स्वयंरोजगाराचा संस्कार हवा...

आपली ऐट दाखवताहेत.’ शाळेत गणवेश वगैरे राहू देत चप्पल वगैरे घालूनसुद्धा मुले येत नसत. विद्यार्थ्यांनी चपला घालणं, ही कारण नसताना केलेली चैन होती.
satara city employment infrastructure development and political influence
satara city employment infrastructure development and political influence Sakal

- डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर

सप्रेम नमस्कार,

माझं वय आज ८७ वर्षे. म्हणजे देश स्वतंत्र झाला, त्या वेळी मी दहा वर्षांचा होतो. त्या वेळी मी सातारा शहरात होतो. शहर कसलं... थोडंफार वाढलेलं खेडं. आजची सातारा शहराभोवतालची खेडीसुद्धा त्या वेळच्या सातारा शहरापेक्षा चकाचक आहेत.

त्या वेळी सबंध गावात एक मोटार, दोन मोटारसायकली आणि दहा-बारा सायकली होत्या. एखादा मित्र किंवा गुरुजी सायकलवरून शाळेत आले, तर आम्ही म्हणायचो, ‘यांना पैशाचा माज चढलाय. पाय काय मोडलेत का?

आपली ऐट दाखवताहेत.’ शाळेत गणवेश वगैरे राहू देत चप्पल वगैरे घालूनसुद्धा मुले येत नसत. विद्यार्थ्यांनी चपला घालणं, ही कारण नसताना केलेली चैन होती. भोवताली अन्नधान्याचा तुटवडा होता. अमेरिकेत डुकरांना खायला घालतात तो लाल मिलो ज्याला आम्ही लाल ज्वारी म्हणायचो. त्याची दातात सहजपणे मोडणार नाही, अशी भाकरी व्हायची.

एका गावातून दुसऱ्या गावात जायचं म्हणजे मर्जीप्रमाणं येणाऱ्या आणि मर्जीप्रमाणं जाणाऱ्या, पोपो करत हिंडणाऱ्या, खडखडत चालणाऱ्या बस होत्या. मला आठवतंय गावात एसटी बस सुरू झाली. बसायला छान आसन, वेळेवर निघणार-वेळेवर पोचणार. आधी आसन आरक्षित करता येणार, असं सांगणारी प्रत्यक्षात आणणारी एसटी. ज्या वेळी एसटी गावात आली, त्या वेळी स्वातंत्र्य मिळालं तसा आनंद आमच्या मनातून ओसंडून वाहत होता.

हे सारं सांगायचे कारण वेगळं. वयाच्या १७ व्या वर्षी मी सातारा शहर सोडलं. त्यानंतर ४५ वर्षे जगभर आणि भारतभर भरपूर हिंडून मी २५ वर्षांपूर्वी सातारा शहरात परत आलो. त्या वेळी सातारा बदलला होता; पण माझ्या कल्पनेत बसत होता.

मात्र, आज थोडं निरखून पाहिलं, तर विश्वरूप दर्शन पाहिल्यावर अर्जुन जसा गोंधळाला असेल, तसं मला सातारा पाहिल्यावर गोंधळून जावयास होतं. खरंतर सातारा शहर अजूनही तसं पेंगुळलेलं पेन्शनरांचे गाव आहे. गावात मोठे उद्योगधंदे नाहीत. मध्यम आकाराचेही तुरळक उद्योगधंदे आहेत. मात्र, गावात वाहनांचा महापूर आहे.

पायी चालणं ही गोष्ट अशक्य अशी कसरत आहे. गावात पुस्तकाचं एकही दुकान नाही; पण बाजारपेठेत एका दुकानानंतर एक दुकान अशी चढाओढ करत सोने-चांदी-जवाहीर यांची दुकानं आहेत. यातील एकाही दुकानात एकही ग्राहक नाही,

अशी वेळ शोधूनही सापडणार नाही आणि गावात हॉटेल्सचा महापूर आहे. त्यात जे पदार्थ मिळतात, त्यांची नावंसुद्धा मला नीट वाचता येत नाहीत. खरंतर त्यांनी इथं ‘महाराष्ट्रीय पदार्थ सोडून इतर सर्व पदार्थ मिळतात,’ अशी पाटी लावावयास हवी. असो...

माझ्या मनातला प्रश्न थोडा वेगळा. ही समृद्धी आहे, की सूज ? झालं ते चांगलं की वाईट? आपण करावयास निघालो होतो गणपती आणि झाला मारुती, असं काही झालं का? झालं असेल, तर त्याचं कारण काय ? वीर सावरकरांनी दोन शब्दांत दोन संस्कृती सांगितल्या होत्या. त्याप्रमाणं कालचा भारत आणि आजचा भारत, दोन शब्दांत सांगावयाचं म्हटलं,

तर मी शाळेत असताना ‘ तुमची बुद्धिमत्ता, कौशल्य, कष्ट आणि प्रामाणिकपणा याच्या जोरावर तुम्ही काहीही करू शकाल,’ हे आमच्या मनावर बिंबवलेलं होतं. आज पैसा, ओळख, कटकारस्थानं यांच्या जोरावर आणि फक्त त्यांच्याच जोरावर तुम्ही काहीही मिळवू शकता.’ हे मुलांच्या मनावर वज्रलेप झालंय का? किंवा याचा व्यत्यासही खरा आहे का? त्यांच्या मनावर बिंबवलंय ‘तुमची बुद्धिमत्ता, तुमचे संस्कार यांना आजच्या भारतात काहीही किंमत नाही.’

फक्त एक गोष्ट लक्षात घेऊ या. आमच्या वेळी शिक्षण खूप स्वस्त होतं. अर्थात ते स्वस्त शिक्षणसुद्धा अप्राप्य वाटावं, असा बहुजन समाज भोवताली होता हे खरं; पण त्या बहुजन समाजासाठी ‘कष्ट करा आणि शिका’ असं सांगत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे कर्मवीर भाऊराव पाटील भोवताली होते.

महाराष्ट्रातील कर्तृत्वात तरुणांची एक पिढी त्यांनी घडवली. हे फार मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतात करण्यासाठी पंडित नेहरूंनी भारतात चार टोकावर चार ‘आयआयटी’ स्थापन केल्या. अमेरिका, जर्मनी, रशिया यांच्याशी करार करून त्यांच्या सहकार्यानं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्या उभारल्या. या आयआयटीमध्ये शिक्षण घेतले.

भारतीय विद्यार्थी तंत्रविज्ञानात जागतिक दर्जाचे असतील आणि चुकूनही या आयआयटीमध्ये कोणालाही पैशाच्या किंवा ओळखीच्या जोरावर प्रवेश मिळवणे स्वप्नातही शक्य होणार नाही, असे अभिवचन नेहरू आणि देश यांनी भारताला दिलं होतं.

त्यांनी आपला शब्द पाळलाय. आजही जगभर भारतातील कोणत्याही आयआयटीमधील बीटेक ही पदवी सुवर्णमुद्रा म्हणून स्वीकारली जाते. त्याचबरोबर फक्त निवड परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण झालात, तरच तुम्हाला आयआयटीमध्ये प्रवेश मिळतो. मग नेमका बदल कुठे झालाय? त्या वेळी नेहरूंनी आयआयटीमधील शिक्षणाचं शुल्क, निवास व्यवस्था, भोजन या गोष्टी विश्वास बसणार नाही, एवढ्या स्वस्त ठेवल्या होत्या.

मला एक गोष्ट आठवते. आमच्या वेळी भरपूर मार्क मिळवून पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजात फी भरून देशपांडे नावाच्या आमच्या मित्राने प्रवेश घेतला होता. ते पैसे परत मिळणार नाहीत; पण चार वर्षांत आयआयटीमध्ये शिक्षण घेतलं,

तर वाचणारे पैसे अधिक आहेत, म्हणून त्यानं पुण्यातील कॉलेजमधील पैसे बुडवून प्रवेश रद्द करून मुंबईतील आयआयटीमध्ये प्रवेश घेतला. खरंतर आयआयटी स्वस्तच आहे. त्या वेळीही फक्त आणि फक्त बुद्धिमत्तेवरच तेथे प्रवेश मिळत होता. आजही वरवर तसेच आहे. मात्र, एक महत्त्वाचा महाभयानक फरक झालाय.

त्या वेळी खेड्यातील हुशार मुलगा सहजपणे आयआयटीमध्ये प्रवेश मिळवत होता. आज मात्र बारावी झाल्यावर आयआयटीची प्रवेश परीक्षा द्यावी, म्हणून लाखो रुपये खर्च करून कोटा वा इतर ठिकाणी वर्षभर अभ्यासक करणारी मुलंच तिथं प्रवेश मिळवतात.

खरी गरज आहे, ती त्यांच्या प्रवेश परीक्षांची रचना बुद्ध्यंक मोजणारी वा इतर कोणत्या तरी मानदंडावर ठरवली गेली पाहिजे. आपण आज असं काही करत नाही. त्यामुळं मुलांच्या मनावर ‘पैसा असेल, तर आणि तरच तुम्ही पुढे जाल आणि तो पैसा कोणत्याही मार्गाने खरंतर ‘कट प्रॅक्टिस’पासून ‘कट थ्रोट कॉम्पिटिशन’पर्यंत कोणत्याही आपण मार्गानं मिळवला पाहिजे.’ हे मुलांच्या मनावर वज्रलेप करतोय का?

या आणि अशा रचनांमुळं आपण संवेदनाहीन झालो आहोत का? खरंतर साखर कारखाने काढायला तंत्रज्ञान व प्रशासन यातील कौशल्याची थोडीफार ‘फार थोडी’ गरज असते. आपण धडाधड हे कारखाने काढले.

सरकारी अनुदानावर काढले, ते सहजपणे बुडवून दाखवले. पुन्हा ते लिलावात कवडीमोल किमतीत विकत घेऊन पैसे मिळवले. हेही तसे ठीक. मात्र, जगाच्या इतिहासात आपण प्रथमच पर्जन्यछायेच्या प्रदेशात साखर कारखाने काढले.

एका बाजूला पाणी पिणारा ऊस आणि दुसऱ्या बाजूला रणरणत्या उन्हात डोक्यावर हंडा घेऊन घोटभर पाण्यासाठी रानोमाळ हिंडणाऱ्या म्हाताऱ्या बाया आणि अजाण पोरांचे थवे आपल्या भोवताली आहेत. आपल्या एवढंही लक्षात कसं येत नाही.

धरणातील पाण्यावर पहिला हक्क नागरिकांच्या पिण्याच्या आणि इतर नित्योपयोगी लागणाऱ्या पाण्यासाठी झाला पाहिजे. धरण प्रथम पिण्याच्या पाण्यासाठी. प्रथम प्रत्येक झोपडीत नळातून नियंत्रित पाणी असे आपल्या मनातही का येत नाही? अशा अनेक गोष्टी आपल्या भोवताली आहेत. आपण संवेदनाहीन झालोय का?

सातारा शहरातील हॉटेल संध्याकाळपासून दुथडी भरून वाहत असतात. त्या मुलांचे राहू देत, हॉटेलात येणारे प्रत्येक कुटुंब सहजपणे पाच-दहा हजार रुपये खर्च करते आणि त्याचवेळी गावातील दिवसरात्र मेहनत करणारे ऑटोरिक्षावाले, हॉटेल आणि दुकानात काम करणारे कामगार म्हणजे सातारा शहरातील ९० टक्के लोक महिना फक्त दहा ते पंधरा हजार रुपये मिळवतात. आपण संवेदनाहीन झालोय.

आमच्या लहानपणी आमच्या जीवनात अभ्यास, संस्कार आणि प्रामाणिकपणा या गोष्टी मनावर बिंबवल्या गेल्या होत्या आणि आज फक्त ‘पैसा, ओळख आणि मनगटी ताकद एवढ्या तीनच गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या आहेत.’ या गोष्टी मुलांच्या आणि तरुणांच्या मनात केंद्रस्थानी बिंबवण्यात आपण यशस्वी झालोय का?

त्याचवेळी मुलांनी आणि तरुणांनी एक गोष्ट शिकली पाहिजे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश आपणाला दिला होता. त्यात एक अध्याहृत शब्द होता. त्या वेळी शिक्षण आणि नोकरी या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या होत्या.

आज शिक्षण आणि नोकरी यांची पूर्णपणे फारकत झालेली आहे. खरी गरज अशी आहे, की आजचे शिक्षण मुलांना स्वयंरोजगार कसा करता येईल, याचं शिक्षण देऊन त्यासाठी प्रवृत्त करणारं हवं. तुमच्या भोवतालच्या टाकाऊ वस्तूंतून कोणत्या नित्योपयोगी गोष्टी बनवता येतील, कोणते नवे उद्योगधंदे तुम्ही सुरू करू शकाल.

एखादा उद्योगधंदा सुरू करावयाचा, तर त्यासाठी कोणत्या आणि किती ठिकाणाहून आणि कशाप्रकारे परवाने मिळवावे लागतात, रक्कम उभी करावी लागते, याचं शिक्षण आपण मुलांना अजिबात देत नाही. ते शिक्षण आपण मुलांना दिलं,

तर पदवी मिळाल्यावर आज मुलं स्पर्धा परीक्षांच्या मृगजळामागे वेड्यासारखी धावत असतात, हे म्हणजे लॉटरीच्या तिकिटामागे धावण्यासारखे आहे. यात खरा फायदा होतो तो केवळ क्लास चालवणाऱ्यांचा. आपण मुलांच्या मनावर ‘स्पर्धा परीक्षांचे मृगजळ विसरा आणि स्वयंरोजगाराचे गिर्यारोहण मनावर घ्या’ हा संस्कार कधी रुजवणार आहोत?

(शब्दांकन : संजय शिंदे)

(लेखक हे ज्येष्ठ विचारवंत व राष्ट्रीय पातळीवरील संस्थेत काम केलेले वैज्ञानिक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com