कशासाठी सारं, हातावरच्या पोटासाठी...! (संदीप काळे)

Sandip-Kale
Sandip-Kale

पोलिसांच्या सगळ्या गाड्याही निघून गेल्या. हळूहळू सगळी माणसं पांगायला लागली. जशा पोलिसांच्या गाड्या गेल्या, तसं त्या सर्वांनी हातगाडी लावण्यासाठी धावाधाव सुरू केली. आजोबांनी दोन्ही स्टोव्ह पेटवले. जावई भज्याचं पीठ कालवत होता आणि त्यांची मुलगी चहासाठी गरम पाणी ठेवत होती. त्या दोन्ही छोट्या मुली सामान लावायचं काम करत होत्या. एका क्षणात ते सगळं कुटुंब कामाला लागलं. दहा मिनिटांमध्ये चहा आणि भजीच्या प्लेट तयार झाल्या. हळूहळू एक-एक करत माणसं यायला लागली; पण ती माणसं फार काळ नव्हती. पाच-दहा ग्राहक आले असतील. बाकी सगळी माणसं नुसतं पाहून पुढं निघून गेली. आता त्या हातगाड्याच्या जवळ ते सहाजण आणि मी एक सातवा, असं थांबलो होतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फ. मु. सरांच्या (ज्येष्ठ कवी फ. मु. शिंदे ) एका कार्यक्रमासंबंधी नियोजनाच्या निमित्तानं त्या दिवशी मी आणि ऋचा मुंबईत भेटणार होतो. कुठं भेटायचं हे ठिकाण ठरलं. ऋचानं (ऋचा माझी नातेवाईक असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयीन कामात तिच्याकडं मोठी जबाबदारी आहे आणि खासदार सुप्रियाताईंच्या टीममध्येपण ती आहे.) मला राष्ट्रवादीच्या फोर्ट येथील कार्यालयात बोलावलं होतं. ठरलेल्या वेळेनुसार मी तिथं पोहोचलो. त्या कार्यालयाच्या आसपास दहा-बारा वेगवेगळ्या राजकीय पक्षांची कार्यालयं असतील. त्या दिवशी राष्ट्रवादी पक्षाचं कार्यालय वगळता बाकी एकाही पक्षाचं कार्यालय उघडलं नव्हतं. राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात माणसं होती. कार्यालयात गेलो, ऋचा भेटली. ऋचा म्हणाली, "थोडा वेळ थांब, मग आपण निवांत नियोजन करत बसू." दहा-साडेदहा वाजले असतील. काही तरी पोटात टाकावं का, या विचारानं तिथंच मी फेरफटका मारत होतो.

राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर असलेल्या कॉर्नरला अचानकपणे माझी नजर गेली. एका रिकाम्या हातगाडीच्या बाजूला दोन महिला एका कोपऱ्यात रडत बसलेल्या होत्या. त्यांच्यासोबत असणारी दोन माणसं त्या रडणाऱ्या महिलांची समजूत काढत होती. त्यांच्या मागच्या बाजूला अस्ताव्यस्त अवस्थेत सामान पडलं होतं. असं वाटत होतं, की ते समान कुणी तरी फेकून दिलं आहे. मी त्या दोन्ही महिलांच्या जवळ गेलो. त्या महिलांना विचारलं, "तुम्ही का रडत आहात?" बाजूला एक माणूस साफसफाई करत होता. मी त्यांना विचारलं, "कायं झालं त्यांना? का रडताहेत त्या?" तो म्हणाला, "यांचं रडणं अनेक दिवसांपासून मी पाहतो, ते आता नेहमीचं झालं आहे. तरी बिचारे आपलं काम घेऊन पुढं चाललेले असतात. पोलिसांच्या रेट्यापुढं कुणाचं कायं चालतं..." असं अर्धवट बोलून तो साफसफाई करणारा माणूस तिथून निघून गेला. 

हळूहळू गर्दी वाढत होती. कोरोना, लॉकडाउन हे केव्हाच संपलंय असं तिथल्या वातावरणातून जाणवत होतं. मी त्या महिलांची समजूत घालणाऱ्या त्या वयस्कर असणाऱ्या आजोबांना विचारलं, "ह्या दोन्ही महिला का रडताहेत?" ते म्हणाले, "काय सांगावं, गेल्या अनेक दिवसांपासून जेव्हा जेव्हा कोणते मंत्री राष्ट्रवादी कार्यालयामध्ये येणार असतील, तेव्हा तेव्हा आम्हाला आमचा हा छोटासा हातगाडा बंद करण्यास पोलिस भाग पाडतात. आम्ही मध्येमध्ये हातगाडा सुरू केला, तर पोलिस आम्हाला मारतात. आज सकाळीसुद्धा आम्ही चहाचा गाडा लावला. चार लोक नेमकेच यायला सुरू झाले. अचानकपणे पोलिस आले, त्यांनी आमचं सगळं सामान उचललं आणि बाजूला फेकून दिलं. ते जोरात ओरडलेही. म्हणाले, परत तिकडं गाडा लावलास तर बेड्या ठोकू. हे नित्याचं झालं आहे. मागंही अनेक वेळा असं झालं." मी त्या आजोबांना विचारलं, "का काढायला सागंताहेत?" आजोबा म्हणाले, "कायदा आणि सुरक्षिततेचा प्रश्‍न आहे. आमच्या हातगाड्यासमोर गर्दी जमेल आणि मंत्र्यांच्या येणाऱ्या ताफ्याला अडचण होईल, असं पोलिसांना वाटतं." मी म्हणालो, "तुम्ही दुसरीकडं हातगाडा का लावत नाही?" ते आजोबा अगदी शांतपणे म्हणाले, "दुसरीकडं माणसं नसतात. दिवसभर चार किंवा पाच ग्राहक येतात. हेच एक कार्यालय आहे, जिथं सध्या माणसांची वर्दळ आहे." आता त्या दोन्ही महिलांचं रडणं थांबलं होतं. मी त्या महिलेला जाऊन काही बोलणार तितक्‍यात एक महिला पोलिस अधिकारी आली. तिनं त्या दोन्ही महिलांना पुन्हा तंबी दिली. "तुला दहा वेळा सांगितलं ना, इथं गाडा लावू नको म्हणून. पुन्हा आलीस तर याद राख, काढ इथून सामान सगळं."

पाठीमागं पडलेलं सामान एक एक करत ते त्या हातगाड्यावर आणून ठेवायचं काम त्या छोट्या छोट्या दोन्ही मुली करत होत्या. ते सामान उचलून ठेवावं अशी मानसिकता त्या महिलांची किंवा माणसांची नव्हतीच; पण त्या मुलींना वाटत असावं, आपलं सामान जर कुणी उचलून नेलं, तर उद्या खायचं काय! त्या भावनेतून त्या छोट्या छोट्या मुली ते सामान वेचण्याचं काम करत होत्या. मी त्या दोन्ही महिलांना म्हणालो, "तुम्ही एखादी वस्ती बघून तिकडं हातगाडा का सुरू करत नाही?" अस्खलित मराठी बोलणाऱ्या त्या आजीबाई म्हणाल्या, "नाही हो, ते शक्‍य नाही. महापालिकेचे कर्मचारी, त्या त्या भागात असणारी तिथली माणसं, खूप त्रास देतात आणि तरुण बाईमाणसाला घेऊन रस्त्यावर काही व्यवसाय करायचा म्हटलं, की चांगल्या माणसांचीही नजर खराब होते.

त्यामुळं जिथं चांगली माणसं आहेत, त्या भागात जाऊन गाडा सुरू करायचा निर्णय आम्ही घेतला. गेल्या वीस वर्षांत आम्ही अनेक जागा बदलल्या. आता तीन वर्षांपासून या जागेवर आहोत. आता अलीकडच्या काळात या कार्यालयामध्ये अनेक मंत्री यायला लागलेत, त्यामुळं जेव्हा जेव्हा असे मंत्री येतात, तेव्हा तेव्हा आम्हाला मारझोड होतेय. आमचं सामान फेकून दिलं जातंय." ती महिला आपल्यावर आलेले प्रसंग मला सांगत होती.

बराच वेळ संवाद झाल्यावर मला त्या कुटुंबीयांचा परिचय झाला. राधाबाई आणि सुरेश जोशी, हे रत्नागिरीतून आलेलं कुटुंब मुंबईमध्ये स्थाईक होतं. कालांतरानं नोकरी गेली. मग छोट्याशा गाड्यावर त्यांनी चहा-नाश्‍त्याचा उद्योग सुरू केला. त्यांची मुलगी निकिता हिचा विवाह संतोष कुलकर्णी यांच्याशी झाला. गावाकडली शेती सोडून संतोषही मुंबईला आले. मालकाशी न पटल्यामुळं दुसरी नोकरी शोधता शोधता त्यांनी आपल्या सासऱ्याच्या व्यवसायात भागीदारी पद्धतीनं काम सुरू केलं. कोरोनाच्या काळामध्ये त्यांचे फार हाल झाले. होतं नव्हतं ते सगळं संपून गेलं. त्या दोन छोट्या छोट्या मुली, सई आणि दिशा अशी त्या दोघींची नावं. मी त्या दोन्ही मुलींजवळ गेलो. त्यांना विचारलं, की "तुम्ही शाळेत जात नाही का?" त्या काहीच बोलल्या नाहीत. नाही म्हणून त्यांनी नुसती मान हलवली. आजी-आजोबा संतोष आणि निकिताच्या बोलण्यामधून त्यांची एकूण असलेली सगळी बिकट परिस्थिती माझ्या लक्षात येत होती. आता माणसांची गर्दी पूर्णपणे ओसरली होती. मी राष्ट्रवादीच्या कार्यालयातून बाहेर पडणाऱ्या एका माणसाला विचारलं, "आतमध्ये काय सुरू आहे?" तो म्हणाला, "गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जनता दरबार सुरू आहे."

मी पुन्हा त्या कुटुंबीयांशी गप्पा मारत बसलो. मुंबईतल्या हातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या संसारांची कशी हालत झाली आहे, याचं दर्शन मला घडतं होतं. कामगार झिजतोय, रोजच्या दोनवेळच्या जेवणासाठी त्याचं मरण होतंय. याउलट मालक मोठा होतोय, हेच खरं या लोकशाहीचं सूत्र आहे, असं त्या सर्व माणसांच्या बोलण्यामधून मला जाणवत होतं. मी त्या राधाआजीला म्हणालो, "तुम्हाला रोजचे किती रुपये मिळतात?" राधाआजी म्हणाल्या, "दादा जेवढं मिळतं त्यातली निम्मी कमाई तर सामान घेण्यामध्येच जाते. आता कोरोनामुळं माणसांची संख्या तशी खूप कमी आहे." त्या आजी पुढं म्हणाल्या, "महापालिकेची माणसं, काही पोलिस खाल्ल्यावर पैसे देतात कुठं, यांना पैसे मागितले तर हीच माणसं उद्या काही तरी सांगून आमच्यावर कारवाई करण्यासाठी पुढं असतात." बिचाऱ्या आजी संतापून बोलत होत्या. आजोबा, त्यांना शांत बस म्हणून समजावून सांगत होते. अचानकपणे राष्ट्रवादीच्या कार्यालयातून सर्व माणसं बाहेर पडली. आवाज करीत गाड्यांचा ताफा रस्त्यानं निघाला. त्या ताफ्यामध्ये पोलिसांच्या सगळ्या गाड्याही निघून गेल्या. हळूहळू सगळी माणसं पांगायला लागली. जशा पोलिसांच्या गाड्या गेल्या, तसं त्या सर्वांनी हातगाडी लावण्यासाठी धावाधाव सुरू केली. आजोबांनी दोन्ही स्टोव्ह पेटवले. 

जावई भज्याचं पीठ कालवत होता आणि त्यांची मुलगी चहासाठी गरम पाणी ठेवत होती. त्या दोन्ही छोट्या मुली सामान लावायचं काम करत होत्या. एका क्षणात सगळं कुटुंब कामाला लागलं. दहा मिनिटांमध्ये चहा आणि भजीच्या प्लेट तयार झाल्या. हळूहळू करत माणसं यायला लागली. पण ती माणसं फार काळ नव्हती. पाच-दहा ग्राहक आले असतील. बाकी सगळी माणसं नुसतं पाहून पुढं निघून गेली. आता त्या हातगाड्याच्या जवळ ते सहाजण आणि मी एक सातवा, असं थांबलो होतो. आजींनी भज्यांची प्लेट माझ्या हातात ठेवली. माझ्याकडं बघत आजी म्हणाल्या, "बघा दहा मिनिटांत पांगली ना सगळी माणसं." बिचाऱ्या आजींनी आपला कंबरेला खोवलेला पदर सोडला आणि डोळ्यांना लावला. आता दिवसभरात आपल्याकडं कुणीही येणार नाही, ही खूणगाठ आजींच्या मनानं बांधली होती. त्या दोन्ही मुली आपल्या आजीची समजूत काढत होत्या. आजोबांचे जावई संतोष मला सांगत होते. "गेल्या अनेक दिवसांपासून हेच सुरू आहे. रोज जाताना आम्हाला आमच्याकडचं तळणासाठी तयार करून आणलेलं सामान फेकून घरी जावं लागतं.

कोणालाही आमची दया येत नाही. हातावरच्या पोटाला किती यातना असतात, हे इथं गाडा टाकल्याशिवाय कळणार नाही." मी संतोषला म्हणालो, "अहो अख्खा दिवस आहे ना, काय फरक पडतो, येतील माणसं." ते आजोबा म्हणाले, "कुणीही येत नाही. इथं एवढ्या पक्षांची कार्यालयं आहेत. हे एकच कार्यालय सकाळी चार तास गजबजलेलं असतं. मग दिवसभर इकडं कुणी फिरकत नाही. गेल्या चार महिन्यांत इथं असणारी पक्षांची कार्यालयं उघडलीच नाहीत."

ते कुटुंब सत्ता, पैसा, गरिबी, शासनाचं चुकीचं धोरण, त्याचे गरिबांवर होणारे घातक परिणाम, सरकारचं गणित, हे सगळे विषय माझ्यासमोर ठेवत होतं. जोशी आणि कुलकर्णी कुटुंबीय इथं असणाऱ्या वास्तवाचं प्राथमिक स्वरूप होतं. हा एकूण घडलेला प्रसंग जरी छोटा असला, तरी एका स्थितीचा आढावा देणारा खूप भयानक अनुभव. भांडवलशाही, हुकूमशाही आणि मालकशाही या तीन अश्‍वांच्या टाचांखाली कामगार आणि कष्टकऱ्यांचा महत्त्वाचा दुवा तुडवला जातोय याचं हे उत्तम उदाहरण होतं.

मी त्या आजोबांना म्हणालो, "हे असचं चाललं तर तुम्ही खाणार कायं?" ते म्हणाले, कोरोनाच्या काळात गावाकडची चार गुंठे असलेली शेती विकून आम्ही कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. आता परिस्थिती हाताबाहेर चाललीय. काय करावं सुचत नाही. सगळीकडून आम्ही संकटात सापडलोय." अचानक माझं फोनकडं लक्ष गेलं. ऋचाचे मिस कॉल दिसत होते. त्या कुटुंबीयांचा निरोप घेत मी ऋचाकडं जायला निघालो. जाताना त्या लहान दोन मुलींच्या चेहऱ्याकडं माझी नजर गेली. त्यांचं लक्ष माझ्याकडं अजिबात नव्हतं. त्यांची नजर रस्त्याकडं होती. दोन माणसं येतील, आपल्या चहाच्या हातगाड्यावर चहा पितील, आपल्याला पैसे देतील आणि त्या पैशांतून आपला दैनंदिन गाडा चालेल, असा त्या विचार करत असाव्यात. ज्या वयात हातात पाटी-पुस्तक असायला पाहिजे, त्या वयात लोकांच्या उष्ट्या कपबश्या आणि खरकटी भांडी धुण्याचं काम त्या दोघी करत होत्या. त्या दोन मुली मला आपल्या राज्यातल्या दारिद्य्रपणाचा, अशिक्षितपणाचा चेहरा वाटत होत्या. अनेक प्रश्‍न मनात घेऊन मी तिथून निघालो. त्या खाल्लेल्या भज्यांना कोकणच्या मातीचा, काम करणाऱ्या त्या सगळ्यांच्या कष्टाचा सुगंध होता. शिवाय, एका आईचं प्रेम त्या अन्नाच्या चवीत होतं.

या कुटुंबीयांच्या परिस्थितीकडं पाहिल्यावर मुंबईत असूनही त्यांच्या जगण्याची परिस्थिती मराठवाड्यातील गरीब कोरडवाहू शेतकऱ्यांपेक्षाही अधिक वाईट होती असं जाणवत होतं. काय माहीत, या परिस्थितीला कोण जबाबदार आहे! असे अनेक जोशी आणि कुलकर्णी आपल्या रोजच्या जगण्यासाठी सगळी ताकद पणाला लावतात. त्यांची अवस्था तशी चांगली नाहीच, हे जातीच्या चष्म्यातून समाजव्यवस्थेकडं पाहणाऱ्यांना कुणी सांगायचं नाही का? असे सुरेश आणि संतोष आपल्या कुटुंबांना घेऊन किती संकटं रोज स्वत:वर झेलत असतील? हे संकट एकट्या जोशी-कुलकर्णी कुटुंबीयांचं नव्हतं; हे संकट त्या प्रत्येकाचं होतं, जो कामगार म्हणून हातावरच्या पोटासाठी वाटेल ते करायला तयार असतो; ज्यात त्याला सतत अपयश येत असतं.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com