या रे पक्ष्यांनो...माझिया अंगणी (विद्या सुर्वे-बोरसे)

vidya surve borse
vidya surve borse

बालकांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग असणारं प्राणी-पक्ष्याचं जग प्रत्यक्षात त्यांच्यापासून दूर दूर जात आहे. कारणं, पुष्कळ देता येतील, त्यांचं समर्थनही करता येईल; पण गेल्या दोन दशकांत मानवातलं आणि सृष्टीच्या अन्य घटकांतलं अंतर वाढत चाललं आहे हे मान्य करावं लागेल.

झाडावरची माकडं, खिडकीतली कबूतरं, दारातला कुत्रा, घरातलं मांजर, गोठ्यातली गाय, आरशातल्या प्रतिबिंबाकडे बघत आपल्या चोचीनं आरशावर टक टक करणारी चिमणी, तुरूतुरू धावणारी खारूताई, तलावाकाठी उतरणारे सारस आणि बगळे, गवतात उडणारी फुलपाखरं, विहिरीतलं कासव, गावात येणारे हत्ती-उंट, चित्रातले
वाघ-सिंह, राणीच्या बागेतला जिराफ, सर्कशीतलं अस्वल आणि प्रवासादरम्यान शेतात, राना-वनात भटकंती करताना दिसणारे रंगीबेरंगी पक्षी-प्राणी हे बाल-कुमारांच्या भावविश्वाचे अविभाज्य घटक आहेत.
मूल लहानपणापासूनच आजूबाजूच्या या गोतावळ्याशी जोडलं जात असतं. ‘हा घास चिऊचा, हा घास काऊचा’, ‘बगळ्या बगळ्या कवडी दे’ अशा प्रसंगांतून प्राणी-पक्षी हे बालकांचे सख्खे दोस्त होऊन जातात. वाढत्या वयाबरोबर ही मैत्री अधिकाधिक घट्ट होत जाते, त्यामुळेच पक्षांच्या-प्राण्यांच्या गोष्टी बालसाहित्याचा अविभाज्य भाग झाल्या आहेत.
आपल्या लोककथा, पंचतंत्र, इसापनीती, कथासरित्सागरातील कथा, ग्रीमबंधूंनी एकत्रित केलेल्या परिकथा, जातककथा प्राणिविश्वानं समृद्ध आहेत.

‘...आणि माकडानं या पावसाळ्यात पुन्हा ठरवलं, की मागच्या वेळी जमलं नाही; पण येत्या उन्हाळ्यात आपण झाडावर नक्की घर बांधू म्हणजे पावसात आणि थंडीत आपलं रक्षण होईल...’

‘एक होती चिऊ आणि एक होता कावळा. कावळा अगदी काळाकुट्ट, जणू कोळसा. चिऊचं घर होतं मेणाचं आणि काऊचं घर होतं शेणाचं...’

‘...तेव्हा म्हातारी कोल्ह्याला म्हणाली, ‘मी नाही पाहिली कुणी आजीबाई, चल रे भोपळ्या टुणुक टुणुक...’

‘एकदा सशानं कासवाशी पैज लावली, दूर डोंगरावरच्या झाडाजवळ कोण अगोदर पोहोचतो?’

वर उल्लेखिलेल्या गोष्टी माहीत नाहीत असा मराठी माणूस सापडणं अशक्य. मराठी माणसाच्या नेणिवेचा भाग झालेल्या या सगळ्या कथा त्यानं त्याच्या बालवयातच ऐकलेल्या असतात.
बदलत्या काळाबरोबर प्राणिकथांच्या आणि पक्ष्यांच्या गोष्टींच्या स्वरूपात बदल होत गेला. पूर्वीच्या कथांमध्ये पक्ष्यांना आणि प्राण्यांना मानवी रूप दिलेलं असे, मानवी स्वभावाचं आरोपण त्यांच्यावरती केलं जाई, अशा कथा विशिष्ट बोध देत किंवा संदेश देत. या कथांमधून मिळणारं ‘तात्पर्य’ मूल्यवाचक असे, जीवनभर पुरेल अशी ज्ञानाची शिदोरी या कथांमधून हाती येई. ‘पंचतंत्रा’च्या कथा
यासंदर्भात आठवून पाहाव्यात. त्यातला लबाड लांडगा असेल अथवा चतुर करकोचा, दुष्ट मगर असेल अथवा दयाळू मुंगी या साऱ्यांवर मानवी स्वभावाचं आरोपण करण्यात आलेलं आहे.
मात्र, अलीकडच्या काळात ज्ञान-विज्ञानाच्या बदलत्या घडामोडींचा ठळक परिणाम मराठी साहित्यातल्या प्राणिकथांवर झालेला दिसून येतो. त्या त्या प्राण्याचे स्वतःचे नैसर्गिक गुणधर्म असतात, खास सवयी असतात. या सगळ्या बाबी कथा-कवितांमधून अधोरेखित व्हायला लागल्या. त्यामुळे नव्या काळाची प्राणिकथा नवं रूप घेऊन अवतरली.
मराठी बाल-कुमारसाहित्यात अशा समृद्ध व संपन्न साहित्याचा खजिनाच आहे. कविता, कादंबरी, कथा, नाटक, ललित लेख, आठवणी, अनुभवकथन, माहितीपर लेखन अशा विविध प्रकारांमध्ये प्राण्यांचं-पक्ष्यांचं अद्भुत आणि विस्मयकारी जग शब्दबद्ध झालं आहे.
दूरदेशीची पाखरे (शिरीष पै), घरटे (अनंत काणेकर), चिमण्या (ग्रेस), गोगलगाय (सोपानदेव चौधरी), पोपट (शंकर वैद्य), बागेतला शिंपी (व्यंकटेश माडगूळकर), अस्वलाच्या मागावर (किरण पुरंदरे), माकड (पद्मिनी बिनीवाले) या ललित लेखांमधून एक अद्भुत जग वाचकापुढं खुलं होतं. आपण मारुती चितमपल्ली यांचं बोट धरून जेव्हा ‘जंगलाच्या वाटेवर’ चालू लागतो तेव्हा त्यांचा एकेक शब्द, एकेक अनुभव वाचताना आपल्याला मानवी सृष्टीचा विसर पडतो. पक्षी-प्राणिनिरीक्षण कसं करावं हे सलीम मुल्ला यांच्या ‘जंगलखजिन्याचा शोध’ या कादंबरीतून फारच सहजपणे आणि मुलांच्या भाषेत सांगितलं गेलं आहे. अरुणा ढेरे यांनी ‘ताडोबाच्या जंगलात’ घडवलेला फेरफटका कुमारांना हवाहवासा वाटेल असाच आहे.

सशाचे कान (विंदा करंदीकर), फुलपाखरू निळं निळं, (मंगेश पाडगांवकर), मांजराचा गाव (शान्ता शेळके), खारूताईचे लग्न (शंकर विटणकर), फुलपाखरांचा गाव (देवीदास फुलारी), चिमणगाणी (प्र. श्री जाधव), हत्तीचा व्यायाम (माया दिलीप धुप्पड) या कवितासंग्रहांद्वारे शीर्षकापासूनच वाचकांचा आणि प्राणिजगताचा परिचय होतो. कुसुमाग्रज, इंदिरा संत, राजा मंगळवेढेकर, कल्याण इनामदार यांच्यापासून ते किशोर पाठक, दासू वैद्य, संगीता बर्वे, उत्तम कोळगावकर यांच्यापर्यंत अनेक कवींनी पक्ष्यांवर सुंदर सुंदर कविता लिहिल्या आहेत.
आमची म्हैस, तुमची म्हैस
अजनाचा पाला खाते
धम्म धम्म दूध देते
या मौखिक परंपरेतल्या बालगीताइतक्याच या कविताही लयबद्ध आहेत आणि त्या गुणगुणाव्याशा वाटतात. विंदा करंदीकर यांची ‘राणीची बाग’ जशी अविस्मरणीय, तसाच त्यांचा ‘सर्कसवाला’सुद्धा न विसरता येणारा.
निसर्गाची जादू (बालकवी), जंगलातील गोष्टी (गोविंद गोडबोले), निमो (सुभाष विभूते), जिनी (लीला शिंदे), बोका (प्रवीण दवणे), ससा हरला असा (माधव चुकेवाड), गायबगळा (मदन हजेरी) अशी
आणखीही कितीतरी पुस्तकांची नावं सांगता येतील.
अमृता वाळिंबे आणि प्रशांत खुंटे यांनी संपादित केलेल्या संग्रहाचं नावच मुळी ‘आमची धमाल गाय’ असं आहे. राजीव तांबे हे मुलांसाठी लिहिणारे प्रयोगशील लेखक आहेत. लेखनात त्यांचे प्रयोग नेहमीच सुरू असतात. ‘मांजरू’, ‘मगरू’, ‘कोंबडू’, ‘मोरू’, ‘गाढवू’, ‘वासरू,’

‘बछडा’ आदी त्यांची पुस्तकं अगदी विलक्षण आहेत. या पुस्तकमालिकेतून बाळ आणि आई यांच्या उत्कट नात्याचा वेध तांबे यांनी घेतला आहे. चंद्रकांत खोत यांनी बालकांसाठी अगदी मोजकं लिहिलं आहे. मात्र, त्यांचं ‘चनिया-मनिया बोर’ आवर्जून वाचावं असं आहे. ल. म. कडू यांनी ‘खारीचा वाटा’या कादंबरीत एका किशोरवयीन मुलाची आणि त्यानं पाळलेल्या खारीची गोष्ट सांगितली आहे. समृद्ध निसर्ग, पीकपाणी, रानमेवा, जनावरं, करामती या सगळ्यांत रमलेला हा किशोरवयीन नायक भुरळ पाडतो. विद्या डेंगळे यांनी ‘करामती गुगी’ आणि ‘भटकभवानी’मध्ये अनुक्रमे कुत्र्याच्या आणि मांजराच्या करामतींची कहाणी सांगितली आहे. हसवणाऱ्या आणि विचारात पाडणाऱ्या या करामती आहेत. ‘गोडतोंड्या मुचकुंद’ हे माधव गाडगीळ यांचं पुस्तक मधाचीही गोष्ट सांगतं आणि अस्वलाचीही. माया रामस्वामी यांच्या चित्रांमुळे हे पुस्तक संग्राह्य झालं आहे. भारत सासणे यांनी बाल-कुमारांसाठी अल्प, तरीही महत्त्वाचं लेखन केलं आहे, ‘जंगलातील दूरचा प्रवास’ ही त्यांची किशोरकादंबरी सशांच्या आणि लांडग्यांच्या लढ्याची उत्कंठावर्धक कहाणी सांगते. ‘वाघाशी झुंज’ ही केशव वसेकरांची कथाही अशाच चित्तथरारक झुंजीची गोष्ट मांडते. ‘बोक्या प्राणी पाळतो’ हे दिलीप प्रभावळकरांच्या बोक्या सातबंडेचं प्रकरण मजेशीर आहे. टिट्डू (धारा भांड), गोंदू (प्र. श्री. जाधव), झुमरी (अयूब पठाण लोहगावकर), दयाळू मोर (अशोक पाटील), जंगलातील उत्सव (रजनी हिरळीकर), गोष्टी पुरून उरणाऱ्या (पुरुषोत्तम धाक्रस), कावळे (लीलाधर हेगडे) या अन्य पुस्तकांमधलं प्राणिजगत संस्मरणीय आहे. बालकुमारांच्या मनोविश्वाशी ते संवादी आहे.

देश-विदेशांतल्या प्राणिकथा भाषांतराच्या माध्यमातून मराठीत उपलब्ध आहेत. अशा कथा वाचताना लेखकांचा सजीवांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमस्वरूपी लक्षात राहतो. आजूबाजूचे प्राणी-पक्षी हे कथानायकाला स्वतःपेक्षाही कसे प्रिय असतात याचं मोहक चित्रण अशा गोष्टींमध्ये आहे. प्रेम, अकृत्रिम जिव्हाळा, भ्रातृभाव अशा अनेक जाणिवा त्यांतून पाहायला मिळतात. भा. रा. भागवत (हरीणबालक), रणजित लाल (कालागढच्या अभयारण्यात), मारुती चित्तमपल्ली (चित्रगरीव, एका कबूतराची कथा), ज्योती सोलापूरकर (पाशा), पृथ्वीराज तौर (हत्ती), मिलिंद परांजपे (छोटा पक्षी), सविता दामले (बोस्कीचे पंचतंत्र), किशोर मेढे (जंगलनामा), मंजूषा आमडेकर (फ्रँकलिनच्या गोष्टी) यांनी श्रेष्ठ कथा मराठीत अनुवादित केल्या आहेत. आकर्षक चित्रं आणि अनोखं वातावरण यांमुळे ही पुस्तकं वाचकांची सहज पसंती मिळवतात.

लेखकांनी आपल्या लेखनातून प्राणी-पक्षीजगताचं निरनिराळ्या पातळ्यांवर चित्रण केलं आहे. कधी हे प्राणी-पक्षी कथानायकाचे मित्र आहेत, तर कधी तेच नायक आहेत. कधी ते बोलके आहेत, तर कधी अबोल; पण त्यांची बोली ही पुस्तकातल्या किशोर-कुमारांना जशी कळते तशीच वाचकांनाही. मित्र म्हणून, भाऊ म्हणून, तसंच कुत्र्यापासून ते गाईपर्यंत आणि बगळ्यापासून ते गरुडापर्यंत अनेक
प्राणी-पक्षी या साहित्यातून व्यक्त झाले आहेत.

मी कधी कधी विचार करते, बालकांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग असणारं पशू-पक्ष्याचं जग प्रत्यक्षात त्यांच्यापासून दूर दूर जात आहे. कारणं, पुष्कळ देता येतील, त्यांचं समर्थनही करता येईल; पण गेल्या दोन दशकांत मानवातलं आणि सृष्टीच्या अन्य घटकांतलं अंतर वाढत चाललं आहे हे मान्य करावं लागेल. हे फारसं भूषणावह नक्कीच नाही. ज्येष्ठांची ही कृती बालकांना त्यांच्या आत्मीय गोतावळ्यापासून तोडून टाकत आहे.
मी या दुरावणाऱ्या नात्यांचा शोध घेते आणि मला सुभाष किन्होळकर यांची कविता आठवते :
कुठे हरवल्या चोची
कुठे हरवली गाणी
या रे पक्ष्यांनो या रे या
या रे माझिया अंगणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com