बालसाहित्य आणि मानवी पंचेंद्रियं (विद्या सुर्वे-बोरसे)

vidya surve borse
vidya surve borse

साहित्यकृतीमधून मिळणारा आनंद हा अलौकिक का असतो? साहित्यातून मिळणारी सौंदर्याची अनुभूती अद्वितीय का असते? या प्रश्नांची उत्तरं एखाद्या पाठ्यपुस्तकात नाहीत, तर ती आपले डोळे-कान-नाक-जीभ-त्वचा यांच्याशी संबंधित आहेत. ती पंचेंद्रियांशी, म्हणजेच आपल्याशी, संबंधित आहेत.

डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही पंचेंद्रियं आहेत. अनुभव आणि ज्ञान या बाबींशी मानवाचा संबंध येतो तो याच पंचेंद्रियांमुळे. पाहण्यासाठी डोळे, ऐकण्यासाठी कान, गंधासाठी नाक, स्वादासाठी जीभ आणि स्पर्शासाठी त्वचा आवश्यक असते. मानवाला होणारा बोध पंचेंद्रियांवर अवलंबून असतो. पंचेंद्रियांमार्फत होणाऱ्या जाणिवा अधिक तरल, सूक्ष्म आणि नेमक्या कशा होतील यावर अनेक शास्त्रांमध्ये ऊहापोह झाला आहे. साहित्य आणि मानवी पंचेंद्रियं यांचा अनुबंध कसा व्यक्त होतो? उदयन वाजपेयी यांनी आपल्या पाच छोट्या छोट्या टिपणांमधून हे नेमकेपणानं सांगितलं आहे.

‘घुडसवार’ हा त्यांचा कथासंग्रह मी वाचत होते. पहिली कथा वाचून मी पुढच्या पानावर गेले तर त्या ठिकाणी ‘पाहणे’ या शीर्षकाचं टिपण माझी वाट पाहत बसलं होतं! अद्याप मी कथेनं दिलेल्या अनुभवाच्या गुंगीत होते. कथेनं विणलेलं मायावी जगत् आणि त्याचा प्रभाव अजून संपलेला नव्हता आणि तोच ‘पाहणे’ या शीर्षकाच्या टिपणाशी माझी गाठ पडली. वाचक म्हणून हा एक विरस करणारा अनुभव होता. कथावाचनाचा आपला छानसा मूड आहे आणि मध्येच कुणीतरी तत्त्वज्ञान सांगू लागलं तर कसं वाटेल? तर तसंच काहीसं झालं, म्हणून मी पानं झरझर उलटत पुढं जात राहिले तर ‘ऐकणे’ या शीर्षकाचं टिपण दत्त म्हणून हजर! पण मी काही अशी थांबणारी नव्हतेच. मी पुढं जात राहिले. अरण्यातून चालत असल्यासारखी. भूलभुलैयामधून जात असल्यासारखी. पुढं काय आहे ही उत्सुकता माझ्या मनात असणार...आणि मग गोष्ट आली ‘लंबे राजा के आँसू’. पुष्कळच उंच असणाऱ्या एका राजाची ती गोष्ट होती. हा राजा एवढा उंच होता की त्याच्या डोक्यावर जो मुकुट होता त्याचं निमुळतं टोक हे स्वर्गातल्या सडकेच्या शेजारी एखाद्या मैलाच्या दगडासारखं असायचं. स्वर्गातले लोक त्याच्यावर कधी कधी आपला कोट टांगून ठेवत आणि शेजारी असलेल्या झाडाखाली आरामात झोप काढत. राजाला झोपण्यासाठी जमिनीवर पुरेशी जागा नव्हती, त्यामुळे तो सतत उभाच असे. तो उभ्याउभ्याच डोळे बंद करत असे. रात्र त्याच्या बंद डोळ्यांपुढून आवाज न करणाऱ्या एखाद्या रथासारखी निघून जाई. राजा इतका उंच होता की त्या उंचीवरून त्याला लोक मोहरीच्या दाण्याइतके बारीक दिसत. त्याला दिसे की एक दाणा घरंगळत बुटांच्या दुकानाकडे जात आहे...एखादा शेताकडे...तर दुसरा वीटभट्टीकडे जाताना दिसत असे. दिवस वर आला की राणी झोपेतून जागी होऊन, आंघोळ करून राजाच्या पायांवर पाणी घालण्यासाठी अंगणात येत असे. राणी जेव्हा आपल्या हातांनी राजाच्या पायावर पाणी घालत असे तेव्हा तिच्या बोटांचा स्पर्श त्याला जाणवत असे. हेच राजाचं स्नान होतं. राजानं राणीला पाहिलं त्याला वर्षे लोटली होती. त्याला फक्त राणीच्या बोटांचा स्पर्शच तेवढा माहीत होता. प्रत्येक सकाळी हा स्पर्श तो अनुभवत असे. त्याला राणीचा चेहरा माहीत नव्हता. त्याला राणीचा रंग ठाऊक नव्हता. त्यानं राणीचं बोलणं ऐकलेलं नव्हतं. तिचं चालणं त्यानं पाहिलेलं नव्हतं. ती दोन वेण्या बांधते की एक हेही राजाला माहीत नव्हतं...गोष्ट फार सुंदर होती. मी तिच्या प्रवाहात पुढं वाहत गेले. पुढं राणी मरते. पुढं राजा रडत राहतो. मग राणी स्वर्गात पोहोचते. स्वर्गातली राणी उंचच उंच राजाला दिसत राहते; पण तो तिच्याशी बोलू शकत नाही...अशी गोष्ट चालत राहते. पुढं चालत राहणारी गोष्ट आपल्याला गुंतवून ठेवत पूर्णविराम घेते. मी पान उलटते तर पुन्हा एक टिपण. ‘स्पर्श’ या शीर्षकाचं. त्यानंतर चौथं टिपण ‘गंध’ उकलणारं. नंतर गोष्ट ‘बिलौटे की पसंद’ आणि पुन्हा अखेरीस एक टिपण ‘स्वाद’ या शीर्षकाचं.
पानं उलटता उलटता माझ्या हे लक्षात येऊ लागलं होतं की कथेच्या पुस्तकात ही निबंधवजा टिपणं उगाचच आलेली नाहीत, तर कथा समजून घेण्यासाठी ही टिपणं सोईची आहेत. केवळ या कथाच नव्हे तर, एकूणच साहित्य समजून घेण्यासाठी ही टिपणं उपयुक्त आहेत. आनंद, सौंदर्य यांची अनुभूती आणि आपली पंचेंद्रियं यांच्यातलं नातं फारच सहजपणे वाजपेयी यांनी उलगडून दाखवलं आहे.
ज्येष्ठ चित्रकार जगदीश स्वामीनाथन यांना कुणीतरी विचारलं होतं, ‘चित्र काढताना कोणत्या रंगासमवेत कोणत्या रंगाची संगती अधिक चांगली दिसेल?’ त्यावर स्वामीनाथन यांनी उत्तर दिलं होतं, ‘या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला निसर्गात जायला हवं, निसर्ग लक्षपूर्वक पाहायला हवा. कुठल्याही झाडाला किंवा रोपाला येणारी पानं, फुलं, फळं, फांद्या यांचे रंग पाहा...ते निरनिराळे असतात आणि सगळेच एकमेकांसोबत सुंदर दिसतात.’

वाजपेयी यांनी आपल्या विवेचनात लक्षपूर्वक, पूर्ण ध्यान लावून, अवधान देऊन ‘पाहणे’ यावर नेमकं बोट ठेवलं आहे. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीकडे लक्ष देत नाही तेव्हा आपण तिला पाहूनसुद्धा पाहत नाही. लक्ष किंवा ध्यान असेल तरच आपण पाहू शकतो. आपण एखाद्या गोष्टीवर डोळे रोखू शकतो; पण ध्यान नसेल तर ती पाहू शकत नाही. ध्यानाचा अर्थ आहे आपण पाहण्याच्या क्षणी जी बाब पाहायची आहे तिच्याशिवायच्या इतर सर्व बाबी विसरून जाणं. आपण जेव्हा एकाच वेळी खूप गोष्टी बघतो तेव्हा बहुधा काहीही पाहत नसतो. वस्तू विशिष्ट अंतरावरून ‘पाहता’ येतात, त्यांच्या खूप जवळ किंवा खूप लांब गेलं तर वस्तू आपलं ‘नाव’ हरवून बसतात. झाडाच्या अगदी जवळ जाऊन त्याचा फोटो काढला तर ते ‘झाड आहे’ हे आपल्याला ओळखू येणार नाही. हे झाडाचं खोड आहे हेही लक्षात येणार नाही. पुष्कळ दूरवरून पाहिलं तरी असंच घडेल. मग आपण स्वप्न पाहतो म्हणजे काय करतो? खरं तर स्वप्न आपण पाहतो, ऐकतो आणि त्याचा स्वादसुद्धा घेतो! चित्रपटाबाबतही असंच होतं. आपण जेव्हा पाहत असतो तेव्हा आपण केवळ पाहत नसतो, दृश्य बघत नसतो, तर आपल्या भूतकालीन जीवनानं आपल्याला दिलेली कल्पना त्या दृश्यात मिसळून आपण ते पाहत असतो. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की चांदण्यांनी आणि नक्षत्रांनी खच्चून भरलेलं आकाश सुंदर आहे...त्या वेळी ते थोडंसं स्वत: सुंदर आहे आणि थोडं आपल्या कल्पनेनं सुंदर आहे.

‘ऐकणे’ म्हणजे काय? वाऱ्याचा सूं सूं करणारा आवाज, रातकिड्यांचा आवाज, उत्तररात्री हळूहळू विरत जाणारे शहरातल्या वाहनांचे, माणसांचे, रेडिओचे आणि वाढत जाणारे बेडकांचे आवाज...आपण ऐकतो तेव्हा नेमकं काय ऐकतो? संगीत ऐकताना कोणता अर्थ आपल्याला सापडतो? खरं तर आपण संगीत ऐकतो तेव्हा फक्त आपण संगीतच ऐकतो. ऐकणंच अनुभवतो. संगीत ऐकताना आपण अर्थाच्या रस्त्यावर जातच नाही. आपण जातो अनुभवाच्या रस्त्यावर. आपण भावनांकडे जातो, विशिष्ट भावावस्थेकडे जातो. आवाज म्हणजे हवेच्या कंपनांचा कानांच्या पडद्यावर आघात होणं. आपली सगळी पृथ्वी थरथरणाऱ्या हवेच्या कंपनांनी वेढली गेलेली आहे. या कंपनांमध्ये बडे गुलाम अली खाँ यांचं गाणंही आहे आणि महात्मा गांधीजींनी दिलेली घोषणासुद्धा आहे.
‘पाहणे’ ही क्रिया केवळ एकाच दिशेला शक्य होते. आपण पुढं पाहू शकतो किंवा मागं. उजवीकडे किंवा डावीकडे. आपण एकाच वेळी चारही दिशांना पाहू शकत नाही. ऐकताना आपण एकाच वेळी कोणत्याही दिशेचा आवाज ऐकू शकतो. आपण ऐकतो आणि ऐकताना आपल्या मनाच्या पडद्यावर अनेक दृश्यं निर्माण होतात. आपण हजार पानांचा सळसळणारा आवाज ऐकतो आणि आपल्या नजरेपुढं जंगल उभं राहतं. आपण शेकडो आवाजांमधून आपल्याला हवं ते नेमकं ऐकतो. आपण हजार आवाजांमधून आपल्या आवडीचा आवाज नेमका ओळखतो. आपल्या आठवणीत लाखो आवाज झोपलेले आहेत. एखादा आवाज आपल्या कानांजवळून जातो आणि झोपी गेलेल्या एखाद्या आवाजाला जाग येते; पण ऐकण्यासाठी आवाजाची आवश्यकता असतेच काय? ते गरजेचं नाही. आपण एकही शब्द न उच्चारता ऐकू शकतो. असं सांगतात की थोर जर्मन संगीतकार बिथोवन जेव्हा आपली प्रसिद्ध अशी नववी सिम्फनी लिहीत होते, त्या वेळी ते संपूर्ण बहिरे झाले होते. ते आपली सिम्फनी कागदावर लिहीत असत आणि मनात ऐकत असत. एक अद्भुत संगीत ते आपल्या आत ऐकत आणि बघा, त्यांच्या मनात निर्माण झालेलं संगीत जसं कागदावर उतरलं तसं त्यानं जगाला वेड लावलं.
स्पर्श, गंध, स्वाद यांविषयीही वाजपेयी यांनी लिहिलं आहे. काय लिहिलंय? हे मी इथं सांगणार नाही. जिज्ञासूंनी ही टिपणं मिळवावीत आणि वाचावीत
अशी माझी इच्छा आहे. ती मिळवून वाचण्यात खरी मजा आहे.

एखादं पुस्तक, एखादी साहित्यकृती आपण वाचत असतो तेव्हा नेमकं काय करत असतो? तर पंचेंद्रियांच्या साह्यानं तिचा अनुभव घेत असतो. एखादी कविता वाचताना आपण ती संगीतासारखी अनुभवत असतो. कथा, कादंबरी चित्रपटासारखी-स्वप्नासारखी पाहत असतो. नाटक ऐकताना, पाहताना त्याचा आस्वादही घेत असतो. चरित्र, आत्मचरित्र, एखादी चांगली कलाकृती आपल्या आतील निद्रिस्त आवाजांना आवाहन करत असते. आपण काळाचाच आवाज त्याच्या गंधासह त्यातून ऐकत असतो...त्यामुळेच झाडावर उमललेलं फूल कोमेजलं तरी कथा-कवितेतून उमललेलं फूल कोमेजत नाही. ते अमर होऊन जातं, ते दृश्यमान राहतं त्याच्या संपूर्ण आणि स्वयंपूर्ण अस्तित्वासह.

साहित्यकृतीमधून मिळणारा आनंद हा अलौकिक का असतो? साहित्यातून मिळणारी सौंदर्याची अनुभूती अद्वितीय का असते? या प्रश्नांची उत्तरं एखाद्या पाठ्यपुस्तकात नाहीत, तर ती आपले डोळे-कान-नाक-जीभ-त्वचा यांच्याशी संबंधित आहेत. ती पंचेंद्रियांशी, म्हणजेच आपल्याशी, संबंधित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com