esakal | नवरात्रीच्या निमित्तानं... (विद्या सुर्वे-बोरसे)
sakal

बोलून बातमी शोधा

vidya surve borse

नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर, मातृशक्तीचा आदर. हा आदर जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे. आई ही केवळ देवता म्हणून पूजण्याची बाब नाही, तर व्यक्ती म्हणून तिचा उचित सन्मान करण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. जगातली कोणतीही आई ही आपलीच आई आहे, ही भावना समजून घेणारं कवीचं हृदय प्रत्येकाच्या आत उमललं पाहिजे...

नवरात्रीच्या निमित्तानं... (विद्या सुर्वे-बोरसे)

sakal_logo
By
विद्या सुर्वे-बोरसे

नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर, मातृशक्तीचा आदर. हा आदर जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे. आई ही केवळ देवता म्हणून पूजण्याची बाब नाही, तर व्यक्ती म्हणून तिचा उचित सन्मान करण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. जगातली कोणतीही आई ही आपलीच आई आहे, ही भावना समजून घेणारं कवीचं हृदय प्रत्येकाच्या आत उमललं पाहिजे...
 

घरातली भांडीकुंडी लखलख करू लागली, डाळी व धान्यं छतावर दिसू लागली आणि अंथरूण-पांघरूणासह सगळे कपडे उन्हात वाळवताना मोठ्या संख्येनं घराघरातली मंडळी दिसू लागली की नवरात्र आल्याची सूचना आपसूक मिळे. घरोघर लगबग सुरू होई. शेतातून नवं धान्य येऊ लागे. सहामाही परीक्षा तोंडावर आलेल्या असत. वर्गातल्या मुली दसऱ्याविषयी, दिवाळीविषयी आणि सुटीविषयी आपापसात बोलू लागत. नेहमीच्या ठिकाणी एके दिवशी देवीचं आगमन होई. पताका, झिरमाळ्या आणि एक छोटा मंडप, त्यावर सोडलेली चमचमणारी लायटिंग अवघ्या गावाचं लक्ष वेधून घेई. घरात घट मांडला जाई. गहू, ज्वारी, करडी, जवस, हरभरा त्यात दिवसागणिक उगवून येई. हळूहळू काळीभोर माती हिरव्या पिकात दिसेनाशी होई. संध्याकाळच्या वेळी देवीपुढच्या पटांगणात टिपऱ्यांचा खेळ खेळला जाई आणि मग दसरा येई. गावाच्या सीमेवर पूजा बांधून, गावकरी सोनं लुटून परत येत. आखरावर जमा झालेले लोक, मारुतीच्या पाया पडून घरी परतत तेव्हा त्यांचं औक्षण होई आणि मग उशिरापर्यंत आपट्याची आणि शमीची पानं देत-घेत भेटींचा, ख्याली-खुशालीचा कार्यक्रम गावभर साजरा होई.
हे दृश्य पुष्कळ जुनं आहे. जत्रा सुरू होण्याअगोदरच्या काळातलं. दसऱ्याचं बाजारीकरण झालं नव्हतं त्या दिवसांतलं. गरबा डान्सचं फॅड अवतरलं नव्हतं त्या काळातलं. हळूहळू घट, सीमोल्लंघन यांवर मार्केटनं ताबा मिळवला. गुजरात, बंगाल या राज्यांतलं नवरात्र आणि देवीचे उत्सव मराठी माणसांच्या सरावाचे झाले. रावणदहनाची परंपरा मोजक्या ठिकाणी होती, ती विस्तारली. डोळ्यांचा पारणं फेडणारा भगवान बालाजीचा रथोत्सवसोहळा नव्या शहरातही सुरू झाला. काळानं नवं वळण घेतलं.

नागनाथ कोत्तापल्ले यांची ‘दसरा’ या शीर्षकाची सुंदर कथा आहे. बाजार आला नव्हता तेव्हा जो बाजार होता, त्याचं तिरकस आणि तेवढंच भेदक चित्रण या कथेत आहे. यांत्रिकता केवळ भांडवली व्यवस्थेमुळेच निर्माण होत असते असं नाही, तर ती खूपदा परंपरेतूनही पुढं सरकत असते याचं सूचनही या कथेत आहे. माणसांचं यंत्रवत् होत जाणं, नवा विचार न करणं, जराही न हेलावणं, गर्दीचा भाग बनून धावत राहणं, चिकित्सा न करणं, डोक्याचा जरासुद्धा वापर न करणं हे सगळं भयावह आहे.
खूपदा मोठ्यांच्या जे लक्षात येत नाही ती निरीक्षणं मुलं सहजपणे नोंदवतात. यंत्र व्हायला दिलेला तो त्यांच्या पातळीवरचा नकार आहे. लिंगभावविषयक जाणीवजागृती आणि स्त्रीचा सन्मान या बाबी मुलं अधिक नेमकेपणानं अंगीकारताना दिसत आहेत. नवरात्रीच्या काळात मातृशक्तीचा खरा गौरव करायचा असेल तर लिंगभावविषयक नितळ दृष्टिकोनाचंच बीजारोपण करणं आवश्यक आहे.
अनुजथ सिंधू विनयलाल या चौदा वर्षांच्या मुलाची कर्तबगारी तुम्हाला नक्कीच ठाऊक असेल. केरळ सरकारच्या ‘जेंडर बजेट मॅन्युअल’च्या दस्तऐवजाच्या मुखपृष्ठावर अनुजथनं काढलेलं चित्र आहे.

जवळपास सगळ्याच लहान मुलांना लहानपणी जशी चित्रकलेची आवड असते तशीच ती त्रिसुर इथल्या अनुजथलाही होती. तो चार वर्षांचा असतानाच त्याच्या बोटांमधली जादू त्याच्या आईच्या लक्षात आली. तिनं त्याला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. अनुजथ चित्रं काढत राहिला आणि आई त्याचं कौतुक करत राहिली. अनुजथनं काढलेली चित्रं निरनिराळ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धांना पाठवण्यात आली. महत्त्वाच्या स्पर्धेत तो विजेताही ठरला.

केवळ स्वत:च्या आनंदासाठी चित्रं काढण्याचा निर्णय अनुजथनं एके दिवशी घेतला. त्यानं दोन अडीच वर्षांपूर्वी एक चित्र काढलं : ‘माझी आई आणि माझ्या शेजारच्या आया.’ आई झोपेतून उठल्यापासून कोणकोणती कामं करत राहते याची चित्रमालिका अनुजथनं रंगवली आहे. स्त्रियांच्या अदृश्य श्रमांची नोंद त्यानं या चित्रातून केली आहे. कोंबड्यांना दाणे टाकणारी, धान्य वाळवणारी, भाजीपाला पिकवणारी व विकणारी, गाईची धार काढणारी, केस विंचरून देणारी, मासे साफ करणारी, भांडी घासणारी, कपडे धुणारी, खरेदी-विक्रीत सहभागी होणारी, अभ्यास घेणारी... अशी आईची विविध रूपं अनुजथनं एकाच मोठ्या पटलावर रंगवली आहेत. ही चित्रं मोहक तर आहेतच; पण त्याच्या विचक्षण बुद्धिमत्तेचा परिचय घडवणारीही आहेत. अनुजथनं हे चित्र रंगवलं आणि ठेवून दिलं. मध्ये बरेच दिवस गेले. सुप्रसिद्ध व्यंग्यचित्रकार शंकर पिल्ले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत हे चित्र पाठवलं गेलं. दरम्यानच्या काळात अनुजथच्या आईचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. अनुजथला पारितोषिक मिळाल्याची घटना ती गेल्यानंतर पंधरा दिवसांनी घडली. हेच चित्र केरळ सरकारच्या लिंगभावविषयक दस्तऐवजावर मुखपृष्ठ म्हणून वापरण्यात आलं आहे.
मुलांची नैसर्गिकपणे वाढ होईल असं पर्यावरण पालक म्हणून आपण खरंच निर्माण करतो का? आपली मुलं स्वतंत्र विचार मांडू लागतात तेव्हा आपण तो स्वीकारतो का? आपल्या घराच्या भिंती, फरश्या त्यांना कॅनव्हास म्हणून वापरू देतो का? की आपणही त्यांना विशिष्ट प्रकारच्या कागदाच्या वहीत ठोकळ्याचं चित्र काढायला लावून यंत्रबद्ध करत आहोत? मुलांना त्यांचं आकाश मुक्त आणि खुलं हवं आहे. ते देण्याची जबाबदारी सर्वस्वी पालकांची आहे.

दरम्यानच्या काळात ‘मुक्तसृजन’ या फेसबुक लाइव्ह पेजवर अमरावती विद्यापीठातल्या डॉ. मोना चिमोटे यांचे ‘स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेनं’ या विषयावर विचार ऐकायला मिळाले. त्याहीपूर्वी ऐकलेल्या सांगलीच्या डॉ. सुनीता बोर्डे यांच्या व्याख्यानाचीही आठवण झाली.
सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे यांच्यापासून सातत्यानं जो मांडला जात आहे; पण तरीही जो अजूनही पुरेसा रुजलेला नाही तोच विचार या दोघींनीही मांडला. आमचं बालसाहित्य, आमची शालेय पाठ्यपुस्तकं, बालकुमारांच्या मासिकातली चित्रं ही स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह धरणारी हवी आहेत, तथापि तसं होतंच असं नाही. पुरुषसत्ताक वर्चस्व हे जिथं तिथं शोधता येते. ‘वर्तमानपत्र वाचणारे बाबा, स्वयंपाक करणारी आई, अभ्यास करणारा दादा, झाडू मारणारी ताई’ हे चित्र बदलायला हवं, त्यासाठी चित्रकारांनी स्वत:हून पुढाकार घ्यायला हवा. लिंगभावविषयक सिद्धान्तन समजून घ्यायला हवं.

नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर, मातृशक्तीचा आदर. हा आदर जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे. आई ही केवळ देवता म्हणून पूजण्याची बाब नाही, तर व्यक्ती म्हणून तिचा उचित सन्मान करण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. जगातली कोणतीही आई ही आपलीच आई आहे, ही भावना समजून घेणारं वामन निंबाळकर या कवीचं हृदय प्रत्येकाच्या आत उमललं पाहिजे आणि हे प्रयत्न सर्व स्तरांवरून सुरू झाले पाहिजेत.

मराठीत फार उत्तम बालसाहित्य लिहिलं गेलं आहे. लेखिका-कवयित्रींचं ठळक योगदान त्यात शोधता येते. मालती बेडेकर, लीलावती भागवत, इंदिरा संत, दुर्गा भागवत, शान्ता शेळके, सई परांजपे, माधुरी पुरंदरे, स्वाती राजे यांच्यापासून ते संगीता बर्वे, प्रतिमा इंगोले, ज्ञानदा असोलकर, माधुरी माटे, सुनंदा गोरे, लीला शिंदे, निधी पटवर्धन, आश्लेषा महाजन, माया धुप्पड, सोनाली गावडे, अर्चना डावरे यांच्यापर्यंत कितीतरी नावं सांगता येतील. साहित्यप्रकारानुसार ही यादी वाढवत नेता येईल. यातल्या किती लेखिकांची पुस्तकं आपण मिळवून वाचली आहेत? यातल्या किती कवयित्रींचे संग्रह आपल्या घरात आहेत? या नवरात्रीत रोज एका तरी मराठी लेखिकेचं एक पुस्तक संपूर्ण वाचायचं किंवा पाल्यांना वाचून दाखवायचं असा संकल्प आपण करायला काय हरकत आहे?
ही पुस्तकं वाचता वाचता स्त्री-पुरुष समानतेच्या जाणिवा आपोआप रुजून येतील. एका स्त्रीचा स्वर आणि विचारप्रक्रिया या बाबी पुरुषाच्या विचारप्रक्रियेहून आणि आवाजाहून कुठं कशा भिन्न होतात हे सहजच कळून येईल आणि यंत्रवत् होण्याच्या आपल्या प्रक्रियेला खीळ बसेल.

नवरात्र येण्याची सूचना कशी मिळत असे हे सुरुवातीला सांगितलं आहे. नवरात्र आलं की आईला जरादेखील उसंत मिळत नाही...तिला रात्रीचा दिवस करावा लागतो...दोन दिवसांचा खास वेळ काढून ती घरातलं प्रत्येक भांडं, वस्तू घासून घासून लख्ख करते...टोपल्याटोपल्यानं डाळी व धान्यं छतावर घेऊन जाते आणि ते ती, पाखरांपासून राखण करत, कडक उन्हात वाळवत बसते... अंथरूण-पांघरुणासह सगळे कपडे उन्हात वाळत घालते... मुलांसाठी नवे कपडे आणावेत असा आग्रह मुलांच्या वडिलांकडे धरते...आई अशी थकून जाईपर्यंत कामात बुडालेली दिसू लागली की नवरात्र आल्याची सूचना मला आपसूक मिळून जाई.
गेल्या वीस-तीस वर्षांत हे चित्र बदललं आहे का? खरोखरच बदललं आहे??