तिमिरातून तेजाकडे... (विद्या सुर्वे-बोरसे)

darkness-to-light
darkness-to-light

‘काडेपेटीवाल्या मुलीची’ कहाणी ऐकून आपले डोळे ओलावले होते, ह्रदय द्रवलं होतं. ही मुलं जेव्हा तुमच्या पुढं उभी असतील तेव्हा तुमच्या सगळ्या व्यस्ततांमध्ये, तुमच्या महागड्या वस्तूंच्या संग्रहामध्ये या लेकरांचे डोळे तुम्ही विसरून जाणार आहात काय? आपल्या आजूबाजूला खूप मुलं आहेत. ती संपन्न समृद्ध कुटुंबात जन्मली नसतील, तरीही त्यांना त्यांचं बालपण जगण्याचा हक्क आहे. त्यांचं बालपण त्यांना हवंहवंसं वाटेल यासाठी आपल्या जराशा सहकार्याची त्यांना गरज आहे.

दुसऱ्या दिवशी लोकांना दिसलं, की चौकातील अरुंद गल्लीत दोन घरांच्या कोपऱ्यात आश्रयाला थांबलेली छोटी मुलगी थंडीनं गोठून मरून गेली आहे. तिच्या ओठांवर हलकं स्मित होतं. तिच्या पायांत बूट नव्हते. तिचे कपडे कर्दमलेले होते आणि तिच्या आजूबाजूला जळून गेलेल्या आगकाड्यांचा खच साचलेला होता....

हँस क्रिश्‍चन अँडरसन यांनी १८४६ मध्ये लिहिलेल्या ‘दि लिटल मॅचबॉक्स गर्ल’ या कथेचा हा शेवटचा भाग. कथेचा शेवट होतो, तेव्हा वाचकांचे डोळे पाणावतात. छोट्या मुलीचा मृत्यू थांबवता आला असता, जर आदल्या रात्री तिच्या चार- दोन आगपेट्या कुणी खरेदी केल्या असत्या. ती छोटी मुलगी जिवंत असू शकली असती. जर तिची आई, आजी तिच्या आजूबाजूला असती, जर तिच्या वडिलांना त्या जिवाची घालमेल आणि भीती समजली असती. ती छोटी मुलगी, जी मरून गेली आहे, ती जिवंत राहिली असती. जर त्या रोषणाईच्या बाजारात एकतरी सुहृदय व्यक्ती तिला भेटली असती. एकानं जरी आस्थेनं तिची चौकशी केली असती. पण असं घडलं नाही, जेव्हा सगळं शहर आनंदाच्या जल्लोषात वाहत जात होतं, जेव्हा लोकांच्या अंगावर थंडीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी उबदार रेशमी कपडे होते, जेव्हा लोक फक्त स्वतःतच मश्गुल होते; एक छोटी मुलगी नागव्या पायांनी प्रत्येकाच्या मागे धावत जाऊन एकतरी आगपेटी विकत घेण्याची आर्जवी विनंती करत होती. जेव्हा लोक आपल्या घरात शेकोटीभोवती बसून गप्पा मारत होते, तेव्हा ही मुलगी एकसुद्धा आगपेटी विकली न गेल्यामुळे हिरमुसली होऊन, भिऊन, अरुंद गल्लीत निवारा शोधत होती. जेव्हा सगळी दुनिया अंथरुणात निजली होती, तेव्हा ही मुलगी गाराठ्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी एकेक काडी ओढत जगण्याची केविलवाणी धडपड करत होती. जेव्हा सगळं जग झोपेच्या कुशीत शांतपणं निजलं होतं, ही छोटी मुलगी भरपेट जेवल्याची ग्लानीतली स्वप्नं पाहत स्वर्गवासी झालेल्या आजीच्या पायांवर पाय ठेवून स्वर्गाची वाट चालत जात होती. एक चिमुरडी छोटी मुलगी, थंडीत गोठून मरून गेली, त्यानंतर कुठल्याच कारणमीमांसेला काहीही अर्थ राहत नाही.

हँस क्रिश्‍चन अँडरसन हा डॅनिश लेखक परीकथेचा जादूगार समजला जातो. त्यांनी लिहिलेल्या परीकथा वाचत जगभर लोक लहानाचे मोठे झाले आहेत. अँडरसन यांची ‘दि लिटल मॅचबॉक्स गर्ल’ वाचताना प्रत्येकवेळी मी आतून हलते. आतल्या आत काहीतरी तुटून फुटून गेलं आहे असं वाटत राहातं.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अँडरसन यांनी ही गोष्ट लिहिली त्याला १७० वर्षे लोटली आहेत. ही गोष्ट जगभरच्या लाखो लोकांनी वाचली आहे. तरीही प्रत्येक हिवाळ्यात जगभर हजारो लोक थंडीमुळे गोठून मरून जातात. ज्यांच्या घरात दिवा नाही, त्यांच्या दारावर एक पणती लावण्यात खरी माणुसकी आहे. थंडीत कुडकुडणाऱ्या जिवाला मायेची ऊब असणारी घोंगडी देण्यात खरा धर्म आहे.

************************
परवा सहज म्हणून सेन्ट्रल मॉलच्या दिशेने घरी परतले. ऑफिस सुटल्यानंतर मुंबई-धुळे रस्ता काही कारणांमुळं टाळला आणि दूरचा वळसा घालून अपार्टमेंट गाठलं. आतल्या रस्त्यांवरही तुफान गर्दी, दिवाळीच्या रोषणाईनं ग्राहकांना आकर्षित करणारी शॉपिंग सेन्टर्स, हातात गजरे घेऊन पळणारी चिमुरडी मुलं, पार्किंगसाठी जागा सापडणार नाही इतकी गाड्यांची रेलचेल, ट्रॅफिक जॅम. मला प्रश्‍न पडला, असं कसं झालं. गेले सात महिने जी भीती मनाशी बाळगून सगळे व्यवहार सुरू होते ते कोरोनाचं भय गेलं कुठं? लोक इतके बेजबाबदार कसे झाले? दाबून ठेवलेली स्प्रिंग ताण हलका होताच जशी मोकळी व्हावी आणि दुप्पट आवेगानं उसळावी त्या पद्धतीनं लोकांचा व्यवहार आणि वर्तन सुरू आहे. हे कसलं जगणं आहे? ही कशाची धावाधाव आहे? कशाचा हव्यास आहे? काय मिळवायचं आहे? जे आपल्या स्पर्धेत होतं असे आपले अनेक मित्र, नातेवाईक, सखे, सोबती दरम्यानच्या काळात जग सोडून निघून गेले आहेत. घरं ओस पडली आहेत. लोक अजूनही धक्क्यातून पुरते सावरलेले नाहीत आणि आमन आंधळ्या वेगानं पुन्हा शर्यतीत उतरलो आहोत. असं होतंच कसं?

मॉलमध्ये कपडे आणि खेळणी विकत घेणाऱ्या मोठ्यांच्या गर्दीत सुटाबुटातील मुलंही होती आणि बाहेर गजरे विकणारे चिमुकले हात गिऱ्हाइकांची वाट बघत आहेत. विरोधाभास असणारे जग शोधायला फार दूर जाण्याची गरज नाही. ते इथंच आहे, जिथं मी उभी आहे, क्षणभर वाटून गेलं.

दिवाळी दारावर येऊन उभी आहे, वाटलं होतं यंदाची दिवाळी थोडी मोकळी ढाकळी असेल. कदाचित थोडी संथ असेल, पण आजूबाजूला तर आतापासूनच जल्लोष सुरू झाला आहे.

दिवाळीच्या धावपळीच्या दिवसांत या वर्षी ‘बालदिन’सुद्धा येत आहे. ‘बालदिन’ म्हणजे चाचा नेहरूंचा वाढदिवस. इंदिरेस पत्रं लिहिणारे तिचे बाबा, देशाच्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्ना पाहणारे, स्वातंत्र चळवळीत आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवणारे, महात्मा गांधींच्या स्वदेशीचा पुरस्कार करणारे, आपल्या कोटावर गुलाबाचे हसरे फुल लावणारे, देशाचे नवनिर्माते आणि मुलांवर माया पांघरणारे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. चाचा नेहरू आणि बालके यांच्या गाठीभेटीच्या अनेक कथा प्रचलित आहेत. जगभरातील बालकांसाठी त्यांनी आपला वेळ राखून ठेवला. जगभरातील बालकांच्या हाकेला ‘ओ’ दिली.

मात्र मुलांच्या वाट्याला अजूनही फार चांगलं वर्तमान आलेलं नाही, एकाविसाच्या शतकातही अनेक मुलं भुकेली, अभावग्रस्त, शोषित आहेत. लाखो बालकांच्या स्वप्नांचं आकाश काळवंडून गेलं आहे. कृष्णमोहन झा या कवीनं ऐके ठिकाणी लिहिलं आहे –

काही मुलांना स्वप्नात दिसतं
पऱ्यांचं अद्‍भुत जग
आणि इतर मुलांच्या झोपेत
वाळलेली पानं वाजतात.
काही मुलांच्या पाठीवर
वह्या पुस्तकांची सुंदर दप्तरं
आणि इतर मुलांना माहिती नाही
आपलं स्वत:चंही नाव.
डोळे बंद करताच काही मुलं
उडू लागतात आकाशात
आणि इतर मुलं रस्त्यावरच्या
अपघातात मरून जातात.
काही मुलांनी तयार होत नाही आपलं जग
सगळी मुलं मिळून ही धरती घडवतात.


भिन्न भिन्न आर्थिक पर्यावरणातील मुलांच्या वाट्याला विरोधाभासातील जगणं वाट्याला आलं आहे. हे चित्र विषण्ण करणारं आहे.

मी विचारात पडते, एकीकडे दिवाळी जल्लोषात साजरी होत असताना, दिवाळीच्या पूर्वसंध्येला ‘बालदिनी’ किती बालकं उपाशी झोपी जातील. किती बालकांच्या डोळ्यांतून अश्रू घळाघळा वाहतील. या लेकरांच्या ओठांवर स्मित फुलवण्यासाठी मी पुढं येणार आहे की नाही? माझं पाऊल मी पुढं ठेवलं पाहिजे, या इतर मुलांची दिवाळी आनंदी 
केली पाहिजे.
************************
चांगल्या गोष्टी, कविता वाचून संपवल्या तरी संपत नसतात, त्या मनातल्या मनात पुन्हा पुन्हा ऐकू येत राहतात. कोणताही मोठा सण येऊन दारावर उभा राहिला, की थंडीत कुडकुडून मृत्युमुखी पडलेल्या ‘काडेपेटीवाल्या मुलीची’ गोष्ट आठवते. ही गोष्ट केवळ पुस्तकातील नाही. ती तर केव्हाच संपली, न संपलेल्या अगणित कहाण्या तुमच्या माझ्या आजूबाजूला धावत पळत असतात. त्यांच्या हातात प्रत्येकवेळी आगपेटीच असेल असं नाही, कधी त्या गजरे विकत असतील, कधी मेणबत्त्या. कधी निव्वळ फुलं विकत असतील, तर कधी पाण्याच्या बाटल्या.

ज्यांनी घरात बसून नातेवाइकांसोबत, आईबाबांसोबत सणाचा आनंद साजरा करायचा अशी चिमुकली मुलं-मुली तुम्हाला दिसत नाहीत काय? त्यांच्या अंगावर कर्दमलेले कपडे आहेत, त्यांच्या पायांत साधी स्लीपरदेखील नाही, त्यांच्या डोळ्यांत मात्र आशा आहे, तुम्ही तुमच्या खिशातील चार नाणी त्यांच्या हातावर ठेवून त्यांची वस्तू विकत घ्यावी यासाठीची केविलवाणी विनवणी त्यांच्या ओठांवर आहे.

‘काडेपेटीवाल्या मुलीची’ कहाणी ऐकून आपले डोळे ओलावले होते, हृदय द्रवलं होतं. ही मुलं जेव्हा तुमच्या पुढं उभी असतील तेव्हा तुमच्या सगळ्या व्यस्ततांमध्ये, तुमच्या महागड्या वस्तूंच्या संग्रहामध्ये या लेकरांचे डोळे तुम्ही विसरून जाणार आहात काय?

आपल्या आजूबाजूला खूप मुलं आहेत. ती संपन्न समृद्ध कुटुंबात जन्मली नसतील, तरीही त्यांना त्यांचं बालपण जगण्याचा हक्क आहे. त्यांचं बालपण त्यांना हवंहवंसं वाटेल यासाठी आपल्या जराशा सहकार्याची त्यांना गरज आहे.

मला विश्‍वास आहे, येणाऱ्या दिवाळीचं स्वागत करताना आपण ‘तिमिरातूंनी तेजाकडे’ हा मंत्र आठवाल, स्वत:च्या काळजात आणि चिमुलकल्यांच्या जीवनातही एक दिवा पेटवाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com