तुमच्याबद्दल विश्र्वास जागवा... (अशोक शिंदे )

अशोक शिंदे (saptrang.saptrang@gmail.com)
Sunday, 15 November 2020

पालकत्व ही फार महत्त्वाची जबाबदारी आहे, ती कोणतीही तक्रार न करता आयुष्य आहे तोपर्यंत निभावली पाहिजे. पालकत्व हे फक्त मुलांचं नसतं, तर त्यात पत्नी, आई, वडील हे सर्वजण येतात.

पालकत्व हे फक्त मुलांचं नसतं, तर त्यात पत्नी, आई, वडील हे सर्वजण येतात. त्यांचीही जबाबदारी आपलीच असते, ती शेवटपर्यंत निभावली पाहिजे. मी तर याही पुढं जाऊन म्हणेन, की सेटवर नवीन येणाऱ्या मुलांकडून, अथवा अन्य कोणाकडून मोठ्यांचा, स्त्रियांचा मान ठेवला जात नसेल, तर सिनिअर कलाकार म्हणून त्यांना थांबवणं हेसुद्धा पालकत्वच आहे. सिनिअर कलाकार म्हणून मी ते केलं पाहिजे आणि ते मी करतो. पालकत्व ही फार महत्त्वाची जबाबदारी आहे, ती कोणतीही तक्रार न करता आयुष्य आहे तोपर्यंत निभावली पाहिजे. 

माझे बाबा रंगभूषाकार होते, मलाही याच म्हणजे नाट्य -चित्रपटसृष्टीत; पण अभिनय क्षेत्रात करिअर करायची इच्छा सुरुवातीपासून होती. माझ्या करिअरची सुरुवात मी रंगभूषाकार ( मेकअप आर्टिस्ट) म्हणून केली. बाबा म्हणायचे, ‘‘या क्षेत्रात तू जे शिकशील, ते काम तुला शेवटपर्यंत रोजी-रोटी देत राहील.’’ त्याचं महत्त्व मला आता कळतंय. खलनायकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारताना आणि त्यानुसार गेटअप करताना एका मेकअप मॅनमुळे अख्ख्या युनिटचं काम अडतं; पण मी स्वतःचा मेकअप स्वतःच करत असल्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा मीच तयार असतो. मेकअप लावण्यापासून काढण्यापर्यंत मला सगळं काही येत असल्यानं मला या गोष्टीचा फायदा झाला. शिकलेली कुठलीच गोष्ट वाया जात नाही, या बाबांच्या शिकवणुकीचा प्रत्यय मला वेळोवेळी येतो. त्यांनी सांगितलेली आणखी एक गोष्ट म्हणजे, या इंडस्ट्रीत लाज बाळगू नकोस, केव्हा काय गरज पडेल सांगता येत नाही. मला कायमच नाटकात, चित्रपटात काम करताना त्यांच्या शिकवणुकीचा उपयोग झाला. 

"कधी कोणाशी तुलना करू नकोस," हे मला आईनं सांगितलं. मला आठवतंय, त्या वेळी वेगवेगळे नावाजलेले हिरो, निर्माते आपल्या मुलांना संधी देण्यासाठी स्वतः पिक्चर काढत होते. ते बघून, आपल्याही बाबतीत असं घडावं, असं मला वाटू लागलं. ते वयही तेवढं नव्हतं. त्या वेळी आई मला म्हणाली, प्राप्त परिस्थितीत हे शक्य नाही. मी चुकीच्या गोष्टी तुझ्या डोक्यात भरणार नाही. धर्मेंद्रनं त्याच्या मुलासाठी पिक्चर काढला याचा विचार करण्यापेक्षा, स्वतः धर्मेंद्र कसा होईल याचा विचार कर आणि करिअरची सुरुवात कर." मला हा कानमंत्रच मिळाला. ती म्हणाली, "जगात खूप समस्या आहेत, तू रडत बसलास, तर कायम रडत राहशील. त्यामुळं त्यावर मात कर, स्वतः घराबाहेर पड, पुण्याहून मुंबईला जा, तूझा तू शोध घे. चूकूनही नातेवाइकांकडून अपेक्षा ठेवू नकोस. नातेवाईक, मित्र मदत करतील, असा विचार करू नकोस. इथं तुझं तुलाच सिद्ध करायचं आहे." 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

तिसरी आणखी महत्त्वाची आई-बाबांकडून शिकलेली गोष्ट म्हणजे ‘आत्मसन्मान’! त्यांनी मला सांगितलं होतं, की वेळ पडली तर कोणाकडून उसने पैसे घ्यायला हरकत नाही; पण ते वेळेत परत कर. प्रयत्न करूनही पैसे द्यायला उशीर होत असेल, तर जाऊन त्यांना भेट आणि सांग, की मला अजून थोडा वेळ द्या, मी पैसे देतो. तुझा शब्द पाळ. ही गोष्ट तुला आयुष्यभर उपयोगी पडेल. लोकांची उदाहरणं देत बसू नकोस आणि पहातही बसू नकोस, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं असतं. ही शिकवण मला योग्य वेळी मिळाल्यामुळं करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर जो वेळ वाया जातो, तो गेला नाही. त्यामुळं बत्तीसपेक्षा जास्त वर्षं मला या इंडस्ट्रीत झालीत, अजून इथं टिकून आहे. आई-बाबांनी सांगितलेली आणखी एक मोलाची गोष्ट म्हणजे, हे सगळं जे आहे ते क्षणिक आहे. घड्याळाचा काटा बारावर आला तरी तो थांबणार नाहीये, तो खाली येण्यासाठीच असतो, त्यामुळं तू थांबू नकोस, चालत राहा, अभिमान, इगो ठेवू नकोस, जे मिळालंय ते आनंदानं स्वीकार आणि आनंदानं जग. माझं शिक्षण पूर्ण करण्याबाबत ते आग्रही होते. त्यामुळं अभिनय क्षेत्रात येणार असलो, तरी मी बी.ई. इलेक्ट्रिक्स पूर्ण केलं. बाबांचं म्हणणं होतं, की शिक्षणामुळं सद् सद्विवेक बुद्धी येते, प्रगल्भता येते. मला खरंच या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा झाला. 

बाबा मेकअप आर्टिस्ट होते; पण त्यांच्या सुरुवातीच्या काळात आम्हाला थोडं आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं. एकदा मी बाबांबरोबर सायकलवरून बेकरीत गेलो होतो. मी वयानं लहान होतो, भरपूर खेळायचो, त्यामुळं भूकही खूप लागायची. आम्ही गेलो त्याच वेळेस एक बाई तिथं आल्या, त्यांनी दोन डझन अंडी घेतली. ब्रेड, केक्स वगैरे गोष्टी घेतल्या. आम्ही सहा अंडी आणि छोटा ब्रेड घेतला. बाबांनी पैसे दिले आणि मी सामान घेऊन निघालो. थोडं पुढं गेल्यावर मी बाबांना म्हटलं, "बाबा मी आज गंमत केली, आता आपल्याला दोन-तीन दिवस खाण्याचं बघायला नको!" ते ऐकून बाबा म्हणाले, "का? असं काय झालं?" मी म्हणालो, "त्या बाईंनी पैसे दिले, पण वस्तू न्यायला त्या विसरल्या. मग मी आपल्याबरोबर त्यांच्याही वस्तू घेतल्या, त्यामुळं आता दोन-चार दिवस आपल्याला बघायला नको." ते ऐकल्यावर बाबा सायकलवरून खाली उतरले, सायकल बाजूला लावली आणि मला एक थप्पड मारली आणि मला म्हणाले, "माझ्याबरोबर ते सामान घेऊन चल, वर बेकरीत जा, त्या मालकाला ते दे आणि सांग त्या काकू हे विसरल्यात आणि माझ्याकडून चूक झाली आहे." ते पुढं म्हणाले, "ही सहा अंडी संपली, की आपण परत आणू; पण तू असं पुन्हा कधीच करायचं नाही." हा प्रसंग माझ्या आयुष्यात खूप काही शिकवून गेला. माझ्या मुलींच्या संगोपनात, माझ्या स्वतःच्या वाटचालीत, हा प्रसंग मला खूप उपयोगाचा ठरला. लहानपणी आपण मुलांना चुकीच्या गोष्टी शिकवल्या, तर मुलं पुढं तशीच घडत जातात. त्यामुळं मुलांच्या लहान चुकीवरही पांघरूण घालू नये, किंवा त्याकडं दुर्लक्ष करू नये, तिथंच ती चूक रोखावी. मुलं लहान असतात, त्यांना योग्य- अयोग्य कळत नाही; पण ते समजावून सांगणं हे पालकांचं काम आहे. शब्दानं नाही समजलं, तर प्रसंगी दंड करावा; पण चुकीचं समर्थन करू नये. वडिलांनी मारल्यावर मला तेव्हा खूप राग आला होता. आईला मी, वडिलांनी मला का मारलं? असं विचारलंही होतं. आपल्या फायद्यासाठीच तर हे केलं होतं, कारण आपली परिस्थिती अशी आहे, असं माझ्या वागण्याचं समर्थनही केलं. पण आई म्हणाली, "अरे, परिस्थिती बदलते, त्याचं फार वाईट वाटून घेऊ नये. आत्ता छोटी चूक पोटात घातली, तर पुढं तू मोठ्या चुका करत राहशील, त्यामुळं वेळीच चुका रोखणं आवश्यक असतं." ही गोष्ट कायम माझ्या लक्षात राहिली. 

मी जेव्हा काम करायला सुरुवात केली, तेव्हा डॉ. काशिनाथ घाणेकर, डॉ. श्रीराम लागू, अरुण सरनाईक, दत्ता भट यांच्यासारख्या दिग्गजांचा काळ होता. त्यांना मी मेकअप केला आहे. यानंतर अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यापासून आत्तापर्यंत मी काम करत आहे. या सर्व वाटचालीत हे नकळत झालेले संस्कार खूप उपयोगाचे ठरले. आता काळ बदलला आहे, जग आधुनिक बनलं आहे; पण तरी पालकत्व हे समजून-उमजूनच निभवावं लागतं. आमचे बरेच स्नेही, मित्रपरिवार आहे. त्यापैकी काहींच्या घरी मुलांसाठी खूप कडक शिस्त, नियम पाहिले; पण तरीही त्यांची मुलं भरकटलेली मी पाहिली आहेत. पालकांच्या दहशतीमुळं, घरात मोकळं बोलता येत नाही, परिणामी मुलींनी घरी न सांगता लग्न केल्याचीही उदाहरणं पाहिली. त्यामुळं मी ठरवलं, की आपण मुलींचं मित्र झालं पाहिजे. पालकांचा वचक तर राहिला पाहिजे; पण मुलींना मोकळं बोलावंसं वाटेल, असं वातावरण आपण घरात ठेवलं पाहिजे. नेहा आणि योजना या माझ्या दोघी मुली माझ्याशी सर्व विषयांवर सकारात्मक पद्धतीनं मोकळेपणानं बोलतात, त्यांची मतं मांडतात. आम्ही वेगवेगळ्या विषयांवर बोलतो, चर्चा करतो, चित्रपट बघतो. पण हल्ली नेटफ्लिक्ससारख्या अॕपवर येणाऱ्या मालिका फारच भडक असतात. त्यामुळं मुलींना मी सांगितलं, की "जग कितीही आधुनिक बनलं असलं, मी स्वतः चित्रपटांत काम करत असलो, तरी यामधील कथेची गरज म्हणून उगाच घातलेला भडकपणा मी तुमच्याबरोबर नाही बघू शकत. तुम्ही तुमचं बघा आणि मला एखादी चांगली मालिका बघावीशी वाटली तर मी माझं बघेन." या गोष्टीचं मुलींनी स्वागत केलं. मी किंवा कोणत्याही पालकांनी मुलांना आजच्या काळात हे बघू नका असं सांगितलं तर चालणार नाही त्या ते बघणारच! बदलत्या काळानुसार पालक म्हणून आपण इथं बदललं पाहिजे, असं मला जाणवलं आणि मी ते केलं. मात्र, मालिकेचा विषय चांगला असेल, एखाद्याचा अभिनय चांगला असेल, तर आम्ही त्यावर चर्चा नक्की करतो; पण परस्परांचा आदर व मर्यादा राखून. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दोघी मुली आता मोठ्या झाल्या आहेत, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या आहेत. आपापल्या क्षेत्रात त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. नेहानं एमबीए केल्यावर ती बॉलिवुड मार्केटिंगमध्ये आली. रवी जाधव, मेघना जाधव यांच्याबरोबर चित्रपटासाठी मार्केटिंग हेड म्हणून काम केल्यावर तिनं ‘हरिओम प्रॉडक्शन’ या ट्विंकल व अक्षयकुमारच्या कंपनीत काम केलं आणि आता ‘टिप्स’ कंपनीत मराठी चित्रपट आणि गाणी यांची प्रोड्यूसर म्हणून स्वतंत्रपणे काम करते. बॉलिवुडसारख्या क्षेत्रात काम करत असली, तरी तिला पालकांनी केलेल्या संस्कारांची पूर्ण जाणीव आहे आणि ती ते कटाक्षानं पाळते. काम मिळवण्यासाठी स्वतःच प्रयत्न करायचे, बाबाचं नाव वापरायचं नाही, हे मी दोघींना सांगितलं होतं, त्यांनी ते पाळलं. स्वतःच्या हिमतीवर काम मिळवलं आणि आदरही. दुसरी मुलगी योजना फॅशन डिझायनर असून, तिचा स्वतःचा 'हिप कॅसल' नावाचा कपड्यांचा ब्रँड आहे. मला दोन्ही मुलींचा खरोखरच खूप अभिमान आहे. पालक म्हणून मला त्यांच्या कुठल्याही चुकीच्या कामासाठी सामोरं जावं लागेल, असं त्या कधीच वागल्या नाहीत. नेहमीच जबाबदारीनं वागल्या. मी त्यांना सांगून ठेवलं होतं, की तुम्हाला कुठंही जायचं असेल तर सांगून जा. मला एक किस्सा आठवतोय, नेहा एका खासगी वाहिनीत काम करत होती. माझी त्या वेळी ‘स्वप्नांच्या पलीकडले' ही माझी मालिका सुरू होती. आमचं शुटिंग रात्री दहा वाजता संपलं आणि त्या वेळी नेहाचा मला फोन आला, की आमच्या वाहिनीचा कार्यक्रम आहे आणि इथं काम करत असल्यानं मला त्या कार्यक्रमासाठी जावं लागणार आहे. रात्री अकरा- साडेअकरा कार्यक्रम संपायला होतील. नंतर आम्हाला हॉटेलमध्ये पार्टीसाठी जावं लागेल. मी म्हटलं, "जा तू, पण तुला किती वेळ लागेल?" ती म्हणाली, "दोन-अडीच वाजतील; पण तू काळजी करू नकोस, माझे कोणी सोबती सोडतील मला." पण मला ते काही योग्य वाटलं नाही. कारण मुंबईत लोक खूप लांब-लांब राहतात. सोडताना कोणी म्हटलं, मी इथं सोडतो अथवा सोडते, तू ईस्ट वरून वेस्टला पुढं टॅक्सीनं जा, तर पुन्हा टॅक्सी मिळते- नाही मिळत अशी शंका. त्यामुळं मी तिला एवढंच म्हटलं, "पार्टी संपली की मला फोन कर." मी हॉलीडे इनच्या बाहेर जाऊन थांबलो. खरंतर मलाही आमंत्रण होतं; पण मी बाहेरच थांबलो. मी बाहेर आहे, हे नेहाला माहीत नव्हतं. तिचा तीन वाजता फोन आला. मी तिला म्हटलं, "तू बाहेर ये, मी गाडीत बसलो आहे." नेहाला ही गोष्ट इतकी डोक्यात राहिली, की सेफ्टी म्हणून पालक काय करू शकतात. नंतर तिच्या ऑफिसमध्येही या गोष्टीचं उदाहरण दिलं जात होतं, की मी तीन वाजेपर्यंत थांबलो होतो. मी काही फार मोठं केलं नाही; पण पालक म्हणून मला ती नैतिक जबाबदारी वाटते. यातून योजनानंही शिकवण घेतली. मी दोघींना सवयच लावली आहे, की घरातून निघताना, घरी, ऑफिसला पोहोचल्यावर मेसेज करायचाच. बऱ्याच जणांना माझं हे वागणं मुलींवरच पँपरिंग वाटतं; पण आपल्याकडं पालकांचं लक्ष आहे, हे मुलांनापण कळलं पाहिजे. माझ्या या सवयीचा फायदाच झाला आहे. 

पालकांनी मुलांना प्रामाणिकपणा, मूल्यं, मोठ्यांबद्दल आदर, कोणाशी काय बोलायचं या गोष्टींची समज दिली पाहिजे. इंग्रजी माध्यमातून शिकला असाल तरी जग जिंकलं आहे असं दाखवू नका, हे सांगितलं पाहिजे. आपल्या मूल्यांना आणि मुळांना धरून राहिलं पाहिजे. आपल्या भाषेचा अभिमान पाहिजे. तसंच, मी मुलींना हेही सांगितलं आहे, की तुमच्या हातून छोटी जरी चूक झाली, तरी ती आम्हाला सांगा. ती कशी सुधारता येईल ते आपण बघू; पण लपवून ठेऊ नका. त्याचबरोबर सांगितलेल्या चुकीची पुन्हा चर्चा करायची नाही, हे मी माझी पत्नी पूजालाही सांगितलं आहे. नाहीतर वारंवार त्या चुकांवरून बोललं, टोकलं तर मुलं चिडतात आणि पुढच्या वेळी मोकळेपणानं सांगायचं टाळतात. 

योजनाचं लग्न झालं तेव्हा मी तिला सांगितलं होतं, की "सासरच्यांचा आदर ठेवायचा, त्यांना आपलं मानून राहायचं. आम्ही तुमच्या दैनंदिन गोष्टींत हस्तक्षेप करणार नाही; पण तुला गरज वाटेल तेव्हा सांग, आम्ही तिथं हजर असणार." मुलींच्या संसारात आई-वडिलांचा नको तितका हस्तक्षेप नको; पण त्याचबरोबर 'लग्न झालं, आता तुझं तू बघ, आम्ही काही बघणार नाही,' या विचारांचा मी अजिबात नाही. पालक म्हणून शेवटपर्यंत जबाबदारी असते, असं मी मानतो. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बरेचदा मुलंही आपल्याला काही शिकवतात. एकदा मला बोनी कपूरच्या प्रॉडक्शन हाऊसकडून 'लालबागची राणी' या चित्रपटासाठी फोन आला. वडिलांची भूमिका आहे असं ते म्हणाले आणि सुरुवातीला ती भूमिका फारशी सशक्त नाही असं मला वाटत होतं. त्यामुळं दोन-तीन वेळा फोन आला आणि प्रत्येक वेळी मी ‘नाही' सांगत होतो. शेवटी नेहा मला म्हणाली, "बाबा, तू फोनवरूनच नाही सांगतो आहेस, एकदा जाऊन तर बघ, भूमिका काय आहे बघ, नाही आवडली तर नको करूस, पण तुझी बोनी कपूर यांच्याशी ओळख तर होईल." मग मी विचार केला, की ही एवढं म्हणते आहे तर एकदा भेटून यावं. मी गेलो, कथा ऐकली आणि ती भूमिका स्वीकारली. तो एक अप्रतिम सिनेमा बनला. नंतर मी नेहाला थँक्सही म्हटलं, कारण तिच्या सांगण्यामुळं मी भेटायला गेलो होतो. मला एक वेगळं दालन खुलं झालं आणि एखाद्या गोष्टीला एकदम 'नाही' म्हणण्यापूर्वी त्याकडं वेगळ्या पद्धतीनं बघण्याची दृष्टी मिळाली. 

मी अभिनय क्षेत्रात काम करत असल्यामुळं मुलींसाठी, घरासाठी जास्त वेळ मिळत नाही, हे वास्तव आहे. पण पूजानं ते खूप सहजपणे स्वीकारलं आणि माझ्या मनातून अपराधीपणाची भावनाही काढून टाकली. ती मला म्हणाली, "हे बघ, तू जे काही काम करतो आहेस, पैसे मिळवतो आहेस, ते घरासाठीच करत आहेस ना, तू ती जबाबदारी सांभाळ, मी घरची जबाबदारी सांभाळते." एकदा नेहा लहान असताना पडली, मी बाहेरगावी शूटिंगला होतो. घरी आल्यावर मला हे कळलं आणि मी चिडलो. मी पूजाला म्हणालो, "तू मला फोनवर का नाही सांगितलं?" त्यावर ती म्हणाली, "तुला मी सांगितल्यावर पुढचे दहा दिवस फक्त चिंतेत जाणार, शिवाय तू इथं येऊन काय करणार होतास, जे काही करणार ते डॉक्टरच करणार होते. इथं मी होते, बाकी लोक होते आणि उपचाराला पैसे लागणार होते, ते तू कमवत होतास." तिच्या अशाप्रकारच्या आधारामुळं, समजूतदारपणामुळं मला सुरळीतपणे करिअर करता आलं. मुली लहान होत्या, तेव्हा दैनंदिन मालिका हा प्रकार नव्हता. त्यामुळं मला मोकळा वेळ मिळाला, की तोच माझा दसरा आणि तीच माझी दिवाळी असायची. तो सगळा वेळ मी कुटुंबासोबत घालवायचो. बरेचदा आमच्या क्षेत्रातील व्यक्तींकडं, स्वतःसाठी, मित्रांसाठी, स्वतंत्र फिरण्यासाठी असा वेगवेगळा वेळ असतो; पण मी या गोष्टी टाळल्या. सेटवर जे असतात तोच माझा मित्रपरिवार, तोच माझा वैयक्तिक वेळ व सहल असं मी ठरवलं आणि महिन्यातून जे काही सहा-आठ दिवस मोकळे मिळायचे, तो पूर्ण कालखंड मुलींबरोबर, कुटुंबासोबत घालवायचो. त्यामुळं त्यांनाही या वेळेची किंमत कळली आणि आम्हाला वेळच दिला नाही अशी कधी त्यांची तक्रार आली नाही. सुदैवानं वेळेचं हे गणित मला साधता आलं. 

मुलींना मी बऱ्यापैकी शिस्तीत वाढवलं. यात मला पूजाची उत्तम साथ मिळाली. आम्ही मुलींना साधारण बारावीनंतर मोबाईल दिले होते, तेदेखील संपर्काचं साधन म्हणून. वस्तूंची गरज किती हे मी त्यांना समजावून सांगितलं होतं. त्यामुळं मोबाईलसारख्या वस्तू त्यांनी नेहमी जबाबदारीनं वापरल्या. पालकत्व हे मूल झाल्यानंतर सुरू होतं असं मला वाटत नाही. मुळात लग्नाचा निर्णय हा अतिशय विचार करून घेतला पाहिजे, कारण ती एक जबाबदारी आहे. माझ्या स्वप्नांमुळं कुटुंबाला त्रास होईल असे निर्णय मी कधी घेतले नाहीत. ड्रीम रोल मिळेपर्यंत वाट पाहिली व अजूनही बघतो; पण ते मिळेपर्यंत बाकीचं काम सोडायचं असं कधी केलं नाही. कुटुंबाला त्रास होता कामा नये, हे माझं आधीपासूनचं तत्त्व आहे. आपल्या कोणत्याही कृतीमुळं कुटुंबाला त्रास भोगावा लागतो आहे, अशा गोष्टी शक्यतो प्रत्येकानं टाळाव्यात. कारण पालकत्व हे फक्त मुलांचं नसतं, तर त्यात पत्नी, आई, वडील हे सर्वजण येतात. त्यांचीही जबाबदारी आपलीच असते, ती शेवटपर्यंत निभावली पाहिजे. मी तर याही पुढं जाऊन म्हणेन, की सेटवर नवीन येणाऱ्या मुलांकडून अथवा अन्य कोणाकडून मोठ्यांचा, स्त्रियांचा मान ठेवला जात नसेल, तर सिनिअर कलाकार म्हणून त्यांना थांबवणं हेसुद्धा पालकत्वच आहे. सिनिअर कलाकार म्हणून मी ते केलं पाहिजे आणि ते मी करतो. पालकत्व ही फार महत्त्वाची जबाबदारी आहे, ती कोणतीही तक्रार न करता आयुष्य आहे तोपर्यंत निभावली पाहिजे. 

(शब्दांकन : मोना भावसार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptrang ashok shinde write article about Guardianship

Tags
टॉपिकस
Topic Tags: