स्मरण एका इतिहासाचे

अरुण खोरे
मंगळवार, 30 जानेवारी 2018

महात्मा गांधी यांच्या ७०व्या पुण्यतिथीनिमित्त गांधीजींच्या पुण्याशी असलेल्या ऋणानुबंधांविषयी.

महात्मा गांधी यांच्या ७०व्या पुण्यतिथीनिमित्त गांधीजींच्या पुण्याशी असलेल्या ऋणानुबंधांविषयी.

स्वातंत्र्यलढ्याचा लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतरचा कालखंड हा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील लढ्याचा होता. या लढ्याचा एकूण कालखंड ज्या प्रमुख शहरांमध्ये विशेष प्रभावाने नोंदला गेला, त्यात पुणे व मुंबई प्रामुख्याने होते. गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून ना. गोपाळ कृष्ण गोखले यांचे नाव इतिहासात नोंदले गेले आहे. त्यांची भेट घेण्यासाठी गांधीजी पुण्यात आले होते आणि त्यानंतर अल्प काळात या दोघांचे जे ऋणानुबंध निर्माण झाले, त्याचा प्रभाव स्वातंत्र्य चळवळीवर कायम राहिला. गोखले ज्या ‘सदाचारी राजकारणा’ची भूमिका मांडत होते, तीच भूमिका गांधीजींनी स्वीकारली आणि त्यातून पुढे अनेक चळवळींना आकार आणि आशय मिळाला. 

दक्षिण आफ्रिकेतील प्रदीर्घ वास्तव्यानंतर १९१५ मध्ये जानेवारीत गांधीजी उतरले ते मुंबई बंदरावर. येथूनच त्यांची खरी ‘भारत-यात्रा’ सुरू झाली. ते भारतात परतण्याचे मुख्य कारण होते गोखले. दक्षिण आफ्रिकेतील आंदोलनात मार्गदर्शन करण्यासाठी गोखले १९१२मध्ये तेथे गेले होते.

त्याचवेळी त्यांनी गांधींना ‘तुम्ही भारतात यायला हवे, तेथे तुमची जास्त गरज आहे’, असे सुचविले होते. यानंतर गांधींची भारतात परतण्याची तयारी सुरू झाली आणि डिसेंबर १९१४ला त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला.

गोखले यांनी पुण्यात स्थापन केलेल्या ‘भारत सेवक समाजा’च्या कामात गांधींनी यावे, असे त्यांना वाटत होते. ‘सत्याचे प्रयोग’ या आत्मचरित्रात पुणे शहरासंबंधी गांधींनी तेथील मोठ्या नेत्यांविषयी लिहिले आहे. या भेटीत त्यांनी लोकमान्य टिळक, गोखले, डॉ. रामकृष्ण भांडारकर या मान्यवरांशी चर्चा केली. ‘ही संस्था तुमचीच आहे, असे समजा’, असे गोखले यांनी त्यांना सांगितले. ‘एकूणच गोखले यांचा प्रभाव आपल्यावर पडला आणि एखाद्या आईप्रमाणे त्यांनी मला सांगितले व समजावून घेतले’, असे गांधीजींनी म्हटले आहे. ‘सर्व भारत पाहून या आणि मग प्रत्यक्ष कामाला सुरवात करा’, हा गोखल्यांचा सल्ला त्यांनी मानला आणि भारतभ्रमण केले. 

असहकार चळवळीच्या काळात गांधीजी १९२२-१९२४ या काळात येरवडा कारागृहात होते. या काळात गांधीजींना ॲपेंडिक्‍सचा त्रास सुरू झाला. त्यांना १२ जानेवारी १९२४ रोजी ‘ससून’मध्ये हलविण्यात आले. कर्नल मॅडोक या ब्रिटिश सर्जनने गांधीजींचे ॲपेंडिक्‍सचे ऑपरेशन लवकर करण्याची निकड व्यक्‍त केली. ब्रिटिशांना काळजी एवढीच होती, की गांधींच्या जिवाला काही बरेवाईट होऊ नये, म्हणून एक निवेदन तयार करण्यात आले. भारत सेवक समाजाचे प्रमुख श्रीनिवास शास्त्री आणि गांधीजींचे मित्र डॉ. पाठक यांना हे निवेदन करण्यासाठी बोलाविण्यात आले. त्यात स्पष्ट करण्यात आले, की गांधींवर उत्तम उपचार केले जात आहेत. त्यांना काही झाले, तर त्यातून सरकारविरोधी आंदोलन करणे योग्य नाही. या निवेदनावर गांधींनी सही केली. सुदैवाने शस्त्रक्रिया वीस मिनिटांत यशस्वीरीत्या पार पडली. 

त्यांचा सर्वात मोठा वैचारिक, सामाजिक व राजकीय संघर्ष झाला, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर. दलित वर्गाच्या प्रश्‍नांवर देशभरात गांधींनी जागृती केली, त्याचे महत्त्व लक्षात घेऊनही गांधी प्रश्‍नाचे विश्‍लेषण चुकीचे असल्याचे मत आंबेडकर मांडत होते. ब्रिटिशांनी अस्पृश्‍यांसाठी वेगळे मतदारसंघ असलेला जातीय निवाडा जाहीर केल्यावर गांधीजींनी त्याला विरोध केला आणि आमरण उपोषण येरवडा कारागृहात सुरू केले. शेवटी स्वतंत्र मतदारसंघांऐवजी संयुक्‍त मतदारसंघांचे आरक्षण दिले जावे, हा तोडगा गांधीजींनी मान्य केला. नंतर ‘पुणे करार’ झाला आणि डॉ. आंबेडकरांनी त्यावर सही करून देशातील एक मोठा तणाव आणि संघर्ष संपवला. एका बाजूने गोखल्यांच्या सदाचारी राजकारणाचा वारसा आणि दुसरीकडे डॉ. आंबेडकरांनी सुरू केलेल्या विषमताविरोधी सामाजिक आंदोलनाला खराखुरा प्रतिसाद अशा दोन्ही पातळ्यांवर पुणे शहरात गांधीजींनी ऐतिहासिक दायित्व पार पाडले.

‘चले जाव’ आंदोलनानंतर गांधीजी, कस्तुरबा, महादेवभाई देसाई यांना पुण्याच्या ‘आगाखान पॅलेस’मध्ये बंदिवासात ठेवण्यात आले. हा कालखंड ऑगस्ट १९४२ ते मार्च १९४४ असा होता. गांधीजींचे पुत्रवत सचिव असलेले महादेवभाईंचे तेथे निधन झाले. फेब्रुवारी १९४४ मध्ये कस्तुरबांचे निधन झाले. गांधींच्या या दोन्ही प्रियजनांच्या स्मृतिशलाका आगाखान पॅलेसमध्ये जतन करून ठेवल्या आहेत.आज ते व्यापक अर्थाने गांधीजींचे राष्ट्रीय स्मारक झाले आहे.

Web Title: saptrang article arun khore mahatma gandhi history pune