esakal | कोल्हापूरला संधी आभाळ भरारीची
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारित कामाचे संकल्पचित्र

कोल्हापूरला संधी आभाळ भरारीची

sakal_logo
By
डॉ. श्रीरंग गायकवाड

कोल्हापूर विमानतळावर नाइट लॅंडिंग सुविधेसह कार्गो हब, पार्किंगसारख्या सुविधांची ग्वाही केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. त्यामुळे कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरी, तसेच शेतीमालाची हवाई वाहतूक सुरू होऊन विकासाचे नवे पर्व सुरू होईल.

कोल्हापूर येथील विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव दिल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी परवा कोल्हापुरात केली. याच वेळी त्यांनी कोल्हापूर विमानतळावर लवकरच नाइट लॅंडिंग सुविधेसह कार्गो हब, पार्किंग, सर्व्हिसिंग सेंटर आणि लॉजिस्टिक पार्क निर्माण केले जाईल, अशी ग्वाहीही दिली. या सुविधा झाल्यास कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरी, तसेच शेतीमालाची हवाई वाहतूक सुरू होऊन छत्रपती राजाराम महाराज यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल.

राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा जोपासणाऱ्या छत्रपती राजाराम महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात दळणवळण आणि व्यापारवाढीसाठी विमान वाहतुकीचे स्वप्न पाहिले. त्यासाठी त्यांनी कोल्हापूरजवळच्या उजळाईवाडीच्या माळावर १७० एकर जमीन संपादित केली. १९३० ते १९३५ या कालावधीत विमानतळाचे काम सुरू झाले. त्याचे उद्‌घाटन ५ जानेवारी १९३९ रोजी झाले. ४  मे १९४० रोजी कोल्हापुरातून पहिले विमान झेपावले.
या विमानतळाच्या माध्यमातून कोल्हापुरातील उद्योग, शेतीक्षेत्राला नवे आभाळ देण्याची राजाराम महाराज यांची दृष्टी काळा पुढची होती. दुर्दैवाने त्यांच्यानंतर या विमानतळाकडे दुर्लक्ष झाले. १९७८-७९ मध्ये त्याच्या विस्तारीकरणास पुन्हा मुहूर्त लागला. त्यानंतरही विकासामध्ये नाना अडथळे येत आहेत. मोठी विमाने उतरवण्यासाठी विमानतळाजवळील १३० हून अधिक अडथळे दूर करणे किंवा त्याऐवजी शेजारच्या हद्दीतील ६४ एकर जागा अधिग्रहित करणे, रात्रीची सेवा सुरू राहण्यासाठी आवश्‍यक वाढीव धावपट्टीसाठी नऊ एकरांहून अधिक शेतजमीन संपादन करणे, विमानतळाच्या दक्षिण हद्दीतून जाणारा रस्ता बंद करून पर्यायी रस्ता देणे, विमानतळासाठी आवश्‍यक वन खात्याच्या १५ हेक्‍टरहून अधिक जागेची भरपाई देणे इत्यादी अडथळे दूर होणे गरजेचे आहेत.
नियमित विमानसेवा हवी
कोल्हापूर विमानतळावरून सध्या केवळ १८ आसनी विमानाचे उड्डाण होते. येथे मोठ्या प्रवासी क्षमतेची विमानसेवा सुरू व्हावी, अशी आग्रही मागणी आहे. नियमित विमानसेवेअभावी मोठ्या कंपन्या कोल्हापूरकडे येण्यास नाखूष असतात. उद्योगपूरक वातावरण, पाणी, रस्ते, कुशल मनुष्यबळ यांसारख्या सुविधा असूनही विमानसेवा नसल्याने मोठ्या कंपन्या कोल्हापूरकडे पाठ फिरवतात. परिणामी रोजगारनिर्मिती खुंटली. पुणे, नाशिक, औरंगाबाद या शहरांच्या तुलनेत कोल्हापूर मागे पडले. शेजारील कर्नाटकातील बेळगाव, हुबळी ही शहरे वेगाने विकसित होत आहेत. कोल्हापुरातील उद्योग कर्नाटकात जाण्याचादेखील धोका वाढला आहे. हे रोखण्यासाठी नियमित विमानसेवा आवश्‍यक आहे. शिवाय, मुंबई, हैदराबाद, तिरुपती या विमानसेवेवर समाधान न मानता कोल्हापूरहून सिंगापूर, दिल्ली, कोलकाता अशी विमानसेवा सुरू होण्यासाठी मोठी धावपट्टी आवश्‍यक आहे. धावपट्टीचे विस्तारीकरण झाल्यास ‘एअरबस ए ३२०’सारखी मोठी विमाने येथे उतरू शकतील. ‘उडे देश का आम नागरिक’ (उडान) ही योजना केंद्र सरकारने २०१७ मध्ये जाहीर केली. त्यातील ‘उडान-३’ टप्प्यात कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी घोडावत एव्हिएशन आणि ट्रू जेट या दोन कंपन्यांना केंद्राने मुभा दिली. त्याचाही लाभ कोल्हापूरला होईल. कोल्हापूर-मुंबई, कोल्हापूर-हैदराबाद आणि कोल्हापूर-बंगळूर या हवाईमार्गावर सेवा सुरू करण्याला ‘उडान’ योजनेच्या पहिल्या दोन टप्प्यांत मंजुरी मिळाली होती; पण डेक्कन चार्टर कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे कोल्हापूर-मुंबई मार्गावरील सेवा खंडित झाली. सध्या कोल्हापूरहून हैदराबाद आणि बंगळूरसाठी अलायन्स एअरची विमाने दररोज उड्डाण घेतात, त्याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे.

विमानतळ विकासामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतमाल मुंबई, दिल्ली  विमानतळांवर वेळेत पोचेल. कवठेमहांकाळ येथे द्राक्ष, बेदाणा निर्यातीसाठी ड्रायपोर्ट होत आहे. त्यामुळे सांगली तसेच कोकणासाठीही हा विमानतळ वरदान ठरेल.  प्रस्तावित विमानतळ आराखड्यातील नवीन इमारतीत महिला बचत गटांना स्टॉल्स देण्यात येणार आहेत. त्यातून कोल्हापूरच्या वस्तू, पदार्थ परदेशी जातील. कोल्हापूर-कोकण रेल्वेने जोडण्याची मागणी वीस वर्षांपासून सुरू होती. अखेर त्याला मंजुरी मिळून कामालाही सुरवात होत असल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले. यातून कृषी, उद्योग, पर्यटन विकासाचे पर्व सुरू होईल. फक्त नेत्यांनी मतभेद दूर ठेवून एकत्र यावे.श्रेयासाठी पायात पाय घालणे सोडून द्यावे लागेल. तर विकासाच्या आभाळात कोल्हापूर भरारी घेऊ शकेल.

loading image
go to top