चला, गोष्टी सांगू...गोष्टी ऐकू! (विद्या सुर्वे-बोरसे)

विद्या सुर्वे-बोरसे vidyasurve99@rediffmail.com
रविवार, 5 जानेवारी 2020

बालसाहित्य म्हणजे राजा-राणीची गोष्ट नाही निव्वळ. बालसाहित्य
म्हणजे कुणा एकाची ‘सक्सेस स्टोरी’ नाही फक्त. बालसाहित्य म्हणजे केवळ आनंददायी, ताल धरून नृत्य करता येतील अशी गाणी नाहीत केवळ वा ताला-सुरात म्हणता येतील अशा केवळ कविता म्हणजेही बालसाहित्य नव्हे. बालसाहित्य म्हणजे केवळ जादू अथवा गंमतजंमत अथवा विनोदही नव्हे....तर, आपल्या घरातल्या बालकांच्या मनात जे साठलेलं आणि दाटलेलं असतं तेही ‘बालसाहित्य’च असतं. अशाच बालसाहित्याविषयीचं ‘गुज’ ऐकू या साप्ताहिक सदरातून.

‘ओ बाबा, अगं आई’ असा धोषा लावत आपल्यामागं फिरणाऱ्या आपल्या मुलांचं सांगणं आपण कधी गंभीर होऊन ऐकलं आहे काय? ऐकलंच तर तुमच्या लक्षात येईल की त्यांच्याजवळ गोष्ट आहे. वयानं मोठे झालेले लोक जी गोष्ट पाहणं, ऐकणं, सांगणं विसरून गेलेले आहेत...अशी गोष्ट. अशी गोष्ट आहे त्यांच्याजवळ!

काही काही गोष्टी कधी कुणाला सांगताच येत नाहीत आपल्याला! सिद्धार्थला असं वाटून गेलं. त्यानं आईला काहीच सांगितलं नाही.
सिद्धार्थची गोष्ट त्याच्याजवळच राहिली. चंदाजवळही गोष्ट होती. तिची गोष्ट ऐकण्यासाठीही कुणाजवळच वेळ नव्हता. मैत्रिणीला गणित सोडवायचं होतं...आईला स्वयंपाक करायचा होता...आजीला टीव्हीवरील स्पेशल एपिसोड पाहायचा होता...दादाला मॅचचे हायलाईट्‌स बघायचे होते...बाबांना बातम्यांमध्ये स्वारस्य होतं...
पण चंदाच्या गोष्टीत मात्र कुणालाच उत्कंठा नव्हती! आणि सिद्धार्थ?
ज्यांच्याजवळ इतरांना समजून घेण्याची संवेदनशीलताच नाही अशा माणसांना सिद्धार्थ गोष्ट सांगू इच्छितच नव्हता.
***

कोण आहे हा सिद्धार्थ? कोण आहे चंदा? सांगायला गेलं तर स्वाती
राजे यांच्या गोष्टीच्या पुस्तकातल्या व्यक्तिरेखा आहेत त्या. आणि
अनुभवायला गेलं तर तुमच्या-माझ्या घरातल्या बालकांचीच रूपं आहेत
ही. तुमच्या-माझ्या घरातली सगळी अशी मुलं - ज्यांच्याजवळ
सांगण्यासारख्या पुष्कळ पुष्कळ गोष्टी आहेत आणि ती सांगू पाहत असलेल्या गोष्टी ऐकण्यासाठी घरातल्या मोठ्यांकडं जरासुद्धा वेळ नाही. ‘ओ बाबा, अगं आई’ असा धोषा लावत आपल्यामागं फिरणाऱ्या आपल्या मुलांचं सांगणं आपण कधी गंभीर होऊन ऐकलं आहे काय? ऐकलंच तर तुमच्या लक्षात येईल की
त्यांच्याजवळ गोष्ट आहे. वयानं मोठे झालेले लोक जी गोष्ट पाहणं, ऐकणं, सांगणं विसरून गेलेले आहेत...अशी गोष्ट. अशी गोष्ट आहे त्यांच्याजवळ!
***

सिद्धार्थच्या गोष्टीची सुरवात होते परीक्षेच्या निकालाच्या दिवशी.
डॅडींनी त्याला आणि ममीला पिक्चरला नेलं, नंतर चायनीज्‌ रेस्टॉरंटमध्ये डिनरला. नंतर ते आईस्क्रीमशॉपमध्ये गेले.
सिद्धार्थ म्हणाला : ‘‘चॉकोक्रीम आणा...नको चॉकोचिप्स घेऊन या.’’ मम्मी म्हणाली : ‘‘दोन्ही घेऊन या.’’
सिद्धार्थनं कारच्या खिडकीच्या काचेला नाक लावलं बाहेर पाहण्यासाठी आणि तो एकदम दचकला. त्याच्या नाकाजवळ एकदम एक चेहरा उगवला, त्याच्याएवढा. काळा. पुढ्यात एक मुलगा होता. त्याच्या अंगावर अर्धी पॅंट. हातातले फुगे हलवत तो काहीतरी म्हणाला. सिद्धार्थनं काच खाली केली.
‘‘फुगे घ्या ना!’’ मुलगा म्हणाला.
‘‘दहाला दोन...थोडेच राहिलेत.’’
ममी म्हणाली : ‘‘घरी गेल्या गेल्या फोडशील... पाच रुपये पाण्यात!’’
आईस्क्रीम घेऊन परतलेले डॅडी ओरडले : ‘‘काय रे, काय पाहिजे?नको, चल!’’
अर्ध्या पॅंटमधला मुलगा कारकडे, सिद्धार्थच्या हातातल्या
आईस्क्रीमच्या कोनाकडे आशाळभूत नजरेनं पाहत राहिला...
पुन्हा असंच घडलं...चार-सहा दिवसांनी...
रविवारी नीलचा वाढदिवस...पुन्हा आइस्क्रीम खाण्याची इच्छा...
पुन्हा सिद्धार्थला दिसला दुकानाच्या कडेला फुटपाथवर बसलेला मुलगा. त्यानं लाल फुगा ताणून धरलेला. बघता बघता फुगा फुगला, एकदम फटकन्‌ फुटला. अर्ध्या पॅंटमधल्या मुलानं वाईट वाटल्यासारखे डोळे मिटले. पुन्हा एक मोठ्ठा श्वास घेतला. त्याच्या हातात आता नवा फुगा होता. हिरवा. दोन बोटांत ताणून त्यानं फुगा ओठाशी नेला. फुग्यावरचे पिवळे-लाल ठिपके फुगत गेले. सिद्धार्थनं पाहिलं,
मुलाचे ताणलेले गाल...बारीक डोळे...कानाच्या मागून ओघळत जाणारा घामाचा ओघळ...जीव ओतून फुग्यात हवा भरत
असलेला मुलगा...बंद काचेवर टक टक करत तो म्हणाला : ‘‘फुगे.’’ डॅडी ओरडले : ‘‘ए! चल सरक...हात काढ!’’
नंतर बर्थ डे पार्टी...नुसती धम्माल!...तिथं हॅरी पॉटरची थीम, मॅजिक
शो, गेम्स...चंगळ, चंगळ, नुसती चंगळ! शेवटी खाणं-पिणं
झाल्यानंतर नीलनं डेकोरेशनमधला फुगा तोडला आणि धवलनं तो
पायाखाली दाबत फटकन्‌ फोडला...मग कॉम्पिटिशनच लागली फुगे
फोडण्याची. सिद्धार्थच्या हातात हिरवा फुगा आला. त्याच्यावर लाल-पिवळे ठिपके. सिद्धार्थला अचानक काहीतरी आठवलं...त्याला
आठवलं...ऊन्ह, फुटपाथ, अर्ध्या पॅंटमधला मुलगा, फुगे...ताणलेले
गाल, बारीक डोळे, घामाचा ओघळ, कारच्या काचेवरून सरकत गेलेला मळकट हात...एक मुलगा...त्याच्याच वयाचा...काळा... अर्ध्या पॅंटमधला... सिद्धार्थकडे पाहत नील ओरडला : ‘‘अरे, फोड नं फुगा’’
सिद्धार्थ तसाच उभा राहिला. धवलनं त्याच्या हातातून फुगा ओढून
घेतला. धवल फुगा फोडणार एवढ्यात सिद्धार्थ सर्व शक्तीनिशी ओरडला : ‘‘फुगा फोडू नकोस, धवल!’’
मित्र सिद्धार्थकडे आश्चर्यानं पाहत राहिले.
आठवडा उलटला. मम्मीला सिद्धार्थच्या टेबलवर फुगा सापडला. हिरवा. हवा निघून गेलेला. तो हातात उचलत ती म्हणाली : ‘‘काय रे, कचरा गोळा करतोस!’’
सिद्धार्थ तिला काहीच बोलला नाही.
***

ही गोष्ट सांगणाऱ्या स्वाती राजे लिहितात : ‘‘काही काही गोष्टी कधी
कुणाला सांगताच येत नाहीत!’’
आपण वाचक म्हणून विषण्ण होत जातो.
फुग्याची ही गोष्ट आपल्या अंगावरच येते. या गोष्टीला चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी चित्रं काढली आहेत. या चित्रात आपल्याला आपलंच प्रतिबिंब दिसू लागतं जणू.
सगळी गोष्ट सजीव होऊन आपल्या आसपास घडत असल्यासारखी वाटत राहते. आपणही तिच्यातलं एक पात्र आहोत असं वाटू लागतं.
तुम्हाला काय वाटतं? आपण नाही आहोत का या गोष्टीत?
डॅडी, मम्मी, नील, धवल या सगळ्यांत एक आपणही आहोत नं?
बालसाहित्य म्हणजे राजा-राणीची गोष्ट नाही निव्वळ. बालसाहित्य
म्हणजे कुणा एकाची ‘सक्सेस स्टोरी’ नाही फक्त. बालसाहित्य म्हणजे केवळ आनंददायी, ताल धरून नृत्य करता येतील अशी गाणी किंवा ताला-सुरात म्हणता येतील अशा कविताच नाहीत काही केवळ. बालसाहित्य म्हणजे केवळ जादू नाही, गंमतजंमत नाही, विनोद नाही. ...तर, आपल्या घरातल्या बालकांच्या मनात जे साठलेलं आणि दाटलेलं असतं तेही ‘बालसाहित्य’च असतं.
***

आपलं मूल आज उदास आहे? का आहे? कारण शोधलं तर एक गोष्ट दडून बसलेली तुम्हाला ऐकू येईल. लंगडणारी गाय पाहून हुंदके देणारा आणि ‘आता या गाईची काळजी कोण घेणार?’ असा प्रश्न विचारणारा साई हा सगळ्यांच्याच घरात असतो.
‘आई माझे पाय मळतील, तू तुझा पदर पसर’ असं म्हणणारा श्याम काळासोबत संपलेला नाही. तो तिथंच आहे, ज्या वयात तो असायला हवा! आपण त्याला ऐकायला, समजून घ्यायला कमी पडतो.
गोष्ट हा एक राजमार्ग आहे बालकांशी संवाद साधण्याचा. हा राजमार्ग
मात्र सर्वत्र आहे आणि समजा नसलाच तर तो कुठूनही सुरू करता येतो. अगदी तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात त्या स्थळापासून. तुम्ही बोलायला सुरवात करा...स्वतःबद्दल बोला, तुमच्या आई वडिलांविषयी, नवरा-बायकोविषयी, स्वप्न आणि सत्य यांविषयी,
मित्र आणि भावंडांविषयी सहज बोलू लागा, हळूहळू एक गोष्ट आकाराला येईल. कधीही न विसरली जाणारी गोष्ट. पुस्तकातून भेटीला येते त्यापेक्षाही अधिक सुंदर गोष्ट!
संवाद, मग तो कुणाचाही कुणाशीही का असेना, सुंदर असतो. त्यातून केवळ चांगलंच निष्पन्न होतं. तुम्ही जसजशा गोष्टी सांगत जाल तसतसं एक नवं नातं हळूहळू आकाराला आलेलं तुम्हाला दिसेल. तुमची लेकरं तुमच्या अधिक जवळ आली आहेत हे लक्षात येईल. तुम्हीही ऐकून घ्या मुलांचा आवाज. नवं शिकल्याचा आनंद तुम्हालाही उपभोगता येईल. बालक आणि पालक यांच्यातला संवादसेतूच नवं ‘गुज’ आकाराला आणू शकतो, ते ‘गुज’ आपल्यापर्यंत घेऊन येऊ शकतो.
तुम्ही म्हणाल की मी चंदाविषयी तर काहीही बोलले नाही!
तिच्याविषयी मी बोलणारही नाही काही. तुम्हीच शोधा चंदा कुठं आहे ते? अंगणातल्या वाळलेल्या झाडाला एकटीच ती काय सांगत आहे?
का सांगत आहे? तुम्ही डोळे उघडून पाहा, चंदाजवळ एक गोष्ट होती व ती झाडाच्या मनात शिरली आहे. वाळलेलं अंगणातलं झाड... त्याच्या वठल्या फांदीला एक कोवळं पान फुटलं आहे...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarng vidya surve borse write balguj article