आबिल खेळू का ताबिल खेळू? (विद्या सुर्वे-बोरसे)

विद्या सुर्वे-बोरसे
Sunday, 26 July 2020

देशी खेळांचं काय झालं असेल असा विचार मी कधी कधी करते तेव्हा लक्षात येतं, की शहरी मध्यमवर्गीय मुलं ज्या वेळी पुस्तकं पाहून खेळ शिकत असतात त्या वेळी छोट्या गावांमधली, वाड्या-वस्त्यांमधली, तांड्या-पाड्यांमधली मुलं-मुली आपल्या ज्येष्ठांकडून देशी वारसा घेऊन लोखंडाची चकारी किंवा टायर पळवता पळवता क्रीडासंस्कृतीसुद्धा पुढं नेत असतात.

देशी खेळांचं काय झालं असेल असा विचार मी कधी कधी करते तेव्हा लक्षात येतं, की शहरी मध्यमवर्गीय मुलं ज्या वेळी पुस्तकं पाहून खेळ शिकत असतात त्या वेळी छोट्या गावांमधली, वाड्या-वस्त्यांमधली, तांड्या-पाड्यांमधली मुलं-मुली आपल्या ज्येष्ठांकडून देशी वारसा घेऊन लोखंडाची चकारी किंवा टायर पळवता पळवता क्रीडासंस्कृतीसुद्धा पुढं नेत असतात. ‘कुणी घ्या सूर्य, कुणी घ्या चंद्र’ म्हणत आपापले भिडू वाटून घेत असतात आणि मुली टाळ्या वाजवत ‘आबिल खेळू का ताबिल खेळू । गाई गेल्या खडका गुलाल खेळू’ म्हणत आयुष्याच्या नव्या स्वप्नांवर ताल धरत असतात.

पाऊस नुकताच पडून गेला होता. आता निदान काही तास उघडीप असेल. जमीनही काहीशी सुकली होती. अंगणातली धूळ खाली बसली होती. तेवढ्यात कुठून तरी चार मुलं येतात. देवळापुढच्या पिंपळाखाली अगोदरच काही मुलं बसलेली असतात. पायरीवर गावातले कुणी मध्यम वयाचे काका. देऊळ बंद आहे. एरवी दुपारी ते बंद असतंच; पण कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून ते बंदच आहे. पूजेपुरतं उघडलं जातं तेवढंच.

मुलं येतात आणि खेळ सुरू होतो. फुल पॅंटमधली मुलं खिशात असलेल्या काचेच्या गोट्या काढतात. कुणा एकाकडे दगडी गोटी आहे; पण ती दिसताच इतर मुलं त्याला विरोध करतात, दगडी गोटीमुळे काचेच्या गोट्यांचे टवके निघतात ही त्यांची तक्रार. तोही राजी होतो. हाताच्या कोपरानं गल तयार केली जाते. सगळे ‘पई’वर उभे राहतात. वितीच्या साह्यानं नेम धरून गोटी गलीच्या दिशेनं फेकली जाते. गोटी गलीत जावी हा ज्याचा त्याचा प्रयत्न. गोट्या गलीच्या आसपास जमा होत जातात. एकजणही नशीबवान नाही! गलीजवळ गोटी असणारा ‘मिर्री’ आणि सर्वात दूरचा ‘पड्डीस’. खेळ सुरू होतो. मिर्री अट्टीवर नेम धरून दुसऱ्या गोटीला बाद करत जातो. गुण मिळवत राहतो. तो हुकेल तेव्हा पुढच्याची बारी. मुलं तल्लीन होऊन गेली आहेत. एकेक जण डावाबाहेर जातोय. पायऱ्यांवर बसलेले काकाही खेळात रंगून गेले आहेत. बाद होणारा भिडू आपली जागा शोधून बसत आहे. पिंपळाच्या मुळ्यांवर, पायऱ्यांवर. प्रत्येकाचे डोळे डावावर. प्रत्येकाच्या मनात गाणं :‘एक्कल काजा, डूब्बी राजा, तिरानी मंजा, चब्बक चेंडू, पाची पांडव, सय्या दांडव, सात सुतली, आठघर नल्ली, नऊमानी किल्ली, दशे गोखिली...’ खूप वेळपासून हा खेळ पाहत असणारे आणि स्वत:च्या बालपणात रममाण झालेले कवी श्रीकांत देशमुख गोट्या खेळणाऱ्या मुलांचं छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करतात. सोशल मीडियात या छायाचित्रावर ‘लाईक’ आणि ‘कॉमेंट’चा पाऊस पडत राहतो.

बहुतेकांना आपलं बालपण आठवतं. बहुतेकजण आपल्या जुन्या दिवसांत हरवून जातात. कुठं गेले ते दिवस...कुठं गेले ते खेळ? अनेकांना प्रश्न पडतो.
पालक म्हणून आपण नव्या-जुन्याच्या सीमेवर उभे आहोत. आपल्या स्मृतींत जुने खेळ आहेत आणि आपल्या घरात नवे खेळ. आजूबाजूला किती तरी नवे खेळ आहेत. दोन्ही प्रकारचे. मैदानी आणि घरातल्या घरात खेळले जाणारे बैठे खेळ. क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, लॉन टेनिस, व्हॉलीबॉल खेळणारी मुलं कोणत्याही शहरात कुठल्याही कॉलनीत आढळतील. बुद्धिबळ, कॅरम यांची संगत आजच्या नव्या पिढीला आहे. बुद्धिबळ या शब्दातच मुळात चातुर्य अभिप्रेत आहे. हा खेळ बुद्धी तल्लख करतो. ‘सापशिडी’ किंवा ‘नवा व्यापारी’ हे खेळ हद्दपार झाले आहेत असं कसं म्हणता येईल? मुंबईची पहिली ओळख अनेकांना ‘नवा व्यापारी’ या खेळानं घरी बसल्या बसल्या करून दिली होती. याच खेळानं अर्थनीतीही शिकवली होती. सापशिडीला जुन्या काळात ‘मोक्षपट’ असं म्हणत असत. अंताक्षरीही घरोघर खेळली जाते. तिथंही बुद्धीचा कस लागतो. ‘भेंड्या’ या नावानं तो मध्ययुगीन काळातही होताच. गावांच्या नावांच्या, देशांच्या नावांच्या, कवितेच्या ओळींच्या भेंड्या खेळणं यांतून अभ्यासही आपोआपच घडत असे.

क्रिकेटला ‘चेंडू-फळी’ का म्हणायचं? कोणत्याही छोट्या गावात पारावर बसलेले आजोबा आपल्याला चेंडू-फळीच्या प्राचीनत्वाचा दाखला देत संतरचना ऐकवतील.
झेला रे भाईंनो, झेला रे। गुरुवचने तुम्ही झेला रे।।
सहजचेंडू सामानफळी। खेळूं जाणे तो खेळिया बळी।।
अभिमानाचा चढे तो खालता पडे। हातचा चेंडू मग तो जाय चडफडे।।
एका जनार्दनी, एकची बोली। गुरुपुत्र होय तोचि झेली।।
मध्ययुगीन संतांनी विटी-दांडू, भोवरा, हुतूतू या खेळांचं रूपक वापरून
ईश्वरभक्तीचा संदेश सामान्यांपर्यंत पोहोचवला.
मिस मेरी भोर, ताराबाई मोडक यांचं बालशिक्षणाच्या क्षेत्रात अतुलनीय योगदान आहे. त्यांनी मुलांसाठी कविता आणि खेळगीतं रचली आहेत. खेळता खेळता अभ्यास करण्यासाठी ही गीतं आजही महत्त्वाची ठरतील. खेळगीतं हा शिशुसाहित्याचा, विशेषत: बालकवितेचा, महत्त्वाचा प्रकार होय.
मुलींचे म्हणून तर पूर्वी किती खेळ होते. त्यातले अजूनही पुष्कळ आहेत. फुगड्या हा बहुतेक मुलींचा आवडीचा खेळ. फुगडी नुसती खेळायची नसते, तर फिरता फिरता गाणंही गायचं असतं. गाण्याचा ताल फुगडीच्या लयीशी एकरूप होऊन जातो, मग झिम्मा-फुगडी खेळणाऱ्या मुली, त्यांचं गाणं आणि त्यांचा सभोवताल हे सगळं एकजीव होऊन जातं.
फुगडी खेळू दणदण ऽ
रुपये वाजवू खणखण ऽ
रुपयाची सुपली, मोत्यानं गुंफली
जाऊ माझी सोकली, पान खाया शिकली
पानाचे देठ, माझ्या फुगडीचा येठ!

असं म्हणत फेर धरणाऱ्या मुली आणि महिला कधी काळी अंगणात दिसत असत. प्रदेशपरत्वे गाण्यांत काही शब्द बदलत असत; पण या खेळांचा आनंद सर्वव्यापी होता.
मराठी ख्रिस्ती साहित्याचा प्रवाह बळकट करणाऱ्या अनुपमा उजगरे यांनी बालपणी खेळलेल्या काही खेळांची नावं सांगितली आहेत, ‘तळ्यात-मळ्यात’ आणि नऊ खड्यांच्या साह्यानं खेळता येणाऱ्या ‘नऊखऊ’ या खेळांचं त्यांनी लिहिलेलं वर्णन जुन्या दिवसांत घेऊन जातं. अनुजा जोशी या गोव्यातल्या कवयित्री. बालपणी नव्यानं शोधलेल्या एका खेळाची हकीकत त्या लिहितात : ‘आम्ही एक नवीन खेळ शोधला होता त्याचं नाव ‘सतरंजी अंजाप.’ एक मोठी चादर, सतरंजी घेऊन सगळ्यांनी तिच्याखाली एकत्र लपायचं. डाव असणाऱ्यानं सतरंजीचा कोपरा ओढत, उघडून बघत, प्रत्येकाचं नावं घेऊन अंजाप करायचं. दहा-बारा जण सतरंजीखाली एकत्र असणार. त्यात गडबड उडे व त्याच्यावरच पुन्हा राज्य येई.’ अंग्यानमंग्यान, घुई, डफ, आंबाकोई, आठ चल्लस, काचापुरणी, ढोपरीपेलणी, कांदाफोड, चंफुलपाणी, सुरापाट्या, गुप्पडगुप्पी, घनमाकड, चीरघोडी, डाबडुबली, लगोर, चूळचूळ मुंगळा, लपंडाव, ऊन्ह-सावली, शिवणापाणी, मामाचे पत्र, कुसली, सारीपाट, चौरस, टिपऱ्या, काचापाणी, धप्पाकुटी, ताकतुंबा हे सगळे खेळ तीस वर्षांपूर्वीपर्यंत खेळले जात असत. यांच्या जोडीला पतंग होते, चिकणमातीचे बैल होते, घरच्या घरी तयार केली जाणारी गणपतीची मूर्ती होती आणि दिवाळीचा किल्लाही होता. वेळूच्या कामठ्यांचे आकाशकंदील साधे रंगीबेरंगी कागद चिकटवून किंवा जिलेटिन पेपर चिकटवून तयार केले जात. नंतर आलेल्या बाजारानं आपल्या हातातली ही कला हिरावून घेतली. कॉम्प्युटरमुळं आणि मोबाईल गेममुळं मुलं मैदानांपासून दूर गेली. आता पतंग उडवू म्हटलं तरी ‘पतंगाला धागा कुठं व कसा बांधायचा?’ असे प्रश्न सुरू होतात. मांजा, कन्नी, चकारी, लपेट, ढील, तुक्कल, बावडी, घार, भरारी असे किती तरी शब्द पतंगबाजीशी संबंधित आहेत. हे शब्दही या खेळाबरोबर ‘आठवणीतले शब्द’ होत गेले.

पुण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या हीरकमहोत्सवानिमित्त सन १९४० मध्ये ‘उद्याचे शिक्षण’ हा ग्रंथ संपादित करण्यात आला होता. या ग्रंथात कृष्णाजी गणेश वझे यांनी ‘देशी खेळ’ असा एक लेख लिहिला आहे. व्यायामाची आवड निर्माण करण्यासाठी प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांनी त्या काळी कोणते श्रम वेचले आणि नेने घाट तालीम, कबूतरखाना, वाळवंट क्लब या खेळाडू-संघांची निर्मिती कशी झाली याचं विवेचन या लेखात आहे. पुण्यात सन १९०१ पासून आट्यापाट्या, खो खो, धावण्याच्या शर्यती यांचे आंतरशालेय सामने, तसंच शिमग्याच्या वेळी धुळवडीच्या दिवशी शालेय पातळीवर कुस्त्यांच्या स्पर्धा आयोजित केल्या जाऊ लागल्या. यामुळे विद्यार्थ्यांना खेळांची नवी दृष्टी दिली गेली. आट्यापाट्यासारखे देशी खेळ आता आपल्या शिक्षणाचा भाग राहिले नाहीत.

पुण्यात सन १८७१ मध्ये ‘नातू आट्यापाट्या क्लब’ या नावाची संस्था होती आणि तिच्या वतीनं आट्यापाट्या या खेळाचे सामने खेळले जात, याच्यावर आज विश्वास बसणार नाही.
सध्याच्या कोरोनाकाळात मुलं घरात अडकली आहेत. मैदानावर जाणं बंद झालं आहे. मी मुलांच्या हातात ‘घरोघरी खेळा खेळ’ हे राजीव तांबे यांचं पुस्तक ठेवलं. अरविंद गुप्ता यांची ‘वैज्ञानिक खेळणी’ त्यांना दिली. मुलं त्यात रममाण झाली. ‘टटाचू’, ‘खाऊ कार्ड’, ‘चावा वाचा’ असे नवे खेळ घरात आले. सापशिडीचं ‘फ्यूजन’ माहीत झालं. काही नव्या बाबी मुलांनी स्वत:हून शिकून घेतल्या. कागदांपासून नवनवीन वस्तू तयार केल्या.

देशी खेळांचं काय झालं असेल असा विचार मी कधी कधी करते तेव्हा लक्षात येतं, की शहरी मध्यमवर्गीय मुलं ज्या वेळी पुस्तकं पाहून खेळ शिकत असतात त्या वेळी छोट्या गावांमधली, वाड्या-वस्त्यांमधली, तांड्या-पाड्यांमधली मुलं-मुली आपल्या ज्येष्ठांकडून देशी वारसा घेऊन लोखंडाची चकारी किंवा टायर पळवता पळवता क्रीडासंस्कृतीसुद्धा पुढं नेत असतात. ‘कुणी घ्या सूर्य, कुणी घ्या चंद्र’ म्हणत आपापले भिडू वाटून घेत असतात आणि मुली टाळ्या वाजवत ‘आबिल खेळू का ताबिल खेळू । गाई गेल्या खडका गुलाल खेळू’ म्हणत आयुष्याच्या नव्या स्वप्नांवर ताल धरत असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang vidya surve borse write balguj article