गाडगीळांची दुनिया!

सुधीरबाबूजी गाडगीळ यांची दोन-दोन पुस्तकं कालच मराठी साहित्याच्या मंडईत (मटार आल्यासारखी) आल्याने एकच खळबळ
Saroj Chandanwale writes Two books of Sudhir Babuji Gadgil publish Marathi literature
Saroj Chandanwale writes Two books of Sudhir Babuji Gadgil publish Marathi literature sakal

कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! महाराष्ट्राचे चिरतरुण मुलाखतकार आणि सूत्रसंचालक (आणि आमचे परममित्र) रा. सुधीरबाबूजी गाडगीळ यांची दोन-दोन पुस्तकं कालच मराठी साहित्याच्या मंडईत (मटार आल्यासारखी) आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नवी पेठेतील गांजवे चौकातल्या एसेम जोशी सभागृहात सुधीरबाबूजींच्या या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी पार पडला. ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे आणि आमचे आणखी एक चिरतरुण मित्र रा. उल्हासदादा पवार हे दोघे तेव्हा उपस्थित होते. शिवाय आमच्यासारखी चिक्कार तरुण मंडळीही होती. उल्हासदादांचे ओळखीच्यांना टाळ्या देत ‘क्या बात है’ सतत चालू होते. मीही एक टाळी वसूल करुन उत्सवमूर्ती सुधीरबाबूजींकडे वळल्ये. ‘कॉफी घेतली ना? फक्कड असते बरं का..,’ एवढेच बोलून ते सटकले. (दिली नाहीच!) पण एकंदर सोहळा छान झाला. ‘उत्तुंग’ असं या सुधीर्गाडगीळलिखित ग्रंथाचं नाव आहे. हा ग्रंथ गाडगीळांचा असल्याने मौखिक असावा, अशी माझी सूचना होती. (हल्ली ऑडिओ बुक्सचं प्रस्थ फार आहे नं!) वास्तविक ही एक नव्हे, दोन पुस्तकं...आय मीन...खंड आहेत. -एक प्रकारे आमच्या गाडगीळांनी बांधलेले उत्तुंग ट्विन टॉवरच!! आमच्या नागनाथपारावरले ‘राजहंस बिल्डर्स’ त्याचे डेव्हलपर आहेत! दोघांचंही उत्तुंग अभिनंदन!

‘उत्तुंग’च्या पानांत वीस थोर व्यक्तींच्या प्रदीर्घ मुलाखतींचा ऐवज ठासून भरला आहे. गेल्या पन्नासेक वर्षात चिरतरुण गाडगीळांनी अनेक थोर व्यक्तींच्या सोळा-सोळा वेळा मुलाखती घेतल्या. त्याचे साररुपी लिखाण ‘उत्तुंग’मध्ये आहे. एकाअर्थी हा एक सांस्कृतिक संदर्भग्रंथच ठरावा!

या दिग्गजांना आयुष्यात खूप थोर व्हायचे होते, त्यामुळे त्यांना सुधीरबाबूजींना मुलाखत देण्यावाचून काही पर्यायच नव्हता. सुधीरबाबूजींनी त्यांना वेळोवेळी गाठून (सोळा वेळा) मुलाखती घेतल्या. कारण दिग्गज व्हायला निघालेल्याला ती त्यांना द्यायचीच असते. करतात काय बिचारे? गाडगीळांनी मुलाखत घेतली नसती, तर यांना कोणी थोर (पक्षी : उत्तुंग) म्हटले असते? काही व्यक्ती तर केवळ गाडगीळांनी आपली मुलाखत घ्यावी, म्हणून थोर झाल्याचंही कळतं. आपल्या आशाताई भोसल्यांनी तर (गाडगीळांनी घेतलेल्या) दोन मुलाखतींच्या मधल्या काळात घाईघाईने गाण्याचं रेकॉर्डिंग उरकून घेतल्याचीही दंतकथा आहे. खरं खोटं देव जाणे!

सुधीरबाबूजींना महाराष्ट्रात कोण ओळखत नाही? त्यांच्या जिवावर सांस्कृतिक महाराष्ट्र आज फळतो, फुलतो, नांदतो आहे. सांस्कृतिक महाराष्ट्रासोबत फर्गसन रोडवरल्या ‘रुपाली’, ‘वैशाली’ आणि ‘वाडेश्वर’ या संस्थाही त्यांच्यामुळेच बहरल्या. ‘‘तुमच्या चिरतारुण्याचं रहस्य काय?’’ हा प्रश्न सुधीरबाबूजींनी त्यांच्या पन्नास वर्षांच्या कारकीर्दीत अनेकांना विचारला. लोकांना वाटलं की मुलाखतीत असलं काहीतरी विचारतातच. पण सुधीरबाबूजी अत्यंत मनापासून हा सवाल करायचे, आणि रहस्य समजून घेऊन अंमलबजावणी करायचे. हे त्यांच्या चिरतारुण्याचं रहस्य आहे! होय, आजही सुधीरबाबूजी अवघे तेवीस वर्षाचे आहेत!! १९७३ साली चार बिल्डिंगींमागे एक टीव्ही असा हिशेब असतानाच्या काळात सुधीरबाबूजी ‘युवदर्शन’ नामक कार्यक्रम करत असत. टीव्ही कृष्णधवल होता, पण सुधीरबाबूजी तेवढे रंगीत दिसत असत.

तेव्हापासून हा मुलाखतींचा सिलसिला चालू आहे. इन्शाल्ला तो आणखी पन्नासेक वर्षं चालेल, यात शंका नाही. चालू द्या, चालू द्या! दोस्तों, ही सुधीरबाबूजी गाडगीळांची दुनिया आहे. इथं थोरामोठ्या, उत्तुंग व्यक्तिमत्त्वांची कायम गजबज असते. व्हेरी व्हेरी क्राऊडेड वर्ल्ड! उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या गराड्यात हसतमुख सुधीरबाबूजी केंद्रस्थानी असतात, असं हे जग! सारांश, भविष्यात ‘उत्तुंग’चे भविष्यात आणखी दहा-वीस खंड आरामात येणार, हे धरुन चाला. तुम्हाला थोर व्हायचे असेल तर आत्ताच रा. सुधीर्गाडगीळ यांना गाठून मुलाखतीचे ठरवून टाकावे. नंतर वेळ गेलेली असेल. त्वरा करा!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com