आमचे ऐतेहासिक खड्डे... (संजय कळमकर)

Sanjay-Kalamkar
Sanjay-Kalamkar

इतर ग्रहावरून पाहिलं तर आमच्या शहराच्या अंगावर जागोजागी डाग पडलेले दिसतील. हे डाग म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आहेत हे सुज्ञांस सांगणे न लगे! आपल्याकडे अनेक बाबतीत विषमता असली तरी खड्ड्यांच्या बाबतीत मात्र सगळ्या शहरांमध्ये एकसमानता आहे. त्यामुळे ‘आपल्या भागात फार खड्डे आहेत..ते बुजवायचं बघा’ असं संबंधितांना सांगितलं तर हे लोक म्हणतात :‘‘देशभर खड्डे आहेत, तिथं आपले खड्डे काय घेऊन बसलात!’’ 

एकंदर, सगळीकडे घाण असताना आपण तरी स्वच्छ का राहायचं अशा धाटणीचा हा खुलासा असतो. एकवेळ भारतीय माणूस दारिद्र्यरेषेच्या वर येईल; पण खड्ड्यातून कधीच वर येणार नाही, असं वाटत राहतं मग! अश्वत्थाम्याच्या कपाळावर भळभळणाऱ्या जखमेप्रमाणे आपल्या रस्त्यांच्या नशिबीही खड्डे कायमचेच आहेत. बरं, चुकून बरा रस्ता लागला अन्‌ वाहनानं वेग घेतला की आलाच स्पीड ब्रेकर आडवा. आमच्या मते, रस्त्याचं काम झाल्यानंतर उरलेली खडी आणि डांबर यांपासून हे उंचवटे तयार केले जात असावेत. त्यांनी केलेली ही ‘उचलटाक’ पाहून ‘यापेक्षा खड्डे बरे’ असं वाटून जातं. आमच्या रस्त्यांना त्यांच्या हक्काचं काही मिळत नाही.

रस्त्यांच्या शरीराच्या बळकटीसाठीचं डांबर पिऊन कुणी ना कुणी स्वतःचे खिसे ‘भक्कम’ करून घेत असतो! कधी कधी तर रस्त्याच्या वाट्याला आलेला आख्खा पैसाच कुणीतरी गिळून टाकतो. तरी तो रस्ता बिचारा जखमा कुरवाळत पडून राहतो. या देशाला गरीब म्हणतात याचं त्याला आश्चर्य वाटतं. कारण, रोज त्याच्या अंगावरून शेकडो गाड्या सरपटत वाहतात. पूर्वी सायकल हे एकच वाहन असल्यानं त्याला कमी त्रास व्हायचा.

नंतर इकडचं तिकडचं चेमटलेपण बदलून वेगवेगळी नावं दिलेल्या भरमसाट गाड्या आल्या. जड अंगाचे ट्रक रस्त्याचा जीव गुदमरून टाकू लागले.

रस्त्यावरून पायी चालणारा माणूस घाबरून गेला. माणसाला चालण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फुटपाथ केले खरे; पण तेही वेगवेगळ्या टपऱ्यांनी ताब्यात घेतले. टपऱ्या चुकवत चालण्यापेक्षा माणसाला गाड्या चुकवत चालणं जास्त सोईचं वाटू लागलं. बहुतेक जुन्या वसलेल्या शहराच्या आतले रस्ते तर खूप गमतीशीर असतात. आमचं शहर तर ऐतिहासिक आहे, म्हणजे पूर्वी या भूमीवर हत्ती-घोड्यांचा चांगलाच राबता असेल. साहजिकच, रस्ता कितीही चांगला केला तरी आधी त्याला घोड्याच्या टापांएवढे खड्डे पडतात, नंतर ते हत्तीच्या पावलाच्या आकाराचे होत जातात अन्‌ शेवटी रस्ता अगदी उखळी तोफांचा मारा केल्यासारखा उद्‌ध्वस्त होऊन जातो. एकंदर, आम्ही सांगण्याआधीच नवख्या माणसाला हे ऐतिहासिक शहर असल्याचा प्रत्यय येतो. शत्रूला चुकवण्यासाठी जागोजागी निमुळत्या रस्त्यांचे बोळ केलेले असावेत. या बोळांना दोन्ही बाजूंना तोंडं आहेत. रस्ता रहदारीनं तुंबला की या बोळांचा फारच उपयोग होतो. दुचाकी बिनदिक्कत बोळात घालायची आणि बोळ नेईल तिकडे जात राहायचं. अचानक त्याचं दुसरं तोंड एखाद्या मोठ्या रस्त्यावर उघडतं! 

मात्र, नवख्यानं या बोळांचा जास्त वापर करू नये. कारण, यातले बरेच बोळ बराच वेळ हिंडवून पुन्हा पहिल्या ठिकाणीच आणून सोडतात. रानभूल झाल्यावर मनुष्य जसा रानातल्या रानातच फिरत राहतो तसे हे बोळ ‘शहरभुली’चं काम करतात. अगदी तयार केला गेलाच चुकून एखादा मोठा रस्ता तर त्याच्यासाठी दुभाजकाचा खर्च करण्याची गरज नाही. मोकाट जनावरं बरोब्बर रस्त्याच्या मधोमध रवंथ करत बसतात. ‘ही जनावरं कुणाची’ अशी शंका काहींना असते; परंतु दुभाजकाचा खर्च वाचवण्यासाठी महापालिकेनंच जनावरांना रस्त्याच्या मधोमध बसवण्याचं प्रशिक्षण देऊन ती तशी बसवलेली असावीत अशी आम्हाला तरी दाट शंका आहे. त्यात आमच्याकडे दुधाचा धंदा परंपरागत असल्यानं म्हशींची संख्या अमाप आहे.

दिवसभर कुठं तरी चरायला गेलेला हा दांडग्या म्हशींचा कळप सायंकाळी घराकडे परततो. त्यांचे गोठे शहराच्या मधोमध असल्यानं सायंकाळी रस्त्यावर त्यांचाच दरारा असतो. बरं, त्यांच्याविरुद्ध बोलण्याची कुणाची हिंमत नाही. त्यांची शिंगं भली लांब व अणकुचीदार असतात. त्यात या म्हशी मध्येच मुरका मारत मान हलवतात. त्या वेळी त्यांच्या शिंगांपासून वाचण्यासाठी रहदारीची उडालेली तारांबळ काय वर्णावी! याची तक्रार कुणाकडे करण्याची सोय नसते. कारण, त्यांचा बेरकी मालक गर्दीतून चालत घरी जाईपर्यंत ‘या म्हशींशी माझा काहीच संबंध नाही,’ असा चेहरा करून मजा पाहत असतो.

आम्ही ‘सामान्य’ या श्रेणीत मोडत असल्यानं खड्ड्यांचा अन्‌ आमचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. पूर्वी खड्डा पाहिला की आमच्या पोटात खड्डा पडायचा. आता त्याची सवय झाल्यानं खड्डा दिसल्यावर जिवलग (प्रसंगी जीव घेणारा का असेना!) मित्र भेटल्यासारखा आनंद होतो. चुकून एखाद्या रस्त्यावर खड्डा दिसला नाही की प्रेयसी न दिसलेल्या प्रियकरासारखं आमचं मन सैरभैर होतं. आमच्यासारखाच एक सामान्य मित्र परदेशात जाऊन आल्यावर एकदम आजारी पडला. तिथल्या गुळगुळीत रस्त्यावर प्रवास केल्यानं त्याचं भारतीय मन प्रचंड अस्वस्थ झालं आणि इतका प्रवास करूनसुद्धा एकही दणका न बसल्यानं त्याचं सारं अंग दुखू लागलं. पचनक्रिया बिघडून गेली. शेवटी, आम्ही त्याला आमच्या शहरातल्या सर्वात जास्त खड्डे असलेल्या रस्त्यानं वेगानं घेऊन फिरलो तेव्हा त्याचे सगळे आजार पळून गेले. गुळगुळीत रस्त्यावरून फिरल्यानं त्याच्या हाडांची अंतर्गत बिघडलेली रचना सुरळीत झाली. पोटातलं सारं पाश्चिमात्य अन्नही गिरणीत टाकल्यासारखं भराभरा पचून पोटाचं गुब्बारेपण सैल झालं आणि ‘परदेशात खड्डेसंस्कृती रुजेपर्यंत मी पुन्हा कधीही तिकडं जाणार नाही’ अशी प्रतिज्ञा त्यानं केली. माणूस माणसाची लबाडी किती उघडी पाडतो माहीत नाही; परंतु या वर्षी पावसानं मात्र रस्त्यावरचं डांबर धुऊन काढत अनेकांचं पितळ उघडं पाडलं आहे. रस्ता बनवणारी माणसं रस्ता कमी आणि माणसांना जास्त बनवतात हे मात्र खरं...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com