‘होमिओपॅथी’सारखी विचारधारा

‘होमिओपॅथी’सारखी विचारधारा

पंतप्रधान मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पावर होत असलेली टीका हे आपल्या सामूहिक भयगंडाचे उदाहरण ठरू शकते. अशाच प्रकारच्या भयगंडातून आपण अनेक चांगली, गुणकारी औषधे दूर सारतो आणि छान दिसणाऱ्या, चवीला गोड, मात्र परिणामशून्य औषधांना जवळ करतो.  

होमिओपॅथी ही वैद्यकशास्त्रातील तुलनेने अलीकडची उपचारपद्धती. जर्मनीतील सॅम्युअल हॅनेमन यांनी १७९६मध्ये होमिओपॅथीचा शोध लावल्याचे (खरंतर अशा एका उपचारपद्धतीची कल्पना मांडल्याचे) सांगितले जाते. शोध लागल्यापासून आजपर्यंत होमिओपॅथीचे कधी स्वागत झाले, कधी तिच्याविषयी प्रश्न उपस्थित केले गेले, कधी त्यावर नवे संशोधन समोर आले आणि त्यानंतर जगातल्या अनेक विकसित देशांनी ही उपचारपद्धती कायमची बंदही करून टाकली. किंबहुना, यात कुठलाही वैज्ञानिक दृष्टिकोन न आढळल्यामुळे आणि कसलेही वैज्ञानिक स्पष्टीकरणच नसल्यामुळे आता होमिओपॅथी हे एक छद्मविज्ञान (सुडो सायन्स) असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

एवढे सारे होऊनही होमिओपॅथी कधीतरी उपकारक ठरते, अशी उदाहरणे दिसून येतात, नाही असे नाही; पण रुग्णांचे हे ‘बरे होणे’ हे होमिओपॅथीच्या ‘परिणामकारक’ असण्यामुळे नसून, आपण काहीतरी ‘औषध’ घेतल्याने रुग्णांना जो तात्पुरता मानसिक आधार मिळतो, त्यातून ‘खरंच बरे झाल्यासारखे’ वाटते. त्यामुळे असल्याचेही दिसून आले आहे; पण हे असे असतानाही होमिओपॅथीचे जगभरातले अंधविश्‍वासू पाठिराखे मात्र कोट्यवधी रुपयांची होमिओपॅथिक औषधे दरवर्षी न चुकता घेत राहतात, हेही तितकेच खरे आहे.

इतर देशांचे जरा बाजूला ठेऊया. भारतात मात्र होमिओपॅथी अजूनही मोठ्या निष्ठेने आपले अढळपद टिकवून आहे आणि अजूनही ही मुख्य प्रवाहातील थेरपी म्हणून वापरली जातेय. इथे प्रत्येक लहान-मोठ्या शहरात त्याची स्वतःची म्हणून एक होमिओपॅथिक डॉक्‍टरांची फळी टिकून आहे. त्यातही सर्वांत लोकप्रिय होमिओपॅथिक डॉक्‍टर म्हणून ‘डॉ. बॅनर्जी’ हे नाव प्रसिद्ध आहे. या होमिओपॅथीचे ‘फॅड’ तिच्या मूळ देशी म्हणजे जर्मनीत आता पुरते संपल्यात जमा आहे. भारतात मात्र होमिओपॅथिचे महत्तव आजही अबाधित आहे. हे कमी की काय म्हणून होमियोपॅथिच्या वाढीसाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘आयुष’ (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी) मंत्रालयाच्या नावातच होमिओपॅथी असल्यामुळे सरकारी पातळीवरील या थेरपीचे महत्त्व ध्यानात येऊ शकेल. आपल्या देशात होमिओपॅथीची थट्टा करणे धोकादायक ठरू शकते, अशी परिस्थिती आहे. या विषयाला हात घातल्याबद्दल माझ्या विरोधातही राळ उठविण्यात येईल यात शंकाच नाही.

आज होमिओपॅथीने अधिकृतपणे स्वदेशी वैद्यकीय उपचारपद्धतीचा दर्जाही मिळवला आहे, हे उल्लेखनीय म्हणावे लागेल. यावरून असा प्रश्‍न पडू शकतो की, भारतीय जनमानसावर होमिओपॅथीचा ऐवढा पगडा का असावा? त्याची कारणेही तशीच आहे. भयगंड असलेल्या लोकांसाठीच खऱ्या अर्थाने होनिओपॅथी ही थेरपी तयार करण्यात आली आहे. त्यापैकी एक कारण म्हणजे या थेरपीचे दुष्परिणाम (साइड इफेक्‍ट) होत नाहीत. आधुनिक औषधांचे दुष्परिणाम होतातच. या दुष्परिणामांनाच आपण घाबरत असतो. औषधामुळे आपल्याला काही झाले तर? ही भीती असतेच. शस्त्रक्रिया म्हटली तर अजूनच कानाला खडा! अशा परिस्थितीत आपण इतर औषधांकडे कसे वळणार? मग आपली होमिओपॅथीच बरी असे वाटू लागते. हे सारे पाहून असा प्रश्‍न पडतो की, आपण राष्ट्र म्हणून एखाद्या ‘होमिओपॅथिक विचारसरणी’चे बळी तर ठरलो नाही आहोत ना? इतर कुठल्या नव्या विचारांचे जग असू शकते, हेच ठाऊक नसलेल्या लोकांचा देश बनलो आहोत का? हे कदाचीत खरेही असू शकते. 

आपल्या याच ‘होमिओपॅथिक विचारसरणी’चा फटका आपल्या पायाभूत सुविधानिर्मितीला आणि एकूणच प्रशासन पद्धतीला बसलाय. तुम्ही एखाद्या नव्या कुठल्या प्रकल्पाचे नाव घ्यायचा अवकाश, की लगेच असंख्य लोकं तुमच्यापुढे त्यातल्या अनन्वित अडचणींचा पाठच वाचायला हजर होतील. विशेषतः नवे काही करायला घेतलेले कसे आर्थिक-सामाजिकदृष्ट्या नुकसानकारक आहे, हेच हिरिरीने सांगू लागतील. आता परवाचेच बुलेट ट्रेनचे उदाहरण घ्या. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कोनशिला समारंभानंतरही अशाच प्रकारची प्रतिक्रिया उमटली. त्यातलीच एक प्रतिक्रिया होती ती काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेले ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांची. तर काय म्हणाले हे सिंघवीसाहेब? म्हणे, ‘शाहजहानच्या ताजमहालाने भारतात आर्थिक संकट आणले. दुष्काळ, उपासमार आणि दारिद्रय आणले होते. आता आपणही बुलेट ट्रेन आणू पाहतोय. ती पळेलही उत्तम. बघूयात...’ सिंघवी पुढे काही बोलले नाहीत; पण त्यांचा रोख मात्र नक्कीच कळू शकणारा होता.

सिंघवींच्याच वक्तव्याच्या धाटणीतील अजूनही काही प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. कमी अधिक प्रमाणात त्यांचा रोख एकच होता, भारताला ही बुलेट ट्रेन परवडणारी आहे का? ती किती वर्षे चालू शकेल? त्यातून पैशांचा अपव्यय किती होणार? अशा अनेक शंकाकुशंका अनेकांनी उपस्थित केल्या. यातल्या कुणाचाही रोख दुर्दैवाने त्या बुलेट ट्रेनचे काही किमान फायदे तरी असतील, हे साधे समजूनही घेण्याचा नव्हता.

हे असेच नेहमी होते. देशात एखादा महत्त्वाचा प्रकल्प सुरू करण्याचा साधा विचारही करण्याचा अवकाश, की लगेच त्यातील उणिवांवर बोट ठेवायला सुरवात. अनेकदा तर या उणिवांची तार्किक खातरजमाही केली जात नाही. या नकारात्मक प्रकारांमुळेच आपण मोठी धरणे बांधण्याच्या किंवा नदीजोड प्रकल्पांसारख्या नव्या गोष्टींना शब्दशः तिलांजली देत चाललो आहोत!
वीस-पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा महाराष्ट्राचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीची आखणी केली होती, तेव्हाही असेच झाल्याचे अनेकांच्या लक्षात असेल. मोठ्या प्रमाणात टीका झाली होती आणि आक्षेपही घेतले होते; पण आज ‘एक्‍स्प्रेस वे’शिवायच्या जगाची कल्पनाही करू शकत नाही. काही समस्या नाकारता येणाऱ्या नसल्या तरीही या द्रुतगती महामार्गाचे फायदेच अनेक आहेत. तो होणे गरजेचेच होते. भूतकाळात अनेकदा अशा नव्या कल्पनांना प्रत्यक्ष आकार घेण्याआधीच चिरडून टाकण्याची ‘जबाबदारी’ नियोजन आयोग नामक संस्थाच पुरेशा चांगल्याप्रकारे (!) सांभाळत होती. आज हा आयोगच नाही, हे बरे. अन्यथा मेट्रोपासून हवाई वाहतुकीपर्यंतच्या अनेक नवनव्या कल्पनांना कदाचित फायलींमध्येच अंतिम श्‍वास घावा लागला असता.

अर्थात, अनेकदा नवकल्पनांवर ‘होमिओपॅथिक विचारसरणी’चा विजय झाल्याचेच आपल्याकडे पाहायला मिळेल. मग तो वांद्रे-वरळी सागरी सेतूची लांबी कमी करण्यातून असो, दिल्लीतल्या पूर्वपश्‍चिम बारापुल्ला कॉरिडोअरचे थांबवले गेलेले काम असो किंवा इतरही अनेक. या सगळ्यांचा परिणाम होतो तो एकच- आपल्या देशात सतत बांधकामे सुरू होतात, थांबवली जातात, नंतर गरज वाटल्यावर पुन्हा अधिकच्या खर्चाने बांधकामे सुरू केली जातात. हेच सतत पाहायला मिळेल!

आज भले मोदी सरकार खऱ्याखुऱ्या होमिओपॅथीला नको तेवढे प्रोत्साहन देत असले, तरीही बुलेट ट्रेनसारखी नवी आव्हाने हे सरकार पेलू पाहतेय. यातून निदान ‘होमिओपॅथिक’ विचारांना तरी ते अद्याप चिकटत नाहीये, हे दिसतेय, हे मान्य करायला 
हरकत नाही.
(अनुवाद - स्वप्नील जोगी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com