न विसरता येणारी गोष्ट (विद्या सुर्वे-बोरसे)

विद्या सुर्वे-बोरसे vidyasurve99@rediffmail.com
Sunday, 4 October 2020

आई-वडील एकमेकांशी कसे वागतात, बोलतात, एकमेकांना कसा प्रतिसाद देतात, कुठं कौतुक करतात, कुठं सामंजस्यानं एकमेकांची समजूत घालतात, कुठं भांडतात आणि कुठं आदळआपट करतात हे आपापल्या घरातली मुलं फार बारकाईनं बघत असतात.

आई-वडील एकमेकांशी कसे वागतात, बोलतात, एकमेकांना कसा प्रतिसाद देतात, कुठं कौतुक करतात, कुठं सामंजस्यानं एकमेकांची समजूत घालतात, कुठं भांडतात आणि कुठं आदळआपट करतात हे आपापल्या घरातली मुलं फार बारकाईनं बघत असतात. अनुभवत असतात. कदाचित आई-वडिलांना वाटत असतं की आपली मुलं तर अजून लहान आहेत, त्यांना काय कळणार आहे? मात्र तसं नसतं! आई-वडिलांना तसं वाटत असेल तर ती त्यांची चूक आहे.

काही पुस्तकं आनंद देतात, तर काही पुस्तकं खूप आनंद देतात. काही पुस्तकं अगदीच महान असतात. ती आपलं आयुष्य बदलून टाकतात. काही भूतकाळाविषयी, काही वर्तमानाविषयी आणि काही भविष्याविषयी आपल्याला सांगत असतात. पुस्तकं ही असा परीस असतात की ज्यांच्यामुळे आपल्या लोखंडाच्या आयुष्याचं सोनं होऊन जातं. पुस्तक एकच असतं; पण ते अनेकांना अनेक प्रकारची दिशा देऊन जातं. अगदी साधं, चर्चेत नसलेलं एखादं पुस्तक आपल्याला जीवन जगण्याचा नवा दृष्टिकोन देऊन जातं. एखादं पुस्तक काळ समजून घेण्याची विशिष्ट दृष्टी प्रदान करतं. एखादं पुस्तक परिचित वास्तवाची अशी फेरमांडणी करतं की आपण आपल्या कृतीचा व वर्तनाचा पुनर्विचार करू लागतो. या सगळ्यातून पुस्तकं आपल्यापुढं आनंदाच्या वाटा दहा दिशांनी खुल्या करत असतात. मध्यंतरी राकेश आनंद बक्षी यांचं ‘डायरेक्टर्स डायरीज्’ हे पुस्तक वाचत होते. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या ज्येष्ठ दिग्दर्शकांच्या मुलाखतींचं हे संकलन आहे. ज्यांना चित्रपटसृष्टीत करिअर करायचं आहे त्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल. गोविंद निहलानी, महेश भट, सुभाष घई, प्रकाश झा, अनुराग बोस, आशुतोष गोवारीकर, विशाल भारद्वाज, इम्तियाज अली, संतोष सिवान, तिग्मांशू धुलिया यांच्याबरोबरच फराह खान आणि झोया अख्तर यांच्या मुलाखती या पुस्तकात आहेत. हे सगळे दिग्दर्शक चित्रपट कसे निर्माण करतात? कथेची, अभिनेत्यांची निवड कशी करतात? सिनेमॅटोग्राफर, संकलक, कलादिग्दर्शक, संगीतकार, नृत्यदिग्दर्शक, डिझायनर यांच्यात ताळमेळ कसा घालतात? आणि त्यातून स्वयंपूर्ण चित्रपट कसा साकारतात? हे सगळं जाणून घेण्यासाठी या मुलाखती उपयुक्त ठरू शकतील.

‘डायरेक्टर्स डायरीज्’ वाचत असताना माझं लक्ष मात्र दोन प्रश्नांनी वेधून घेतलं. पहिला प्रश्न होता, या दिग्दर्शकांच्या बालपणाविषयीचा आणि पुढचा प्रश्न होता त्यांच्या अपत्यांविषयीचा. ‘तुम्ही तुमच्या मुलाला/मुलीला चित्रपटसृष्टीत, दिग्दर्शनाच्या क्षेत्रात येऊ द्याल काय?’ या प्रश्नाला पालक म्हणून या सगळ्यांनी दिलेली उत्तरं विचार करायला लावणारी आहेत. ‘सांगत्ये ऐका’ या आत्मकथनात अभिनेत्री हंसा वाडकर यांनीही या प्रश्नाचं उत्तर दिलेलं होतं, त्यापेक्षा अगदीच निराळी उत्तरं या दिग्दर्शकांनी दिली आहेत. ‘चित्रपटसृष्टीत कसे आलात? बालपण कसं, कुठं गेलं?’ या प्रश्नांना मिळालेली उत्तरं मात्र पुनःपुन्हा वाचावी लागतात. एखाद्या पुस्तकातला विशिष्ट मुद्दा पुनःपुन्हा का वाचायचा असतो? कारण, असा मुद्दा आपल्याला आपल्या विचारपद्धतीविषयी पुनर्विचार करायला लावत असतो. आपण जे ग्रह बाळगलेले असतात, जे पूर्वग्रह मनाशी जपलेले असतात ते खरोखर बाळगावेत/जपावेत असे होते काय, या दृष्टीनं आपण स्वत:शीच संवाद साधू लागतो. आपल्या चुका आपल्या लक्षात येतात. त्या सुधारण्याची एक संधी यामुळे निर्माण होते. महेश भट यांनी स्वत:बद्दल बोलताना म्हटलंय : ‘माझ्या आई-वडिलांची आम्ही अनौरस मुलं होतो. आई-वडील निरनिराळ्या धर्मांचे होते. त्यांचं लग्न कायदेशीर नव्हतं. लोक आमच्याकडे तुच्छतेनं बघत. वडील आम्हाला भेटायला येत; पण आमच्या घरी ते कधी राहिले नाहीत. ते आमच्याकडे आल्यावर कधीही पायातले जोडे काढत नसत. माझ्या वडिलांनी गुजरातीत आणि हिंदीत चित्रपट निर्माण केले. मी सहा किंवा सात वर्षांचा असताना वडिलांचा ‘सन ऑफ सिंदबाद’ हा चित्रपट बघितला. लोकांच्या हृदयात एक वेगळीच जादूई दुनिया असते आणि बाहेर एक निराळंच जग असतं हे या सिनेमामुळे मला कळलं. आम्ही गच्चीवर सिनेमा बघत होतो, फिल्म अचानक प्रोजेक्टरमध्ये अडकली. वडील म्हणाले, ‘काळजी करू नका, मी नीट करतो.’ माझे वडील ते काम करत असताना मी वर आकाशाकडे बघत होतो, तेव्हा मला वाटलं की चित्रपटातलं जग आणि प्रत्यक्षातलं जग यात किती फरक आहे! माझ्या आईचं घरातलं जग आणि घराबाहेरचं जग यांतही असाच फरक आहे. काहीतरी तुटलं आहे, हे माझ्या लक्षात आलं...वडील म्हणाले की फिल्म तुटली; पण माझ्या लेखी स्वप्नांची शृंखला तुटली होती! तेव्हापासून मला त्या मायावी जगात राहावंसं वाटू लागलं. काल्पनिक दुनियेत. ‘सिनेमा तुमच्या आयुष्यातली कमतरता भरून काढतो’ हे लहान वयात मला कळून आलं.’
भट यांचं विवेचन मी चार-सहा वेळा वाचलं आणि मी त्या लहान मुलाचा विचार करत राहिले, जो आपल्या वडिलांची आतुरतेनं वाट बघत आहे, जो गच्चीवर बसून केवळ आकाश बघत नाहीय, तर नव्या स्वप्नांचं बांधकाम त्या विराट पडद्यावर करू लागला आहे...

सुभाष घई यांचं बालपण वाचतानाही मी अशीच विचारात पडले. त्यांनी म्हटलंय :‘घरी मी फार अस्वस्थ होत असे. माझ्या आई-वडिलांची भांडणं होत असलेली मी पाहिली आहेत. त्यांचं एकमेकांशी पटत नसे. त्या बाबीचा माझ्या मनावर फार परिणाम होत असे. मला त्या प्रकाराची भीती वाटत असे. मी चौदा वर्षांचा असताना माझ्या आयुष्यातली सर्वात क्लेशकारक घटना घडली. ‘मी तुझ्या वडिलांपासून विभक्त होत आहे,’ असं माझ्या आईनं मला तेव्हा सांगितलं. मला आठवतंय, नवी दिल्ली स्टेशनवर मी तिला सोडायला गेलो होतो. त्या दिवशी आईनं मला जीवनातली सर्वात मौल्यवान अशी बाब सांगितली. ती म्हणाली, ‘प्रत्येक आईचं आपल्या अपत्यावर जसं प्रेम असतं तसंच प्रेम माझंही तुझ्यावर आहे. या दीर्घ, संघर्षमय काळोख्या बोगद्यात मी तुला सोडून जात आहे; पण बळ एकवटून, श्रद्धेनं तू चालत राहा. माझी खात्री आहे की एक दिवस तू बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला नक्की पोहोचशील...जिथं हा काळोख संपेल आणि स्वच्छ प्रकाश दिसेल’. जशी गाडी हलली आणि स्टेशनबाहेर जात दिसेनाशी होऊ लागली तसा मी एकदम सुन्न होऊन गेलो. ती काय बोलली ते समजण्याच्या पलीकडचं माझं दु:ख होतं. मोडलेल्या कुटुंबामुळे माझी लहानपणी जी भावनिक कोंडी झाली तिला मी माझ्या चित्रपटांमधून वाट करून देत असतो.’

फराह खान यांचंही बालपण असंच संघर्षमय होतं. वडील कर्जबाजारी झाल्यानंतर घरातली एकेक वस्तू विकली जाताना, लिलावात काढली जाताना ते सगळं वाढत्या वयात पाहणं त्यांच्या नशिबात आलं. विशाल भारद्वाज यांची आठवणही अशीच. ते म्हणतात, ‘सात मे १९८५ ही तारीख मी कधीच विसरणार नाही. तेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होतो. सकाळी क्रिकेट खेळून मी घरी परतलो आणि पाहतो तर काय, आमच्या घरातलं सगळं सामान रस्त्यावर विखुरलेलं होतं. माझे वडील रस्त्यावर निश्र्चेष्टावस्थेत पडलेले होते. त्यांचा श्वासोच्छ्वास जड झाला होता. मी वडिलांना उचलून घेतलं. रस्त्यावर पडलेल्या पसाऱ्यात आम्हाला वडिलांचं औषध सापडत नव्हतं. मी डॉक्टरांना बोलवायला धावतच गेलो. परत आलो तर माझ्या वडिलांना शेजारच्या घरात नेण्यात आलं होतं. वडील कसे आहेत, असं मी सगळ्यांना विचारात होतो. कुणीच उत्तर देत नव्हतं. मी शेजारच्या घरात गेलो; पण तोपर्यंत उशीर झालेला होता... माझा भाऊ तेव्हा त्याच्या करिअरच्या खटपटीत होता, तर मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात शिकत होतो.’
भट ते भारद्वाज यांच्यापैकी संघर्ष कुणालाच चुकला नाही. तरीही ते एका विशिष्ट ठिकाणी पोहोचले व तिथं त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला. त्या ईप्सितस्थळी पोहोचल्यानंतरही स्वत:चं बालपण, उमेदीचे दिवस आणि त्या काळातला कुटुंबातला विसंवाद ते विसरू शकले नाहीत. आई-वडील एकमेकांशी कसे वागतात, बोलतात, एकमेकांना कसा प्रतिसाद देतात, कुठं कौतुक करतात, कुठं सामंजस्यानं एकमेकांची समजूत घालतात, कुठं भांडतात आणि कुठं आदळआपट करतात हे आपापल्या घरातली मुलं फार बारकाईनं बघत असतात, अनुभवत असतात. कदाचित आई-वडिलांना वाटत असतं की आपली मुलं तर अजून लहान आहेत, त्यांना काय कळणार आहे? मात्र तसं नसतं! आई-वडिलांना तसं वाटत असेल तर ती त्यांची चूक आहे. या दिवसांच्या छाया-पडछाया मुलांच्या आयुष्याला व्यापून राहतात. भविष्यात मुल इतरांशी, त्यांच्या कुटुंबाशी कसं वागणार आहेत, कोणते निर्णय घेणार आहेत आणि मोक्याच्या वेळी त्यांचं वर्तन कसं असणार आहे हे ठरवण्यात त्या दिवसांचा वाटा खूप मोठा असतो.
आपली मुलं शाळेत, महाविद्यालयात, समाजात शिकतच असतात; पण ती सर्वाधिक शिकत असतात ती घरातल्या घरात. आई-वडिलांचा पुसता न येणारा ठसा त्यांच्यावर उमटलेला असतो. आई-वडिलांनी आपल्या मुलांशी आणि मुलांसमोर कसं वागावं, हे सांगणं ‘डायरेक्टर्स डायरीज्’ या पुस्तकाचं उद्दिष्ट नाही; पण स्वत:ला सुधारण्याची एक संधी या पुस्तकातल्या मुलाखती वाचताना प्रत्येक आई-वडिलांना नक्कीच मिळते. मोठ्या पडद्यावर गोष्टी सांगणाऱ्या लोकांच्या आयुष्यातली ही ‘न विसरता येणारी गोष्ट’ पुढच्यांना शहाणं करणारी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang vidya surve borse write balguj article