चळवळीची चाकं... (संदीप काळे)

Agitation
Agitation

प्रत्येक माणूस लोकहितासाठी कुठल्या तरी चळवळीचा, विचाराचा आधार घेतोच. काहींचं काम सातत्यानं सुरू असतं, तर काहींच्या कामांचं रूपांतर चळवळीत होतं. महाराष्ट्राला चळवळींचा, संघर्षाचा इतिहास आहे. आजही अनेक जण लोकहितासाठी एखाद्या चळवळीचा झेंडा हाती घेऊन आगेकूच करत असतात. अशाच चार चळवळींच्या चाकांचा हा प्रवास...

राज्यात भ्रमंती करत असताना काही व्यक्ती खूप खोलवर मनात रुजल्या. त्या व्यक्ती समाजासाठी काहीतरी वेगळं करत असतात. त्यांनी केलेलं प्रत्येक काम नोंद घेण्यासारखं होतं. ही माणसं जर नसती तर समाजाचं काय झालं असतं, असा प्रश्न या सर्व माणसांना भेटल्यावर पडतो.

मालेगावमध्ये काही मुस्लिम समाजसेवकांच्या भेटीनंतर मी याच शहरात फेरफटका मारत असताना माझ्या कानावर 
जय जगत्‌ पुकारे जा, सिर अमन पे वारे जा। 
सब के हित के वास्ते अपना सुख बिसारे जा। 
प्रेम की पुकार हो, सबका सब से प्यार हो।
जीत हो जहाँ की, क्यूँ किसी की हार हो। 
जय जगत...
हे गाणं पडलं...आणि मी मंत्रमुग्ध झालो.

एक्काहत्तरी-बहात्तरी ओलांडलेले गृहस्थ मोठ्या जोशात ही प्रार्थना म्हणत होते. त्यांच्या मागं प्रार्थना म्हणणारे सगळे तरुण होते. प्रार्थना संपली. माझ्या सहकाऱ्यांनी प्रार्थना म्हणणाऱ्या त्या व्यक्तीची  ओळख करून दिली. डॉ. सुगन बरंठ (९४२२२५२७९१) असं या व्यक्तीचं नाव. ते घरचे खूप श्रीमंत. त्यांचं शिक्षण एमबीबीएस आणि पुढं पीजी झालेलं. 

सन १९७७ मध्ये त्यांनी ‘संघर्षवाहिनी’मधून सामाजिक कामाला सुरवात केली. त्यानंतर ‘सर्वोदय’मध्ये राज्यपातळीवरचं आणि देशपातळीवरचं अध्यक्षपद बरंठ यांच्याकडे होतं. पुढं पाच वर्षं त्यांनी ‘नर्मदा बचाव’ आंदोलनाचं काम केलं. ते ‘सेवादला’तही अनेक वर्षं होते. त्यांची डॉक्टरकीची प्रॅक्टिस जोरात होती; पण त्यांचं तीत काही मन लागेना. त्यांनी आपला दवाखाना सहकाऱ्यांच्या ताब्यात देऊन ‘संघर्षवाहिनी’त पूर्ण वेळ काम करण्यासाठी उडी घेतली. लोकांनी लोकांसाठी चांगल्याचा आग्रह धरावा यासाठी बरंठ यांनी अनेक सेवाभावी चळवळींत भाग घेतला. आता सत्तरीनंतर त्यांनी आपल्या गावातच ‘नई तालीम’ नावानं एक चळवळ सुरू केली आहे. यातून महात्मा गांधीजींना मानणारा एक मोठा तरुणवर्ग निर्माण करायचं काम त्यांनी सुरू केलं. शिक्षण हा जीवनाचाच भाग बनलं पाहिजे, अशी ही चळवळ आहे. ‘नई तालीम’ एका मालेगावापुरती मर्यादित नाही; तर ती राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोचली आहे.  माझ्याशी गप्पा मारत असताना बरंठ यांनी मला चळवळीच्या काळातले खूप किस्से सांगितले.

त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. समोरच्या मैदानावर चकरा मारत आम्ही त्यांच्या घराकडे निघालो. ते महावीरनगरमध्ये भाड्याच्या घरात राहतात. घरी पोचल्यावर पत्नीची ओळख करून देताना ते म्हणाले :‘‘यो संदीप हे. यो नांदेड को हे, यो पत्रकार हे, यो अबार परिवार रे, हाथे बंबई मे रेवे हे.’’

मी काकूंना वाकून नमस्कार केला. बरंठकाका पत्नीची ओळख करून देताना म्हणाले : ‘‘ही माझी पत्नी जोधा.’’
बरंठकाका यांचं नाव सुगन आणि त्यांच्या पत्नीचं नाव जोधा. मी जरा गोंधळलो. थोड्या वेळानं माझ्या मनात सुरू असलेला गोंधळ थांबला. उच्चशिक्षित असलेल्या या कुटुंबानं चळवळीला जणू वाहून घेतलं होतं त्यातून घरात आंतरजातीय विवाह झालेले. जोधाकाकू काही कार्यकर्त्यांना जेवू घालत होत्या. कुणी त्यांच्याकडे राहून शिक्षण घेत आहे, कुणी चळवळीत पूर्ण वेळ काम करत आहे. 

कुणी जुन्या चळवळीशी संबंधित आहे, तर कुणाला नव्यानं संघटनेत काम करत आहे. पूर्ण घर कार्यकर्त्यांनी भरलेलं. बरंठकाकांची कमाई किती आहे, हे त्यांच्या घरात बसलेल्या पंगतीवरून दिसत होतं. त्यांनी वडिलोपार्जित सगळी संपत्ती चळवळीच्या कामासाठी खर्च केली होती. ते म्हणाले  : ‘‘मला जे वाटलं ते मी आयुष्यभर केलं. आज हजारो तरुण मी उभ्या केलेल्या चळवळीचा भाग बनून ‘गांधी’ बनत या देशाचा आधारवड बनले आहेत.’’
बरंठ यांच्या अवतीभोवती फिरणारे समर्पित कार्यकर्ते पाहून त्यांच्या म्हणण्याची प्रचीती येत होती. 

चळवळीत आख्खं आयुष्य झोकून देणाऱ्या बरंठ यांनी जे उभं केलं ते पुढच्या कित्येक पिढ्या घडवणारं होतं. मी त्यांचा निरोप घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागलो. 

बरंठकाकांचा निरोप घेतांना मला हृषीकेश सकनूर (९०९६९२६०९१) याचा लॅंडलाईनवरून फोन आला. तो म्हणाला : ‘‘फेसबुकवरची तुमची मालेगावविषयीची पोस्ट पाहिली. तुम्ही आता जळगावला जाणार आहात ना? मग रस्त्यात माझं गाव लागेल. तुम्ही नक्की या.’’
आणि त्यानं मला त्याचा पत्ता दिला. 
हृषीकेश सेवाभावी विचारांनी झपाटून गेलेला तरुण. लोकहित त्याच्या नसानसात भिनलेलं जाणवलं.

हृषीकेश मूळचा परभणी जिल्ह्यातल्या कळगाववाडीचा. तो आमच्या ‘यिन’च्या मंत्रिमंडळात सांस्कृतिक मंत्री होता. आपलं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यानं संघात पूर्ण वेळ काम करायचा निर्णय घेतला गेल्या वर्षभरापासून तो धरणगाव इथं राहत आहे. घरदार, मोबाईल, नातेवाईक या सगळ्यांचा त्याग करून तो त्याला ठरवून दिलेलं काम करत आहे...

त्यानं दिलेल्या पत्त्यावर आम्ही नियोजित वेळेपेक्षा दीड-दोन तास उशिरा पोचलो. कारण, गावपातळीवरच्या रस्त्यांची अवस्था!
हृषीकेश एका लायब्ररीत राहतो. मला पाहून तो खूप आनंदित झाला.  हृषीकेशसाठी दोनजण जेवणाचा डबा घेऊन आले होते. खानदेशी पद्धतीचं जेवण इथंच झालं. या वर्षभरात लाजरा-बुजरा हृषीकेश पूर्णपणे बदलला होता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अशा सर्व विषयांवर तो माझ्याशी अभ्यासपूर्ण पद्धतीनं बोलत होता. विविध विषयांच्या अभ्यासाची त्याची बैठक जबरदस्त होती. त्याहूनही अधिक त्याचा साधेपणा मनात ठसणारा होता. तो काय काम करतो? शाखेवर नेमकं चालतं काय? गावात काय होतं? यातून तरुणांचं मोठं संघटन होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, गावात थेट काम होतं आणि त्यातून घडतं बरंच काही! संघात काम करणाऱ्या काही मुस्लिम तरुणांशी हृषीकेशनं माझी भेट घडवून आणली. संघाची चळवळ मी एवढ्या जवळून कधी अनुभली नव्हती. हृषीकेशनं त्याचा दिनक्रम, कामाची पद्धत याविषयी मला सांगितलं. त्यानं ज्या ज्या गावात कामं उभी केली होती, तिथं तिथं त्याला खूप आदर दिला जात असल्याचं दिसलं. हृषीकेश वर्षभरासाठी इथं काम करायला आला होता. मात्र. ‘‘आता आयुष्यभर हेच काम करायचं आहे,’’ असं त्यानं मला सांगितलं. सगळं सोडून हृषीकेश पूर्ण वेळ या चळवळीला वाहून घेईल, असं मला कधीही वाटलं नव्हतं. 
हृषीकेशचा निरोप घेऊन मी औरंगाबादकडे निघालो. 

दुसऱ्या दिवशी विद्यापीठाच्या गेटमधून आत प्रवेश करत होतो. 
तिथं हातात लाल निशाण घेऊन काही कामगारांचं आंदोलन सुरू होतं. एक उंच व्यक्ती ‘झिंदाबाद झिंदाबाद, इन्किलाब झिंदाबाद’च्या घोषणा देत होती. मी थांबलो. घोषणा देणाऱ्या व्यक्तीचं भाषण सुरू झालं होतं. भाषण ऐकून लोक टाळ्या वाजवत होते. आंदोलन संपलं. आंदोलनकर्ते पांगले; पण भाषण करणारी ती व्यक्ती मात्र त्याच जागी काही विद्यार्थ्यांशी बोलत तिथंच थांबली. विद्यार्थी गेल्यावर मी त्या व्यक्तीला भेटलो. बोललो. त्यांनी माझ्या बोलण्याला प्रतिसाद दिला. विषयावरून विषय निघत गेले. प्रा. राजेंद्र गोणारकर, प्रा. वैशाली प्रधान अशा अनेकांच्या ओळखी निघाल्या.

मी ज्या व्यक्तीशी बोलत होतो त्या व्यक्तीचं नाव बुद्धप्रिय कबीर (९३७२७२०००१). अर्थात त्यांचं मूळ नाव वेगळं आहे. ते नाव आहे संजय उबाळे. मात्र, बुद्ध आणि कबीर यांच्या भक्तीनं भारावून गेलेल्या उबाळे यांनी आपलं नामकरण ‘बुद्धप्रिय कबीर’ असं करून घेतलं. सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये त्यांनी तसा बदल करून घेतला आहे. हॉकीचा खेळाडू असलेल्या बुद्धप्रिय यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज’मध्ये जीएस होण्याचा मान पहिल्यांदा मिळवला. कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवता सोडवता मराठवाड्यातल्या युवकांचे प्रश्नही बुद्धप्रिय व्यापक पातळीवर सोडवू लागले. विद्यापीठाच्या अनेक संघटनांचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे. 

‘आता युवकांचे प्रश्न सोडवणं हेच माझं काम आहे,’’ बुद्धप्रिय यांनी सांगितलं. ‘फुले- शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा एक कट्टर कार्यकर्ता...आंबेडकरी चळवळीचा आधारवड’ अशी त्यांची प्रतिमा त्यांच्या कामातून निर्माण झाली आहे. 

बुद्धप्रिय यांचं वय आता पन्नाशीच्या पुढं आहे. घरदार, संसार काही नाही. चळवळीच्या कामासाठी आजही त्यांच्यात पंचविशीचा जोश कायम आहे. त्यांच्याशी बोलत बोलत आम्ही त्यांच्या घरी गेलो. घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा फोटो आणि बाकी सगळ्या घरात पुस्तकंच पुस्तकं. 
चळवळ आणि चळवळीचे अनेक पैलू बुद्धप्रिय यांनी मला उलगडून सांगितले. बुद्धप्रिय यांनी चळवळीला आपलं आयुष्य निःस्वार्थीपणे समर्पित केलं आहे.

आंबेडकरी चळवळीचा आणि लाल सलाम चळवळीचा बुद्धप्रिय हे खरा आधार असल्याचं त्यांच्याशी बोलताना जाणवलं. त्यांचा निरोप घेतला आणि पुढं निघालो.
नामांतराच्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या बुद्धप्रिय यांची आठवण विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराकडे पाहून पुन्हा आली.

औरंगाबादचा दोन दिवसांचा मुक्‍काम संपवून मी लातूरला निघालो. लातूरमध्ये सकाळी वर्तमानपत्र चाळताना मला प्रा. डॉ. दिलीप चव्हाण सरांची आठवण आली. ‘‘लातूरला गेल्यावर महेश गुंड (८८३००२४६९३) या कार्यकर्त्याची भेट नक्कीच घ्या,’’ असं सरांनी मला सांगितलं होतं आणि मी त्याच महेशविषयीची बातमी वाचत होतो. महेशनं आणि त्याच्या टीमनं संशोधन करून प्रकाशित केलेली पुस्तकं आज लातूरच्या चार मुख्य चौकांत मोफत वाटली जाणार होती. हे पुस्तकवाटप कुठं होणार आहे, याची तपशीलवार माहिती आमच्या ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली होती. मी त्या ठिकाणी पोचलो. एका बाजूला बरीचशी पुस्तकं आणि दुसऱ्या बाजूला ती पुस्तकं घेण्यासाठी लागलेली रांग असं चित्र मला तिथं दिसलं. गौतम बुद्ध, शिवाजीमहाराज, तुकाराममहाराज, महात्मा फुले-सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे, शाहूमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंजाबराव देशमुख, क्रांतिसिंह नाना पाटील, भगतसिंग, भाई उद्धवराव पाटील, कॉम्रेड शरद पाटील, फातिमा शेख यांच्या विचारांची, त्यांनी केलेल्या कार्याची माहिती देणारी ती पुस्तकं होती. दहा ते बारा युवकांचा एक ग्रुप ही पुस्तकं वाटण्याच्या कामात गुंतला होता. दोन ते अडीच हजार पुस्तकांचं वाटप दोन तासांत झालं. ज्यांना ज्यांना पुस्तकं दिली जात होती, त्यांची त्यांची नावं आणि पत्ता लिहून घेण्याचं काम एक टीम करत होती. पुस्तकवाटप संपलं. मी त्या तरुणांच्या घोळक्‍यात जाऊन विचारलं : ‘‘आपल्यापैकी महेश गुंड कोण आहेत?’’ 

त्यावर ‘‘ए, मी’’ म्हणत एक तरुण पुढं आला. त्याला ओळख सांगितल्यावर तो म्हणाला : ‘‘मला चव्हाण सरांनी तुमच्याविषयी सांगितलं होतं.’’ 
रस्त्याच्या जरा कडेला जाऊन आमच्या गप्पा सुरू झाल्या. 

महेशनं त्याच्या ग्रुपमध्ये काम करणाऱ्या भीम गडेराव, अखिलेश आयलाने, दत्ता पवार, रहीम शेख, अभिजित गणापुरे, नरेश गुणाले, श्‍याम माने, प्रशांत साखरे या तरुण मित्रांची ओळख करून दिली. पुस्तकवाटपाचा आणि त्यातून निर्माण झालेल्या चळवळीचा सर्व इतिहास-भूगोल समजून घेतल्यावर मी थक्क झालो. लातूर हे चळवळींचं माहेरघर आहे. माधव बागचे, सोमनाथ रोडे, राजकुमार रायवाडीकर असे अनेक जण याच शहरातले. लातूरमध्ये खूप संघटना आणि चळवळी आहेत; पण महेश यांनी ‘मराठा लिबरेशन टायगर’ या नावानं संघटना स्थापन केली आहे. पन्नास जणांची टीम दर महिन्याला प्रत्येकी ठराविक रक्कम जमा करते. त्यातून पुस्तकं प्रकाशित केली जातात.

ही पुस्तकं छापण्यासाठी महेश आणि त्याच्या मित्रांनी ‘मराठा संस्कृती साहित्य मंडळ’ या नावानं प्रकाशनसंस्थाही स्थापन केली आहे. तरुणाईमध्ये जागरूकता यावी यासाठी हीच टीम लातूरमध्ये मोफत शिकवणीवर्गही घेते. 
महेश म्हणाला : ‘‘मी पूर्वी मराठा सेवासंघात काम करायचो; पण सतत कुणातरी जाती-धर्माला शिव्या देणं मला नाही आवडलं; म्हणून आम्ही ही संघटना काढली. अठरापगड जातीच्या बहुजनांसाठी काम करायचं या हेतूनं आम्ही एकत्रित आलो.’’

पुढच्या तीन वर्षांचं नियोजन महेशनं आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलं आहे. या चार जणांप्रमाणे स्वतंत्र चळवळ चालवणारे, कुठल्या तरी चळवळीचा भाग असलेले अनेक जण आपल्या भोवताली असतात. हे सर्व जण समाजाचं स्वास्थ्य शाबूत ठेवण्याचं काम करतात. आपण अशा चळवळीचा भाग बनलो तर आपलंही आयुष्य सार्थकी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com