चटका लावणारी गावोगावची होर्डिंग्ज

Hording
Hording

रस्त्याच्या कडेला लक्ष वेधून घेणारी, तरुण मुलांना श्रद्धांजली वाहणारी होर्डिंग्ज अलीकडे वाढली आहेत. थोडी दक्षता बाळगली, वेगाच्या थराराला बळी न पडण्याची काळजी घेतली, पालकांनी मुलांना समज दिली आणि मुलांनी ते समजून घेतले, तर मानवी चुकांमुळे होणारे तरुणांचे मृत्यू टाळता येऊ शकतील.

रस्त्याच्या आजूबाजूला उभारलेली होर्डिंग्ज आणि त्यावरील आडव्या-उभ्या रांगेतल्या छबींवर यथेच्छ विनोद करून झाले असतील, तर थोडे गंभीर विषयाकडे वळूया. अगदी उच्च न्यायालयाने वारंवार ताशेरे ओढून, स्थानिक स्वराज्य संस्थांना वेळोवेळी कामाला लावूनही होर्डिंग्ज कमी झालेली नाहीत.

वाहतुकीचे अडथळे ‘जैसे थे’ आहेत. समाधान हेच की त्याविरोधातील लढाही थांबलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर, अलीकडे ज्यांचे प्रमाण वाढले आहे अशी काही होर्डिंग्ज नकळत मन खिन्न करून जातात. त्यावरील फोटो-मजकुराचे संदर्भ माहिती असतील तर डोळ्यांच्या कडाही ओल्या होतात. प्रत्येक संवेदनशील माणसाला विचार करायला लावणारा तो तपशील असतो व त्यात मोठा संदेशही असतो. 

हे चित्र कोण्या जिल्ह्याचे, प्रदेशाचे राहिलेले नाही. राज्याच्या, किंबहुना देशाच्या प्रत्येक भागात कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र असेल. होर्डिंग कोणतेही असू द्या, त्यावरील छायाचित्रे साधारणपणे सारख्याच वयोगटातील असतात. ते अभिनंदनाचे असो, वाढदिवसाचे असो, की ज्यामुळे आपण दिग्मूढ होऊ, अशा या मजकुराच्या गंभीर विषयाचे असो.

रस्त्याच्या आजूबाजूला ठळकपणे लक्ष वेधून घेणारी तरुण मुलांना श्रद्धांजली वाहणारी, त्या जेमतेम विशी-पंचविशीच्या आयुष्यातील आठवणींना उजाळा देणारी होर्डिंग्ज वाढली आहेत. ज्यांच्या तरुण डोळ्यांमध्ये तरळणारे भावी आयुष्याचे, जगण्याच्या संघर्षातील विजयाचे स्वप्न त्यांच्या आकस्मिक, अपघाती निघून गेल्यानंतरही स्पष्ट जाणवावे, असा चेहरा, सभोवती फुलांची सजावट आणि त्याखाली त्याच्या शोकाकुल मित्रांची नावे, असे सर्वसाधारणपणे हे फलक. या मुलांच्या माता-पित्यांनी, आप्तांनी, शेजारीपाजारी व ते जिथे शिकत असतील तेथील संबंधितांनी कौटुंबिक, सामाजिक, झालेच तर भावनिक व आर्थिक गुंतवणूक केलेली असते. ही मुले कुटुंबाचे, गावाचे, समाजाचे नाव मोठे करतील, अशी आशा बाळगलेली असते. क्षणाच्या थरारापोटी ही कोवळी मुले जीव धोक्‍यात घालतात आणि मागे एक कधी न संपणारा काळोख सोडून परत न येण्यासाठी निघून जातात. 

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबई-आग्रा महामार्गावर रात्री उशिरा एक अपघात झाला. ‘नो एन्ट्री’त स्पोर्टस बाइक भरधाव चालविणाऱ्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही ग्रामीण दलात कार्यरत असलेल्या पोलिसांची मुले होती. अपघातस्थळाचे दृश्‍य अंगावर काटा आणणारे होते. असे अपघात आता रोजच होऊ लागलेत. अंत्यसंस्कारावेळी लोक हळहळतात. पोरांना समजावून सांगण्याचा निर्धार करतात. पण, हा निर्धार ज्यांच्या घरातला कोवळा मुलगा गेला त्या पलीकडे पोचतच नाही आणि दु:खाच्या प्रसंगांची मालिका सुरूच राहते. या वाढत्या अपघातांमध्ये अकाली मृत्युमुखी पडणाऱ्या तरुण मुलांची जितकी चूक आहे, तितकीच ती त्यांच्या पालकांचीही आहे. मुलांचे शिक्षण व करिअरबाबत एकीकडे कमालीचे दक्ष असणारे, त्यांच्यासाठी रात्रीचा दिवस करणारे पालक दुसरीकडे त्यांच्या जीविताच्या सुरक्षेबाबत मात्र दक्ष नसतात. मुलांचे अतिलाड पुरवताना रस्त्यांवरील मृत्यूचे सापळे व बेशिस्त, धोकादायक वाहनांचा विचार न करता त्यांना वेगवान, महागड्या बाइक सहज उपलब्ध करतात. हेल्मेटसारख्या जीव वाचविणाऱ्या साधनांचा आग्रह धरीत नाहीत. परिणामी, अतिलाड जिवावर बेततात. 

पुण्यात हेल्मेटसाठी पोलिसांची मोहीम सुरू आहे. अशीच मोहीम नाशिक पोलिसांनी मध्यंतरी राबविली. त्या निमित्ताने समोर आलेली आकडेवारी धक्‍कादायक आहे. नोव्हेंबरपर्यंतच्या अकरा महिन्यांमध्ये नाशिक शहर परिसरात, पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या अपघातांमध्ये ११० दुचाकीस्वारांचा जीव गेला. त्यापैकी ९६ जणांनी हेल्मेट वापरले नव्हते. २०१७ मध्ये नाशिक शहरात ६३१ अपघातांमध्ये १४० पुरुष व ३१ महिला असे १७१ मृत्यू झाले. पस्तिशीच्या आतील मृतांची संख्या ८२ होती व सात मृत तर अठराच्या आतील होते. मावळत्या वर्षात अपघातांची संख्या ५८० पर्यंत कमी झाली, पण मृतांची संख्या २१७ वर गेली. आधीच्या वर्षाच्या तुलनेत जवळपास दीडपट, एकूण १२४ जण पस्तिशीच्या आतील होते. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २०१७ मध्ये ६६३ अपघातांमध्ये ७३३ मृत्यू झाले. त्यापैकी पस्तिशीच्या आतील मृतांची संख्या ३३३ इतकी होती.

मावळत्या २०१८ मध्ये तुलनेने अपघात व मृत्यू दोन्हींमध्ये वाढ झाली. ७६४ अपघातांमध्ये ८२५ जीव गेले. त्यापैकी ३५४ मृतांचे वय पस्तीसच्या आत होते. दोन्ही वर्षांमधील मृतांमध्ये दुचाकीस्वारांची संख्या मोठी आहे. 

त्यामुळेच नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात, विशेषत: मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील गावांमध्ये किंवा नाशिक-पुणे, नाशिक-औरंगाबाद आणि गुजरामधील सुरतकडे अथवा मनमाड, सटाणा या शहरांमधून जाणाऱ्या राज्य महामार्गावरील परिसरात जागोजागी कुटुंबांच्या, समाजाच्या भविष्याला श्रद्धांजली वाहणाऱ्या होर्डिंग्जची संख्या नजरेत भरेल इतकी वाढली आहे. हे खरे आहे, की हे अपघातच आहेत व ते शून्यावर येणे सध्या तरी शक्‍य नाही. गाड्या नादुरुस्त झाल्याने, रस्त्यावरच्या अडथळ्यांचा अंदाज न आल्याने अपघात होणे समजूही शकते. परंतु, जिथे थोडी दक्षता बाळगली, वेगाच्या थराराला बळी न पडण्याची काळजी घेतली, पालकांनी मुलांना समज दिली, मुलांनी ते समजून घेतले, तर मानवी चुकांमुळे होणारे तरुणांचे मृत्यू टाळता येऊ शकतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com