सादाकोची आणि हॅनाची गोष्ट (विद्या सुर्वे-बोरसे)

vidya surve borse
vidya surve borse

सादाको बारा वर्षं जगली आणि हॅनाच्या वाट्याला तेरा वर्षांचं आयुष्य आलं. दोघी अकाली गेल्या. अनैसर्गिक गेल्या. युद्धांनी त्यांना अकाली हिरावून घेतलं. लहान मुलांच्या अपूर्ण आयुष्याच्या गोष्टी वाचून संपतात तेव्हा वाचक सुन्न आणि सजग होतो. या गोष्टी वाचकाला सजगतेबरोबरच अस्वस्थही करतात.

‘‘चल,’’ सादाको तिच्या मैत्रिणीला चिझुकोला म्हणाली : ‘‘आपल्याला घाईनं गेलं पाहिजे म्हणजे ‘शांतिस्मारका’तले सगळे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतील...’’ आणि त्या दोघी धावू लागल्या.
‘सादाको चालण्यापूर्वी पळायला शिकली...’ तिची आई कौतुकानं सांगायची.

सादाको अकरा वर्षांची होती. ती हिरोशिमा शहरात राहायची. या चिमुरडीची केवळ एकाच इच्छा होती. शाळेतली सर्वात वेगवान धावपटू होण्याची, कृषिदिनाच्या स्पर्धेत जिंकण्याची आणि माध्यमिक शाळेतल्या धावण्याच्या स्पर्धेत आपला क्रमांक टिकवण्याची इच्छा. म्हणून संधी मिळेल तेव्हा ती धावत सुटायची. शाळेत जाताना पळत जायची. परतताना धावतच यायची. मधल्या सुटीत मैदान गाठायची. वेळ मिळेल तेव्हा धावण्याचा सराव करत राहायची.
सरावाच्या दरम्यान एके दिवशी भोवळ येऊन ती कोसळते. तिला रुग्णालयात दाखल केलं जातं.
‘ल्युकेमिया, रक्ताचा कर्करोग,’ चाचण्यांनंतर डॉक्टर तिच्या रोगाचं निदान करतात.
अमेरिकेनं जपानमध्ये हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला तेव्हा
सादाको दोन वर्षांची होती. तिची आजी या हल्ल्यात मरण पावली. हजारो लोक या हल्ल्यात बळी गेले. जे जगले त्यांना निरनिराळ्या आजारांनी वेढलं. किरणोत्सर्जनामुळे लोक मरतच राहिले. सादाकोला ल्युकेमियाचं निदान झालं तेव्हा ती अकरा वर्षांची चिमुरडी पोर होती. शाळेतली सर्वात वेगवान धावपटू होण्याची तिची इच्छा होती. आपल्या आजूबाजूला असतात तशाच बालकांसारखी होती सादाको. आपल्या घरात जशी लहान मुलं असतात तशाच लहान मुलांतली एक ती होती. वाऱ्याशी स्पर्धा करण्याचं स्वप्न पाहणारी, छोट्या छोट्या शुभशकुनांवर विश्वास ठेवणारी, निळं आभाळ पाहून आनंदणारी, छोटा कोळी पाहून ‘आजचा दिवस चांगला असणार’ अशी समजूत बाळगणारी सादाको. अगदी आपल्या घरातल्या मुलांसारखीच.
‘एक हजार कागदी बगळे तयार करून देवाला अर्पण केले की तू ठणठणीत बरी होशील,’ असं रुग्णालयात असताना चिझुकोनं जेव्हा तिला सांगितलं तेव्हा सादाकोला तो शुभशकुनच वाटला होता आणि त्यानंतर ही लहानशी मुलगी तिच्या दुबळ्या हातांनी उत्साहानं कागदी बगळे तयार करू लागली. वर्गमित्रांना पत्रं लिहू लागली. आपण लवकरच पुन्हा शाळेत परतू म्हणून गृहपाठ करू लागली. म्हातारं होईपर्यंत जिवंत राहण्याची स्वप्नं पाहू लागली.

सादाको दोन वर्षांची होती त्या वेळी हिरोशिमावर टाकला गेलेला अणुबॉम्ब मात्र तिचा पाठलाग करत राहिला. तिच्या आई-वडिलांचा संसार काटकसरीचा होता. लाडक्या लेकीसाठी किमोनो घेण्यासाठीही वाट पाहावी लागली त्यांना. लेकीच्या आवडीचे खाद्यपदार्थ पै पै जमा करून विकत आणावेत आणि आजारी लेकीला ते खाताच येऊ नयेत, तिच्या सुजलेल्या घशाखाली ते उतरूच नयेत यापेक्षा मोठं दुःख काय असणार? अगदी तुमच्या-माझ्यासारखे होते सादाकोचेही आई-वडील. आपल्या बाळांच्या आनंदात स्वत:चा आनंद शोधणारे.
अणुबॉम्ब सादाकोचा पाठलाग करत राहिला आणि जगण्याची चिवट अभिलाषा मनात बाळगून सादाको कागदी बगळे तयार करत राहिली... पण ती ६४४ च बगळे तयार करू शकली. ‘जेव्हा मी मरेन तेव्हा माझ्या आत्म्याच्या देव्हाऱ्यासमोर तुम्ही माझ्या आवडीचं बिस्किट ठेवणार नं?’ अखेरच्या काळात तिनं विचारलेल्या प्रश्नानं वाचक आतल्या आत मोडून पडतो. फेब्रुवारीत रुग्णालयात भरती झालेली सादाको ता. २५ ऑक्टोबर १९५५ रोजी वयाच्या बाराव्या वर्षी हे जग सोडून गेली. जगातली हजारो समजूतदार बालकं काहीही गुन्हा नसताना जशी मरून जातात, तशीच सादाकोही मरून गेली.
***

एलिनॉर कोअर या अमेरिकी लेखिकेनं सादाकोची ही गोष्ट जगापुढं आणली. सादाकोवरच्या पुस्तकापूर्वी कोअर यांनी अठरा पुस्तकं लिहिली आहेत. मात्र, त्यांची ओळख निर्माण केली ती सादाकोच्या पुस्तकानं.
‘ही आमची वेदना अन् हीच आमची प्रार्थना...या जगी शांतता नांदो!’ शांतिउद्यानातील सादाकोच्या पुतळ्याखाली लिहिलेली ही सदिच्छा ऑगस्ट महिन्यात कितीदा तरी मी स्वतःशीच म्हणत राहते.
बाबा भांड यांचा ‘धर्मा’ हा माझ्या आवडत्या बालनायकांपैकी एक; पण भांड यांनी भाषांतरित केलेल्या या सादाकोच्या गोष्टीसाठी त्यांना मनापासून धन्यवाद द्यायला हवेत. युद्धाविषयी एक शब्दही न बोलता ही कथा युद्धाची संहारकता वाचकांना सांगते. वाचकांच्या संवेदनेला खडबडून जाग आणते.
***

‘हॅनाची सुटकेस’ हे पुस्तकही काहीसं असंच. मी ते
असंख्य वेळा वाचलं असेल. जेव्हा जेव्हा वाचलं तेव्हा तेव्हा माझे डोळे पाणावले. आयुष्यभर आपला पाठलाग करत राहणारी जी काही पुस्तकं असतात अशांपैकी एक हे पुस्तक आहे.
कॅनडातल्या रेडिओ-निवेदिकेनं माहितीपटासाठी हॅनाची गोष्ट लिहिली. नंतरच्या काळात ही कहाणी पुस्तकरूपात प्रकाशित झाली आणि जगभरातल्या चाळीसपेक्षा जास्त भाषांत भाषांतरित झाली. मराठीतही ती आहेच. माधुरी पुरंदरे यांचं यासाठी ऋण मानायला हवं.
ज्यांच्या वाट्याला बऱ्यापैकी सुरक्षित आयुष्य आलेलं आहे आणि ज्यांनी केवळ टीव्हीतून वा चित्रपटांतूनच युद्धं पाहिलेली आहेत अशांनी या दोन्ही गोष्टी अवश्य वाचल्या पाहिजेत.
कॅरन लिवाईन या कॅनेडियन लेखिकेनं हॅना ब्रॅडीची सत्यकथा जगापुढं आणली. या कथेसाठी त्यांना ‘न्यूयॉर्क आंतरराष्ट्रीय रेडिओ फेस्टिव्हल’चं सुवर्णपदक मिळालं. इतरही अनेक महत्त्वाचे पुरस्कार या पुस्तकाबद्दल त्यांना मिळाले.
काय आहे या पुस्तकात? ही आहे एक सत्यकथा आणि तिची शोधकथा. दोन पातळ्यांवर, दोन भिन्न काळांत, नकाशाच्या भिन्न भिन्न तुकड्यांवर हॅनाची कथा आकार घेत जाते. जपान, कॅनडा आणि झेक प्रजासत्ताक या तीन देशांना एकत्र घेऊन येत ‘आम्हाला शांतता हवी’ असा नितळ संदेश ती देते. कोणत्याही प्रचाराशिवाय, भाषणबाजीशिवाय हॅनाची गोष्ट इतिहासाचं आणि वर्तमानाचं भान वाचकाला आणून देते. विवेकशील बनवते.
हॅना ही चेकोस्लोव्हाकियात जन्मलेली मुलगी. नोव्हे मेस्टो नावाच्या छोट्या शहरात तिच्या वडिलांचं छोटंसं दुकान होतं. आई-बाबा आणि तीन वर्षांनी थोरला जॉर्ज या भावासह हॅना सुखी, संपन्न आणि आनंदी जीवन जगत असते. हॅनाचा जन्म ता. १६ मे १९३१ चा. ती सहा-सात वर्षांची होते आणि नाझी साम्राज्याविस्ताराचे आणि ज्यूविरोधी धोरणांचे चटके तिला बसू लागतात, तिच्या बालबुद्धीला सभोवतालच्या बदलांचे अर्थ समजून येत नाहीत. युद्ध संपेल आणि लवकरच सगळं पूर्ववत्‌ होईल असं तिला सतत सांगण्यात येतं. तथापि, तसं घडत मात्र नाही. सर्वात अगोदर तिच्या आईला घर सोडावं लागतं आणि छळछावणीत दाखल व्हावं लागतं. काही महिन्यांनंतर वडिलांना एका ट्रकमध्ये डांबून नेलं जातं. सात वर्षांची चिमुरडी मुलगी आणि दहा वर्षांचा तिचा भाऊ यांच्यासाठी ते खडतर दिवस असतात. लवकरच त्यांनाही थेरेजिअनश्टटच्या छावणीत दाखल व्हावं लागतं. छोटी हॅना करपत जाणारं बालपण सांभाळत ज्यूंच्या संचितासोबत वाहत जाते. लवकरच युद्ध थांबेल आणि आई-वडिलांशी आणि भावाशी आपली भेट होईल...आपण शाळेत जाऊ, खूप अभ्यास करू, बर्फ कोसळू लागेल तेव्हा गावातल्या तळ्याच्या बर्फ झालेल्या पाण्यावर स्कीइंग आणि स्केटिंग करू...मोठेपणी खूप छान शिक्षिका बनू अशी स्वप्नं पाहणाऱ्या हॅनाला आउसश्वित्सला नेण्यात येतं आणि ता. २३ ऑक्टोबर १९४४ या दिवशी तिला गॅसचेम्बरमध्ये पाठवून ठार मारलं जातं. तिच्या आई-वडिलांची इतर लाखो ज्यूंबरोबर दोन वर्षं अगोदरच हत्या करण्यात आलेली असते. हॅनाच्या वाट्याला केवळ तेरा वर्षांचं आयुष्य आलं. हिटलर आणि त्याच्या अनुयायांनी लाखो ज्यूंची हत्या केली, त्यात दीड लाखांपेक्षा जास्त लहान मुलं होती. हॅना ब्रॅडी ही त्यांपैकी एक.

हॅनाची ही गोष्ट जपानी मुलांच्या ध्यासातून जगाला कळून आली. सन १९९८ मध्ये सामूहिक नरसंहाराविषयी माहिती देणारं एक छोटंसं संग्रहालय टोकिओ शहरात सुरू करण्यात आलं. सन २००० मध्ये या संग्रहालयासाठी आउसश्वित्समधून एक सुटकेस भेट येते. ही सुटकेस कुणाची? हॅना नावाची मुलगी अनाथ का झाली? तिचा एखादा फोटो पाहायला मिळेल का? संग्रहालयात येणाऱ्या छोट्या मुलांना प्रश्न पडले. उत्तरं मिळवण्यासाठी संग्रहालयाची संचालक फ्युमिको यांनी पुष्कळ पत्रव्यवहार केला, विविध देशांना भेटी दिल्या आणि लोकांच्या विस्मृतीत गेलेली हॅनाची गोष्ट त्यांनी शोधून काढली. एवढंच नव्हे तर, हॅनाच्या भावाचा - जॉर्जचा - कॅनडातला पत्ताही शोधून काढला आणि त्यांच्याशी जपानी मुलांची भेट घडवून आणली.

ऑगस्टचा महिना हा जसा स्वातंत्र्याची महती सांगणारा महिना आहे, तसाच तो दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा-नागासाकीला उद्ध्वस्त करणाऱ्या अणुबॉम्बच्या दुःखद आठवणी सांगणाराही महिना आहे. दुसरं महायुद्ध हे एका हुकूमशहाच्या युद्धखोर प्रवृत्तीची आणि लाखो निष्पाप लोकांच्या यातनामयी आयुष्याची कहाणी सांगतं. दुसऱ्या महायुद्धाचा काळ आणि सन २००० चं दशक या दोन पटलांवर हॅनाची गोष्ट आकाराला येत जाते, तर दुसरीकडे सादाकोची गोष्ट ही शांततेचं महत्त्व अधोरेखित करत जाते.

सादाको बारा वर्षं जगली आणि हॅनाच्या वाट्याला तेरा वर्षांचं आयुष्य आलं. दोघी अकाली गेल्या. अनैसर्गिक गेल्या. युद्धांनी त्यांना अकाली हिरावून घेतलं. लहान मुलांच्या अपूर्ण आयुष्याच्या गोष्टी वाचून संपतात तेव्हा वाचक सुन्न आणि सजग होतो. या गोष्टी वाचकाला सजगतेबरोबरच अस्वस्थही करतात. ही अस्वस्थता सर्जनशील व्हावी, या सर्जनातून निर्माण होणारा वाचक अधिक विवेकी आणि डोळस असावा. आजच्या काळात जेव्हा युद्धाचा प्रसंग आपण अनुभवत असतो तेव्हा सादाकोची आणि हॅनाची गोष्ट मुलांनी आणि थोरा-मोठ्यांनीदेखील वाचली पाहिजे. अशा गोष्टींनी केलेला शांततेचा संस्कार दीर्घ असू शकेल, अमिटही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com