बाणाईची बडबडबखर (ऐश्वर्य पाटेकर )

बाणाईची बडबडबखर (ऐश्वर्य पाटेकर )

‘‘मंग काये, आजपत्तूरचं समदं दुस्काळ पचवून आल्यालीय ही बाणाई. अशी तशी थोडीय?’’

दुस्काळाचं उपकार माह्यावर थोर, म्हनून दर येळी त्यातून म्या वाचले. माह्यावर माया असल्यासारखं त्येनं मला जीवदान देलं. आता घरातले माह्या गचाकन्याची वाट बघून ऱ्हायले; पर म्या कशी गचकन? गचकायला म्या काय झाडपालाय! पर त्यांयला कोन सांगनार? तुला म्हनून सांगते, ह्या दुस्काळानंच मला लई मजबूत बनीवलंय. ऐक, तुला सांगते...’’

बाणाईचं तोंड जर खापराचं असतं तर इतक्या दिवसांत ते नक्कीच फुटून गेलं असतं. तिच्या तोंडाची टकळी सारखी सुरूच असायची. कुणी ऐकायला असो वा नसो, त्यात ना व्यत्यय, ना खंड! 

‘‘भावड्या, तुला म्हाईतंय का, आपल्या मारुतीचं तोंड का वाकडंय?’’
‘‘का गं आज्जे?’’

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘‘लई जुनी गोष्टंय, बरं बाबा. आपलं गाव लुटाया चोर गावात घुसलं व्हतं. गाव व्हतं जागसूद. चोरांयचा मनसुबा गेला फेल. गाव लागलं लाठ्याकाठ्या घिऊन मागं. पळता पळता चोर घुसलं देवळात. लपलं देवळात. देव का त्यायची गय करील? मारुतीनं मान वळवून पाह्यलं नं रागानं त्यांयच्याकड. झाली नं बाबा त्यांयची लेंडी पाताळ! फुटला ना दरदरून घाम...त्यायला मनुमन वाटलं का आपलं काई खरं न्हाई आता आन् ठोकली नं त्यांयनी यकायकी धूम, तव्हापून यक झालं का, चोर पुन्यांदी गावात काही आलं न्हाईत. त्यांयनी देली आसंल दुसऱ्या बी चोरायला कानुकान खबर. बसली का दहशत! पर यक मातूर वाईट झालं, मारुतीचं तोंड वाकडं ती वाकडंच ऱ्हायलं. लोकायनी मस भजन-कीरतनाचा राजरोस रतीब घातला; पर त्वांड काई सरळ झालं न्हाई...अशानं असं झालं. झाली माही गोष्ट. उलसक् पानी आन. घसा कोरडा पडला माहा. तुह्या मायला म्हनावा, उलसाक च्या बी ठिव. कोरा का देईनास.’’ 

असं घेणं एक ना, घेणं दोन...तिचं आपलं असं सुरूच असायचं...आईला तर तिची इतकी सवय झाली होती की तिच्या बडबडीचा आईच्या दिनक्रमात कुठलाही व्यत्यय येत नसे. बाणाईच्या बडबडीत आईची सगळी कामं आवरूनही व्हायची अन् बाणाई आईकडून मशेरी घेऊन निघून जायची. आईला मजुरीच्या कामाला जायचं नसेल तर मग काय, बाणाई आमचं घर काही सोडायची नाही. एवढा हक्काचा श्रोता ती कसा काय गमावील?

साऱ्या गावाचा इतिहास-भूगोल-नागरिकशास्त्र तिला ठाऊक. गावात आतापर्यंत पडलेल्या दुष्काळाची मोजदाद तिनंच केली. अमूक वर्षी कुणाच्या शेतात किती पिकलं...कुणाची कशी धूळधाण झाली...सगळ्याची खडा न् खडा नोंद तिच्याकडं अचूक सापडेल. 

सध्या कोरोनाची महामारी सुरू आहे. बाणाईनंही काही महामाऱ्या पाहिल्या आहेत. या साथीच्या रोगांची हकीकत सांगताना बाणाई जरा जास्तच मशेरी लावते आणि त्या कैफात ती अशा काही पद्धतीनं गोष्ट सांगू लागते की ऐकणारा खिळूनच जातो.

‘‘काय सांगू तुला बाबा, मानमोडीच्या महामारीची कैना. माय मेली का बाप मेला...काईच कुनाला कळंना. डोळ्यासमूर जिवाचं मानूस आसं खल्लास व्हायाचं का हंबरडा फोडाया बी येळ न्हाई.

कोंबडीगत मान वाकडी झाली का समजायचं त्येचा शेर संपला. गावच्या गावं बसली. लोक पार हवालदिल झाले. तोंडचं पानी पळालं. घास-कुटका कसा गोड लागावा? माय-लेकराला धरीना आन् बाप लेकरू आपलं मानीना. नुसताच भनाटा. म्या माह्या दादल्याला आन् पोरांयला घिऊन रानावनात पशार झाले. ती अवखदा नगं इच्यारू. कसं दिस काढलं असत्याल वनात? दादला म्हन्ला, तुह्यामुळं वाचला जीव. अशानं अशी महामारी. त्या वख्ती म्या चपाटा केला नसता तं ह्ये सांगाया आज म्या जित्ती आसते का? उजूक सांगलंच म्या...’’

***
बाणाईनं आमच्या गावच्या सौंदडीचीही कथा सांगितली. मारुतीच्या देवळाजवळून दोन हाकांच्या अंतरावर नदीकाठी होती ही सौंदड. गावात बैलपोळ्याचा सण असला की सौंदडीला महत्त्व प्राप्त व्हायचं. पोळ्याच्या दिवशी मारुतीमंदिराजवळून बैल तंगडले की या सौंदडीला गरका मारून देवळाजवळ आणून उभं केलं जायचं. असा दर वर्षीचा रिवाज. त्यात कधीच बदल झाला नाही. भलेही गावात दुफळी माजली; पण रिवाजाचा कधी खाडा झाला नाही. आम्ही पोरांनी सरपणासाठी गावात कुठलंच झाड सोडलं नाही; पण सौंदडीच्या वाट्याला कधी गेलो नाही. कसं जाणार? जर का त्याला बाणाईनं देवाचं झाड ठरवून टाकलं असेल तर आमची काय हिंमत देवाच्या झाडाला पाय लावायची? आम्ही कधी शेळ्या चरायला घेऊन गेलो अन् चुकूनमाकून त्या सौंदडीच्या उघड्या पडलेल्या मुळीला जर आमची लाथ लागली तर आम्ही मोठ्या भक्तिभावानं पाया पडायचो. ‘आमच्याकडून घडलेल्या पापाबद्दल क्षमा कर,’ असं मनोमन म्हणायचो. बाणाईनं सांगितलेली गोष्ट अशी : ‘सौंदडीच्या झाडाखाली मारुतीचं देवाळ हाय ना त्येच्याखाली सात कढाया सोन्यानं टिळोटीळ भरलेल्या हायेत. त्या कढायांवर बसलाय यक भला मोठा भुजंग्. त्यो वकतोय त्याच्या त्वांडातून भकाभका आग. यकदा देवानं गावाच्या सपनात यिऊन गावाला देलं आव्हान. देव म्हन्ला, ‘जर का तुमी यका रातीत माहं देऊळ बांधलं तं सात कढाया सोनं तुमचं आन् जर का काम अर्धवट ऱ्हायलं तं माहा भुजंग् येऊन समदं गाव भस्मसात करून टाकीन! गावानं वळखलं का, यका रातीत देऊळ बांधाययवढी काय दानत आपल्यात न्हाई, मग ऱ्हायलं गाव मुकाट. ते सात कढाया सोनं आजूक बी तसंच पडूनंय...त्येच्यावर त्यो भुजंग् तसाच बसूनंय...! म्हनून या झाडाच्या नादी लागू नगा. त्ये आसं तसं न्हाई, देवाचं झाड हाये!’’

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मग कसे लागू बरं आम्ही या झाडाच्या नादी? कुणाला भस्मसात व्हायची हौस आलीय? पण संत्याला कधी कधी खुमखुमी यायची. कावळ्याला आवतण द्यायची त्याची खोड काही जायची नाही.

‘‘भावड्या, बांधायचं का देऊळ यका रातीत?’’

‘‘संत्या, आधी तुहं घर पाह्य. पावसात भळाळ गळतं. चाल्ला मारुतीचं देऊळ बांधाया!’’

‘‘नाई तं काय...संतू, तू लई वरून हाणली!’’

‘‘तुह्या घराची मागची भीत बांध आधी!’’

‘‘ऐ, मला कमी नगा समजू. बांधीलच म्या. सोन्यात वाटंकरी व्हायाला या...मंग बघतो...’’

‘‘ऐ बाबो, सात कढाया सोनं तुह्या यकट्याचं व्हईन!’’

‘‘काय करशील ब्वा यवढ्या सोन्याचं?’’

‘‘अब्बास गारीगारवाला आल्यावं तुला भंगार सापडत न्हाई आन् चाल्ला सात कढाया सोन्यावं मालकी सांगाया!’’

‘‘त्यो भुजंग् येऊन तुहा फोटू काढनार काय?’’
‘‘

न्हाई तं काय, आम्हाला येडं बनवू ऱ्हायलाय ती!’’

असे कित्येक विषय बाणाईनंच देऊन ठेवले आम्हाला. आमची बालपणाची बखर याच तर गोष्टींनी भरून गेलीय. त्या वजा केल्या तर आमच्या बालपणाची मजाच निघून जाईल. रणरणत्या उन्हात भरकटलेले नुसतेच भुरटे दिवस उरतील. त्यांचं काय करायचं?

‘‘बर का भावड्या...’’

‘‘हां आज्जे,’’ पुस्तक वाचता वाचता मी म्हणालो.
‘‘तू आईकून ऱ्हायला का न्हाई. का नगं सांगू?’’
‘‘सांग न आज्जे, आईकून ऱ्हायलोय म्या,’’ हातातलं पुस्तक बाजूला ठेवत मी म्हणालो.
‘‘हजार पायांनी दुस्काळ चालत येतो आन् सारी दाणाफान उडवून निघूनशान जातो. आसं किती दुस्काळ म्या पाह्यले आसत्याल बरं?’’
‘‘किती?’’
‘‘आरं, काई आंदाज बांधशीन का न्हाई? का साळंत जाऊन पाढं उगाच म्हनीतो?’’
‘‘चार!’’ सांगायचं म्हणून मी सांगितलं.
‘‘पंधरा’’
‘‘ये बाबो!’’
‘‘मंग काये, आजपत्तूरचं समदं दुस्काळ पचवून आल्यालीय ही बाणाई. अशी तशी थोडीय?’’

दुस्काळाचं उपकार माह्यावर थोर, म्हनून दर येळी त्यातून म्या वाचले. माह्यावर माया असल्यासारखं त्येनं मला जीवदान देलं. आता घरातले माह्या गचाकन्याची वाट बघून ऱ्हायले; पर म्या कशी गचकन? गचकायला म्या काय झाडपालाय! पर त्यांयला कोन सांगनार? तुला म्हनून सांगते, ह्या दुस्काळानंच मला लई मजबूत बनीवलंय. ऐक, तुला सांगते...’’

येक साल दुस्काळ आला...गोठयाची जितराबं खाऊन गेला...दुसरा आला आन् मानसं खाऊन गेला. तिसरा आला गाव-शहरात घिऊन गेला. चौथा आला सडघाण करून गेला आन् बरं का, पाचवा आला त्यो मानूस मानसाला वळखीनाच. तव्हापून मानसाची माया पात्ताळ झाली. त्यो लई पायापशी बघाय लागला...

बाप मरो नाई तं माय...त्येला सोयर ना सुताक. शेवटच्या दुस्काळानं तं लईच कहर केला. त्यो टिकूनच ऱ्हायला. आता जर का दुस्काळ आला तं त्यो जगबुडी करून शांत व्हईल. तसा त्येचा आत्मा निवनारच न्हाई आन् पापं काय कमी झाले का? त्यांयचा भार व्हऊन व्हऊन तसं बी जग संपनारंय बग. तसं व्हायाला आता काई दुस्काळाच पडाय पाह्यजे आसं काई न्हाई! किती दुस्काळ सांगितले म्या तुला?’’

‘‘पाच!’’

‘‘किती राह्यले? दहा!’’

‘‘त्येचा हिशेब तू लाव. सगळं म्या यकटीनंच सांगायचा मक्ता घेतलाय का रं?’’

बाणाईची कथनपद्धतीच अशी की ऐकत राहावसं वाटायचं. राहिलेल्या दहा दुष्काळांविषयी मी तिला विचारत नव्हतो असं नाही. ती सांगायला सुरुवात करायची अन् पुन्हा दहा शिल्लकच ठेवायची! बाणाई गेली तेव्हा वाटलं, गावाचा इतिहास गेला. आता दुष्काळाची गोष्ट कोण सांगणार? उत्खनन करायची इच्छा एखाद्‍दुसऱ्याची झालीच तर गाव तर शिल्लक राहायला हवं. उत्खननात बाणाईची हाडं सापडली तर ती सांगतील गावाची गोष्ट...! बाणाईनं जुने दिवस पाखडून पाखडून असे समोर ठेवले...आता महामूर लोक आहेत आजूबाजूला. त्यांना स्वत:विषयी दोन ओळीत काही सांगता येत नाही, तर अशा गोष्टी ते काय सांगणार...? असं काही उगाच सांगता येत नसतं...त्यासाठी जगावं लागतं...आता बाणाईसारखं जगणारं कुणी सापडणार नाही. एखादा १०५ वर्षं जगला असेल; पण त्याच्याकडं सांगण्यासाठी काहीच नसेल...तर तसंही त्याचं आयुष्य फिजूल ठरवायलाही बाणाईच लागेल...बाणाई नाही राहिली; पण बाणाईची बडबडबखर गावाच्या कागदपत्रांत नव्हे, मुखपत्रात सहजी सापडेल...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com