कोको आणि चॉकलेट (विष्णू मनोहर)

vishnu manohar
vishnu manohar

चॉकलेट आपल्या जीवन संस्कृतीचं एक अंग बनलेलं आहे. केक्स‌, कुकीज, पेस्ट्रीज्‌ आणि पाईज्‌ यांच्या उत्पादनात आणि फिनिशिंगसाठी कोको आणि चॉकलेट यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्याचप्रमाणं बेकरी उत्पादनातल्या विविध प्रकारांना वैशिष्ट्यपूर्ण स्वाद आणि रंग, तसंच केक मिश्रण आणि आयसिंगमध्येही महत्त्वाचा दुवा म्हणूनसुद्धा याचा वापर करतात. चॉकलेट आणि कोकोचं प्रस्थ आज सगळीकडं वाढलं आहे आणि अनेक पदार्थांत त्यांची वेगवेगळी मिश्रणं अतिशय लोकप्रिय आहेत. या सगळ्याची कहाणीसुद्धा अतिशय ‘गोड’ आहे.

‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी-सोनेरी चमचमता चांगला’ हे गाणं लहानपणी आपण म्हणत असू आणि अजूनही या गाण्याची मजा गेलेली नाही. चॉकलेट आपल्या जीवन संस्कृतीचं एक अंग बनलेलं आहे. चॉकलेट आणि मुलं हे समीकरण तर गेल्या कित्येक काळापासून आहे. त्याचप्रमाणं आपलं जीवनसुद्धा एक चॉकलेटच्या डब्याप्रमाणं आहे. कधी थोडंसं कडू, कधी थोडंसं गोड, तोंडाला पाणी आणणारं, तर कधी मलईदार असं म्हटल्यास वावगं ठरू नये. कधीकधी वरून कठीण वाटणारं; पण प्रत्यक्षात जसं चॉकलेट तोंडात घातल्यावर विरघळतं त्याचप्रमाणं- खरं ना? केक्स‌, कुकीज, पेस्ट्रीज्‌ आणि पाईज्‌ यांच्या उत्पादनात आणि फिनिशिंगसाठी कोको आणि चॉकलेट यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्याचप्रमाणं बेकरी उत्पादनातल्या विविध प्रकारांना वैशिष्ट्यपूर्ण स्वाद आणि रंग, तसंच केक मिश्रण आणि आयसिंगमध्येही महत्त्वाचा दुवा म्हणूनसुद्धा याचा वापर करतात.

कोकोच्या बियांवर एक विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करून चॉकलेट तयार केलं जातं. कोकोचा शोध सर्वप्रथम मॅक्‍सिकन लोकांनी लावला. कोकोचं झाड सर्वसाधारण चार ते सात मीटर उंचीचं असतं. कोकोच्या उत्पादनाला साधारणपणे कोरड्या जमिनीची आवश्‍यकता असते. तसंच, कोकोचं उत्पादन उष्णकटिबंधीय प्रदेशात आणि जास्त पाऊस पडणाऱ्या प्रदेशात चांगल्या प्रकारे होतं. त्यामुळं प्रामुख्यानं घाना, ब्राझिल, मेक्‍सिको, न्यूगिनी, फिलिपाईन्स, व्हेनेझुएला, इंडोनेशिया, मेलेशिया इत्यादी देशांत कोकोचं उत्पादन भरपूर प्रमाणात असतं. कोकोचं जे फळ असतं त्याचा साधारण आकार पपईच्या फळासारखा असतो आणि यात साठ ते सत्तर बिया असतात. या बिया धुवून वाळवतात आणि त्यावरचं फायबर काढून नंतर विशिष्ट प्रकारे आंबवून आणि भाजून घेतात. यामुळं बियांना विशिष्ट रंग, गंध आणि स्वाद येतो.
यानंतर या बिया पुढच्या प्रक्रियेसाठी पाठवतात. प्रक्रिया केंद्रांवर त्या विशिष्ट प्रकारे भाजतात. त्यामळं त्याचा स्वाद, रंग, गंध यात आणखी सुधारणा होते. थंड केल्यावर या बिया ‘रोलर मिल’मध्ये टाकतात. त्यामुळं त्यांच्यावरचं कवच वेगळं होतं. मग या बिया दळून त्यांचा लगदा करतात. त्याला ‘चॉकलेट लिकर’ म्हणतात. ‘चॉकलेट लिकर’मध्ये ५४ टक्के स्निग्धांश असतो. फिल्टर प्रेसमध्ये द्रवरूप कोको लिकरवर प्रक्रिया करून स्निग्धांश वेगळा करतात आणि गोड चॉकलेटच्या आवरणासाठी त्याचा वापर करतात. उर्वरित (कोरडा) भाग दळून कोको पावडर तयार करतात.

डच पद्धतीनं केलेला कोको
नैसर्गिक कोकोपासून विशिष्ट आणि सुधारित डच पद्धतीनं कोको तयार करतात. या कोको बियांवर अल्कलीची प्रक्रिया करतात. अर्धवट भाजलेल्या कोको बियांमध्ये अल्कलीचा द्रव (सामान्यतः सोडियम-बाय-कार्बोनेटचा द्रव) टाकतात. यातल्या जास्त पाण्याचं बाष्पीभवन घडवून आणतात. नंतर या कोको बियांवर प्रक्रिया करून नैसर्गिक कोको तयार करतात. डच प्रक्रियेमुळं कोकोचा रंग गडद होतो. स्वादामध्येही बदल होतो. शिवाय द्रवपदार्थांत विसर्जन होण्याचा गुणधर्म सुधारतो. अल्कली प्रक्रियेमुळं कोकोची नैसर्गिक आम्लता कमी होते. कारण अल्कलीमुळं काही प्रमाणात आम्लं उदासीन होतात. एक मात्र खरं, डच-पद्धतीमुळं कोकोचा रंग गडद होतो. शिवाय त्यातला कडवटपणा कमी होतो.

डच प्रक्रिया कोको आणि नैसर्गिक कोको यामधला फरक कसा ओळखाल? : प्रत्येक नमुन्याचा सुमारे २५ ग्रॅम कोको, एक चमचा बेकिंग पावडर आणि २०० मिलीलिटर पाणी घेऊन दोन वेगवेगळी द्रावणं बनवावीत आणि ती हलवावीत. नैसर्गिक कोकोचं द्रावण फेसाळतं आणि काळं बनतं; पण डच पद्धतीच्या कोकोचं द्रावण फेसाळत नाही, फारसं काळपट होत नाही. या पद्धतीनं दोन प्रकारच्या कोकोमधला फरक जाणून घेता येईल आणि त्याप्रमाणं त्यांचा योग्य वापर करता येईल.
यासाठी रंगपरीक्षणाच्या पद्धतीचाही अवलंब केला जातो. डच प्रक्रिया केलेला कोको अल्कलीमुळे गडद रंगाचा झालेला असतो. त्यामुळं एक चमचा आम्ल (क्रिम ऑफ टार्टर) डच्‌ कोकोच्या द्रावणात टाकलं, तर त्याचा रंग फिकट होतो. तेच आम्ल जर नैसर्गिक कोकोच्या द्रावणात टाकलं, तर रंगात फारसा फरक पडत नाही. चॉकलेट केकचा रंग, वास आणि स्वाद यावर लिव्हनिंग एजंट्सचा होणारा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो.

नैसर्गिक कोको
याला ‘ब्रेकफास्टचा कोको’ असंही म्हणतात. त्याचा पीएच मूल्यांक ४ ते ५ पर्यंत असतो. म्हणजेच त्यात जास्त आम्लता असते. त्यामुळं मिश्रणसूत्रात किण्वीकारक बेकिंग सोड्याचं प्रमाण डच कोकोपेक्षाही जास्त वापरावं लागतं. डच कोको तीव्र नसतो. त्याचा पीएच मूल्यांक ६ ते ८.८ पर्यंत असतो. म्हणजेच त्यात जास्त अल्कली गुणधर्म असतात. या कोकोचा वापर करताना बेकिंग सोड्याचं प्रमाण कमी लागतं. मात्र, बेकिंग पावडर मात्र जास्त लागते. केकच्या प्रकारानुसार लिव्हनिंग एजंटबाबत योग्य तो बदल करता यावा म्हणून केकचं मिश्रणात वापरायच्या कोकोचा प्रकार माहीत असला पाहिजे. कोकोचा रंग मॅहॉगनी अथवा तांबडसर तपकिरी झाला, तर त्याचा अर्थ अगदी जास्त सोडा वापरला गेला आहे, असा होतो. त्यामुळं केकला सोड्याची अथवा साबणासारखीच चव येते. म्हणून सोड्याचा वापर केक मिश्रणात योग्य प्रमाणातच करावा लागतो. केक फिकट तपकिरी किंवा दालचिनी रंगाचा झाला, तर त्यात कमी सोडा पडला असं अनुमान निघतं. अशा मिश्रणांत सोड्याचं प्रमाण किंचित‌ वाढवावं लागतं.

तसं पाहिलं, तर कोको पावडरचा स्वाद मुळात अतिशय कडवट असतो. यामध्ये कोको बटर घालून तो स्वाद सौम्य बनवतात. कोको पावडरपासूनच चॉकलेटची निर्मिती केली जाते. चॉकलेट हा मूळ स्पॅनिश शब्द आहे, असं म्हणतात. कोको या झाडाचा शोध दोन हजार वर्षांपूर्वी अमेरिकेत लागला. चॉकलेट बनविण्याचा प्रथम मान मेक्‍सिकन आणि मध्य अमेरिकन लोकांना आहे. सर्वप्रथम कोकोच्या बियांचं पेय बनवायचे; पण त्याच्या बाजूचा जो पांढरा मऊसर भाग असायचा, त्याची वाईनसुद्धा बनवली जात असे. असं म्हणतात, की सन १५२८ मध्ये स्पेननं मेक्‍सिकोवर राज्य केलं, त्यावेळी जाताना तिथल्या राजांनी पुष्कळ मोठ्या प्रमाणात कोकोच्या बिया आणि चॉकलेट बनवणारी यंत्रसामग्री स्पेनला नेली. त्यानंतर फार थोड्या काळातच तिथल्या श्रीमंत लोकांचं फॅशनेबल ड्रिंक म्हणून लिक्विड चॉकलेट प्रसिद्ध झालं.
यानंतर इटलीच्या एका माणसानं स्पेनचा हा चॉकलेटचा एकाधिकार संपविला. अमेरिकेतल्या काही भारतीय लोकांना चॉकलेट बनवताना पाहिलं आणि त्यातल्या काही लोकांना त्यानं आपल्याबरोबर इटलीला नेलं. इसवीसन १६०५ ते १६०६ या काळात इटलीमध्येसुद्धा चॉकलेट प्रसिद्ध केलं. इकडं फ्रान्समध्ये सन १६१५ मध्ये पहिल्यांदा ड्रिंकिंग चॉकलेटचा स्वाद चाखला गेला. इंग्लंडमध्ये मात्र चॉकलेट यायला सन १६५० उजाडावं लागलं.

आणि चॉकलेट गोड झालं!
तुम्हाला वाचून गंमत वाटेल; पण आधी चॉकलेट चक्क तिखट होतं. अमेरिकन लोक कोकोच्या बियांना वाटून त्यात वेगवेगळ्या प्रकारचे मसाले टाकून चमचमीत आणि तिखट असं पेय बनवायचे. त्यानंतर या चॉकलेटला गोड बनवण्याचं काम मात्र युरोपनं केलं. त्यांनी हा तिखट स्वाद काढून त्यात दूध आणि साखर टाकून गोड चॉकलेटी पेय बनवलं आणि यानंतर खऱ्या अर्थानं चॉकलेटचा प्रसार होऊ लागला. चॉकलेटला पिण्यायोग्य आणि खाण्यायोग्य बनवण्याचं कामसुद्धा युरोपीयन लोकांनीच केलं. त्यासाठी त्यांनी त्यावर वेगवेगळे प्रयोग केले. चॉकलेटबरोबर वेगवेगळे पदार्थ वापरून कुठलं कॉंबिनेशन लोकांना आवडेल याचा आढावा घेऊन तशा प्रकारे चॉकलेटचं उत्पादन केलं. एक डॉक्‍टर महाशय होते. त्यांचं नाव डॉ. हॅन्स स्लो. ते दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर आले असताना, त्यांना चॉकलेट चाखायला मिळालं आणि ते अतिशय आवडलं. चॉकलेट प्यायल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा उत्साह त्यांना जाणवला. मात्र, हे द्रवस्वरूपात असल्यामुळं याचा प्रचार कमी प्रमाणात होत होता, असं त्यांना वाटलं. या माणसानं पहिलं घनरूपातलं चॉकलेट बनवलं आणि यानंतर निर्माण झाली ‘कॅडबरी मिल्क चॉकलेट’ कंपनी. मग सन १८२४ मध्ये बर्मिंगहॅम इथं ‘कॅडबरी ब्रदर्स’ नावाची कंपनी सुरू झाली- जी ‘जॉन कॅडबरी’ यानं आपल्या भावाबरोबर सुरू केली. मग यांनी सन १८५४ मध्ये लंडनमध्ये याची दुसरी शाखा सुरू केली. गंमतीचा भाग असा, की जॉन बंधू आधी चहा-कॉफी, दूध विकत आणि त्याला चौथा पर्याय म्हणून ते ड्रिंकींग चॉकलेट विकू लागले. मग यात बरेच बदल होत गेले. कॅडबरी बंधूंनी जणू काही चॉकलेट क्रांतीच घडवून आणली आणि सन १९०५ मध्ये ‘कॅडबरी डेरी मिल्क बार’ याचा जन्म झाला. मग यात वेगवेगळे स्वाद आले. मिल्क क्रीम (१९२०), यलो एग्ज्‌ (१९२३), क्रंची (१९२९), गुलाब (१९३८) इत्यादी.

चॉकलेटचे मुख्य प्रकार
चॉकलेटचे मुख्य प्रकार साधारणपणे असे असतात :
डार्क चॉकलेट : यामध्ये साखर, कोको-बटर, कोको-लिकर आणि कधी-कधी व्हॅनिला यांचा वापर करतात.
मिल्क चॉकलेट : यामध्ये साखर, कोको-बटर, कोको-लिकर, दूध किंवा मिल्क पावडर आणि व्हॅनिला यांचा वापर करतात.
व्हाईट चॉकलेट : यात साखर, कोको-बटर, दूध, मिल्क फॅट आणि व्हॅनिला यांचा वापर करतात.

कोको बटर हे नैसर्गिक कोको बीन्सपासून मिळणारं एक प्रकारचं तेल आहे. त्याला ‘थियाब्रोंम’ असं म्हणतात. कोको बटरचा रंग हलका पिवळा असा असतो. याचा वापर चॉकलेट बनवताना करतात. त्यामुळं चॉकलेट मऊसर तर होतंच; शिवाय त्याला एक छान सुगंध येतो. चॉकलेट बटरचा उपयोग व्हाईट चॉकलेट बनवतानासुद्धा मोठ्या प्रमाणात करतात. याचा द्रवणांक आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा थोडा कमी असतो. त्यामुळंच रूममध्ये असताना चॉकलेट व्यवस्थित असतं; पण तोंडात घातल्याबरोबर वितळून जातं. कोको बटरचा उपयोग चॉकलेटशिवाय बऱ्याच ठिकाणी केला जातो. उदाहरणार्थ, फ्रेस क्रीम, लिपस्टिक, मॉइस्चरायझर, कित्येक प्रकारच्या सौंदर्य प्रसाधानांमध्येसुद्धा याचा वापर केला जातो.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी चॉकलेट अतिआवश्‍यक भोजन म्हणून सैनिकांना देत होते अशी नोंद आहे. त्यावेळी युद्धाच्या दरम्यान चॉकलेटवर रेशनिंग आलं होतं. सन १९४९-१९५० नंतर कॅडबरीनं पुन्हा नव्यानं चॉकलेट कारखान्यांची सुरुवात केली.
ज्याप्रमाणं आपल्या इथं सणावाराला आणि आनंदाच्या क्षणी मिठाई देण्याची पद्धत आहे, त्याचप्रमाणं युरोपीय देशांमध्ये चॉकलेटचा मिठाई म्हणून वापर करतात. बर्फी, पेढा हे जसे आपल्या संस्कृतीचे भाग झाले आहेत, त्याचप्रमाणं युरोपीय देशांत वेगवेगळ्या दिवशी चॉकलेटचं महत्त्व आहे. उदाहरणार्थ, व्हॅलेंटाईन डे, ख्रिसमस, ईस्टर, जन्म दिवस इत्यादी. यामध्ये मग चॉकलेटबरोबर वेगवेगळ्या प्रकारची कॉंबिनेशन आली आहेत. उदाहरणार्थ, शेंगदाणे, काजू, किसमीस, मनुका, बेदाणे, अक्रोड, बदाम एवढंच काय- चॉकलेटच्या मधोमध लिकरसुद्धा भरून तशी चॉकलेट्स बाजारात आली आहेत. हे चॉकलेट आईस्क्रीमच्या स्वरूपातसुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांना आवडतं.

कोको बीन्समध्ये साधारण पन्नास टक्के फॅट्स असतात. नुसतं कोको बटर आणि चॉकलेट खाल्लं, तर त्याच्यामुळं रक्तातलं कोलेस्टेरॉल वाढत नाही. मात्र, मिल्क चॉकलेट किंवा वेगवेगळ्या प्रकारची फॅन्सी चॉकलेट्स खाल्ली, तर त्याचा परिणाम शरीरातल्या कोलेस्टेरॉलवर होऊ शकतो. कोको बीन्समध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त आहे. कोकोमध्ये असे काही ऍन्टीऑक्सि‍डंट गुणधर्म आहेत, की जे आपल्या शरीराला फायदेशीर आहेत. त्यांना ‘फ्लेव्होनाईड्‌स’ असं म्हणतात.
काही लोकांचा असा गैरसमज आहे, की कोको किंवा चॉकलेटमध्ये कॅफीन असतं; पण कॉफी आणि चहाच्या तुलनेत कोकोमधल्या कॅफीनचं प्रमाण अतिशय कमी आहे. यामध्ये व्हिटामीन ए, बी-१, बी-२, बी-३, सी, ई, असते.

बाजारात चॉकलेटच्या स्लॅब, कोको पावडर, डार्क चॉकलेट स्लॅब, मिल्क चॉकलेट स्लॅब सहज उपलब्ध असतात. त्यामध्ये वेगवेगळी कॉंबिनेशन्स करून तुम्ही चॉकलेटची निर्मिती करू शकता. सध्या लोकप्रिय असलेला चॉकलेटचा बुके हासुद्धा वेगळ्या पद्धतीनं करू शकता. चॉकलेटचा बुके करताना साधारणपणे नेहमीच्या फुलांच्या बुकेबरोबर कॉंबिनेशन करून चॉकलेटची फुलं लावली जातात. मात्र, तसं न करता माझ्या मते चॉकलेटचा बुके असा असावा, की जो आपण पूर्णपणे खाऊ शकलो पाहिजे. यामध्ये चॉकलेटचा डोंगर, त्यामध्ये लागलेली फुलं, साखरेच्या कॅरामलची झाडं, चॉकलेटच्या ग्रॅन्युल्सचे दगड-धोंडे इत्यादींचा आपण कल्पकतेनं वापर करू शकतो. चला, आता काही चॉकलेटच्या रेसिपीज्‌ पाहूयात.

चॉकलेट लॉलीपॉप
साहित्य : कोको पावडर अर्धी वाटी, मिल्क पावडर अर्धी वाटी, पोळ्या पाच नग, कोको बटर ३ चमचे, साखर पाव वाटी, भाजून जाडसर भरडलेले काजू अर्धी वाटी, मीठ चिमूटभर, आईस्क्रीमच्या लांब काड्या.
कृती : सर्वप्रथम लोणी आणि साखर एकत्र करून घ्या. त्यामध्ये कोको पावडर, मिल्क पावडर घालून मिश्रण पातळ होईस्तोवर गरम करा. पोळ्यांचा मिक्‍सरवर बारीक चुरा करून त्यामध्ये पिठीसाखर, मिल्क पावडर आणि काजूचे तुकडे घाला. दुधाचा हात शिंपडून त्याचे आईस्क्रीमच्या काड्यांवर लॉलीपॉपसारखे चपटे गोळे लावा. फ्रीजमध्ये पाच मिनिटं थंड करा. नंतर कोको मिश्रणामध्ये बुडवून काजूंच्या तुकडयांवर घोळवा. थंड करून खायला द्या.

चॉकलेट लाडू
साहित्य : पोळ्या ८-१० नग, बदाम, पिस्त्याचे तुकडे १ वाटी, गूळ अर्धी वाटी, चॉकलेट ग्रॅन्युल्स १ वाटी, चॉकलेटचे मोठे बार २ नग, तूप ४ चमचे.
कृती : पोळ्या मिक्‍सरमध्ये बारीक करून घ्या. त्यामध्ये गूळ, तूप, सुका मेवा घालून घालून मिश्रण एकत्र करा. सर्वांत शेवटी चॉकलेट ग्रॅन्युल्स घालून छोटे-छोटे लाडू वळा. चॉकलेट सॉस थोडं कोमट करून त्यामध्ये हे लाडू बुडवून साखरेवर घोळवा. फ्रीजमध्ये थंड करून खायला द्या.

चॉकलेट पुडिंग
साहित्य : कोको पावडर १ कप, साखर पाव कप, अंडं १ नग, कॉर्नस्टार्च २ चमचे, मीठ चिमूटभर, दूध २ कप, चॉकलेट चिप्स पाव वाटी, फ्रेश क्रीम १ कप, किसलेलं चॉकलेट पाव वाटी.
कृती : सर्वप्रथम पाव कप साखर, १ कप कोको पावडर, १ अंडं, २ चमचे कॉर्नस्टार्च, चिमूटभर मीठ, एकत्र करून त्यात २ कप दूध घाला. नंतर डबल बॉलिंग पद्धतीनं गरम करा. गरम करतानाच त्यामध्ये पाव वाटी चॉकलेट चिप्ससुद्धा घाला. त्यानंतर हे मिश्रण थोडं थंड झाल्यावर त्यामध्ये १ कप फ्रेश क्रीम घाला. मिश्रण एकत्र करून एका भांड्यामध्ये सेट होण्याकरता ठेवा. फ्रीजमध्ये तासभर ठेवून सर्व्ह करतेवेळी वरून किसलेलं चॉकलेट घाला.

चॉकलेट आईस्क्रीम सिझलर
साहित्य : चॉकलेट ब्राउनीचा पातळ पीस १ नग, अननस स्लाईस १ नग, बदाम, काजूचे तुकडे ४ चमचे, चॉकलेट सॉस १ कप, व्हॅनिला आईस्क्रीम १ स्कूप, सिझलर प्लेट १ नग.
कृती : सिझलर प्लेट चांगली गरम करून घ्या. त्यावर प्रथम अननसाचा तुकडा त्यावर चॉकलेट ब्राउनीचा तुकडा वर आईस्क्रीमचा स्कूप, भाजलेले बदाम-पिस्त्याचे काप घाला आणि वरून चॉकलेट सॉस घालून सर्व्ह करा.

चॉकलेट ब्राउनी
साहित्य : मैदा अर्धा कप, कोको पावडर पाव कप, बेकिंग पावडर पाव चमचा, मीठ पाव चमचा, साखर १ कप, बटर किंवा मार्गारीन अर्धा कप, अंडी २ नग.
कृती : ओव्हन ३५०० फॅ. गरम करा. ९ इंचाचा बेकिंग टे ग्रिस करून घ्या. बटरमध्ये साखर, अंडी मिसळून मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करा. नंतर मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र करून चाळून घ्या. यात वर तयार केलेलं मिश्रण मिसळा. तयार झालेलं मिश्रण बेकिंग ट्रेमध्ये टाकून बेक करा. १८०० फॅ. वर २५ मिनिटं.

चॉकलेट डोसा
साहित्य : मैदा दीड वाट्या, कोको पावडर अर्धी वाटी, साखर अर्धी वाटी, बेकिंग पावडर अर्धा चमचा, मीठ चिमूटभर, आईस्क्रीम स्लॅब १, व्हेजिटेबल ऑईल १ चमचा, चॉकलेट ग्रॅन्युल्स २ चमचे (किंवा बदामाचे तुकडे), मध १ चमचा, बटर १ चमचा.
कृती : सर्वप्रथम मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, तेल, साखर आणि मीठ एकत्र करून दुधानं भिजवून घ्यावं. डोशाच्या पिठाइतपत घट्ट भिजवा. नंतर नॉनस्टिक तव्यावर या मिश्रणाचा व्यवस्थित डोसा बनवा. वरून थोडं बटर घाला. डोसा कडक झाल्यावर प्लेटमध्ये काढून मधोमध आईस्क्रीमची स्लॅब टाका. त्यावर चॉकलेट ग्रॅन्युल्स, सुका मेवा घालून डोसा, मसाला डोशाप्रमाणं रोल करावा. वरून मध किंवा चॉकलेट सॉस घालून लगेच सर्व्ह करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com