पुलं : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)

sarvottam thakur
sarvottam thakur

"पुलं' या दोन अक्षरी विनोदमंत्रानं आख्खा महाराष्ट्र भारलेला आहे. "महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असंही सार्थ बिरुद पु. ल. देशपांडे अर्थात पुलं यांच्या नावामागं लावलं जातं. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत हरहुन्नरी पुलंनी त्यांच्या सर्जनशीलतेचा ठसा उमटवला. येत्या आठ नोव्हेंबरपासून त्यांची जन्मशताब्दी सुरू होत आहे. त्यानिमित्तानं पुलंच्या आठवणी जागवत आहेत त्यांचे मेहुणे - सुनीताबाई देशपांडे यांचे धाकट बंधू - सर्वोत्तम ठाकूर. पुलंचा तब्बल 50 वर्षांचा सहवास ठाकूर यांना लाभला. या काळातल्या काही निवडक आठवणींना त्यांनी दिलेला हा उजाळा...

पुलंची आणि माझी पहिली भेट झाली ती त्यांच्या लग्नातच. त्यांच्या लग्नाचाही वेगळाच किस्सा आहे. पुढं पुलंची सहधर्मचारिणी झालेली सुनीता ठाकूर अर्थात सुनीताबाई ही माझी थोरली बहीण. आम्ही तिला माई म्हणत असू. - माईशी पुलंचं लग्न ठरलं त्या वेळी नाटकांत नुकतच काम करायला लागले होते. एवढे प्रसिद्धीला आलेले नव्हते. लेखक म्हणूनही त्यांचा तेवढा नावलौकिक त्या वेळी झालेला नव्हता. पुलं आणि माई यांनी लग्न अगदी साधेपणानं केलं. समारंभ करायचा नाही, असं त्यांचं आणि माईचं ठरलंच होतं. कोणताही आहेर त्यांनी घेतला नाही. नोंदणी पद्धतीनं हे लग्न झालं. त्या वेळी पुलं आमच्या कोकणातल्या - रत्नागिरीतल्या - घरी पहिल्यांदाच आले होते. ता. 13 जून ही लग्नाची तारीख ठरली होती. वडील काही कामानिमित्त आदल्या दिवशी कचेरीत गेले होते. त्या वेळी त्यांनी त्यांच्या मित्रांना "तुम्ही उद्या येणार आहात ना रजिस्टरवर सह्या करायला?' असं विचारलं. तेव्हा ते मित्र म्हणाले ः ""उद्याची कशाला वाट बघायची? आत्ताच येतो!'' मग ही मित्रमंडळी घरी आली.

वडील म्हणाले ः ""लग्नसमारंभ आजच उरकून घेऊ या.'' पुलंना या प्रकाराची काहीच कल्पना नव्हती. अत्यंत साध्या म्हणजे घरच्याच कपड्यांत पुलं आणि माई यांचं लग्न, ठरलेल्या तारखेच्या आदल्या दिवशी - म्हणजे 13 जूनऐवजी 12 जूनलाच - झालं. मी 12 जूनला कामानिमित्त बाहेर गेलो होतो; त्यामुळे लग्नाला उपस्थित नव्हतो. त्या दिवशी संध्याकाळी मी घरी आलो तर तोपर्यंत पुलं आणि माई यांचं लग्न लागूनही गेलं होतं! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वडिलांनी आमच्या घरातल्या हॉलमध्ये गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. 25-30 लोकांना त्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. "पुलंना या कार्यक्रमात गायला लावायचं,' असं वडिलांनी ठरवलं होतं. मात्र, पुलंना याची पूर्वकल्पना त्यांनी दिलेली नव्हती. मैफल जमली तेव्हा पुलंनी वडिलांना विचारलं ""गाणं कोण गाणार आहे?'' तेव्हा वडील म्हणाले ः ""तुम्हीच...!'' स्वतःच्या लग्नात स्वतःच गाणं म्हणणारे पुलं हे बहुदा पहिलेच असावेत! पुलंनी एक पैसा वा वस्तू आहेर म्हणून आमच्याकडून घेतली नाही. रजिस्टरचा सरकारी कागद त्या वेळी माईनं स्वतःच आठ आण्यांना आणला होता. केवळ आठ आण्यांच्या खर्चात पुलं-माई यांचं लग्न पार पडलं. पुलं आणि माई लग्नानंतर मुंबईला निघाले तेव्हा आम्ही आमच्याजवळचा ग्रामोफोन त्यांना भेट दिला होता.

***

आम्ही सगळे नंतर पुलंना भाई म्हणू लागलो. एकदा सहज मी त्यांना म्हटलं ः ""भाई, तुम्हाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला पाहिजे.'' त्यावर भाई लगेच म्हणाले ः ""अरे, मी नाही रे... माझ्यापेक्षा कुसुमाग्रज मोठे साहित्यिक आहेत. ज्ञानपीठाचे मानकरी ते व्हायला हवेत.'' त्या काळी भाईंच्या व्यक्तिमत्त्वानं आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलेलं होतं. स्वतः उत्तम साहित्यिक असूनही भाईंनी दुसऱ्या साहित्यिकासाठी हे कौतुकोद्गार काढले होते. एखादा साहित्यिक दुसऱ्या साहित्यिकाचं कौतुक अपवादानंच करताना आढळतो; पण भाईंचा स्वभाव तसा नव्हता. ""कुसुमाग्रज माझ्यापेक्षा ग्रेट आहेत,'' असं भाई म्हणाले. तो प्रामाणिकपणा भाईंकडं होता. चांगल्याला चांगलं म्हणणं आणि स्वतः ग्रेट असूनही त्याचा मोठेपणा न मिरवता इतर जण आपल्यापेक्षाही मोठे आहेत, हे ओळखून त्यांचा आदर-सन्मान करणं हे भाईंच्या स्वभावाचं वेगळेपण होतं.

***

-मला तब्बल 50 वर्षं त्यांचा सहवास लाभला. या प्रदीर्घ सहवासात मला त्यांची काही वैशिष्ट्यं जाणवली, ती अशी ः वेळेबाबत काटेकोरपणा, खाण्याविषयीच्या विशिष्ट आवडी-निवडी नसणं, कुणाबद्दलही वाईट न बोलणं, कुणाचाही द्वेष न करणं...
कार्यक्रम कुठलाही असो, तो ठरलेल्या वेळेवरच सुरू होईल याची दक्षता ते अगदी काटेकोरपणे घेत असत. "आज जेवायला हेच पाहिजे अन्‌ असंच पाहिजे', असा त्यांचा हट्ट कधीच नसायचा. अमुकतमुक पदार्थाविषयी ते आग्रही नसायचे. जे काही ताटात वाढलं जायचं त्याचा ते आनंदानं स्वाद घेत जेवायचे. मासे ही त्यांची विशेष आवड होती. कुणाविषयीही ते कधी वाईट बोलले आहेत वा त्यांनी कुणाचा द्वेष केला आहे, असं मला त्यांच्या प्रदीर्घ सहवासात कधीच आढळून आलं नाही. पुलंना एखाद्या व्यक्तीमध्ये काही वेगळेपणा (स्पार्क) दिसला की त्या व्यक्तीला पुढं आणल्याशिवाय ते राहत नसत. भाईंनी असं अनेकांचं जीवन घडवलं आहे. पुढच्या काळात लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेलं "वस्त्रहरण' हे गंगाराम गवाणकर लिखित नाटक सुरवातीला चालत नव्हतं. त्यामुळं "शेवटचा एक प्रयोग करून थांबायचं', असं त्या मंडळींनी ठरवलं होतं. भाईंनी तो प्रयोग पाहिला आणि त्यांना ते नाटक अतिशय आवडलं. त्या नाटकासंबंधी त्यांनी पत्र लिहिलं. त्यानंतर "वस्त्रहरण' लोकांना एवढं आवडलं, की त्याचे प्रयोगांवर प्रयोग होत राहिले आणि त्या नाटकानं लोकप्रियतेचा उच्चांक गाठला.
***

भाईंना वेगवेगळ्या क्षेत्रांतले अनेक लोक भेटायला येत असत. ते कुणालाही कधीही भेटायला तयार असायचे. भेटायला येणाऱ्या व्यक्तीनं आधी वेळ घेऊन भेटायला यावं, एवढीच त्यांची माफक अपेक्षा असायची. त्यातही विचार त्या व्यक्तीच्याच हिताचा असायचा व तो असा की त्या व्यक्तीला आपल्याला पुरेपूर वेळ देता यावा. समजा, एखादी व्यक्ती वेळ न ठरवता भेटायला आली आणि त्याच वेळी आणखी कुणीतरी आधीच भेटायला आलेलं असेल तर नंतर आलेल्या त्या व्यक्तीलाही वेळ देता येत नसे आणि समोर आधीच बसलेल्या व्यक्तीशीही बोलणं नीट होत नसे. हा घोळ-घोटाळा टाळण्यासाठी "आधी वेळ घेऊन' येण्याची अपेक्षा ते बाळगायचे आणि त्याबाबतीत आग्रहीसुद्धा असायचे.
***

पुलंचं राजकारणाशी सूत कधीच जमलं नाही. पुलं नेहमीच राजकारणापासून लांब राहिले. कोणत्याही गोष्टीसाठी राजकारण्यांची मदत घेणं त्यांनी टाळलं. याबाबत एक विशेष आठवण सांगावीशी वाटते. नरसिंह राव हे पंतप्रधान असतानाची गोष्ट. तेव्हा ते पुण्यात येणार होते. "पुण्याच्या दौऱ्यात भाईंना भेटावं' असं राव यांना सुचवण्यात आलं होतं. त्यामुळे राव यांच्या सोबत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि पाच-सहा अन्य मंत्री भाईंना भेटायला घरी येणार होते. अनेक कलाकार स्वतः पंतप्रधानांची भेट घेतात; पण इथं पंतप्रधानच भाईंकडं येणार होते. त्या वेळी निवडणुका तोंडावर आलेल्या होत्या. या भेटीत आपल्यासोबत फोटो काढले जाऊन त्यांचा वापर निवडणुकांसाठी केला जाऊ शकतो, हे भाईंच्या लक्षात आलं. मग भाईंनी राव यांना पत्र लिहिलं ः "तुम्ही मला भेटायला येणार असल्याचं समजलं. मात्र, त्याच वेळी माझी मुंबईतल्या "नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस ' इथं महत्त्वाची मीटिंग आहे. ती मीटिंग रद्द होऊ शकत नाही; त्यामुळे आपली भेट होऊ शकणार नाही.' पंतप्रधान आपल्याला भेटायला आल्यास त्या भेटीचा फायदा आपल्यालाही होऊ शकतो, असा विचार भाईंनी कधीच केला नाही.
***

क्षुल्लक गोष्टींतूनही भाईंना वेगळं काहीतरी सुचायचं. एकदा ते एसटीतून प्रवास करत होते. त्या एसटीला एक म्हैस आडवी आली. या साध्याशाच प्रसंगावर त्यांनी "म्हैस' नावाची एक खुमासदार विनोदी कथा लिहिली आणि ती कमालीची लोकप्रिय झाली. पुलंची बुद्धिमत्ता विलक्षणच होती. एरवी, वयानं आणि कर्तृत्वानं मोठ्या माणसांवर व्यक्तिचित्रं लिहिली जातात; पण भाईंनी त्या वेळी दोन-तीन वर्षांच्या असलेल्या माझ्या मुलाचं - दिनेशचं - व्यक्तिचित्र लिहिलं होतं!
माझं आणि भाईंचं फार जवळचं नातं होतं. मी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात शिकायला होतो आणि कॉलेजच्याच होस्टेलवर राहत होतो, तेव्हाची आठवण सांगतो. तेव्हा भाई चित्रपटात काम करत असत. पुण्याला गुप्ते यांच्या आउटहाऊसमध्ये दोन खोल्या होत्या, त्यातल्या वरच्या एका खोलीत पुलं भाड्यानं राहत असत. पुढं त्यांना काही दिवसांनी पुण्यातच नवीन फ्लॅट मिळाला. ते होस्टेलवर आले आणि मला म्हणाले ः ""मला आता चांगली जागा राहण्यासाठी मिळाली आहे, तेव्हा तू आमच्याकडंच राहायला चल.'' मी होस्टेल सोडून त्यांच्या घरी राहायला गेलो. त्या वेळी मला साहजिकच खूप बरं वाटलं. पुढच्या काळात आमचाही पुण्यात चार खोल्यांचा फ्लॅट झाला; पण आम्ही तिथं कधीच उतरायचो नाही. कारण, "पुण्याला गेलो की भाईंकडंच मुक्कामी उतरायचं', हे ठरून गेलेलं होतं. पुढं मी कामानिमित्त काही वर्षांसाठी अमेरिकेत स्थायिक झालो. एकदा भाई अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. मला भेटायला येण्यासाठी त्यांना दोन-तीन हजार मैलांचा प्रवास करावा लागणार होता. केवळ मला भेटण्यासाठी म्हणून ते तेवढा प्रदीर्घ प्रवास करून आमच्या अमेरिकेतल्या घरी येऊन गेले. त्यांच्यात आणि माझ्यात असं स्नेहाचं आणि आपुलकीचं नातं होतं.

पुढं मी अमेरिकेची नोकरी सोडून पुन्हा भारतात आलो. तेव्हा भाई ज्या इमारतीत राहायचे, त्याच इमारतीत राहायला गेलो. अमेरिकेची नोकरी सोडून आलो, याचं दुःख मला तेव्हा झालं नाही. कारण, आता भाईंच्या सहवासात राहायला मिळणार होतं, भाईंचा सहवास मिळणार होता आणि या बाबीचा आनंद त्याहूनही अधिक होता.
***

भाईंची सामाजिक बांधिलकीची जाणीव तीव्र होती आणि सक्रिय होती. त्या वेळी अपघातग्रस्तांसाठी "लीला मुळगांवकर रक्तपेढी' चालवली जात असे. त्या रक्तपेढीला 40 हजार रुपयांची गरज होती. भाईंकडं त्या वेळी पैसे नव्हते; मग त्यांनी ते 40 हजार रुपये आपल्या नाट्यप्रयोगांतून उभे करून दिले. अशा समाजकल्याणाच्या कामासाठी भाईंनी सन 1964-65 च्या दरम्यान "पु. ल. देशपांडे फाउंडेशन'ची स्थापना केली. त्या काळी नाटकाच्या तिकिटाचा सगळ्यात जास्त दर होता सात रुपये. त्या वेळी ते सात रुपयेही फार वाटायचे. कारण, सात रुपयांमध्ये महिन्याची खानावळ होत असे. परिणामी, भाईंवर तेव्ही टीका झाली होती. नाटकांमध्ये काम करणारी प्रत्येक व्यक्ती, कलाकार रात्र रात्र जागून लोकांचं मनोरंजन करत असते; मग तिनं का बरं हलाखीत राहावं, असं भाईंचं म्हणणं होतं. नाटकात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती सुधारावी, तसंच तिला नीटनेटकं जीवन जगता यावं यासाठी भाईंनी नाटकाच्या तिकिटांचे दर जास्त ठेवले होते. भाईंनी जेवढे पैसे कमावले, त्यातला बहुतांश वाटा हा जगालाच परत दिला. भाईंनी अनेक चांगल्या, तसंच लोककल्याणाच्या कामांसाठी देणगी दिली; पण त्याविषयीची प्रसिद्धी कुठं कधी केली नाही. एका माणसानं भाईंचं नाटकातलं काम पाहून त्यांना रोलेक्‍स घड्याळ भेट दिलं होतं. ते ऑटोमॅटिक घड्याळ होतं. रोलेक्‍ससारखी महागडी घड्याळं घालून मिरवणारी मंडळी आज आपण अनेकदा पाहतो. मात्र, भाईंनी ते घड्याळ कधीच वापरलं नाही. इतके ते साधे होते. "प्रामाणिक राहा आणि स्वतःच्या गरजांपेक्षा समाजातल्या गरजवंतांच्या गरजांकडं लक्ष द्या,' ही महत्त्वाची शिकवणूक मला भाईंकडून मिळाली. तिचं पालन करण्याचा मी प्रयत्न करतो.
***

भाईंची आणखी एक खासियत म्हणजे त्यांची स्मरणशक्ती. ती कमालीची होती. "नाच रे मोरा', "इंद्रायणी काठी' अशा अनेक गाण्यांना भाईंनी संगीत दिलं. ती गाणी खूप लोकप्रियही झाली. "इंद्रायणी काठी देवाची आळंदी' हा अभंग गाऊन पंडित भीमसेन जोशी त्यांच्या बहुतेक मैफलींची सांगता करत असत. "गुळाचा गणपती' या चित्रपटातलं "ही कुणी छेडिली तार?' हे गाण भाईंचं खूप आवडतं गाणं होतं. कलाकाराची गाण्याची मैफल संपल्यावर गाणं कसं, किती उत्तम झालं, त्यात काय काय आवडलं याविषयी भाई कौतुक करायचे. गाण्यात काय कमी होतं आणि काय चुकलं यावर ते कधीच बोलायचे नाहीत. त्या गाण्यातल्या चांगल्या बाजूविषयीच ते बोलायचे. हा त्याचा स्वभाव होता. कलाकाराच्या कमकुवत गुणांवर भाष्य करण्यापेक्षा त्याच्या चांगल्या गुणांवर भाष्य करून त्याला उत्तेजन देणं अधिक महत्त्वाचं, असं भाईंचं मत होतं. भाईंनी अशा प्रकारे अनेकानेक नवकलाकारांना प्रोत्साहित केलं आणि त्यांना पुढं आणण्यात पुढाकार घेतला.
***

"ऑल इंडिया टेलिव्हिजन'चे भाई हे प्रमुख होते; पण त्यांना कधीच कोणत्याही पदाचा मोह आणि अहंकार नव्हता. मिळणाऱ्या पदापेक्षा आपलं लेखन आणि अभिनय, नाटकांचे प्रयोग यातच त्यांनी धन्यता मानली. याबाबत कविवर्य विंदा करंदीकरांची भाईंविषयीची एक आठवण आहे. विंदांना पारितोषिक मिळालं होतं आणि त्या पारितोषिकाची रक्कम त्यांनी दान केली होती. त्या वेळी विंदांची मुलाखत घेतली गेली. "तुम्ही पुलंसारखं दान केलंत...' असं त्या मुलाखतकारानं त्या मुलाखतीदरम्यान म्हटलं. त्या वेळी विंदा त्याला म्हणाले ः ""माझी तुलना पुलंसोबत होऊ शकत नाही. मला पुरस्कार मिळाला होता, ते माझे स्वतःचे पैसे नव्हते. पुलंनी स्वतः त्रास घेऊन दुसऱ्यांना देण्यासाठी पैसे मिळवले. हे असं करणं खूप वरच्या "लेव्हल'चं आहे. मी ती "लेव्हल' गाठू शकत नाही.''
***

भाई शेवटच्या काळात आजारी होते. त्यांना अनेक शारीरिक व्याधींचा त्रास व्हायचा; पण त्यांनी आपल्या आजारपणाचा बाऊ कधीच केला नाही. त्यांना चालायला त्रास होत असे, बोलताही येत नसे. अतिशय सावकाश बोलावं लागत असे. असं असतानाही ते शेवटपर्यंत आनंदी राहिले. शेवटी शेवटी शारीरिक त्रास वाढल्यामुळं भाईंनी लोकांना भेटणं फारच कमी केलं होतं. लोकही समजून घेत त्यांना. तरीदेखील कुणी भेटायला आलं तर, भाई त्यांच्याशी बोलले नाहीत, असं कधीच झालं नाही. कुणाशीही बोलताना "मी फार मोठी व्यक्ती आहे,' असा त्यांचा आविर्भाव कधीच नसे. अगदी सर्वसामान्यांप्रमाणे ते त्या व्यक्तीशी संवाद साधत असत. शेवटच्या आजारपणातही त्यांची स्मरणशक्ती जशी तल्लख होती, तशीच त्यांची विनोदबुद्धीही तेवढीच जागृत होती. एकदा दिनेश घरी लॅपटॉप घेऊन आला. कॉम्प्युटरला मराठीत संगणक म्हणतात. "लॅपटॉपला मराठीत काय म्हणणार,' असं आमचं संभाषण सुरू होतं, तेव्हा पुलं पटकन म्हणाले ः "अंगणक!' कारण, लॅपटॉप आपण आपल्याबरोबर कुठंही घेऊन जाऊ शकतो ना...!
***

लग्नानंतर पत्नीचं नाव बदलायची प्रथा आपल्याकडं प्रचलित आहे. अलीकडं ती काहीशी कमी झाली असली तरी 50-60 वर्षांपूर्वीची स्थिती वेगळी होती. माझ्या बायकोचं नाव सुशीला होतं. तिचं नाव बदलायला नको, असं माझं मत होतं. मात्र, माझ्या मोठ्या वहिनीचंही नाव सुशीलाच होतं. त्यामुळं "एका घरात दोन सुशीला कशा चालणार?' असा प्रश्न निर्माण झाला.
मग "तुझ्या बायकोचं नाव अंजली ठेवावं,' असं भाईंनी सुचवलं. ते मला आवडलं आणि सुशीलाची अंजली झाली. ही पुलंनी मला दिलेली भेट आहे, असं मी मानतो.

(शब्दांकन : उत्कर्षा पाटील)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com