दगडपूरचा संतुक (ऐश्वर्य पाटेकर)

Aishwary-Patekar
Aishwary-Patekar

संतुकचे आई-वडील हादरले. गयावया करू लागले. तरी संतुक त्याच्या निर्णयापासून हलेना म्हणून जिवाचा आसबोस करू लागले. संताप संताप करू लागले. मग मात्र संतुकला त्यांचं दुखणं उमगलं. पिढ्यान् पिढ्याची सवय अंगवळणी पडत गेलेली माणसं होती ती. मर्जी रक्तातच मुरलीय त्यांच्या. इतक्या सहजी ती बाजूला होणार नाही. म्हणून त्यानं नमतं घेत, बिघडलेली परिस्थिती तवताक दुरुस्त केली. आई-वडिलांस हायसं वाटलं. त्यांचा जीव भांड्यात पडला. म्हणून तो त्याच्या निर्णयापासून हटला होता असं नाही, तो त्याच्या निष्ठेवर अचल होता. तो हळूहळू आई-वडिलांना समजावत गेला. त्याची ही समजावण्याची पद्धत दुखण्यावर दवा म्हणून असर करत गेली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे माझ्या गोष्टीतलं गाव आहे. मात्र, ते कुठल्या प्रदेशातलं आहे, ते काही मला माहिती नाही. आता गोष्टीतलं आहे म्हटल्यावर गोष्टीपुरता विश्वास ठेवावाच लागेल. हे असं गाव होतं, की तिथल्या राजाच्या मर्जीनंच पाऊस पडायचा. राजाच्या मर्जीनंच गावात हवा वाहायची. राजाच्या मर्जीइतकंच नदीत पाणी असायचं. राजाच्या मर्जीनंच झाडांची पानं सळसळ करायची. राजाच्या मर्जीनंच गुरं हंबरायची अन् पक्षी किलबिल करायची. थोडक्यात सांगायचं, तर ‘दगडपूर’ गाव बिलकूलही राजाच्या मर्जीबाहेर नव्हतं.

तर, दगडपूर गावात पिढ्यान् पिढ्या बाजरीचं पीक घेतलं जायचं. म्हणजे त्या लोकांना गहू, हरभरा, ज्वारी, ऊस असली पिकं माहीतच नव्हती, त्याविषयी ते काहीच जाणत नव्हते. गावात कुणीही श्रीमंत नव्हतं अन् गरीबही! सगळ्यांच्या घरात बाजरीच्या पोत्यांची थप्पी. म्हणून बाजरीचं पीठ. भाकरी, कालवण बाजरीचंच. बाजरीचेच लाडू. सणावाराला बाजरीचा भात, बाजरीचा शिरा, खिचडी वगैरे!

राजाच्या मर्जीशिवाय इथं कुणी शिंकत किंवा खोकतही नव्हतं. स्वप्नसुद्धा लोकांना राजाच्या मर्जीनुसार पडायचं. राजा दाखवील तेच स्वप्नात आलं पाहिजे, असा इथला दंडक! त्यामुळं तिथं वेगळं स्वप्न अजूनतरी कुणाला पडलं नव्हतं. तसं काही झालं असतं, तर देहदंडाची शिक्षा ठरलेली होती. पण, एक दिवस राजाच्या मर्जीला तडा गेला. त्यादिवशी झालं असं, की राजाच्या मर्जीनं नुकतीच सकाळ झाली होती. अप्पाच्या ओट्यावर सूर्यकिरणही राजाच्या मर्जीनंच पोचले. मात्र, त्याचं पाच वर्षांचं संतुक नावाचं पोरगं स्वत:च्या मर्जीनं अंथरुणावरून उठून डोळे चोळत बसलं. तेवढ्यात त्याचा बाप अप्पा तिथं आला. डोळे चोळता चोळता संतुक लगेच बापाला म्हणाला, “दादू माझ्या स्वप्नात किनी उसाचं पीक आलं. फार भारी. हिरवं हिरवंगार!”
चेहऱ्यावरच्या आठ्यांमध्ये असंख्य प्रश्न घेऊन अप्पा म्हणाला, “हे काय असतं बा?”
'दादू ऊस! लई गुळचट असतो; अन् खात्यात बी!”
'तुला रे कसं कळलं संतुक?”
'मी स्वप्नात पाह्यलं नं! पोरं खात व्हते. म्हनून म्या बी खाल्ला जरासक. अजून खायचा व्हता पन जाग आली नं!”
सुंतकचं हे स्वप्नकथन ऐकून अप्पाच्या अंगाला अन् काळजाला दरदरून घाम फुटला. त्याला भोवताली ब्रह्मांड गरगरल्यासारखं झालं. जे आतापर्यंत घडलं नव्हतं, ते घडू पहात होतं. कसल्यातरी अघटिताची जणू त्याला सूचना मिळाली. हातातल्या उपरण्यानं त्यानं घाम पुसला. अन् संतुकला म्हणाला,
'संतुक बाळा असं काही स्वप्न पाहू नको!”
'काम्हून दादू?”
'हे राजाच्या मर्जीइरुद्द हाये!”
'स्वप्न थोडंच मी पाडलं! त्याचं ते पडलं!”
'पडूच द्यायचं नाही लेका!”
अशी तंबी देत अप्पा मळ्याकडं निघून गेला. संतुक अजूनही अंथरुणातच होता. म्हणजे तो त्याच्या दादूवर रुसला होता. एवढं छान स्वप्न पडलं. पण त्याचं दादूला काहीच नाही. वरून म्हणे कुणालाच सांगायचं नाही. अप्पा संतुकला कोड्यात टाकून गेला खरा; पण संतुक कुठं शांत बसतो. तो पिच्छा करू लागला बापाच्या नकाराचा. का पहायचं नाही स्वप्न?

तर बरं का, आपल्या या गोष्टीत दुसरी घटना घडली. म्हणजे संतुकची आगळीक! तेव्हाही संतुक पाचच वर्षांचा होता. म्हणजे पहिल्या घटनेनंतर अगदी एक-दोन दिवसांतच घडलेली घटना. राजाचा रथ गावात हमरस्त्यावरून निघाला होता. अचानक गावाच्या वेशीजवळ येऊन राजाच्या रथाची दोन्ही चाकं जागीच थांबली. जशी पृथ्वीची गती थांबली होती. वाऱ्यानं वाहणं थांबवलं होतं. झाडाच्या पानांची सळसळ स्तब्ध झाली होती. पाखरं बावचळून खोप्यात दडून बसली होती. गावातल्या घरांच्या माना खाली गेल्या होत्या. सूर्याचं ऊन कोमेजून जागच्या जागी उभं राहिलं होतं. असं झालं काय होतं? तर, आपला संतुक रस्त्यानं गाणं म्हणत चालला होता. हे घोर पातक होतं. देशद्रोह होता. राजाच्या मर्जीचं उल्लंघन होतं. राजाच्या अंगाला त्वेषाचे हजार काटे फुटून आले. डोळे लालबुंद झाले. अतोनात रागानं त्याचं शरीर एवढं थरथरून आलं, की पायाखालची पृथ्वी भोवऱ्यासारखी गरगरत राहिली. राजानं चवताळून फर्मान सोडलं..

सैनिकांनी संतुकला राजाच्या दरबारात हजर केलं. सारा गाव चिल्यापिल्यांसह गोळा झाला. संतुकचे आई-वडील गर्भगळीत झालेले. अप्पानं अन् सीताक्कानं राजासमोर लोळण घेतली. राजाकडं संतुकच्या प्राणाची भीक मागितली. राजा ढिम्म. जराही त्याचं काळीज द्रवेना. त्याला पाझर फुटेना. सारं गाव चिनभिन. त्यांनाही अप्पाची अन् सीताक्काची दया येत होती. पण राजाच्या मर्जीसमोर ते हतबल होते. एवढ्याशा जिवाला देहदंडाची शिक्षा होण्याची वाट पाहणं त्यांच्या हातात होतं; अन् असा दुर्दैवी प्रसंग त्यांना आता पहावा लागणारच होता. एक म्हातारा कळवळला, की ईश्वरा माझे डोळे घेऊन टाक! ठार आंधळं कर मला! पण हे असं काही दाखवू नकोस. सीताक्कानं मोठा हंबरडा फोडला. परत एकदा राजाला विनंती केली.

राजा त्याच्या सिंहासनावरून उठला. लोकांनी डोळे बंद केले. चिमुकल्या जिवाचा शिरच्छेद. त्याची निरागस किंकाळी आता कानांवर येईल. लोकांनी डोळे आणखीनच बंद केले..! मात्र, तसं काही घडलं नाही. घडलं असं, की राजानं गावाला तंबी देत; संतुकला पहिला गुन्हा माफ केला.

असं जरी असलं तरी राजाची झोप मात्र उडाली होती. आपल्या मर्जीच्या खिलाप एवढासा पोरगा जातो म्हणजे काय! आपल्याला या लोकांमध्ये आणखी दहशत निर्माण करावी लागेल. हा विद्रोह आहे... हा देशद्रोह आहे... आपण त्याला माफ करायला नको होतं. काही झालं तरी आपल्या मर्जीला तडा गेला होता. खूप पश्चात्ताप राजाला झाला..
गोष्ट इथं संपली नाही. खरी गोष्ट तर पुढंच आहे..
दगडपूरच्या राजाच्या मर्जीनं जरी दिवस उगवायचा अन् मावळायचा, तरी वयावर थोडंच राजाचं नियंत्रण होतं. मुलाचा म्हातारा अन् म्हाताऱ्याचा मुलगा काय राजाच्या मर्जीनं होणार काय? म्हणून आपला संतुकही आता वीस वर्षांचा तरणाबांड युवक झाला होता. त्याला मिसरूट फुटलं होतं. मिशीला पिळा मारावा एवढी मोठी ती नव्हती, नाहीतर संतुकनं त्याच्या मर्जीनंच तिला पिळा मारला असता.

राजानं त्याच्या गाण्यावर अंकुश ठेवला होता, स्वप्नावर थोडाच. इथंच राजाची घोडचूक झाली. संतुकनं गेल्या पंधरा वर्षांत कितीतरी स्वप्नं पाहिली होती. त्याला त्याच्या स्वप्नांनी जे जे स्वप्नात दाखवलं, ते ते आता त्याला करून पहायचं होतं. पिढ्यान् पिढ्या ज्या गावात बाजरी पेरली गेली. आता त्याला वेगवेगळी पिकं घ्यायची होती. त्यानं आई-वडिलांना आपली इच्छा बोलून दाखवली.
“संतुक लेका तुला देहदंडाची शिक्षा झालेली आम्हाला पहावणार न्हायी. आम्ही जित्तं आहोत तवर अशी आगळीक करू नको; आमचं डोळं झाकलं, की तुला काय करायचं ते कर! तवर दम काढ!”
'किती दम काढायचा?”
'आमी सांगतो तवर!”
'दादू पिढ्यान् पिढ्या दम काढतच आला तुम्ही; आता नाही!”
'ठार मारील त्यो राजा तुला!”
'तुम्ही त्याला राजा म्हणता?”
'मग कोणय राजा न्हायी त?”
'हैवान आहे दादू तो, त्याच्या अघोरी मर्जीचं गुलाम जन्माला घातलं त्यानं! त्याच्या मर्जीलाच उखडून फेकीन मी!”

संतुकचे आई-वडील हादरले. गयावया करू लागले. तरी संतुक त्याच्या निर्णयापासून हलेना म्हणून जिवाचा आसबोस करू लागले. संताप संताप करू लागले. मग मात्र संतुकला त्यांचं दुखणं उमगलं. पिढ्यान् पिढ्याची सवय अंगवळणी पडत गेलेली माणसं होती ती. मर्जी रक्तातच मुरलीय त्यांच्या. इतक्या सहजी ती बाजूला होणार नाही. म्हणून त्यानं नमतं घेत, बिघडलेली परिस्थिती तवताक दुरुस्त केली. आई-वडिलांस हायसं वाटलं. त्यांचा जीव भांड्यात पडला. म्हणून तो त्याच्या निर्णयापासून हटला होता असं नाही, तो त्याच्या निष्ठेवर अचल होता. तो हळूहळू आई-वडिलांना समजावत गेला. त्याची ही समजावण्याची पद्धत दुखण्यावर दवा म्हणून असर करत गेली. आई-वडील राजाच्या मर्जीच्या बाहेर पडले होते असंही नाही; पण त्यांना संतुकचं म्हणणं पटायला लागलं होतं...

संतुकनं आपल्या वावरात उसाचं पीक केलं. संतुकचं उसाचं पीक गावभर चर्चेचा विषय झालं. नवलानं सारं गाव येऊन त्याचं पीक पाहू लागलं अन् संतुकचे गोडवे गाऊ लागलं. मात्र, ही वार्ता राजाच्या कानावर जाऊन पोचली. या बगावतीनं राजाची काय अवस्था होऊ शकते, हे तुम्ही जाणताच. पुन्हा वर्णन करून सांगायची मला वाटतं आवश्यकता नाही. राजानं आपल्या सैनिकांना आज्ञा केली...

राजानं साऱ्या गावाच्या समक्ष संतुकच्या उसाला आग लावली. त्या आगीत संतुकचंही जळीत झालं ...जळीत जेव्हा शांत झालं, त्यातून पुन्हा उसाचं पीक तरारून आलं. राजा परत आग लावू लागला. आग विझली की पुन्हा पीक तरारून यायचं. राजा त्याच्या सैनिकांना आग लावायची आज्ञा करायचा. सैनिक आग लावायचे, पीक जळायचं; पुन्हा उगवून यायचं. आता तर गावभरच्या शेतात वेगवेगळी पिकं उगवून येऊ लागली. राजा अन् त्याचे सैनिक आग लावून थकले.

लोकांना काय वाटलं माहीत नाही, त्यांनी हातात पेटता पलिता घेऊन घेराव घातला राजाला अन् सैनिकांना. नंतर राजवाडाही जाळून टाकला. अन् सारेच संतुकच्या उसाच्या शेतात येऊन उभे राहिले. संतुक उसाच्या पानापानांतून डोलत होता. आपण मुक्त झालो!!!!! लोक संतुकचा जयजयकार करू लागले.
त्यांनतर गावातील नदी स्वत:च्या मर्जीनं वाहू लागली. झाडाची पानं सळसळू लागली. गुरं स्वत:च्या मर्जीनं हंबरू लागली अन् पाखरं चिवचिवू लागली..
गोष्ट अजूनही पुढं वाढंतच जाईन... पण इथं संपली..!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com