मुकाबला अदृश्‍य शत्रूशी (योगिराज प्रभुणे)

yogiraj prabhune
yogiraj prabhune

कोरोनामुळं जगभरातील लाखो निरपराध माणसांचा जीव गेलाय. रोजच्या रोज लाखोंना संसर्ग होतोय आणि हजारो निष्प्राण होताहेत. एकाच आजारानं जाणारे लक्षावधी प्राण वाचविण्यासाठी कुणाकडं ना रामबाण औषध आहे, ना कोणतं तंत्र. या अदृश्‍य शत्रूला नामोहरम करण्याचं एकमेव प्रभावी अस्त्र आता मानवाकडं उरलयं, ते म्हणजे प्रतिबंधक लस. ती कधी येईल, याकडं अवघ्या मानवजातीचं लक्ष लागलंय.

विषाणूंच्या एका समूहाला दिलेलं नाव म्हणजे कोरोना. आपल्याला होणारा साधा सर्दी-खोकला याच समूहातील वेगवेगळ्या विषाणूंमुळंच होतो. जगभरात यापूर्वी उद्रेक झालेला ‘सार्स’ असो की ‘मार्स’, हे याच समूहातील प्राणघातक विषाणू. मात्र, गेल्या वर्षीच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये चीनमधील वुहान शहरात कोरोना विषाणूंचा पहिला उद्रेक झाला. वुहानमध्ये आढळलेला विषाणू या समूहातला असला, तरीही तो यापूर्वीच्या विषाणूंपेक्षा वेगळा होता. तो या समूहातील नवीन विषाणू असल्याचं स्पष्ट दिसलं. त्यामुळं या नव्या प्रकारच्या विषाणूला ‘नॉवेल कोरोना व्हायरस’ (कोविड १९) असं नाव मिळालं. आधुनिक काळात अवघं जग हे ‘ग्लोबल व्हिलेज' झालंय. दळणवळणाच्या सुविधा वाढल्या आहेत. त्यामुळं एका देशातून दुसऱ्या देशात सहजतेनं प्रवास करता येतो. यातूनच हा विषाणूंचा फैलाव एका देशातून दुसऱ्या देशात आणि एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रचंड वेगानं झाल्याचं आपण पाहत आहोत.

प्राणघातक अशा साथीच्या रोगाचे असंख्य उद्रेक आपल्या देशानं, महाराष्ट्रानं अनुभवले आहेत. प्लेग, पटकी, देवी अशा साथीच्या रोगांनी घातलेल्या थैमानाचे पुण्यासह अनेक शहरं साक्षीदार आहेत. इतकंच काय, पण गेल्या दहा-अकरा वर्षांपूर्वी आलेल्या स्वाइन फ्लू (एच - १ एन- १)ची साथही आपल्यापैकी बहुसंख्य जणांनी पाहिली. मग, या कोरोनाचं वेगळेपण काय? यापूर्वीच्या साथी तीन-चार महिने थैमान घालायच्या आणि नंतर कमी व्हायच्या. पुन्हा काही महिन्यांनी डोकं वर काढायच्या आणि त्यानंतर उद्रेक कमी होत जायचा. पण, कोरोना आतापर्यंतच्या साथींच्या उद्रेकाला अपवाद ठरतोय. तो कमी होत नाही, उलट वाढत आहे. महाराष्ट्रात सलग सहा महिने कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचं निदान होत आहे. किंबहुना, तो त्याचं आणखी अक्राळ-विक्राळ रूप समोर आणतोय. त्यावर परिणामकारक औषध सध्या नाही. त्याच्या संसर्गाला प्रतिबंध करता येईल, अशी लसही उपलब्ध नाही. अशा निःशस्त्र अवस्थेत त्या अदृश्‍य शत्रूशी जगातला प्रत्येक माणूस आज रोज लढतोय. कोरोनाचा उद्रेक अद्यापही नियंत्रणात आलेला नाही. या संसर्गाच्या भीतीनं देशातील असंख्य कुटुंबांचा थरकाप उडालाय. कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांचा शोक हृदय पिळवटून टाकणारा आहे. सायरन वाजवत रस्त्यांवरून सुसाट वेगानं धावणाऱ्या रुग्णवाहिका, जीवरक्षक इंजेक्‍शनसाठी दिवस-रात्र होणारी धावपळ, एकेका बेडसाठी रुग्णालयाच्या दाराशी लागलेल्या लांबच लांब रांगा, ऑक्‍सिजन बेड आणि व्हेंटिलेटर मिळण्यासाठी अक्षरशः कंठाशी आलेला प्राण, अशा मन सुन्न करणाऱ्या स्थितीतून महाराष्ट्र सध्या जातोय. विशेषतः पुण्या-मुंबईमध्ये तर हे चित्र अधिकच विदारक दिसतं. न भूतो न भविष्यती असं संकट राज्यासह देशावर कोसळलंय. हा निसर्गातील एखादा नवीन जीव आहे, की शत्रुराष्ट्रानं जैविक अस्त्राचा केलेला हल्ला आहे, हे कळेल त्या वेळी कळेल. पण, सध्या तरी कोरोनापासून संरक्षणाची हमी देणारं एखादं अस्त्र तातडीनं हवंय आणि ते म्हणजे कोरोना प्रतिबंधक लस!

लस निर्माण कशी होते?
कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून प्रत्येकाचं लक्ष लशीकडं लागलंय. ही लस घेऊन आपण स्वतःला कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित करू शकतो, असा विश्‍वास सगळ्यांना वाटतो. मग प्रश्‍न पडतो, की आधुनिक काळात सुपर कॉम्प्युटर, आर्टिफिशल इंटेलिजंट असं अद्ययावत तंत्रज्ञान असूनही लस निर्माण करण्यासाठी इतका वेळ का लागतोय? या प्रश्‍नाचं उत्तर मानवी शरीरात दडलंय. रक्तातील पांढऱ्या पेशी या शरीरातील सैनिक असतात, असं आपण लहानपणापासून विज्ञानात शिकत आलोय. रोगप्रतिकारक शक्ती या पेशींमध्ये असते. या लशीत चक्क त्या रोगाचे जंतू असतात. हे जंतू म्हणजे जिवाणू किंवा विषाणू एकतर जिवंत पण अर्धमेले असतात, किंवा मृत असतात, किंवा विषारी गुणधर्म असलेले जिवंत स्वरूपातीलही असतात. या तीनपैकी कोणत्यातरी एका प्रकारानं लस तयार करतात. ही लस टोचल्यानंतर मानवी शरीरात त्या संबंधित आजाराच्या रोगजंतूंशी लढण्याची शक्ती निर्माण होते, त्यालाच लशीमुळं येणारी रोगप्रतिकार शक्ती म्हणतात. याचीच आपण सगळेजण उत्सुकतेनं वाट पाहत आहोत. काही प्रकारच्या लस इंजेक्‍शनद्वारे दिल्या जातात, तर काही नाक किंवा तोंडावाटेही देतात.
चार प्रमुख टप्प्यांतून लस निर्माण होते. प्रयोगशाळेत सुरुवातीला विषाणूंचा जनुकीय अभ्यास केला जातो. त्यानंतर उंदीर, ससा, माकड अशा प्राण्यांवर प्रयोग केला जातो. त्यानंतर प्रत्यक्ष माणसांवर प्रयोग होतो.

प्रतिकारशक्ती कशी कार्य करते?
लशीतून त्या संबंधित रोगाचे जंतू शरीरात प्रवेश करतात. शरीरात आलेल्या या जंतूंशी पांढऱ्या पेशी लढाई करतात. ही प्रक्रिया म्हणजे शरीरासाठी युद्ध सराव असतो. कारण, या लशींमध्ये सशक्त रोगजंतू नसतात, त्यामुळे प्रत्यक्ष रोग होत नाही. पण, रोगजंतूंचा प्रत्यक्ष हल्ला झाल्यानंतर त्यांच्याशी लढण्याची शरीराची तयारी होते. लशीतून शरीरात प्रतिपिंडं तयार होतात. रक्तात ‘टी लिम्फोसाइट्स' नावाच्या पेशी असतात, त्या या रोगजंतूंना लक्षात ठेवतात. त्यामुळं या लशीतून शरीरात "टी' पेशी सक्रिय होतात का, की फक्त प्रतिपिंडं मिळतील, यावर संशोधन सुरू आहे. आपल्याला कोरोना होऊन गेला, म्हणजे आता रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली, असा समज असतो. परत या विषाणूंच्या संसर्गाचा धोका नाही, असंही आपण बोलताना ऐकतो. पण, प्रत्यक्षात आता असं दिसून येतं, की शरीरात निर्माण झालेली प्रतिपिंडं (अँटिबॉडिज) तीन महिन्यांनी कमी होतात, त्यामुळं पुन्हा संसर्गाचा धोका वाढतो.

लस, भारत आणि जग
सध्या जगात ज्या कोरोना विषाणूंनी धुमाकूळ घातलाय, त्याच प्रकारच्या चार विषाणूंचा उद्रेक यापूर्वी झालेला. त्यांची बहुतांश लक्षणं या साथीसारखीच होती. त्यापैकी एकाही विषाणूला प्रतिबंध करणारी लस विकसित झाली नाही. पण, या कोरोनाचा जगभर उद्रेक सुरू आहे. त्याला नियंत्रित करण्यासाठी लस हा प्रभावी मार्ग असल्यानं वेगवेगळ्या देशांमध्ये याची चाचणी सुरू आहे.

कोरोनावरील तीन लशींच्या चाचण्या देशात सुरू असल्याचं स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. त्यातील पहिली लस भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडची कोव्हॅक्‍सिन ही आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषद (आयसीएमआर), भारतीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) यात सहभागी झाल्या आहेत. दुसरी लस ही झायडस कॅडिला हेल्थकेअरची आहे. ऑक्‍सफर्ड विद्यापीठाची तिसरी लस आहे. त्याची निर्मिती पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करत आहे. या प्रत्येक लशीच्या प्राण्यांवरील चाचण्या यशस्वी झाल्याची माहिती पुढं येते आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या देशातील चाचण्यांनाही गेल्या महिन्यात पुण्यातून सुरुवात झाली. "कोविशिल्ड' या लशीच्या ०.५ मिलिलिटरच्या पहिल्या डोसचं पहिलं इंजेक्‍शन पुण्यातील स्वयंसेवकांना टोचण्यात आलं. मधल्या काही काळात या मानवी चाचण्या थांबविण्यात आल्या असल्या, तरीही त्या आता पूर्ववत सुरू झाल्या आहेत. मानवी चाचण्यांच्या दुसऱ्या टप्प्यात सुरक्षितता तपासली जात आहे, तर तिसऱ्या टप्प्यात त्याची परिणामकारकता पाहिली जाणार आहे. या दोन्हींच्या निष्कर्षांनंतर नागरिकांसाठी ही लस प्रत्यक्षात उपलब्ध होईल. या वर्षाच्या शेवटी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला ही लस मिळेल, अशी अपेक्षा संशोधन क्षेत्रातले तज्ज्ञ व्यक्त करतात.
जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोना विषाणूंना प्रतिबंध करणाऱ्या लशींच्या चाचण्या सुरू आहेत. जागतिक पातळीवर लशीचा पहिला प्रयोग अमेरिकेत मार्चमध्ये झाला. तेथील मॉर्डना लशीची निर्मिती शेवटच्या टप्प्यात असल्याचं सांगण्यात येत आहे. सोनाफी आणि जीएसके या औषध निर्माण क्षेत्रातील कंपन्याही लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. जिथं या उद्रेकाची सुरुवात झाली, त्या चीनमधील कंपनीनंही लशीच्या संशोधनात आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियानंही यात प्रगती केली आहे.
रशियानं आता लस निर्माण केल्याचा दावा केला आहे. त्याचे काही डोस भारतालाही देणार असल्याचं आता रशियाकडून सांगण्यात येत आहे. ही लस कोणीही विकसित केली, तरीही कोरोनावर उपचार करणारे डॉक्‍टर, नर्स, तेथील कर्मचारी यांना प्रथम दिली जाणार, यात शंका नाही. दुसऱ्या टप्प्यात इतर आजारांच्या रुग्णांना आणि ज्येष्ठ नागरिकांना ही लस दिली जाईल. त्यानंतर सर्वसामान्यांसाठी ही लस उपलब्ध होईल. त्यामुळं लस उपलब्ध झाल्यानंतरही किमान पुढील सहा महिने स्वसंरक्षणासाठी मास्क, हँड सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचा वापर आपल्या करावाच लागेल, हे मात्र निश्‍चित!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com