स्वागत नव्या पुस्तकांचं

प्रतिनिधी
Sunday, 6 September 2020

जगात आतापर्यंत झालेल्या दोन महायुद्धांनी इतिहास रचला आणि भूगोलही बदलला. यापैकी दुसऱ्या महायुद्धाचा तपशीलवार आढावा किरण गोखले यांनी या पुस्तकात घेतलाय. या युद्धात ३० राष्ट्रं सहभागी झाली होती. हे युद्ध जगात विविध भूभागांवर लढलं गेलं,

दुसरे महायुद्ध
जगात आतापर्यंत झालेल्या दोन महायुद्धांनी इतिहास रचला आणि भूगोलही बदलला. यापैकी दुसऱ्या महायुद्धाचा तपशीलवार आढावा किरण गोखले यांनी या पुस्तकात घेतलाय. या युद्धात ३० राष्ट्रं सहभागी झाली होती. हे युद्ध जगात विविध भूभागांवर लढलं गेलं, अनेक सैनिक यात मृत्युमुखी पडले. समुद्र, जमीन आणि आकाश अशा तिन्ही ठिकाणी लढल्या गेलेल्या या युद्धात अनेक राष्ट्रांचं नुकसान झालं. जर्मनी, इटली, अमेरिका, इंग्लंड, रशिया या राष्ट्रांची या युद्धादरम्यानची भूमिका, त्या काळातील विविध नेत्यांची भूमिका या सगळ्याचा वेध किरण गोखले यांनी या पुस्तकात घेतला आहे. केवळ माहिती न देता त्यांनी त्या काळातील घटनांचं मार्मिक विश्लेषण केलंय. विशेष बाब म्हणजे, पहिल्या महायुद्धाचं विश्लेषण करणाऱ्या पुस्तकाचं लेखन त्यांचे वडील दि. वि. गोखले यांनी केलं होतं. दुसऱ्या महायुद्धाचं विश्लेषण किरण गोखले यांनी करून वेगळा योग जुळवून आणलाय. प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस, मुंबई (०२२ - २३८२६२२५, २३८७३५०२)
पृष्ठं : ४५६, मूल्य : ५०० रुपये

कार्पोरेटला रामराम, शेतीला सलाम
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात उच्चपदावर नोकरी करत असलेल्या वेंकट अय्यर यांनी नोकरी सोडून शेतकरी व्हायचा निर्णय घेतला. मुंबईसारख्या महानगरातून ते पालघर जिल्ह्यातील एका छोट्या खेड्यात राहायला गेले. शेतकरी होण्यासाठी त्यांना अनेक कागदपत्रं सादर करावी लागली. शासकीय नियम आणि तिथल्या कर्मचाऱ्यांची मानसिकता, त्यांची कार्यपद्धती... या सगळ्यांचा त्यांना सामना करावा लागला. शेतीत नवनवीन प्रयोग करताना विविध स्वरूपांचे अनुभव आले. आपण उत्पादित केलेल्या धान्य आणि भाजीपाल्याला भाव कसा कमी मिळतो, याचा अनुभव त्यांना आला. शेतातच राहत असल्यानं प्राणी सांभाळणं, अन्य प्राण्यांचा वावर, यामुळं त्यांना एका वेगळ्याच जगाचा अनुभव आला. अय्यर यांनी हे सगळे अनुभव या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत. दीपक कुलकर्णी यांनी मूळ 'मूंग ओव्हर मायक्रोचिप्स' या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे.
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे (०२० - २४४७६९२४, २४४६०३१३) पृष्ठं : १९८, मूल्य : २९५ रुपये

कृष्णाकाठ ते पवनाकाठ
पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के यांचं हे आत्मचरित्र. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी गावात शिवाजीराव यांचा जन्म झाला. सँडविक एशिया लिमिटेड या कंपनीत त्यांनी ३५ वर्षं नोकरी केली. पवना नदीच्या परिसरात पिंपरीत त्यांनी विविध उपक्रम राबविले. ११ वर्षं त्यांनी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून काम केलं. नोकरीत असताना गुणवंत कामगार हा सन्मानही त्यांना मिळाला. हे सारं करत असतानाच त्यांनी ‘पवनेचा प्रवाह’ हे साप्ताहिक सुरू केलं. पत्रकार म्हणून काम करताना सामान्यांचे प्रश्न मांडले, तसंच काही पुस्तकांचं लेखन केलं. ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या ‘फेस्कॉम' या संघटनेचे पदाधिकारी म्हणूनही काम केलं. आपल्या जन्मगावाचा विकास करण्यासाठी त्यांनी पसरणी विकास मंडळाची स्थापना करून सामाजिक कामही केलं.
प्रकाशक : प्रवीण प्रकाशन, फुगेवाडी, पुणे (९९६०१५६३७८)
पृष्ठं : २८०, मूल्य : ३०० रुपये

कधी बहर कधी शिशिर
ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांच्या ललित लेखांचा हा संग्रह. यामध्ये दै. 'सकाळ'मध्ये लिहिलेल्या लेखमालेचा, तसंच अन्य नियतकालिकांत लिहिलेल्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे. सृष्टिचक्रात कधी बहराचा कालखंड असतो, तर काही वेळा पानगळीचीही वेळ असते. जीवनातील या दोन्ही अवस्थांकडं तुम्ही कसं पाहता, यावर बरंच काही अवलंबून असतं. लेखिका इथं आयुष्यात येणाऱ्या विविध अनुभवांबद्दल आणि मनुष्यस्वभावाबद्दल भाष्य करत महत्त्वाच्या बाबींकडं लक्ष वेधतात. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अनेक गोष्टींवर लेखिकेनं आपली मतं व्यक्त केली आहेत. इथं केवळ मार्गदर्शन करण्याचा आव आणलेला नाही. विनोदी पद्धतीनं एखाद्या समस्येकडं पाहताना मार्गदर्शन करणारं असं हे लेखन व त्यात अंतर्मुख करायला लावणारे विचार मांडले आहेत.
प्रकाशक : नावीन्य प्रकाशन, पुणे (९८२२९३९४४६)
पृष्ठं : १७६, मूल्य : २२० रुपये

खरी कमाई
माजी जिल्हाधिकारी मधुसूदन साळवी यांचं हे आत्मचरित्र. साळवी यांनी राज्यात विविध भागांत वेगवेगळ्या पदांवर काम केलं. सरकारी नोकरी करतानाही त्यांनी सामाजिक बांधिलकी सोडली नव्हती. कोकणचे भूमिपुत्र असलेल्या साळवी यांनी आपल्या नोकरीच्या शेवटच्या टप्प्यात रत्नागिरीत जिल्हाधिकारी म्हणून काम केलं. एन्रॉनसारख्या मोठ्या प्रकल्पांसाठीचं काम मार्गी लागण्यासाठी एक सरकारी अधिकारी म्हणून त्यांनी मोठी कामगिरी बजावली. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कसा खुबीनं मार्ग काढावा लागतो, त्याचे काही अनुभव इथं दिले आहेत. मोर्चाला सामोरं जाण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना राजी करणं, तसंच मोर्चेकऱ्यांची समजूत घालणं... यांसारखी उदाहरणं त्यांनी सांगितली आहेत. प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन, पुणे (०२० - २५५३७९५८, २५५३२४७९)
पृष्ठं : १९२, मूल्य : २५० रुपये

कथा उर्वशीची
स्वर्गात अप्सरा असतात आणि त्या इंद्रदेवांच्या सेवेत असतात, अशी समजूत आहे. इंद्रलोकी असलेल्या अनेक अप्सरांपैकी एक म्हणजे उर्वशी. सर्व अप्सरांमध्ये सर्वांत सुंदर असलेली ही अप्सरा नारायणमुनींची कन्या. ऋग्वेदापासून अनेक ग्रंथांमध्ये हिचा उल्लेख येतो. वेगवेगळ्या ग्रंथांतील आणि पुराणकथांमधील संदर्भांचा वेध घेऊन डॉ. लिली जोशी यांनी इथं या अप्सरेची सारी कथा सांगितली आहे. तिला मिळालेले शाप, उ:शाप, त्यामुळं तिला पृथ्वीवर घ्यावा लागलेला जन्म... हे सारं यातून कळतं. या पुस्तकात त्यांनी जी दोन परिशिष्टं दिली आहेत, त्यांतून अप्सरा, त्यांचं आयुष्य या सगळ्यांकडं कसं पाहावं याची माहिती मिळते. प्रकाशक : ज्ञानगंगा प्रकाशन, पुणे (०२० - २४४९७९५१, २४४८७६२९)
पृष्ठं : ९०, मूल्य : १२५ रुपये

हटके भटके
सकस आणि नावीन्यपूर्ण विषयांवर लेखन करणारी व्यक्ती म्हणजे निरंजन घाटे. ‘अनुभव’ मासिकात त्यांनी अज्ञाताचा शोध घेत फिरणाऱ्या अवलियांवर एक लेखमाला लिहिली. या लेखमालेत काही लेखांची भर घालून हे पुस्तक तयार करण्यात आलं आहे. या पुस्तकातून १७ व्यक्तींची ओळख होते. वेगवेगळ्या क्षेत्रांत संशोधन करणाऱ्या या ज्ञानवंतांनी आपलं सारं आयुष्य संशोधनासाठी कसं समर्पित केलं होतं, त्याची माहिती यातल्या लेखांमधून मिळते. हनुमानानं लक्ष्मणासाठी द्रोणगिरी पर्वत उचलून आणला, ही कथा आपण वाचतो. मात्र, इंग्लंडमधील ॲन मुस्टो ही महिला इंग्लंडमधून भारतात येते आणि रामायणाचा अभ्यास करून भारत ते श्रीलंका असा प्रवास सायकलवरून करते. अमेरिकेतील मिशी शरण ही महिला अशीच वेगळी. चीनमधील बौद्ध भिक्खू ह्यूएन त्संग यांनी भारत ते चीन दरम्यान तेराशे वर्षांपूर्वी जो प्रवास केला, तसा प्रवास मिशी शरण करतात. या पुस्तकातील ही दोन उदाहरणं. अशीच वेगळ्या वाटेनं जाणारी ही विलक्षण मंडळी आणि त्यांचं विलक्षण आयुष्य घाटे रंजक शैलीत सांगतात आणि त्यांच्या अफाट कर्तृत्वाची ओळख करून देतात. प्रकाशक : समकालीन प्रकाशन, पुणे (०२० - २४४७०८९६)
पृष्ठं : १८४, मूल्य : २५० रुपये

दत्तू द रोईंग मॅन
ऑलिंम्पिक स्पर्धेत रोईंग या खेळातून भारताचं प्रतिनिधित्व करणारा दत्तू भोकनळ हा साधा सरळ तरुण. घरची गरीबी. तळेगाव रोही या गावात दुष्काळाची परिस्थिती, पण दत्तू हरला नाही. त्यानं उभारी धरली. त्यानं लष्करात प्रवेश केला. तिथं त्याच्यातले गुण बघून त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याचं नाव रोईंग या क्रीडाप्रकारासाठी सुचवलं. त्यानंतर दत्तूनं मागं वळून पाहल नाही. अफाट मेहनत आणि लक्ष्य गाठण्यासाठी योग्य तो सराव करून त्यांनं देशाला सुवर्णपदक मिळवून दिल. त्याचा हा स्फूर्तीदायी प्रवास डॉ. संतोष खेडलेकर यांनी या पुस्तकात मांडला आहे. प्रकाशक : गीता परिवार, संगमनेर (०२४२५-२२५०११)पृष्ठं : १५२ मूल्य : १५० रुपये.

पांडुरंग आगळा
पुण्यातील आयुर्वेदीक डॉक्टर पां. ह. कुलकर्णी यांच्या आयुष्याचा विविध घटनांचा आलेख या पुस्तकात अनघा ठोंबरे यांनी रेखाटला आहे. कुलकर्णी यांनी आजपर्यत केलेलं संशोधन, तसेच आयुर्वेद लोकप्रिय होण्यासाठी केलेले प्रयत्न यातून कळतात. या पुस्तकात डॉक्टरांच्या विविध कामाची कल्पना येईल असे लेख आहेतच पण डॉक्टरांची सविस्तर मुलाखत देखील आहे. त्याचरोबर त्यांना आजपर्यंत मिळालेले विविध पुरस्कार, सन्मान याचीही माहिती मिळते. डॉक्टरांनी केलेल्या कविता इथं वाचायला मिळतात. तसंच त्यांनी ज्या संस्थाचं व्यवस्थापन केलं, या संस्था कशा मोठ्या केल्या, त्यामागचे त्यांचे किती कष्ट आहेत ते लक्षात येतं. प्रकाशक : दीर्घायू इंटरनॅशनल, पुणे (०२०-२५३८२१३०) पृष्ठं : १९२ मूल्य : ३०० रुपये.

कोरोनाच्या कृष्णछायेत
कोरोना या महाभयंकर साथीचा प्रसार वेगानं संपूर्ण जगभर झाला. कुणालाच काही कळेनासं झालं. वैद्यकशास्त्रातली आजपर्यतची गृहितकं या आजारासमोर कोलमडून पडली. जगात या रोगाविरुद्ध लढण्यासाठी वेगवेगळे उपायय केले गेले. लॉकडाऊन, मास्क आणि योग्य ते अंतर राखून संचार करणं याला खूपच महत्व आलं. या सगळ्या प्रचंड घडामोडीच्या काळाचा वेध घेणारं आणि या साथीच्या रोगाचा शास्त्रीय विचार करून तशी माहिती देणारं हे पुस्तक. डॉ. मृदुला बेळे या औषधनिर्माण शास्त्रातल्या पीएचडी आहेत. त्यांनी या रोगाची सुरवात कुठून झाली, त्याची व्याप्ती कशी वाढली. या रोगावर मात करण्यासाठी जगात कुठे कुठे कसे प्रयत्न सुरू आहेत याची तपशीलवार माहिती दिली आहे. कोरोनानंतर सगळीच समीकरणं कशी बदलणार आहेत याचीही कल्पना हे पुस्तक वाचल्यावर येते. प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे (०२०- २४४७३४५९) पृष्ठं : २५० मूल्य : ३०० रुपये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang welcome new book