वाचन उभं-आडवं (विद्या सुर्वे-बोरसे)

vidya surve borse
vidya surve borse

‘वाचायचं काय?’ हा एक प्रश्न सतत विचारला जातो. याचं उत्तर अगदी साधं आहे, ‘हाती येईल ते वाचा. नीट आणि काळजीपूर्वक वाचा.’ प्रत्येक शब्दावरून नजर फिरवायची सवय लागली की आपण वाचत असलेल्या ठरावीक विषयावर विचारही करू लागतो, आपल्या पूर्वस्मृती मदतीला येतात, आपल्या ज्ञानात भर पडते आणि आपण एका अपूर्व आनंदाच्या प्रदेशात प्रवेश करतो.

‘गुडघ्यात मेंदू आहे काय?’ कुणीतरी समोरच्याला म्हणालं. मला क्षणभर हसू आलं. वाटलं, असं कुठं असतं काय? मेंदू तर डोक्यातच असणार. मग विचारात पडले, ‘गुडघ्यात मेंदू’ हा वाक्प्रचार कसा रूढ झाला असेल? आणि एके दिवशी वाचन करता करता थबकले, नव्हे चक्क थांबले आणि स्वत:च्या मेंदूत नोंदवून घेतलं की गुडघ्यातही मेंदू असतात! अतिप्राचीन काळापासून काहींच्या गुडघ्यात मेंदू होते आणि तेही एक नव्हे, तर दोन दोन मेंदू! दोन्ही गुडघ्यांत प्रत्येकी एकेक मेंदू.

डॉ. यश वेल्हणकर यांचं ‘अवयव बोलू लागतात’ हे पुस्तक मी वाचत होते. त्यात त्यांनी लिहून ठेवलं आहे की डायनासोर या प्राण्याला दोन मेंदू होते आणि ते त्याच्या मागच्या पायांच्या दोन्ही गुडघ्यांत होते. डॉ. वेल्हणकर यांचं हे पुस्तक भन्नाट आहे. आपल्याला माहीत नसणाऱ्या आपल्या शरीराच्या हजार गोष्टी हे पुस्तक आपल्याला सांगतं.

सुहास कुलकर्णी-मिलिंद चंपानेरकरलिखित ‘यांनी घडवलं सहस्रक’ हेही असंच एक माहितीपूर्ण पुस्तक. गेल्या एक हजार वर्षांतल्या एक हजार व्यक्तींचा वेध या ग्रंथात घेण्यात आला आहे. हाताशी वेळ असला की या पुस्तकातलं कोणतंही पान काढून वाचायला मी सुरुवात करते. एक हजार प्रभावशाली व्यक्तींमधल्या शंभरदेखील आपल्याला नीटपणे माहीत नाहीत हे जाणवत राहतं. जग पालथं घालणारे प्रवासी, फिरस्ते, दर्यावर्दी, उत्खननतज्ज्ञ, आरेखक, योद्धे, राज्यकर्ते, क्रांतिकारक, तत्त्वज्ञ, धर्मोपदेशक, समाजनीतिज्ञ, मजूरनेते, स्त्रीमुक्तीवादी, लेखक, चित्रकार, शिल्पकार, संगीतकार, नर्तक, वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, संशोधक, उद्योगपती, व्यावसायिक, खेळाडू, निसर्ग-अभ्यासक, भविष्यवेत्ते यांची भरपूर माहिती या पुस्तकात आहे. रॉबर्ट पिअरी यांनी उत्तर ध्रुवावर पहिलं मानवी पाऊल ठेवलं तेव्हा त्यांच्या मनात कोणती भावना दाटली असेल? अणुबॉम्बचा कठोरपणे वापर करणारे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांची भूमिका काय होती? हेगेल यांनी इतिहासाचं द्वंद्वविकासी पद्धतीनं विश्लेषण कसं केलं? मद्यपानाला विरोध करत एका चळवळीची निर्मिती करणाऱ्या सुझान अँथनी यांची घडण कशी झाली असेल? युद्धविरोधी होण्यासाठी हाइनारिस ब्योल यांच्याबाबत नेमकं कोणतं कारण घडलं असेल? चित्रकार व्हिन्सेंट व्हान गॉग याला आत्महत्या का करावीशी वाटली असेल? जॉन नेपियरनं ‘लोगॅरिथम्’ कोष्टकाची निर्मिती कशी केली असेल? माध्यमक्षेत्रात रूपर्ट मर्डोक यांनी आपला दबदबा कसा निर्माण केला असेल? रोलंड हिल यांना पोस्टस्टॅम्पची कल्पना कशी सुचली असेल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मला माहीत नव्हती. खरं तर हे प्रश्नही मनात कधी निर्माण झाले नव्हते. ‘यांनी घडवलं सहस्रक’ या पुस्तकवाचनानं प्रश्नही दिले आणि उत्तरं शोधायला मदतही केली.

मोकळा वेळ असेल तेव्हा विश्वकोशाचे खंड वाचणं हाही आवडता छंद असू शकतो. कोणताही खंड घ्यायचा आणि कोणतीही नोंद वाचायला सुरुवात करायची. हा आपला विषय आहे का? याचा आपल्याला फायदा आहे का? हे मी कशासाठी वाचू? असे प्रश्न जवळपास फिरकूच द्यायचे नाहीत. या नोंदी कधी ना कधी तुमच्या मदतीला येतात. विशेषत: लहान मुलांच्या प्रश्नांची उत्तरं देताना या नोंदींची खूप मदत होते. मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देणं बहुतेक पालक टाळतात, असं दृश्य आजूबाजूला अनेक वेळा दिसतं. पालक उत्तरं देणं टाळतात याचं खरं कारण म्हणजे पालकांनाच उत्तरं माहीत नसतात. मुलांच्या शालेय पाठ्यपुस्तकांतलं साधे साधे प्रश्नदेखील पालकांना सोडवता येत नाहीत. पालकांना एकाच कुठल्या तरी विषयात गती असते आणि मुलं मात्र गणितापासून नागरिकशास्त्रापर्यंत आणि एखाद्या इंग्लिश कवीच्या कवितेपासून अर्थशास्त्रापर्यंत कोणत्याही विषयावर प्रश्न विचारत असतात. शिवाय, ‘सोबत खेळायला या’ असाही आग्रह फावल्या वेळात मुलं धरतात आणि एखाद्या वेळी क्राफ्ट, ओरिगामी यांच्या आकृत्या तयार करण्याचा आदेशही देतात! ‘हरभऱ्याचं झाड’ केवढं असतं या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्ष कृतीतून मुलांना शिकवता आलं पाहिजे; पण असं होत नाही.

‘मुंबईचं वर्णन’ हे गोविंद नारायण माडगांवकर यांचं अप्रतिम पुस्तक. त्यात ‘नेटिव्ह जनरल लैब्ररी’ असं उपप्रकरण आहे. माडगावकर लिहितात : ‘ही स्थापण्याचा मुख्य हेतु हा होता, की लोक हापिसांत जाऊन धंदा-रोजगार करू लागले म्हणजे त्यांचे ग्रंथावलोकन करणे बंद पडते. जो अभ्यास त्यांनी पूर्ववयात केलेला तो विसरून जातात. मग सहजच त्यांची विद्येवरील भक्ती उडत्ये. मग ते आपले आयुष्य गप्पा झोकण्यांत व आळसांत घालवितात. अशा लोकांकडून दिवसांतून तास-दोन तास तरी विद्येकडे लागावे म्हणून ही उभारिली होती. तरी करावा त्या रीतीने हिचा विनियोग करणारे थोडेच. लोकांस अजून विद्येचा व्यासंग व ग्रंथावलोकन करण्याची गोडी लागली नाही.’
माडगांवकर यांनी सन १८६३ मध्ये हे भाष्य केलं आहे. दीडशे वर्षं उलटून गेली तरी या विधानातली वस्तुस्थिती बदललेली नाही. आपल्या शहरातल्या जुन्या आणि ऐतिहासिक ग्रंथालयांची अवस्था दिवसेंदिवस ओसाड इमारतीसारखी होत आहे. लवकरच मोक्याच्या जागांवरची जुनी सार्वजनिक वाचनालयं एका खोलीपुरती बंदिस्त होऊन त्या जागेवर अवाढव्य मॉल उभारली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पालकांचं थांबलेलं वाचन हा चिंतेचा विषय आहे. वाचन प्रेरणादिनाच्या (ता. १५ ऑक्टोबर) निमित्तानं पाल्याकडून एखादं भाषण पाठ करून घेणं व त्यानिमित्तानं एखाद्या कवितेच्या चार-सहा लयदार ओळी इकडून तिकडून मिळवणं एवढ्यापुरतंच ते सीमित झालं आहे. मोबाईल आणि कॉम्प्युटर-स्क्रीन यांत अडकलेले पालक मुलांना पुस्तकांचं वाचन करण्याची सवय लावू शकत नाहीत. त्यासाठी त्यांनीही एखादा तास पुस्तक हातात घेऊन मुलांबरोबर वाचत बसणं आवश्यक आहे.

‘वाचायचं काय?’ हा एक प्रश्न सतत विचारला जातो. याचं उत्तर अगदी साधं आहे, ‘हाती येईल ते वाचा. नीट आणि काळजीपूर्वक वाचा.’ प्रत्येक शब्दावरून नजर फिरवायची सवय लागली की आपण वाचत असलेल्या ठरावीक विषयावर विचारही करू लागतो, आपल्या पूर्वस्मृती मदतीला येतात, आपल्या ज्ञानात भर पडते आणि आपण एका अपूर्व आनंदाच्या प्रदेशात प्रवेश करतो. चकाकणाऱ्या कचकड्यांत वावरणाऱ्या आपल्याला हिऱ्यांची सोबत मिळते. आपलं अवघं जीवनच उजळून निघतं. पुस्तकं आणि आपलं वाचन या बाबी आपल्याला नवी दृष्टी, नवा विचार आणि नवा दृष्टिकोन देत असतात.
वाचन करणं म्हणजे विचार करणंही असतं. वाचन करताना आपल्याला प्रकाशवाटा सापडत जातात. आपण नवे होत जातो. विचार करता करता बोलू लागतो, आपलं अंतरंग व्यक्त करू लागतो. क्वचित लिहूही लागतो. म्हणजे, ज्ञानाचा वारसा आपल्या पिढीकडून पुढच्या पिढीला देण्याच्या प्रक्रियेतला आपण एक जबाबदार घटक ठरत असतो. चल-अचल संपत्तीचा, नाव-गावाचा वारसा हा पाल्यांना मिळतच असतो. मात्र, कोणत्या विचारपरंपरेचा आणि ज्ञानाचा वारसा आपण पुढच्या पिढ्यांच्या हाती देत आहोत हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं.

प्रतीक्षा तालंगकर-कथले या नव्या पिढीच्या लेखिकेचं ‘बालमानसशास्त्र’ हे पुस्तक मधल्या काळात वाचनात आलं. अगदी सोप्या-सहज भाषेत एक अवघड विषय तालंगकर यांनी मांडला आहे. संपूर्ण विवेचन प्रश्नोत्तरांच्या शैलीत आहे. स्पर्धापरीक्षेच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त वाटावं असं हे पुस्तक आहे असं सकृद्दर्शनी वाटतं. मात्र, मी वाचत गेले आणि लक्षात आलं की हे पुस्तक केवळ
स्पर्धापरीक्षेसाठीच उपयुक्त नसून, प्रत्यक्ष जीवनातही नवी दिशा दाखवणारं आहे.
तुम्ही एखाद्या महामार्गावरून चालत असता आणि अचानक अशी पुस्तकं तुम्हाला आडबाजूला घेऊन जातात, नवा भोवताल दाखवतात, नव्या, पावसाळी पायवाटांवरून चालायला भाग पाडतात. मृद्गंधी चिकणमातीतले तुमचे पाऊलठसे किती ताजे आहेत ते तुम्हालाच सांगतात. ‘बालमानसशास्त्र’ हा शब्द ऐकायलादेखील जड वाटतो; पण जर थोडी उत्सुकता दाखवली तर हिरव्या रानात मोरपिसं वेचायला गेल्यावर जसं वाटतं तसं तालंगकर यांचं हे पुस्तक वाचताना वाटत राहतं.

पुस्तकं वाचताना आडबाजूचं अपरिचित जीवन अनुभवायला मिळणं हेच खरं फलित असतं. पुस्तक तुम्हाला आंतर्बाह्य बदलून टाकतं, उजळून टाकतं. ‘वाचायचं काय?’ हा प्रश्न न विचारता वाचायला सुरुवात करायची. कोणत्या प्रकारचं साहित्य आपल्याला वाचायला आवडत आहे हे हळूहळू आपल्या लक्षात येऊ लागतं. एक पुस्तक दुसरं पुस्तक सुचवत राहतं! ‘ज्योत से ज्योत जलाते चलो’ असा हा अनुभव असतो. काही दिवस उलटतात, वर्षं सरतात...आपण मागं वळून पाहतो तेव्हा आपल्या आत एक संपन्नता निर्माण झालेली असते. पुस्तकांचं एक सुगंधी अरण्य आहे, ज्यात वाचणारी व्यक्ती कस्तुरीमृगाच्या शोधात धावत असते.
...आणि धावता धावता एक दिवस ती व्यक्ती स्वत:च कस्तुरीमृग होऊन जाते!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com