यंत्र आणि 'तंत्र' (प्रा. प्रकाश पवार)

प्रा. प्रकाश पवार 
रविवार, 31 डिसेंबर 2017

गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानानं राजकीय क्षेत्रामध्ये मूलभूत स्वरूपाचे बदल घडवून आणले आहेत. एके काळी राजकीयदृष्ट्या फार सजग नसणारा तंत्रज्ञानसक्षम समाज, राजकीयदृष्ट्या सजग असलेल्या तंत्रज्ञानबाह्य समाजावर मात करताना दिसतो. गेल्या तीन वर्षांतल्या निवडणुकाच नव्हे, तर एकूणच धोरणांची दिशाही तंत्रज्ञानाचा विचार करून ठरताना दिसते. राजकीय, सामाजिक क्षेत्रांची बैठकच बदलून टाकणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या परिणामांबाबत विवेचन. 

टेक्‍नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान म्हणजे नवं सोनं आणि लक्ष्मी अशी नव्या युगाची घोषणा आहे. यामुळं एकविसाव्या शतकाच्या आरंभीपासून तंत्रज्ञान या घटकाचा भारतीय राजकारणावर आणि राज्यांच्या राजकारणावर दूरगामी परिणाम झालेला दिसतो. समाजाचं ध्रुवीकरणदेखील "तंत्रज्ञानसक्षम' आणि "तंत्रज्ञानबाह्य' अशा दोन समूहांमध्ये होत गेलं. ही राजकीय आणि सामाजिक प्रक्रिया विसाव्या शतकातल्या नव्वदीपासून सुरू झाली होती.

समकालीन दशकामध्ये व्यक्ती-व्यक्ती, व्यक्ती-समाज, व्यक्ती-राज्यसंस्था, व्यक्ती-अंतरराष्ट्रीय संस्था यांचे व्यवहार आणि त्यांचे संबंध यांच्यातले नातेसंबंधही तंत्रज्ञान याच घटकामुळं नव्याने रचत आणि घडत असल्याचं दिसतं. यामुळे तंत्रज्ञान अशी एक राजकीय संघटन करणारी राजकीय छत्री उदयास आलेली दिसते. तंत्रज्ञानबाह्य समाज त्या छत्रीखाली आला. तो "टेक्‍नोसॅव्ही' आहे; परंतु या दोन घटकांमध्ये मूलभूत अंतर दिसून येतं. 2014 च्या निवडणुकीमध्ये तंत्रज्ञानसक्षम आणि तंत्रज्ञानबाह्य या दोन समाजांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष झाला. निवडणुकांखेरीज दैनंदिन राजकीय व्यवहार जवळपास तंत्रज्ञानानं घडवलेल्या मानसिकतेमध्ये घडतो. हा मुद्दा वेगवेगळ्या पद्धतींनी सध्या राजकारणावर प्रभाव टाकतो. त्यामुळे तंत्रज्ञानसक्षम समाजातल्या "टेक्‍नोक्रॅट' व्यक्तींना आणि गटांना आवाहन करून त्यांना कायमचं राजकारणात ओढून घेतलं जातं. त्यांना राजकीय कृती करण्यास उद्युक्त करण्याची राजकीय प्रक्रिया विविध राज्यांमध्ये घडताना दिसते. हा "टेक्‍नोक्रॅट' वर्ग राजकीय मानला जात नव्हता; परंतु त्यांच्यामध्ये राजकीय चर्चा घडवून आणल्या गेल्या. तंत्रज्ञान वापरणाऱ्या व्यक्ती आणि समूहांना त्यांचेत्यांचे हितसंबध आहेत. त्यामुळं एकूणच तंत्रज्ञानानं नव्यानं राजकीयीकरण केल्याचं आपल्याला दिसतं. या घडामोडी लक्षवेधक स्वरूपात दिल्ली, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र अशा विविध राज्यांत घडताहेत. या सर्व घटना संरचना आणि विचारप्रणाली अशा दोन्ही रूपांत अभिव्यक्त झाल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या विचारप्रणालीचा पोत विकास, हिंदुत्व, सॉफ्ट हिंदुत्व असा आहे. त्या अंतर्गत घोषणा चित्तवेधक आहेत. 

लक्ष्मीचं स्थान सरस्वतीकडं 
नारायण गेहलोत हे एटी अँड टी कंपनीचे पूर्व वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या नावे 27 पेटंटही आहेत. त्यांनी भोपाळ इथं संशोधन आणि कल्पकता (रिसर्च आणि इनोव्हेशन) म्हणजे सरस्वतीची भक्ती अशी भूमिका मांडली. त्यांनी अमेरिकेचं उदाहरण दिलं. संशोधन आणि कल्पकतेमधून संपत्ती (लक्ष्मी) मिळते. अमेरिका संशोधन आणि कल्पकतेवर लक्ष केंद्रित करते. भारतामध्ये मात्र या क्षेत्रावर लक्ष केंद्रित होत नाही. खासगी क्षेत्रात तर संशोधन आणि कल्पकतेमध्ये शून्य गुंतवणूक होते. थोडक्‍यात त्यांनी सरस्वती हा व्यक्तीच्या व्यवहारांचा आरंभबिंदू असावा, असा त्यांचा मुद्दा होता. त्याच वेळी त्यांनी खासगी उद्योगांच्या व्यवहारांचा आरंभबिंदू सरस्वती असावा, अशी भूमिका मांडली. म्हणजेच व्यक्ती आणि उद्योग यांची संरचना "तंत्रज्ञान' पद्धतीची घडवण्याचा मुद्दा पुढं रेटला गेला. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी तंत्रज्ञानामुळं निर्माण झालेल्या समाजिक समस्यांकडं लक्ष वेधलं आहे. म्हणजेच एकूण व्यक्ती, समाज आणि आणि उद्योग यांचे चर्चाविश्‍व तंत्रज्ञान या विषयाच्या भोवती फिरताना दिसत आहे. यातून भारतामध्ये पैशाचा अर्थ बदलत आहे. वायफाय, इंटरनेट, "स्पेस' यांसारख्या गोष्टींना सध्या उद्योगपती "नवीन सोनं' म्हणत आहेत. त्यामुळं जुन्या सोन्याची जागा आता हे "नवीन सोनं' घेत आहे. त्यांचा आधार अर्थातच तंत्रज्ञान हा आहे. पैसे किंवा सोने आणि हिऱ्यापेक्षा जास्त महत्त्व सोशल मीडियाला आले आहे. त्यावरती निवडणुकांची धामधूम असते. गुजरातच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बरोबर कॉंग्रेसनंही सोशल मीडियाचा लक्षवेधक वापर केला. विकास आणि प्रारूपांची सोशल मीडियाने समीक्षा करून त्यांचा नवीन अर्थ लावला. पैसे, सोने आणि हिऱ्यापेक्षा सरस्वतीची ताकद जास्त ठरली. ही तंत्रज्ञानाची अहितकारक त्सुनामी हे कॉंग्रेसकडून भाजपच्या विरुद्ध आलेलं नवीन अस्र होतं. त्यांचा प्रतिवाद करताना भाजपनं "सी-प्लेन'चा युटोपिया गुजराती मतदारांना दाखविला. "सी-प्लेन'च्या चर्चाविश्‍वाचा प्रचार लक्षवेधी होता. भाजपच्या विकासाचं ते प्रारूप आणि दूरदृष्टी होती आणि त्याच वेळी कॉंग्रेसच्या विकास समीक्षेवर केलेला तो लक्ष्यभेदी मारा होता. रविशंकर प्रसाद यांनी कॉंग्रेसचा विकास उघडा पाडण्यासाठी भूतकाळातील "सी-प्लॅन' म्हणजे "करप्शन प्लॅन' अशी टीका केली होती. हे सगळे वाद-प्रतिवाद म्हणजे साधे हल्ले आणि प्रतिहल्ले नव्हेत. अगदी मूलभूत पद्धतीनं विचार केला, तर या सगळ्या वाद-प्रतिवादांत "सरस्वती'ला केंद्रबिंदू मानलं गेलं आहे. त्यामुळं एकूण भारतीय आणि राज्यांच्या राजकारणाचा आखाडा सध्या तंत्रज्ञान ठरवतं, अशी स्थिती आहे. 2017 ची गुजरात विधानसभेची निवडणूक म्हणजे तंत्रज्ञानसक्षम समाज व तंत्रज्ञानबाह्य समाज यांच्यातला संघर्ष दिसतो. यामध्ये भाजपचा झालेला विजय म्हणजे तंत्रज्ञानसक्षम समाजाचा विजय दिसतो. उदाहरणार्थ, सुरतमध्ये 16 पैकी 15 जागा भाजपनं जिंकल्या आहेत. 

तंत्रज्ञान संस्कृती 
तंत्रज्ञानानं नवीन राजकीय संस्कृती घडवलेली आहे; तसंच तंत्रज्ञानाद्वारे राजकीय, सामाजीकरण घडत आहे. राजकारणाकडं पाहण्याचा दृष्टीकोन, मूल्यव्यवस्था या गोष्टी तंत्रज्ञानानं घडवलेल्या आहेत. यामुळं भारतीय लोकशाहीमध्ये सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. निवडणुकीशिवाय सरकार आणि राज्यसंस्थेनं तंत्रज्ञानसक्षम राजकीय संस्कृती आणि तंत्रज्ञानसक्षम राजकीय सामाजीकरण या दोन्ही गोष्टींचा लोकप्रिय प्रचार आणि प्रसार केला आहे. उदाहरणार्थ, "डिजिटल इंडिया', "कॅशलेस इंडिया' असे राजकीय संस्कार जलद गतीनं होत आहेत. नवनिर्माण करण्याची शैली तंत्रज्ञानकेंद्रित ("स्वच्छ भारत', "स्मार्ट सिटी', "स्मार्ट व्हिलेज') आहे. एवढंच नव्हे, तर स्वयंसेवी संघटनांनी मांडलेली "व्हिलेज' ऐवजी "सिलेज' अशी "तंत्रप्रधान' कल्पना महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात दिसते. मध्य प्रदेशमध्येही ग्रामोदयाची नवीन संकल्पना तंत्रज्ञान संस्कृतीमधून पुढं येत आहे. कायदा व सुव्यवस्था, प्रशासन, शिक्षण, वित्तीय क्षेत्र अशा नानाविध क्षेत्रांमध्ये पैशाचा वारेमाप वापर करून तंत्रज्ञान संस्कृती स्थिरस्थावर केली गेली आहे. या गोष्टी समस्या सोडण्यासाठी कौशल्यानं वापरल्या जातात. उदाहरणार्थ, डॉ. लालजी सिंह यांनी यांची सुरवात फिंगरप्रिंट टेक्‍नोलॉजी क्षेत्रातून केली होती. 1991 मध्ये राजीव गांधी यांचा मृत्यू बॉंबस्फोटांमध्ये झाला. त्यांना ओळखता येत नव्हतं. तेव्हा या पद्धतीचा वापर केला गेला. या पद्धतीनं भारतातील गुन्हेगारीबाबतच्या संशोधनाच्या पूर्ण प्रक्रियेला नवीन वळण दिलं. हत्यांच्या विविध प्रकारांचे गुंते या पद्धतीनं सोडवले गेले. नैना साहनी (दिल्ली), मधुमिता हत्याकांड (उत्तर प्रदेश), प्रियदर्शिनी हत्या अशी प्रकरणं सोडवण्यासाठी डीएनए फिंगरप्रिंट चाचणी पद्धत उपयुक्त ठरली. 1998 पर्यंत डीएनए रोगनिदान आणि रोगचिकित्सा केली जात नव्हती. जनुकीय तंत्राच्या आधारे रोगनिदान होत नव्हते. लालजी सिंह यांनी डीएनए रोगनिदान व रोगचिकित्सा पद्धती शोधली. हे सगळे तपशील गृहीत धरले, तर असं लक्षात येतं, की भारतात विशेष तज्ज्ञ, संस्था, विज्ञान, सायबर कायदे, रोगनिदान आणि रोगचिकित्सा, जैविक खतं, जनुकीय सुधारित पिकं, जीवनसत्वाचं एकत्रीकरण (बायोफोर्टिफिकेशन) अशा अनेक गोष्टी तंत्रज्ञान संस्कृतीमधून उत्क्रांत झाल्या आहेत. या उत्क्रांतीमुळे व्यक्ती-व्यक्ती, व्यक्ती-समाज, व्यक्ती-राज्यसंस्था, व्यक्ती-अंतरराष्ट्रीय संस्था यांचे व्यवहार आणि त्यांचे संबंध यांची फेरमांडणी झाली आहे. व्यक्ती, समाज, संस्था यांनी तंत्रज्ञानाशी जुळवून घेतलं आहे. तो एक समाज भारतात सध्या आकाराला येतो आहे. त्या समाजामधून घडलेल्या व्यक्ती आणि संस्था भारतीय तंत्रज्ञानसक्षम समाजाचं नेतृत्व करत आहेत. त्यांचा प्रभाव धोरणनिश्‍चिती, धोरणांची अमंलबजावणी, धोरणांचं मूल्यमापन यांवर पडलेला दिसतो. मनमोहनसिंग आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला सल्ला देणारा वर्ग हा तंत्रज्ञानसक्षम समाजाचा भाग होता. त्या आधी राजीव गांधी यांनी राजकीय नेतृत्वामध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातल्या व्यक्तींना पुरेसा अवकाश उपलब्ध करून दिला होता.

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्वर्तुळातलं मंत्रिमंडळ आकारानं छोटं आहे. परंतु तंत्रज्ञानसक्षम क्षेत्रातल्या व्यक्तींचं निर्णयांमध्ये कळीचं स्थान आहे. यामुळे तंत्रज्ञानबाह्य राजकीय समाज आणि तंत्रज्ञानसक्षम राजकीय समाज अशा दोन रचना उदयास आल्या आहेत. तंत्रज्ञानसक्षम राजकीय समाज हा वरचढ झाला आहे. या समाजानं तंत्रज्ञानबाह्य राजकीय समाजाला आपल्या नियंत्रणाखाली ठेवले आहे. तंत्रज्ञानबाह्य समाज हा एका अर्थानं हतबल झाला आहे. तो राजकीय पक्षांच्या विरुद्ध बंड करतो; परंतु तंत्रज्ञानसक्षम समाज ते उद्रेक आपल्या पोटात पचवतो आहे. त्यामुळं तंत्रज्ञानसक्षम समाज आणि तंत्रज्ञानबाह्य समाज यांचे संबंध पितृसत्ताक स्वरूपाचं घडले आहेत. इथं नवीन तंत्रज्ञांचं राज्य घडलं आहे. हा सगळाच आशय औद्योगिक क्षेत्र, मिश्र अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतलं तंत्रज्ञांचं राज्य यांच्यापेक्षा वेगळा आहे. दोन्हीमध्ये एक घटक समान म्हणजे राजकीय निर्णय प्रक्रिया, समाजिक-आर्थिक धोरणांवर त्यांचा वरचष्मा राहतो. म्हणजेच तिथं तंत्रज्ञांच्या औद्योगिक क्षेत्रातल्या सत्तेचं राजकीय सत्तेत रूपांतर होते. नव्वदीनंतर तंत्रज्ञांच्या तंत्रज्ञानसक्षम व्यवस्थेतल्या सत्तेचं राजकीय सत्तेत रूपांतर होते. हा महत्त्वाचा फरक औद्योगिक क्षेत्र, मिश्र अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञान अर्थव्यवस्था यांच्यामध्ये झाला आहे. यामुळं राज्यांच्या राजकारणातून तंत्रज्ञानबाह्य समाजांची हद्दपारी होते. तंत्रज्ञानसक्षम समाजातले तंत्रज्ञ त्यांची जागा घेत आहेत. यामुळं आपोआपच नागरी समाजांचं वर्चस्व दिसू लागलं आहे. 

Web Title: Saptrang Sunday article in Marathi Prakash Pawar