

Marathi Sahitya Sammelan
esakal
पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे महामंडळाची धुरा आल्यानंतरचे हे पहिलेच संमेलन. नव्या दमाच्या तरुण कार्यकारिणीनं आश्वासन दिल्याप्रमाणे त्रुटी सुधारण्याचा प्रयत्न करत बदलांची नांदी केली. ग्रंथ प्रदर्शनातूनच संमेलनात प्रवेश, कार्यक्रमांची मर्यादित संख्या, उद्घाटन व समारोपाला अन्य भााषेतील ज्येष्ठ साहित्यिकांना निमंत्रण, सर्व माजी संमेलनाध्यक्ष आणि महामंडळाच्या माजी अध्यक्षांना निमंत्रण, समकालीन पुस्तकांवर चर्चा, सर्व विचारधारेच्या वक्त्यांना स्थान, गझलकट्ट्याचे पुनरागमन अशा अनेक सकारात्मक गोष्टी या संमेलनात पाहायला मिळाल्या. संयोजन समितीने संमेलनाची पूर्वप्रसिद्धी उत्तम केल्यामुळे संमेलनाला येणाऱ्या रसिकांची गर्दी लक्षणीय होती. साहित्यिक कार्यक्रम ऐकण्यासाठी रसिक उत्सुक होते; मात्र चार दिवस चार मनोरंजनात्मक कार्यक्रमांची खरंच गरज आहे का, याचा विचार व्हायला हवा. विशेषतः ‘हास्यजत्रा’सारख्या कार्यक्रमांसाठी होणाऱ्या अलोट गर्दीमुळे त्याआधीच्या कार्यक्रमांमध्ये होणारा अडथळा, ही गंभीर बाब आहे. शिवाय या मनोरंजनात्मक कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनाचाही विचार करायला हवा. या संयोजन समितीने व्यवस्थेतही फार कसूर ठेवली नाही; मात्र चांदीच्या ताटात जेवणावळी करण्यासारखा दिखाऊ मोह त्यांना टाळता आला नाही. तसंच, यंदा साहित्यनगरीला स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज यांचं नाव देण्यात आलं असलं, तरी अन्य मंडपांना आणि व्यासपीठांना स्थानिक परिसरातील दिग्गज साहित्यिकांची नावं देण्यात आली नव्हती. स्थानिक परिसरातील साहित्यिकांच्या योगदानाचं स्मरण करण्यासाठीचा हा महत्त्वाचा पायंडा असून त्याचा विसर पडता कामा नये.