

Satish Gupta art journey
esakal
हर्ष भटकळ - saptrang@esakal.com
विविध माध्यमांत काम करणाऱ्या सतीश गुप्ता यांच्यासाठी कलाजीवन ही बाह्य वस्तू नाही तर ते त्यांचे जीवन आहे. कला हा आत्माविष्कार नसून कलावंत, कला आणि अनुभव यातील परात्मता काढून स्वत:ला पुसून टाकायचा एक प्रयत्न आहे. पेंटिंग, शिल्पकला आणि कवितालेखन हे गुप्तांसाठी कलेचे निरनिराळे प्रकार नाहीतच, त्या त्यांच्या अस्तित्वाच्या निरनिराळ्या जाणिवा आहेत.
सतीश गुप्ता यांच्यासाठी कलाजीवन ही बाह्य वस्तू नाही तर ते त्यांचे जीवन सर्वस्वच आहे. ‘मी काही सर्जनशील कलाकार नाही’ हे ते सहजपणे सांगून जातात. ‘या कलाकृती फक्त माझ्या माध्यमातून प्रकट होतात.’ असे कोणी इतर कलावंत म्हणाले असते तर ते नाटकी किंवा उगाच मिथक विधान वाटले असते. परंतु सतीशजी जेव्हा हेच म्हणतात तेव्हा ते पटते. चार दशकांहून अधिक काळाच्या आपल्या कलाप्रवासात गुप्ता यांनी चित्रकला, मुद्राचित्रकला, शिल्पकला, कविता आणि हायकू अशा विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. या सर्व अभिव्यक्तींना झेन तत्त्वज्ञान, क्षणभंगुरता, अध्यात्म आणि वर्तमानक्षणात पूर्णपणे उपस्थित असण्याच्या अनुभवाशी असलेली त्यांची अंतर्मुख नाळ एकत्र बांधून ठेवते.त्यांची शिव, विष्णू, सूर्य आणि बुद्ध यांची विख्यात शिल्पे ही आता देशभरात सर्वात नावाजलेली आहेत. परंतु त्या सर्वामागे आहे या माणसाची स्थिरतेची ओढ.