गुंतवून ठेवणारी आशयसमृद्ध कूळकथा (योगेश कुटे)

Yogesh-Kute
Yogesh-Kute

प्रत्येक व्यक्तीला आपलं कूळ, घराणं, पूर्वज यांच्याविषयी कुतूहूल असतंच. आपण सगळे ‘माकडाचे वंशज’ आणि ‘सेपिअन्स’ असल्याचं माहीत असलं, तरी आपल्या आधीच्या पिढ्या काय करत होत्या, याचं औत्सुक्य संपत नाही. त्यात एखाद्या लढवय्या, सत्ताधारी वंशाचा, घराण्याचा वारसा असेल, तर ही माहिती इतिहास म्हणून पुढे येत असते; पण ही सरदार किंवा राजघराणी सोडून इतरांच्या पूर्वजांचं काय? त्यांनी आपला काही ठसा आपल्या काळात उमटवला का नाही, आपण या गावात कसे आलो, आपले नातेसंबंध कुठवर होते, आपलं आडनाव कसं मिळालं, घरातले देव कुठून आले, कुलदैवत कसं ठरलं याच चर्चा होत असतेच.

प्रसिद्ध कादंबरीकार रंगनाथ पठारे यांनाही हाच प्रश्न पडला. त्यात त्यांना कादंबरीचं बीज सापडलं. ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही ती कादंबरी. या कादंबरीचा काळही मोठा आहे. हा काळ सुरू होतो तो अल्लाउद्दीन खिलजीनं पैठणवर स्वारी केण्याच्या वर्षापासून म्हणजे इसवीसन १२८९ पासून. तिथून सुरू झालेली ही कादंबरी आपल्याला सन २०००च्या अखेरच्या दशकात आणून सोडते. ही ऐतिहासिक कादंबरी नाही. ती इतिहासातल्या एखाद्या असामान्य व्यक्तीवर आधारीतही नाही, तर इतिहासातल्या महत्त्वाच्या घटना घडत असताना तेव्हाचं सामाजिक जीवन कसं होतं, याचा शोध पठारे या कादंबरीत मांडतात. त्याला निमित्त ठरलं आहे सातपाटील घराणं! या घराण्यातल्या व्यक्तिरेखांच्या आधारे त्यांनी हे मांडलं आहे. या व्यक्तिरेखांच्या आयुष्यातल्या विलक्षण घटना वाचकाला खिळवून ठेवतात.

पठारे यांनी या इतिहासाला कल्पकतेची जोड देऊन कादंबरी रोचक बनवली आहे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातही अकल्पित असे प्रसंग येऊ शकतात. त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांची गुंतागुंत, तेव्हाची धार्मिक, सामाजिक बंधनं, राजकीय वर्चस्वाच्या लढाया, हे सारं पठारे कथानकात सुंदरपणे गुंफून देतात. सातशे वर्षांची सांधेजोड कादंबरीत इतक्या सहजपणे झाली आहे, की एका काळातून पुढच्या काळात जाताना कुठंही वाचताना खडखडाट जाणवत नाही. सोबत पठारेंची निवेदनशैली आणि त्यांची निरीक्षणं वाचनीयता आणखीन वाढवतात.  

श्रीपती पठारे या व्यक्तिचित्रापासून कादंबरीची सुरवात होते. देवगिरीच्या रामदेवराव जाधवाचं (यादव) साम्राज्य लयास जाण्याचा हा काळ. पैठणजवळच्या डोंगरकिणी गावातल्या मेंढ्यांची राखण करणाऱ्या या श्रीपतीचा जाधवांच्या दरबारात असलेल्या काशिराज एडकेशी आणि त्याच्या पत्नीशी श्रीपतीचा संपर्क येतो. या राजवटीत अशा काही घटना घडतात, की श्रीपतीला पैठण सोडून नगर जिल्ह्यातल्या वांबोरीत त्याच्या मालकिणीसह यावं लागतं. वांबोरीत त्याची मालकीण तिच्या मुलासह श्रीपतीच्या साथीनं वांबोरीत वास्तव्य करते. ती का येते, तिच्यासोबतचं तिचं मूल कोणाचं, श्रीपती तिच्या इतक्या विश्वासातला का होतो हे एखाद्या सुरस कथेप्रमाणं पठारे सांगतात. ते केवळ श्रीपतीची कथा सांगत नाहीत, तर तेव्हा आजूबाजूला घडणाऱ्या प्रमुख ऐतिहासिक क्षणांचा श्रीपतीवर कसा परिणाम होतो आणि हा गुंता कसा वाढत जातो, हे दाखवून देतात आणि तो गुंता वाचकाचा गोंधळ होणार नाही, असा सोडवूनही टाकतात. 

या श्रीपतीनंतर येतो साहेबराव. हा मूळचा सातपाटील; पण त्याच्यापुढं जो सातपाटील वंश आहे तो त्याचा नाहीये. अल्लाउद्दीन खिलजीच्या काळानंतर पठारे निजामशाहीत आपल्याला नेतात. त्या राजदरबारातल्या कटकारस्थानांच्या निमित्तानं ते वांबोरीतल्या एडक्यांच्या मुलीला चार पठाणांनी पळवून नेल्याचं कथानक रचतात. गावातल्या वेगवेगळ्या घराण्यांतले सात तरुण या पठाणांचा बदला घेतात. या चार पठाणांना ते ठार मारतात. मग या वांबोरी या गावची पाटीलकी ‘सातपाटलां’च्या नावे होते. हा बदला घेणाऱ्यांतला एक तरुण साहेबराव हा वेगळ्याच जंजाळात अडकला जातो. चार पठाणांपैकी एकाच्या पत्नीचा साहेबरावावर जीव जडतो. तिला पठाणापासून एक मुलगाही (आरेन) झालेला आहे. साहेबराव, त्याची पठाण बायको, तिचा मुलगा, एडक्यांची पळवून नेलेली मुलगी हे निजामाशाहीच्या जाचातून सुटण्यासाठी आदिलशाहीच्या प्रांतात म्हणजे पुण्यात येतात.

आदिलशहाच्या सुभेदाराकडून तो पुण्याजवळचं खराडी गाव वसवायला घेतो. (खराडीत सध्या पठारे आहेतच.) पुण्यात बहिरट पाटलांशी साहेबरावची ओळख होते. त्याचा म्हणून सर्वत्र ओळख असलेला; पण प्रत्यक्षात पठाणाचं रक्त शरीरात असलेल्या त्याच्या मुलाचं बहिरट पाटलांच्या नातीशी लग्न होतं. अफगाण आणि मराठा असा संयोग दाखवून या सातपाटील घराण्याचा वेल थेट अफगाणिस्तानापर्यंत  रंगनाथ पठारे नेतात. साहेबराव आणि त्याची बायको नंतर अफगाणिस्तानात जातात. 

त्यानंतर दसरथाच्या (दशरथ) रूपानं सातपाटील घराण्याची कथा पुढं चालतं. साहेबराव सातपाटलानं उभं केलेलं खराडीतलं साम्राज्य लयाला गेलं आहे. भावकीतल्या भांडणांतून दसरथला घर सोडावं लागतं. दसरथ शिंद्यांच्या सैन्यात सहभागी होऊन तिसऱ्या पानिपताच्या लढाईत भाग घेतो.

मराठ्यांना पराभूत करून अफगाणिस्तानात जाणाऱ्या अब्दालीच्या एका सैन्याच्या तुकडीच्या तावडीत दसरथ सापडतो. तो अफगाणिस्तानात जातो. तो तिथं का जातो, याचा भन्नाट योगायोग पठारेंनील जुळवून आणलेला आहे. तिथून त्याला परत यावं लागतं; पण येताना सोबत अफगाण बायको घेऊन येतो. तो साताऱ्याजवळच्या करंजे गावात आपलं नवीन जीवन सुरू करतो. सातपाटील घराण्याचा असा वंशवेल निरनिराळ्या ठिकाणी कसा वाढलेला असतो, हे पठारे दाखवून देतात. दसरथानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात त्याचा नातू जानरावची कथा कादंबरीत येते. मराठा साम्राज्याच्या उतरणीचा हा काळ. मराठा सरदारांतच सुरू झालेली भांडणं, इंग्रजांची वाढलेली सत्ता सारं जानरावाच्या निमित्तानं कादंबरीत येतं. जानरावच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात, की त्याचं व्यक्तिमत्व अंतर्बाह्य बदलून जातं. कधी काळी नावलौकीक असलेल्या सातपाटील घराण्याची ओळख ‘येड्या जानबाचा खानोटा’ अशी होते.

यानंतर जानरावचा मुलगा रखमाजी आणि पिराजी यांची कथा लेखक आपल्याला सांगतो. हा सन १८५७ च्या बंडाचा काळ. सामाजिक सुधारणांसाठीची दारं याच काळात किलकिली होऊ लागलेली. त्याचा परिणाम, शेतीची होत असलेली दुरवस्था, लढाऊ असलेल्या मराठा  समाजासाठीचा बिकट काळ लेखक यात सांगतात. त्यानंतर येतो शंभूराव. पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर हे कथानक येतं. तेव्हाचा गावगाडा कादंबरीत येतो. मुंबई येते, नव्या सुधारणाचं वारं येतं. शंभूरावनंतर त्यांचा नातू म्हणजे कादंबरीचा लेखक देवनाथ आपली कथा सांगतो. सन १९५० पासून सुरू झालेली या लेखकाची कथा मग आताचं वर्तमान सांगते. हे वर्तमानही रोचक आहे.

तब्बल सातशे वर्षांचा मोठा पट रंगनाथ पठारे आपल्यासमोर मांडतात. महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा शोध या निमित्तानं ते घेतात. महाराष्ट्राची, महरठ्ठ्यांची कूळकथा आपल्याला सांगतात. मराठा म्हणजे केवळ जातीय अंगानं मराठा नव्हे, तर महाराष्ट्रात राहणारा तो मराठा, अशा व्याख्या ते या निमित्तानं मांडतात. सामाजिक चित्रण उभं करतात. मात्र, हे सारं करताना आपण विश्वाच्या या पसाऱ्यापुढं बिंदूइतकेही नाही, हे देखील मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात. पठारेंचा हा शोध एखाद्या रहस्यमय पुस्तकासारखा वाचनीय ठरतो. पुढं काय घडणार, याची उत्सुकता टिकवून ठेवण्यात त्यांना कमालीचं यश आले आहे. ऐतिहासिक काळातल्या सामान्यजनांच्या स्थितीचं, त्यांच्यातल्या महत्त्वाकांक्षांचं, त्यांच्या वादाचं निमित्त करून ते तो काळ आपल्यापुढं उभा करतात. हा काळसुद्धा वाचकाला कादंबरीत गुंतवून ठेवतो. या कादंबरीतल्या काही खाणाखुणा आजही पाहायला मिळतात. त्यामुळं ही कल्पनारम्यता हवेतली वाटत नाही. ती आणखी जवळची वाटते. त्यामुळंच कादंबरी वाचकाला वजनानं जड वाटली, तरी बोजड अजिबात वाटत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com