाठी वनस्पतीशास्त्राचं अभ्यासकच असायला हवं असं नाही, तर आपल्याकडे तशी दृष्टी असणं गरजेचं आहे. हे तर सामान्यज्ञान आहे, परिसरज्ञान आहे; पण घडतं असं की, आपल्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष माहीत असतात, पण आपल्या शहराचे शिक्षण समितीचे अध्यक्ष कोण आहेत हे माहीत नसतं! आपल्याला अमेझॉनच्या जंगलातल्या झाडाविषयीची माहिती असते; पण हरभऱ्याचं झाड किती उंच असतं याचं उत्तर माहीत नसतं. आपल्याला विमानाच्या प्रत्येक सुट्या भागाची नावं ठाऊक असतात; पण कुळव, वखर, कोळपे, पास, रुमणे, औत, दुफण, पाभर, चाडे, नांगर, विळा, खुरपे, कोयता, बतई या आजूबाजूला असणाऱ्या अवजारांची नावं आणि त्यांचे उपयोग माहीत नसतात.

आपली संस्कृती या शब्दांनी घडवलेली आहे. आपल्या संस्कृतीमधली बोली अनोखी आहे. केवळ संस्कृतीचाच मुद्दा नसतो, तर आपल्याला जेव्हा खूप छोट्या छोट्या गोष्टी माहीत असतात तेव्हा आपली विचार करण्याची पद्धतच बदललेली असते. आपण मनातले विचार नेमकेपणानं व्यक्त करू लागतो. शब्द आपल्या मागं मागं चालत येतात!
जगातली माणसं निरनिराळ्या भाषा बोलतात, हे मुलाला ते पाच-सहा वर्षांचं होईपर्यंत कळून आलेलं असतं. शाळेतली इंग्लिश भाषा, घरातली मराठी भाषा आणि टीव्हीच्या कार्टूनमधली हिंदी भाषा या एक नाहीत, प्रत्येक भाषेत वस्तूला, प्राण्याला निराळं नाव आहे हे त्याला अनुभवानं कळून येतं. बनियान, बरगद आणि वड ही एकाच झाडाची नावं आहेत... लायन, शेर आणि सिंह हे एकच आहेत हे त्याला समजलेलं असतं. मूल जर बहुभाषक समाजात वावरत असेल तर ते उत्सुकतेनं विचारीलही, की ‘सिंहाला गुजरातीत किंवा सिंधीमध्ये काय म्हणतात?’ मुलाचं नैसर्गिक कुतूहल हे परीक्षेसाठी नसतं किंवा भविष्यातला व्यापारी-दृष्टिकोन ठेवून तयार झालेलं नसतं. भाषाप्रभुत्वाची लढाई ही मोठ्यांची असते, तिच्याशी बालकाला काही कर्तव्य नसतं, त्याला केवळ शिकायचं असतं, जाणून घ्यायचं असतं, समजून घ्यायचं असतं. ज्ञानग्रहणाची प्रक्रिया याच कुतूहलातून सुरू होते.

आपल्या मुलांचं शिक्षण कोणत्या माध्यमात
झालं पाहिजे, त्यांना कोणत्या माध्यमाच्या शाळेत दाखल करायचं हा निर्णय ज्या त्या पालकांनी घ्यावा, त्याबद्दल मला काही सांगायचं-म्हणायचं नाही. मात्र, मला सांगायचं आहे ते जग समजून घेण्याच्या मुलांच्या स्वाभाविक वृत्तीबद्दल. पालकांनी आपल्या मुलांना कोणत्याही अडथळ्याशिवाय जग पाहायला शिकवलं पाहिजे. जग अनुभवण्याची प्रक्रिया ही शब्दांतूनही होत असते, त्यासाठी ‘शब्दांनो, मागुते या’ हा अनुभव मुलांना स्वत:हून घेऊ दिला गेला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com