कॅनेडियन पाहुणे (एस. एस. विर्क)

एस. एस. विर्क (निवृत्त पोलिस महासंचालक, महाराष्ट्र आणि पंजाब) virk1001ss@gmail.com
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

‘‘तुम्ही त्या कॅनेडियन शिष्टमंडळाच्या सदस्यांना अमृतसर आणि आसपासच्या भागात फिरवून आणाल का? म्हणजे त्यांना जे काही सांगितलं गेलं आहे त्यात काहीही तथ्य नाही हे ते स्वतःच पाहू शकतील...’’  रिबेरोसाहेबांनी मला विचारलं.

‘‘तुम्ही त्या कॅनेडियन शिष्टमंडळाच्या सदस्यांना अमृतसर आणि आसपासच्या भागात फिरवून आणाल का? म्हणजे त्यांना जे काही सांगितलं गेलं आहे त्यात काहीही तथ्य नाही हे ते स्वतःच पाहू शकतील...’’  रिबेरोसाहेबांनी मला विचारलं.

दहशतवाद्यांच्या दृष्टीनंही प्रचार आणि प्रसिद्धी या दोन्ही गोष्टी अनेकदा महत्त्वाच्या ठरतात. प्रसिद्धीच्या जोरावरच ते टिकून राहिलेले असतात आणि प्रसिद्धीच्या जोरावरच त्यांची भरभराटही होत असते. दहशतवादी चळवळीत सामील असणारे लोक आणि त्यांचे सहानुभूतीदार बाकीच्या लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या दुष्कर्मांचा तपशील दडपून ठेवतात, सरकारनं त्यांच्याविरुद्ध केलेल्या कारवायांविषयी अतिरंजित कहाण्या रचतात. त्यामुळे त्यांना लोकांच्या सहानुभूतीबरोबर त्यांच्या कारवायांसाठी देणग्याही मिळत राहतात. खालिस्तानची चळवळही याला अपवाद नव्हती. पोलिसांकडून, अन्य सुरक्षा दलांकडून होणाऱ्या अन्यायाच्या, जुलमाच्या, दडपशाहीच्या भरपूर बनावट कहाण्या त्या काळात सांगितल्या जात होत्या. पंजाबमधला हिंसाचार, त्या हिंसाचाराला प्रत्युत्तर देणाऱ्या पोलिसी कारवाया, दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या आयएसआयकडून मिळणारा सक्रिय पाठिंबा, अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि जर्मनीसारख्या पाश्‍चिमात्य देशांतून दहशतवाद्यांची पाठराखण करणारे गट, ऑपरेशन ब्लू स्टार आणि त्यातली लष्कराची भूमिका या सगळ्यामुळे ऐंशीच्या दशकाच्या मध्यावर पंजाब प्रश्नाला जगभर प्रसिद्धी मिळत होती. 

वर उल्लेखिलेल्या सगळ्याच देशांमध्ये शीख नागरिकांची संख्या लक्षणीय आहे; विशेषतः अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमध्ये. अनेक शीख कुटुंबं अनेक दशकांपूर्वीपासून या देशांमध्ये स्थायिक झाली आहेत. कित्येकांनी त्या देशांचं नागरिकत्वही स्वीकारलं आहे. आपल्या धार्मिक परंपरा जपत परदेशात स्थायिक झालेल्या शीख समाजानं अनेक ठिकाणी मोठे गुरुद्वारेही उभारले आहेत. नंतरच्या काळात फुटीरतावादी मनोवृत्तीचे काही लोकही त्या देशांमध्ये पोचले. त्यातल्या काहींनी त्यापैकी काही गुरुद्वारांमध्ये आश्रय मिळवला. त्यातली बराचशी ठिकाणं खालिस्तान चळवळीची केंद्रे बनली.

पंजाबमध्ये दहशतवाद आणि हिंसाचार वाढत गेला तशी या चळवळीलाही चालना मिळत गेली. पंजाबमधल्या बहुसंख्य शिखांचा खालिस्तानच्या मागणीला विरोध होता; पण या बहुसंख्य लोकांना सशस्त्र असणाऱ्या आणि त्यांच्या म्हणण्याचा प्रसार करण्यासाठी त्या शस्त्रांचा उपयोग करण्याच्या मनःस्थितीत असणाऱ्या थोड्याशा लोकांची भीती वाटत होती. अशी फुटीरतावादी मनोवृत्ती लक्षात आल्यावर सरकारकडून लगेच काही उपाययोजना होणं अपेक्षित असतं; पण दुर्दैवानं पंजाबमध्ये असं काहीच झालं नाही. लवकरच संख्येनं अगदी थोड्या असणाऱ्या कडव्या मनोवृत्तीच्या लोकांनी शस्त्रं मिळवली, हल्ले, हत्या घडवून आणायला सुरवात केली. राजकारण आणि व्यावसायिक मूल्यांच्या घसरणीमुळे पोखरलेल्या पोलिस दलाला परिस्थितीवर काबू मिळवणं अशक्‍य होऊन बसलं होतं. त्यांनी प्रयत्न केले; पण दहशतवाद्यांसमोर त्यांचं काही चाललं नाही. पंजाबमध्ये खालिस्तान चळवळीचा जोर वाढल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरही खालिस्तानच्या प्रचाराला जोर चढला आणि परदेशात स्थायिक झालेले अनेक शीख सक्रियपणे चळवळीच्या प्रचारात सामील झाले. 

केंद्र सरकारनंही सुरवातीला फारशी परिणामकारक भूमिका न घेतल्यानं हिंसाचार वाढतच गेला. जून १९८४ मध्ये मात्र केंद्रानं सुवर्णमंदिराच्या परिसरात लष्करी कारवाई केली. ज्या सरकारनं पोलिसांना सुवर्णमंदिराच्या परिसरात प्रवेश करण्यासही मनाई केली होती आणि दहशतवाद्यांचा तिथला वावर वाढू दिला होता, त्याच सरकारनं लष्कर पाठवून मंदिरपरिसरात कारवाई केली होती. हा सरकारच्या रणनीतीचा भाग होता की निव्वळ राजकारणापोटी या सर्व घटना घडल्या याबद्दल मला खात्री नाही; पण या सर्व घटनांमुळे शीख समाजाचं मन दुखावलं गेलं हे सत्य राहतंच. त्यांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहापासून लांब फेकलं गेल्यासारखं वाटू लागलं होतं आणि त्यामुळे मूठभर खालिस्तानवाद्यांना बळ मिळत गेलं. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याचे परिणाम झाल्याशिवाय राहिले नाहीत. 

पंजाब सरकारनं आणि केंद्रानंही नंतरच्या काळात काही प्रयोग केले. अशा एकट्यादुकट्या प्रयोगांचे तात्पुरते काही परिणाम झालेही; पण एखाद्या मोठ्या दहशतवादी घटनेनंतर त्या तात्पुरत्या शांततेचा प्रभाव ओसरून जात असे. दहशतवादाविरुद्ध व्यापक, संपूर्ण राज्यात एकत्रितपणे लढण्याची रणनीती नसल्यानं, काही अधिकाऱ्यांनी स्वतः केलेल्या प्रयत्नांचा परिणाम फारसा जाणवत नसे. ज्युलिओ रिबेरो यांची पंजाबचे पोलिस महासंचालक म्हणून झालेली नियुक्ती ही अशा व्यापक प्रयत्नांची पहिली परिणामकारक खूण होती. पंजाबप्रश्नाचा अभ्यास करून त्यांनी दहशतवादाविरुद्ध एक सर्वसमावेशक दीर्घकालीन योजना आखली. त्यांनी केपीएस गिल यांच्यासारख्या अधिकाऱ्याला केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) महानिरीक्षक म्हणून पंजाबमध्ये आणलं आणि दहशतवाद्यांच्या विरुद्धच्या मोहिमा सीआरपीएफ आणि सीमा सुरक्षा दलाकडे (बीएसएफ) सोपवल्या. पंजाब पोलिसांची या दोन्ही दलांना सक्रिय मदत होती. या एकत्रित प्रयत्नांचे परिणाम लवकरच दिसायला लागले. अनेक महत्त्वाचे दहशतवादी पकडले गेल्यानं किंवा मारले गेल्यानं दहशतवादी गटांचं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या त्यांच्या पाठिराख्यांचं कंबरडं मोडलं गेलं. खालिस्तानची निर्मिती ही केवळ औपचारिकता आहे अशा वल्गना करणाऱ्या दहशतवादी गटांसाठी पंजाबमध्ये नव्यानं होणाऱ्या या घडामोडी हा एक मोठा धक्का होता. केवळ पाकिस्तानच्या मदतीनंच खालिस्तानची चळवळ यशस्वी होऊ शकते अशी त्या काळात त्यांची धारणा होती. हा खरोखरच भारताविरुद्धचा एक मोठा कट होता. 

याच सुमाराला दहशतवादी गटांनी निरपराध शीख युवकांवर अत्याचार होत असल्याची, सुरक्षा दलांकडून त्यांच्या हत्या होत असल्याची ओरड सुरू केली. पंजाबमध्ये शिखांचं हत्याकांड सुरू असल्याच्या बनावट कहाण्या रचून पसरवल्या जाऊ लागल्या. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून दबाव आणून भारत सरकारला दहशतवादाविरुद्धच्या मोहिमेची धग कमी करायला भाग पाडावं हा या प्रचाराचा हेतू होता. पाश्‍चिमात्य देशांनी या मुद्द्यावर भारताला जाब विचारावा या हेतूनं शीख समुदायाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा भारत सरकारचा प्रयत्न असल्याचा प्रचार पाश्‍चिमात्य देशांमध्ये सुरू होता. 
संख्यात्मकदृष्ट्या शीख नागरिकांची संख्या कॅनडामध्ये सर्वाधिक आहे. त्या काळातही काही शीख प्रतिनिधी तिथं संसदेतही निवडून जात असत. शीख समुदायावर होणाऱ्या अत्याचारांबद्दल ज्या कहाण्या पसरवल्या जात होत्या त्यांच्या आधारे कॅनेडियन सरकारनं भारत सरकारकडे खुलासा मागावा, अशी मागणी तिथं होऊ लागली होती. कॅनडाच्या मध्यवर्ती सरकारनं सात संसदसदस्य आणि काही अधिकारी यांचं एक शिष्टमंडळ भारतात पाठवून पंजाबमध्ये होणाऱ्या मानवी अधिकारांच्या कथित उल्लंघनाबाबत पाहणी करण्याचा निर्णय होण्याइतका हा दबाव वाढला होता. दहशतवाद्यांच्या पाठिराख्यांनी पसरवलेल्या कपोलकल्पित कहाण्यांच्या जंजाळात कॅनेडियन सरकारवर पुरतं गुंतलं होतं. 

पंजाबमध्ये मानवी अधिकारांचं उल्लंघन होईल असं काहीच झालं नसल्यानं कॅनडाचा हा पवित्रा आपल्या दृष्टीनं अनाकलनीय होता. दहशतवादाविरुद्ध आम्ही उघडउघड; पण पूर्णपणे कायदेशीर लढाई लढत होतो. खालिस्तानच्या पाठिराख्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी निरपराध लोकांच्या हत्या कराव्यात किंवा देशाचे तुकडे करण्याचा कट करावा हे कधीच मान्य होण्यासारखं नव्हतं. या पार्श्वभूमीवर रिबेरोसाहेबांना एक दिवस अचानक दिल्लीला एका बैठकीसाठी बोलावून घेण्यात आलं. 

अमृतसरमध्ये मी माझ्या कामात व्यग्र असताना मला दिल्लीहून  रिबेरोसाहेबांचा फोन आला :‘‘सरबदीप, मी आत्ता एका कॅनेडियन शिष्टमंडळाला भेटलो. पंजाबबद्दल त्यांना अत्यंत चुकीची माहिती दिली गेली आहे. अमृतसरमधल्या सर्व तरुण शीख मुलांना सुरक्षा दलांनी मारून टाकलं आहे आणि आता अमृतसरमध्ये नावालाही शीख तरुण सापडणार नाही, असं त्यांना सांगण्यात आलं आहे. त्यांचा हा गैरसमज दूर करायला हवा. तुम्ही त्या शिष्टमंडळाच्या सदस्यांना अमृतसर आणि आसपासच्या भागात फिरवून आणाल का? म्हणजे त्यांना जे काही सांगितलं गेलं आहे त्यात काहीही तथ्य नाही, हे ते स्वतःच पाहू शकतील.’’  

‘‘हो सर, करता येईल,’’ मी म्हणालो : ‘‘मी स्वतः त्यांना अमृतसर दाखवेन. त्यांची खात्री होईपर्यंत त्यांच्या सर्व प्रश्नांचं, शंकांचं निरसन करेन. त्यांना तरुण मुलांना भेटता येईल, त्यांच्याशी बोलताही येईल. मला त्यात काही अडचण दिसत नाही. त्यांच्यासाठी सुरक्षाव्यवस्थाही तैनात करावी लागेल. मी त्यांच्यासाठी एका दिवसाचा दौरा आखतो आणि आपल्याला पुन्हा फोन करून सविस्तर माहिती देतो.’’ 

आता वेळ न घालवता या शिष्टमंडळाच्या दौऱ्याचे तपशील ठरवून रिबेरोसाहेबांची मंजुरी घ्यायची होती. दुसऱ्याच दिवशी सकाळी नऊ वाजता शिष्टमंडळ अमृतसरला पोचणार होतं आणि सायंकाळी चार वाजता त्यांना दिल्लीला परतायचं होतं. 

मी दौऱ्याचा एक प्लॅन बनवून रिबेरोसाहेबांशी पुन्हा बोललो : ‘‘सर, मी त्यांना एअरपोर्टवर रिसिव्ह करेन. मी आणि माझ्याबरोबरचे माझे सगळे अधिकारी आम्ही साध्या वेशात असू. त्यांच्यासाठी मी एक खासगी मिनी बस ठरवली आहे. मी स्वतः बसमध्ये त्यांच्या बरोबर असेन.

प्रत्येकाला अमृतसरचा एकेक नकाशा द्यावा, असं मला वाटतं. त्यांना कुठं जायचं आहे ते त्या नकाशावरून त्यांनी ठरवावं, त्याप्रमाणे आम्ही त्यांना घेऊन जाऊ. शिवाय, मी त्यांना विद्यापीठात, खालसा कॉलेजमध्ये, आणखी एका कॉलेजात आणि एक-दोन शाळांमध्ये घेऊन जाईन. शहराचे जुने आणि नवे भागही मी त्यांना दाखवेन. त्यांची इच्छा असेल तर काही भागांत त्यांना पायीही फिरता येईल. त्यांच्या सुरक्षेची पूर्ण तजवीज असेल; पण गणवेशातल्या सुरक्षाव्यवस्थेचा कोणताही जामानिमा न ठेवता साध्या पर्यटकांप्रमाणे त्यांना अमृतसर पाहता येईल.’’ 

रिबेरोसाहेबांनी माझ्या योजनेला मान्यता दिली आणि मग मी त्या व्यवस्थेला लागलो. 

ठरल्यानुसार एका खास विमानानं शिष्टमंडळ अमृतसरला उतरलं. विमानतळावर त्यांचं स्वागत केल्यावर तिथंच थोडे स्नॅक्‍स आणि चहा घेता घेता मी त्यातल्या प्रत्येक सदस्याला अमृतसरचा एकेक नकाशा दिला. शहरात त्यांना कुठं जायचं आहे, ते त्यांनीच मला सांगावं, असं मी त्यांना सुचवलं. एका सदस्यानं ‘हॉल बझार’ला जाऊ सं सुचवलं, तर दुसऱ्या एका सदस्यानं ‘तरणतारण रोड’ला जाण्याची इच्छा व्यक्त केली. ‘हॉल बझार’पासून आमचा दौरा सुरू झाला. 

आमची बस पोचली तेव्हा ‘हॉल बझार’ रोजच्या व्यवसायासाठी तयार होत होता. दुकानं उघडली जात होती. भाज्यांच्या, चहाच्या दुकानांत वर्दळ सुरू झाली होती. खूप तरुण मुलं स्कूटर-सायकलवरून त्यांच्या त्यांच्या कामासाठी ये-जा करत होती. तिथून आम्ही तरणतारण रोडकडे मोर्चा वळवला. हा भागही वर्दळीचा होता. सायकलींना तांब्याच्या मोठमोठ्या चरव्या बांधून नेणाऱ्या लोकांना पाहून एका सदस्यानं मला त्यांच्याबद्दल विचारलं. 

‘सर, ते दूधवाले आहेत. जवळपासच्या गावांतून ते दूध आणून इथं शहरात विकतात. हवं असेल तर त्यातल्या एखाद्याशी तरी आपण बोलू शकू,’’ मी म्हणालो.

गाडी थांबवून आम्ही खाली उतरलो. सकाळची दूधविक्री संपवून ते परत चालले होते. एक-दोन दूधवाल्यांनी, आपण कसे रोज सकाळ-संध्याकाळ दूध घेऊन येतो हे त्या मंडळींना समजावून सांगितलं. या संवादात माझ्याकडे दुभाष्याची भूमिका होती. ते सगळे दूधविक्रेते शीख होते. एका सदस्यानं त्यांना विचारलं : ‘‘तुम्हाला कधी कुणी वाटेत अडवून धमकावतं का?’’ 

‘होय साहेब,’’ तो म्हणाला : ‘‘कधी कधी ते दहशतवादी आम्हाला अडवून दमदाटी करतात, धमक्‍या देतात; पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. दूध विकूनच आम्हाला आमचं घर चालवायचं आहे.’’ 

त्या दूधवाल्यांशी आणखी थोडा वेळ गप्पा मारून आम्ही त्यांना निरोप दिला. आमचं बोलणं सुरू असताना शिष्टमंडळातल्या काही लोकांचं लक्ष त्या दूधवाल्यांकडच्या भल्यामोठ्या चरव्यांनी वेधून घेतलं होतं. अशा सुंदर कलात्मक धाटणीची भांडी त्यांनी याआधी कधीच पाहिली नव्हती. वाटेत सगळीकडे तरुण शीख मुलांचा वावर पाहून शिष्टमंडळाला आश्‍चर्य वाटल्यानं मी त्यांना विद्यापीठात जाण्याविषयी सुचवलं. विद्यापीठाच्या विस्तीर्ण आवारात नेहमीप्रमाणे मुलांचा सहज वावर होता, कॅंटिनमध्ये मुला-मुलींचा गलका सुरू होता, खाली उतरून मी काही मुलांशी त्यांची परदेशी पर्यटक म्हणून ओळख करून दिली. ती मुलंही अत्यंत आपुलकीनं त्यांच्याशी बोलली. मग आम्ही तिथले वर्ग पाहिले. काही वर्गात लेक्‍चर सुरू होती.

तिथून आम्ही अमृतसरच्या जुन्या नावाजलेल्या खालसा कॉलेजमध्ये गेलो. तिथंही नेहमीचे सगळे व्यवहार सुरू होते. खालसा कॉलेजमधून निघाल्यावर मी आधी शिष्टमंडळाला एका शाळेत नेलं आणि मग तिथून आम्ही लॉरेन्स रोडवरच्या पॉश मार्केटमध्ये गेलो. ‘आमच्या पर्यटकांनी’ तिथं दुकानदारांबरोबर व खरेदीसाठी आलेल्या लोकांबरोबर भरपूर गप्पा मारल्या. ‘अमृतसर आता अगदीच नॉर्मल आहे, हवं तर तुम्ही स्वतःच फिरून पाहा,’ असंच प्रत्येकाचं मत होतं. 

‘अमृतसरबद्दल आपली काहीतरी भलतीच कल्पना करून देण्यात आली होती. इथं तर वेगळंच चित्र आहे. सगळंच एकदम नॉर्मल आहे,’’ बसमध्ये बसता बसता एका संसदसदस्यानं मला बोलून दाखवलं. आमच्या प्रयत्नांचा परिणाम जाणवत होता असा याचा अर्थ होता. कॅनेडियन शिष्टमंडळातल्या इतर सदस्यांचं मतही बदलत होतं. 

तिथून आम्ही त्या सर्वांना सुवर्णमंदिरात घेऊन गेलो. ‘कॅनडाच्या दिल्लीतल्या दूतावासाच्या प्रतिनिधींची भेट’ असं त्या भेटीचं स्वरूप होतं. सुवर्णमंदिराच्या प्रवेशद्वारात शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या सर्वांचं स्वागत केलं. आम्ही अर्थातच त्यांच्या बरोबर गेलो नाही, मात्र शिष्टमंडळाच्या सुरक्षेसाठी आम्ही आधीच आमची काही माणसं आत तैनात केली होती. सुवर्ण मंदिरात त्या सर्वांनी दर्शन घेतले. समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी चर्चाही केली. आमच्या चौकीतून दुर्बिणीतून आम्ही या भेटीवर लक्ष ठेवून होतो. सर्व काही सुरळीत होतं. मंदिरात भक्तांची वर्दळ नेहमीप्रमाणे सुरू होती, त्यात अनेक तरुण शीखही होते. 

थोड्या वेळानं शिष्टमंडळ परतलं. आम्ही निघत असताना एक सदस्य म्हणाले : ‘‘ग्रेट व्हिजिट...पण आधी आमची चांगलीच फसवणूक झाली होती. इथं सगळंच व्यवस्थित सुरू आहे.’’ 

‘पुढं कुठं जाऊ या?’ असं विचारल्यावर मात्र ‘‘आता बास. आणखी कुठंच जायला नको,’’ असंच सगळ्यांच मत पडलं. 

दुपारच्या जेवणासाठी आम्ही ‘हॉटेल मोहन इंटरनॅशनल’मध्ये अन्य काही स्थानिक अधिकाऱ्यांना आणि काही मान्यवर नागरिकांनाही निमंत्रित केलं होतं. हॉटेलकडे जाताना मी शिष्टमंडळाला जुन्या शहरातून घेऊन गेलो. चटपटीत खाणं मिळण्यासाठी प्रसिद्ध असलेली अमृतसरमधली काही जुनी ठिकाणं मी त्यांना दाखवली. तिथंही नेहमीप्रमाणेच लोकांची गर्दी होती. ती गर्दीच आमचं म्हणणं सिद्ध करत होती. एव्हाना, आपल्याला कॅनडात मिळालेली अमृतसरबद्दलची माहिती तद्दन चुकीची होती याबद्दल शिष्टमंडळाच्या मनात शंका राहिली नव्हती. त्यांच्या शंका दूर झाल्याचा आनंद त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता. 

जेवणाच्या वेळी स्थानिक अधिकाऱ्यांबरोबर शिष्टमंडळाचा परिचय करून देण्यात आला. जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलिस अधीक्षक आणि इतर काही अधिकारी. यातले बहुतेक अधिकारी शीख होते. खास पंजाबी जेवणाचा आनंद घेताना या अधिकाऱ्यांवरोबर आणि मान्यवर नागरिकांबरोबरही मोकळ्या गप्पा झाल्या. ‘आता आपल्याला विमानतळाकडे निघायला हवं,’ असं सुचवल्यावर शिष्टमंडळातल्या अनेकांनी, ‘इथं आणखी वेळ मिळाला असता तर बरं झालं असतं. या दौऱ्यात आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं,’ असं आम्हाला खुलेपणाने सांगितलं. 

विमानतळाकडे जाताना शिष्टमंडळातल्या अनेकांनी व्यक्तिशः मला, त्यांना मिळालेली माहिती किती चुकीची होती आणि आता स्वतःच अमृतसरमधली परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांच्या मनात शंकेला जागा उरली नाही,’ हे पुनःपुन्हा सांगितलं. साधेपणानं झालेल्या या दौऱ्याबद्दल ते सगळेच समाधानी होते. 

दिल्लीत रिबेरोसाहेबांना भेटल्यावरही शिष्टमंडळातल्या सदस्यांनी अमृतसरची भेट ‘डोळे उघडणारी’ ठरल्याचं मोकळेपणानं मान्य केलं. काही दिवसांनी कॅनेडियन संसदेकडून मला आभाराचं आणि आमच्या टीमच्या प्रयत्नांचं कौतुक करणारं पत्रही आलं. या सगळ्यातून मी एवढंच शिकलो : दहशतवाद्यांशी लढताना शस्त्रांचा वापर तर करावा लागतोच; पण दहशतवाद्यांच्या खोट्या प्रचाराशी लढा देणंही तेवढंच आवश्‍यक असतं. 
(या लेखाचे बौद्धिक संपदाहक्क लेखकाकडे आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptrang s s virk Canadian guest