टेस्टी ‘सॅंडविच’ (विष्णू मनोहर) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vishnu manohar

टेस्टी ‘सॅंडविच’ (विष्णू मनोहर)

सॅंडविच हा पदार्थ खरं तर अपघातानं तयार झाला. मात्र, आज हा पदार्थ जगभरातल्या खवय्यांच्या पसंतीला उतरला आहे. ब्रेडच्या दोन स्लायसेसमध्ये ‘स्टफ’ केलेले जिन्नस एवढंच त्याचं स्वरूप राहिलेलं नाही. अक्षरशः त्याची कित्येक रूपं जगभरात तयार झाली आहेत. ब्रेकफास्टपासून जेवणापर्यंत साथ करणारा हा पदार्थ. तो आता फक्त ब्रेडपुरताही मर्यादित राहिलेला नाही. ढोकळ्यापासून मिठाईपर्यंत अनेक ठिकाणी ‘सॅंडविच’ दिसतात. या आगळ्यावेगळ्या पदार्थाचा हा लज्जतदार प्रवास.

जगात काही पदार्थ असे आहेत, की ते पदार्थ निर्माण होण्यामागं काहीतरी घटना/अपघात असतात किंवा त्यची मुद्दाम निर्मिती केली जाते. अशी बरीच उदाहरणं देता येतील; पण अशा प्रकारात मोडणारा आणि सर्वांचा आवडता व सोपा प्रकार म्हणजेच ‘सॅंडविच.’

सॅंडविच हा शब्द उच्चारल्यावर लगेच आपल्या डोळ्यासमोर दोन पावांच्यामध्ये भरलेले काही जिन्नस येतात, आणि कालांतरानं सॅंडविच या शब्दाला आपण आपापल्या पद्धतीनं अर्थ देऊ लागलो. उदाहरणार्थ, दोन ट्रकच्यामध्ये एखादी गाडी अडकली त्याला आपण म्हणतो : ‘अरे! त्या गाडीचं तर पार सॅंडविच होऊन गेलं.’ त्याचप्रमाणं दोन व्यक्तींचा वाद सोडवण्यात जी व्यक्ती असते, ती व्यक्तीसुद्धा कधीकधी रागानं बोलून जाते- ‘अरे! यार या दोघांमध्ये माझं तर सॅंडविच झालं.’ अशी बरीच उदाहरणं पाहायला मिळतील; पण ‘सॅंडविच’ हे ब्रिटनमधल्या एका शहराचं नाव आहे. या शहराशी संबंधित दोन गोष्टी आहेत, की त्या घटनेमुळं ‘सॅंडविच’ तयार झालं असं म्हणतात.

पहिली घटना अशी : सॅंडविच शहरात एक पत्ते खेळणारा मनुष्य होता, पत्ते खेळताखेळता त्याला खायला आवडायचं; पण पत्त्याचं व्यसन इतकं होतं, की त्याला बसून जेवायला वेळ पुरत नसे. गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हणतात. या महाशयाला हात खराब न होता तो पदार्थ खाता यावा, अशा एका पदार्थांची गरज होती. म्हणून त्यानं ब्रेडवर काही चिरलेल्या भाज्या ठेवल्या. त्याला चव यावी म्हणून त्यावर टोमॅटो सॉस घातला आणि हे सर्व जिन्नस खाली पडू नयेत, म्हणून त्यावर दुसरा ब्रेडचा तुकडा ठेवला आणि झालं! इथून त्याचं पत्ते खळणं आणि जेवण एकत्र होऊ लागलं. मग या पदार्थाला नाव काय द्यावं, असा प्रश्न पडला, तेव्हा त्यांनी सरळ आपल्या शहराचं नाव दिलं- ‘सॅंडविच.’

अशीच एक दुसरी दंतकथा वाचण्यात आली होती ती अशी : सॅंडविच या शहरातला एक मनुष्य जवळच्या शहरात गेला असताना दिवसभर काम करून थकल्यावर त्याला खूप भूक लागली होती. तो धावत बाजारात गेला. बघतो तर काय- सर्व रेस्टॉरंट्स बंद झालेली. एक रेस्टॉरंट कसंबसं बंद होताहोता त्याला दिसलं. त्यानं त्या मालकाला विनंती केली, की काहीतरी खायला द्या; पण रेस्टॉरंटमध्ये काहीच नाही, असं मालकानं सांगितलं. शेवटी त्यानं म्हटलं, की ‘अहो, एखादा पावाचा तुकडा तर असेल!’ रेस्टॉरंट मालकानं पावाचा तुकडा देताना नुसताच काय द्यायचा, म्हणून त्यात भाजलेले मांसाचे दोन-तीन तुकडे टाकून तो पाव त्याला दिला. त्या व्यक्तीनं तो पाव तसाच खाल्ला, त्याला त्याची चव आवडली आणि तो परत आपल्या शहरात आला. दुसऱ्या दिवशी त्याला पुन्हा त्याच शहरात काम होतं. तो त्याच रेस्टॉरंटमध्ये गेला आणि मालकाला म्हणू लागला : ‘कालच्यासारखाच पदार्थ बनवून द्या!’ मालकालाही कौतुक वाटलं. त्यानं आनंदानं पावाच्यामध्ये मांसाचा तुकडा भरून ते चविष्ट व्हावं म्हणून त्याबरोबर कच्चे टोमॅटो, कांदे, काही चटण्या आणि सॅलड भरून त्याला दिलं. पहिल्या दिवशीपेक्षा त्या व्यक्तीला हा पदार्थ जास्त चविष्ट लागला. बिल देताना मालकां त्याला सहजच विचारलं : ‘कुठून आला?’ त्यानं ‘सॅंडवीच’ या शहराचं नाव सांगितलं. पुन्हा दोन-तीन दिवसांनी हा मनुष्य त्या शहरात आला असताना त्याच रेस्टॉरंटमध्ये गेला आणि तोच पदार्थ त्यानं मागितला. मालकानं पुन्हा हसतहसत तो पदार्थ बनवून दिला आणि देताना सांगितलं, की तुम्ही गेल्यानंतर हा पदार्थ आम्ही बऱ्याच लोकांना दिला, त्यांना तो आवडला आणि कौतुकानं आम्ही तुमच्या शहराचं नाव या पदार्थाला दिलं. अशा प्रकारे ‘सॅंडविच’चा जन्म झाला.

कालांतरानं लोकांनी सॅंडविचवर वेगवेगळे प्रयोग केले. त्यात बटर, लोणी आणि चीज आलं, वेगवेगळ्या भाज्या, मांस अशा प्रकारचे जिन्नस त्यामध्ये टाकून त्याची चव वाढवण्यात आली. काही लोकांनी हे सर्व जिन्नस ब्रेडमध्ये भरून त्याला भाजलं आणि ‘ग्रिल्ड सॅंडविच’ नावाचा वेगळा आविष्कार तयार झाला. नंतर त्याला समांतर अशा बऱ्याच पदार्थांची निर्मिती होऊ लागली. इसवीसन १७६० च्या दरम्यान बर्गरची निर्मिती झाली असं म्हणतात. पुढं ते सन १९५५ नंतर मॅक्डोनाल्डच्या प्रयत्नानं लोकप्रिय झालं. साधारण १० वर्षांनी म्हणजे सन १९६५ मध्ये ‘सब-वे सॅंडविच’ नावाचा प्रकार सुरू झाला. त्यामध्ये लांबट अशा पावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या आवडीचे सॉसेस, भाज्या, नॉनव्हेज घालून सॅंडविच बाजारात आली. आतातर संपूर्ण जगात ब्रेकफास्टला, लंचला लोक सॅंडविच मोठ्या प्रमाणात आनंदानं खातात. ‘काठीरोल’ हा यातलाच एक प्रकार म्हणता येईल आणि मी तर म्हणीन, की लोणचं-पोळीचा रोल हासुद्धा सॅंडविचचा एक प्रकार आहे. त्याचबरोबर अजून काही वेगळी नावं घ्यावी लागतील- उदाहरणार्थ, सॅंडविच ढोकळा, सॅंडविच मिठाई इत्यादी.
काही पदार्थ मीही तयार केले. उदाहरणार्थ, ‘इंडियन कॉटेज सॅंडविच’ म्हणजेच भाकरीला मधून कापून आतमध्ये हिरवी चटणी आणि लोणी लावून, मध्ये कांद्याच्या चकत्या आणि झुणका भरून खायला देणं. तर अशी ही सॅंडवीचची गोष्ट. ती पुढं कशी वाढेल, हे मी आत्ता सांगू शकत नाही.

रोल सॅंडविच
साहित्य : न कापलेला ब्राऊन ब्रेड १ नग, हिरवी चटणी अर्धी वाटी, आलं-लसूण पेस्ट २ चमचे, पालकाची पानं ३-४, पानकोबीची पानं ३-४, चाट मसाला चवीनुसार, टोमॅटो सॉस २ चमचे.
कृती : यासाठी न कापलेला ब्रेड घेऊन त्याच्या लांब स्लाईसेस कापा व त्याच्या दोन बाजूच्या लांब कडा कापून ठेवा. हिरवी चटणी, कोथिंबीर, आलं-लसूणची पेस्ट लावा. नंतर टोमॅटो सॉस, पानकोबी आणि पालकाची पानं घालून त्याचा रोल करा. नंतर त्याचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवा. खायच्या वेळी ८-१० मिनिटं बेक करून चाट मसाला घालून खायला द्या.

चीजी टोस्ट सॅंडविच
साहित्य : ब्रेड स्लाईस ४-५, उकडलेले बटाटे २, टोमॅटो १, काकडी १, चीज क्‍युब पाव वाटी, मीठ चवीनुसार, मिरपूड अर्धा चमचा, बटर २ चमचे, टोमॅटो सॉस ४ चमचे.
कृती : एका ब्रेड स्लाईसवर उकडलेल्या बटाट्याची एक चकती, टोमॅटोची एक चकती आणि काकडीचा एक चकती ठेवावी. नंतर त्यावर एक चीजचा चौकोनी तुकडा ठेवावा. चीज ठेवण्यापूर्वी आवडीप्रमाणं मीठ आणि मिरपूड भुरभुरावी. वरून ब्रेडचा दुसरी स्लाईस ठेवून थोडं बटर लावावं आणि हे सॅंडविच टोस्टरमध्ये ठेवून खरपूस भाजावं. नंतर बाहेर काढून त्याचे दोन भाग करून सॉसबरोबर खायला द्यावं.

रोस्टेड चिकन खिमा सॅंडविच
साहित्य : चिकनचे मोठे ब्रेस्ट पीस ४ नग, खिमा १ पाव, अंडी ४ नग, आलं-लसूण पेस्ट २ चमचे, हळद, तिखट, मीठ चवीनुसार, कॉर्नस्टार्च ४ चमचे, गरम मसाला १ चमचा.
कृती : सर्वप्रथम चिकनच्या ब्रेस्ट पीसना काप मारून मीठ आणि लिंबू चोळून ठेवा. अंडी फेटून त्यात कॉर्नस्टार्च, चवीनुसार मीठ घालून मिश्रण बनवून ठेवा. हळद आणि मीठ घालून खिमा शिजवून घ्या. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घेऊन गरम झाल्यावर त्यात आलं-लसूण पेस्ट परतून खिमा घाला, चवीनुसार हळद, तिखट मीठ आणि गरम मसाला घाला. नंतर हे मिश्रण चिकनच्या ब्रेस्ट पीसवर पसरवून त्यावर दुसरा पीस ठेवा आणि असं तयार केलेलं चिकन सॅंडविच अंड्याच्या द्रावणात बुडवून त्यांना तव्यावर ठेवून मंद आचेवर शॅलोफ्राय करा.

क्रिस्पी एग सॅंडविच
साहित्य : अंडी ४ नग, आलं-लसूण पेस्ट ४ चमचे, बेसन ४ चमचे, आमचूर पावडर १ चमचा, हळद, तिखट चवीनुसार, धने-जीरे पावडर १-१ चमचा, चाट मसाला १ चमचा, कॉर्नस्टार्च अर्धी वाटी, मैदा अर्धी वाटी, ब्रेड क्रम्स १ वाटी.
कृती : सर्वप्रथम अंड्याचं जाड ऑम्लेट बनवून घ्या. त्याचे चौकोनी तुकडे करा. एका पॅनमध्ये आलं-लसूण फोडणीला घालून त्यामध्ये बेसन, आमचूर पावडर, हळद, तिखट, धने-जीरे पावडर, चाट मसाला एकत्र करून मसाला बनवा. दोन ऑम्लेटच्या चकत्यांच्या मधोमध हा मसाला, त्यावर एक कांद्याची स्लाईस आणि त्यावर दुसरा ऑम्लेटचा तुकडा ठेवून दाबा. नंतर असं तयार सॅंडविच कॉर्नस्टार्च आणि मैद्याच्या मिश्रणात बुडवून, नंतर ते ब्रेड क्रम्सवर घोळवून डीप फ्राय करा.