मोबाईलचा इतिहास (अच्युत गोडबोले)

Mobile-History
Mobile-History

बिनतारी मोबाईल फोनचा शोध नेमका कुणी लावला याबद्दल वाद आहेत. सन १९०८ मध्ये प्राध्यापक अल्बर्ट जॅनके आणि ऑकलँड ट्रान्सकॉन्टिनेंटल एरियल टेलिफोन अँड पॉवर कंपनी यांनी पहिला बिनतारी टेलिफोन बनवल्याचा दावा केला होता. मात्र  त्यांनी आपला शोध काही पुढं आणला नाही किंवा त्याचं उत्पादनही केलं नाही हे मात्र नक्की! मात्र, मोबाईल फोनची खरी पायाभरणी स्टॉकहॉममध्ये राहणाऱ्या लार्स मॅग्नस एरिक्सन यानं सन १९१० मध्ये आपल्या बायकोच्या काळजीपोटी केली, अशी एक दंतकथा प्रसिद्ध आहे. 

सन १९०७ मध्ये पंच मॅगेझिनमध्ये लेविस बामर या इंग्रजी व्यंगचित्रकाराचं एक व्यंगचित्र छापलं होतं. ‘फोरकास्ट्स ऑफ १९०७’ या मथळ्याखाली छापलेल्या या व्यंगचित्रात लंडनच्या हाईड पार्कमध्ये अनेक जण ये-जा करताना दाखवले होते. त्यातली एक महिला आणि एक पुरुष एकमेकांपासून दूर अंतरावरून चालत होते. तरी त्यांचं एकमेकांशी काहीतरी संभाषण चालू होतं आणि तेही त्यांच्या हातात असलेल्या बिनतारी टेलिफोन्सच्या माध्यमातून! सन १९२६ मध्ये कार्ल अर्नोल्ड या व्यंगचित्रकारानंही जर्मनीतल्या एका मॅगेझिनमध्ये बिनतारी टेलिफोनचा उपयोग दाखवणारं एक व्यंगचित्र काढलेलं होतं. ही चित्रं चक्क मोबाईल फोन्सची होती. तसं सन १९२८ मध्ये चार्ली चॅप्लिनच्या ‘द सर्कस’ या चित्रपटात एका तरुणीच्या हातात मोबाईल फोनसारखंच एक यंत्र दाखवलं होतं. विशेष म्हणजे हे यंत्र ती कानाला लावून चालता चालता त्यावर बोलते आहे असंही त्यात दाखवलं होतं. यात गंमतीचा भाग हा, की सन १९२८पर्यंत बिनतारी तंत्रज्ञानाबाबत किंचितशी प्रगती झाली असली, तरी अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा होता.

खरं तर तोपर्यंत टेलिग्राफचा शोध लागलेला होता आणि दुरून संदेशांची देवाणघेवाणही सोपी व्हायला लागली होती. मग टेलिफोनही आले. त्यामुळे एकमेकांशी दुरून बोलताही यायला लागलं. मात्र, या सगळ्या यंत्रणांमध्ये एक मोठी अडचण होती. ती म्हणजे या सगळ्या यंत्रणा तारांनी जोडलेल्या असायच्या. त्यामुळे टेलिफोन एका जागीच ठेवून त्याचा वापर करणं भाग पडायचं. तो काही आपल्याला आपल्याबरोबर वागवता यायचा नाही. त्यामुळे बाहेर पडलेल्या माणसाशी संपर्क करणं अतिशय अवघड होऊन बसायचं. तो माणूस जोपर्यंत आपल्याशी संपर्क साधत नाही तोपर्यंत वाट बघण्याशिवाय काहीच पर्याय उरायचा नाही.

बिनतारी मोबाईल फोनचा शोध नेमका कुणी लावला याबद्दल वाद आहेत. सन १९०८ मध्ये प्राध्यापक अल्बर्ट जॅनके आणि ऑकलँड ट्रान्सकॉन्टिनेंटल एरियल टेलिफोन अँड पॉवर कंपनी यांनी पहिला बिनतारी टेलिफोन बनवल्याचा दावा केला होता. मात्र, त्यांनी आपला शोध काही पुढं आणला नाही किंवा त्याचं उत्पादनही केलं नाही हे मात्र नक्की! मात्र, मोबाईल फोनची खरी पायाभरणी स्टॉकहॉममध्ये राहणाऱ्या लार्स मॅग्नस एरिक्सन यानं सन १९१० मध्ये आपल्या बायकोच्या काळजीपोटी केली, अशी एक दंतकथा प्रसिद्ध आहे.  

या दंतकथेनुसार एरिक्सननं १८७६ मध्ये स्टॉकहोम शहरात आपल्या मित्राच्या मदतीनं तारायंत्र आणि टेलिफोन दुरुस्त करण्याची कंपनी काढली. कालांतरानं त्यानं १८८३ मध्ये कंपनीचं नाव बदलून ‘एरिक्सन कॉर्पोरेशन’ असं ठेवलं. यानंतर त्यानं बराच पैसा कमावला आणि वयाच्या अवघ्या चोपन्नाव्या वर्षी तो निवृत्त होऊन चक्क शेती करायला लागला! या शेतातच पहिल्या मोबाईल फोनचा जन्म झाला. फक्त त्यात तारांचा वापर टळला नव्हता! या फोनची कल्पना झकासच होती!

एरिक्सनचं फार्महाऊस खूपच मोठं होतं. त्यांच्याकडे गाडी होती; पण एरिक्सनला गाडीतून फिरायचा अतोनात कंटाळा यायचा आणि त्यामुळे तो बऱ्याचदा घरीच असायचा; पण त्याची बायको हिल्डा हिला मात्र गाडीतून फिरायला आवडत असल्यामुळे ती अनेकदा गाडी घेऊन फिरायला जायची. ती बाहेर गेल्यावर तिच्याशी संपर्क साधायचा असल्यास एरिक्सनची खूपच पंचाईत व्हायची. एरिक्सननं अनेक दिवस झटून त्यासाठी एक यंत्र तयारही केलं आणि ते त्यानं आपल्या गाडीत बसवलं; पण अजून बिनतारी यंत्रांबाबत फारसं काहीच काम झालं नव्हतं. मग हे यंत्र बाहेर चालणार कसं? 

मग एरिक्सनला एक भन्नाट कल्पना सुचली. त्याच्या शेताच्या संपूर्ण परिसरात ठिकठिकाणी टेलिफोनचे खांब बसवलेले होते. एरिक्सननं या खांबांमधल्या सर्किट्समध्ये आपल्या यंत्रातल्या तारा जोडता येतील अशी सोय केली आणि आपण तयार केलेलं यंत्र गाडीत बसवलं. आता गाडी घेऊन बाहेर गेलेल्या हिल्डाला आपल्या नवऱ्याशी बोलायचं असेल तेव्हा यातल्या कुठल्याही टेलिफोनच्या खांबापाशी हिल्डा गाडी थांबवायची, यंत्र गाडीतच ठेऊन या यंत्राच्या लोंबकळणाऱ्या तारा दोन उंच काठ्यांच्या आधारे शेतातल्या खांबावरच्या सर्किटमध्ये ठरावीक ठिकाणी जोडायची आणि यंत्राला सिग्नल मिळाला, की ती टेलिफोन ऑपरेटरला सांगून आपला फोन नवऱ्याच्या फोनशी जोडण्याची विनंती करायची. नवऱ्याशी बोलणं झाल्यावर परत त्या तारा ती सर्किटमधून काढून आपल्या गाडीत ठेवायची. कारमधून ही दोघंही फिरत असताना समजा त्यांना कुणाशी संपर्क करावासा वाटला, तर एरिक्सन एखाद्या टेलिफोन पोलपाशी आपली गाडी थांबवायचा आणि हिल्डा हे यंत्र टेलिफोनच्या वायरशी जोडायची. हे यंत्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जगातला तारायुक्त का होईना; पण चक्क पहिला मोबाईल फोन होता! मात्र, ही गोष्ट खरी नसल्याचं जिम्मी दुवाल या एरिक्सनच्या डायरेक्टरनं सांगितलं आहे. त्याच्या मते, एरिक्सनकडे गाडी तर नव्हतीच; पण ड्रायव्हिंग लायसन्सही नव्हतं. त्याच्या मुलाकडे मात्र गाडी होती आणि तो वडिलांना कधीकधी लिफ्ट द्यायचा; पण कार फोनच्या मात्र सगळ्या थापा आहेत असं त्याचं म्हणणं होतं. ही गोष्ट जरी खरी असली, तरी अजून बराच पल्ला गाठायचा होता हे मात्र खरं. 

रेडिओ हेही एक बिनतारीचं उपकरण असतं. त्यात प्रत्येक रेडिओ स्टेशनला (उदाहरणार्थ, रेड एफएम, रेडिओ मिर्ची इत्यादी) सरकारनं वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज (किंवा चॅनेल्स) दिलेल्या असतात. प्रत्येक स्टेशन आपल्याला दिलेल्या फ्रिक्वेन्सीचा वापर करून आपला प्रोग्रॅम प्रक्षेपित करत असतं. याच तऱ्हेनं रेडिओसाठी आणि टीव्हीसाठी राखून ठेवलेल्या फ्रिक्वेन्सीज सोडून इतर काही फ्रिक्वेन्सीज वापरून मोबाईल फोनवरून संवाद करणं शक्य होईल याची संशोधकांना खात्री होती. 

मोटारकारचा वापर करून जर टेलिफोनचा वापर करता येऊ शकतो, तर कुठल्याही चालणाऱ्या वाहनांचाही तसाच वापर करता यायला पाहिजे अशा कल्पनेवरही आता प्रयोग सुरू झाले. सन १९१८ मध्ये जर्मनीमध्ये बर्लिन आणि झोसेन या स्टेशनांच्या दरम्यान बिनतारी टेलिफोनचा पहिला प्रयोग केला गेला. लष्करी जवानांच्या रेल्वेमध्ये हा प्रयोग झाला होता.

मात्र, खऱ्या अर्थानं बिनतारी मोबाईल सुविधा पुरवली जायला लागली ती १९२१ मध्ये! डीट्रॉईटमध्ये त्यावेळी विल्यम रटलेज नावाचा एक पोलिस कमिशनर होता आणि त्याच्याच कारकिर्दीत ही सुविधा सुरू झाली; पण अजूनही ही सेवा परिपूर्ण नसल्यानं ऐकणं आणि बोलणं या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होत नव्हत्या. एकीकडून फक्त बोलण्याची, तर दुसऱ्या बाजूला फक्त ऐकण्याची सोय होती. साहजिकच हे सोयीस्कर नव्हतं. 

याच दरम्यान जर्मनीचे रेल्वेत बिनतारी टेलिफोन सेवा पुरवण्याचे प्रयत्न सुरूच होते. सन १९२४ मध्ये बर्लिन आणि हॅम्बर्ग या स्टेशनांच्या दरम्यान केला गेलेला प्रयोग यशस्वी झाल्यावर १९२५ मध्ये ‘झुगटेलिफोन ए.जी.’ या नावानं टेलिफोन उपकरणं पुरवणाऱ्या कंपनीची स्थापना करण्यात आली आणि बर्लिन आणि हॅम्बर्ग या स्टेशनांच्या दरम्यान प्रवास करणाऱ्या फर्स्ट क्लासच्या प्रवाशांसाठी ही सेवा सुरूही करण्यात आली. हा मोबाईल फोनचाच एक प्रकार होता. कारण चालणाऱ्या ट्रेनमध्ये ही टेलिफोन सेवा देण्यात आली होती.

मात्र, अजूनही हे तंत्रज्ञान एकतर्फीच (वन वे) होतं. १९३० च्या दशकात ‘पुश टू टॉक (पीटीटी)’ हे तंत्रज्ञान आलं आणि ही सेवा दुतार्फा (‘टू वे’) झाली; पण तरीही एका वेळी फक्त ऐकता किंवा फक्त बोलता यायचं. दोन्ही एकाच वेळी अजून शक्य नव्हतं. म्हणून याला ‘हाफ डुप्लेक्स’ म्हणतात. या उपकरणात एक बटन असायचं. बोलायचं असेल, तेव्हा हे बटन दाबायचं. म्हणजे समोरची व्यक्ती बोलणार आहे, त्यामुळे आता आपण बोलायचं नाही, तर ऐकायचं काम करायचं आहे असा पलीकडल्या व्यक्तीला सिग्नल जायचा; असा तो प्रकार होता. यातून संपर्क जरी होत असला तरी ऐकत असताना बोलता येत नव्हतं किंवा बोलत असताना ऐकता येणं शक्य होत नव्हतं. त्यात हे टेलिफोन्स मोठे, जड आणि भरपूर बॅटरी खाणारे असायचे. असं असलं, तरी दुसऱ्या महायुद्धात या बिनतारी टेलिफोन सेवांचा लष्कराला मात्र प्रचंड फायदा झाला.

अमेरिकेमध्ये १९३० च्या सुमारास वाहनांच्या बाबतीत मोठीच क्रांती घडत होती. लोकांना आपण स्वत:ची मोटारगाडी विकत घ्यावी असं वाटत असे. अर्थातच त्या काळात मोटारींमध्ये आज असतात तशा एसी, पॉवर स्टीअरिंग वगैरे सोयी नसायच्या. मात्र, प्रवास करताना रेडिओवरचे कार्यक्रम ऐकायला मिळाले तर काय बहार येईल अशा विचारानं १९२९ मध्ये ‘गॅल्व्हिन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’नं मोटारीत बसवता येईल असा ‘मोटारोला’ या नावानं ओळखला जाणारा रेडिओ तयार केला. या कंपनीचा मालक असलेला पॉल गॅल्व्हिन याची गोष्ट तर अजबच आहे. 

गॅल्व्हिन १८९५ मध्ये अमेरिकेतल्या इलिनॉय राज्यातल्या एका छोट्या गावात जन्मला होता. तिथल्याच एका विद्यापीठात शिक्षण घेत असताना या शिक्षणाचा फोलपणा लक्षात आल्यामुळे त्यानं शिक्षण सोडून एके ठिकाणी चक्क कारकुनाची नोकरी धरली. या नोकरीचाही कंटाळा आल्यावर त्यानं एडिसनच्या कंपनीत नोकरी धरली. अमेरिकेला पहिल्या महायुद्धात घुसावं लागणार हे लक्षात येताच गॅल्व्हिननं लष्करी प्रशिक्षण घेऊन फ्रान्समध्ये सीमेवर जायचा पराक्रमही करून दाखवला. सन १९१९ मध्ये लष्करातून सुटका झाल्यावर त्यानं बॅटरी तयार करणाऱ्या एका कंपनीत काम केलं. नंतर त्यानं विस्कॉन्सिन राज्यात बॅटरी बनवणाऱ्या कंपनीत भागीदारी केली; पण १९२३ मध्ये या कंपनीला आपला गाशा गुंडाळावा लागला. खिशात जेमतेम दीड डॉलर्स शिल्लक असताना गॅल्व्हिननं दुसरी नोकरी धरली आणि काही काळानं पुन्हा एकदा आपली स्वत:ची एक कंपनी काढायचं ठरवलं; पण दुसऱ्यांदाही त्याची बॅटरी तयार करणारी कंपनी बंद पडायची वेळ आली. अगदी शेवटच्या क्षणी नशिबानं आपल्या कामातली एक चूक लक्षात आल्यानं गॅल्व्हिन ती वेळेत दुरुस्त करू शकला आणि त्यामुळे त्याची कंपनी कशीबशी वाचली. बॅटऱ्या बनवता बनवता गॅल्व्हिनची कंपनी बिनतारी संदेशवहनाच्या क्षेत्रात घुसली.

१९३२ मध्ये आर्थिक महामंदीचा विळखा कायम असतानासुद्धा मोटारगाड्या आणि त्यात बसवलेले रेडिओ यांचं वेड अमेरिकन जनतेत एवढं होतं, की अमेरिकेत नऊ लाख मोटारगाड्या विकल्या गेल्या आणि १९३५ मध्ये तर तब्बल वीस लाख लोकांनी मोटारी विकत घेतल्या! साहजिकच गॅल्व्हिनच्या रेडिओची तुफान विक्री झाली. लवकरच गॅल्व्हिन यानं ‘मोटोरोला’ या नावानं आपला रेडिओ विकायला सुरवात केली. ‘मोटोरोला’ हा ब्रँड आजही जगभर लोकप्रिय आहे. रक्ताचा कर्करोग झालेला गॅल्व्हिन वयाच्या चौसष्टाव्या वर्षी समाधानानं मरण पावला.
मात्र, अजून ‘सेल फोन्स’ निघाले नव्हते. त्याविषयी पुढच्या लेखात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com