अशी पाखरे येती...

सतीश पांडे 
बुधवार, 28 डिसेंबर 2016

बर्ड रिंगिंग 
ही स्थलांतरित पक्ष्यांचा अभ्यास करण्याची पारंपरिक पद्धत आहे. यामध्ये पक्ष्याच्या पायात एक कडी अडकवली जाते. या कडीवर कोणी कडी अडकवली आणि ही कडी सापडल्यास कोणाला कळवायचं ही माहिती लिहिलेली असते. कधीकधी रंगीत कड्याही वापरल्या जातात. कडीचे वजन पक्ष्याच्या एकूण वजनाच्या पाच टक्के असेल, याची दक्षता घेतली जाते. 

हिवाळ्याची चाहूल लागलाच परदेशी पक्षांचे थवेच्या थवे आकाशात उडताना पाहायला मिळतात. हिवाळा संपेपर्यंत हे पक्षीवैभव तलावाकाठी, समुद्रकिनारी, रानावनात अगदी पुण्या-मुंबईसारख्या शहरी भागांतदेखील पाहायला मिळते. हिवाळा संपताच हे पक्षी अचानक नाहीसे होतात. एवढे सगळे पक्षी येतात कुठून आणि अचानक कुठे जातात, असा प्रश्‍न तुम्हालाही पडला असेल ना? पक्षी स्थलांतर का व कसे करतात, ते भारतात कुठून येतात, त्यांना रस्ते कसे समजतात, त्यामागचे विज्ञान काय असते याची रंजक माहिती... 

स्थलांतर कशासाठी? 
हिवाळ्यात ध्रुवीय प्रदेशातील दिवस लहान होतो. पक्ष्यांना अन्न शोधण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यातच बर्फवृष्टीमुळे अनेक वनस्पती, कीटक बर्फाखाली जातात. त्यामुळे हे पक्षी अन्नाच्या शोधात सुरक्षित प्रदेश शोधत स्थलांतर करतात. आपल्याकडे थंडी असली, तरी ती ध्रुवीय प्रदेशाच्या तुलनेत कमी असते आणि इथे या पक्ष्यांना मुबलक प्रमाणात अन्नही मिळते. आपल्याकडे काही काळापुरते दिसणारे हे पक्षी स्थलांतर करून आलेले असतात. ध्रुवीय प्रदेशातून हजारो मैलांचे अंतर कापून ते आपल्याकडे उतरतात. काही काळ इथे थांबून परत आपापल्या प्रदेशात जातात. हे वर्षानुवर्षे अगदी न चुकता घडते. 

भारतात पक्षी येतात कोठून? 
भारतात युरोपातून, उत्तर व मध्य आशियातून, पूर्व आशियातून तसेच ऑस्ट्रेलियातून पक्षी येतात. साधारणपणे आपल्याकडे 159 प्रजातींचे पक्षी स्थलांतर करून येतात. यात पिन्टेल, शॉव्हलर, वीजन, टफ्टेड, पोचार्ड, टील, चक्रवाक अशी बदके, कदंब व पट्टाकदंब हंस यांसारखे पानथळ पक्षी; तर चमचा, तुतवार, उचाट, शेकाट्या, कारंडव, कंठेरी चिखल्या, सोनचिखल्या, गप्पी दास, कस्तूर, करडा धोबी, क्रौंच, रोहित असे अनेक छोटे-मोठे पक्षी आढळतात. दलदल ससाणा, शिक्रा, श्‍येन, तीसा, खरूची असे शिकारी पक्षीदेखील या पक्ष्यांमागोमाग येतात. उन्हाळा जाणवू लागताच हे पक्षी आपल्या मायभूमीकडे परततात. 

अशी होते स्थलांतराची तयारी... 
लांबच्या प्रवासाला निघताना आपण तयारी करतो, तशीच तयारी पक्षीही करतात. त्यासाठी ते आधी शरीर तंदुरुस्त करून घेतात. या काळात त्यांची जुनी पिसे गळून व त्याजागी नवी तजेलदार पिसे येतात. या काळात पक्षी भरपूर खाऊन चरबी जमा करतात. ही चरबी त्यांना प्रवासादरम्यान ऊर्जेसाठी कामी येते. उडताना वजन कमी असावे, यासाठी पक्ष्यांच्या आतड्याचे आकुंचन झालेले असते. त्यामुळे हे पक्षी एकदा प्रवासाला सुरवात केल्यानंतर इच्छितस्थळी पोचेपर्यंत शक्‍यतो खात नाहीत. काही पक्षी एका दमात, काही टप्प्याटप्प्याने हे अंतर कापतात. काही फक्त रात्री, फक्त दिवसा, रात्रंदिवस प्रवास करतात. काही एकट्याने, थव्याने प्रवास करतात. 

प्रवासाचा मार्ग स्थलांतरित पक्षी ठरलेल्या वेळी निघून अपेक्षित ठिकाण त्याच वेळीच गाठतात. त्यांच्या या वेळापत्रकात शक्‍यतो बदल होत नाही. बरेचसे पक्षी वर्षानुवर्षे एकाच मार्गाने कसे काय येतात, हे एक न उलगडलेले कोडे आहे. या पक्ष्यांना पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचे आकलन असते. तसेच सूर्याची दिशा, ध्रुव तारा, तारांगण यांचा आधार घेऊन ते प्रवासाची दिशा ठरवतात. या पक्ष्यांना आनुवांशिकतेनेतून हा मार्ग माहिती असतो. दिवसा उडणारे पक्षी नद्या, डोंगर, जंगले, शहरे अशा ठळक भौगोलिक घटकांवरून दिशा ठरवतात, तर रात्री उडणारे पक्षी नक्षत्रे, तारे यांची मदत घेतात. 

बर्ड रिंगिंग 
ही स्थलांतरित पक्ष्यांचा अभ्यास करण्याची पारंपरिक पद्धत आहे. यामध्ये पक्ष्याच्या पायात एक कडी अडकवली जाते. या कडीवर कोणी कडी अडकवली आणि ही कडी सापडल्यास कोणाला कळवायचं ही माहिती लिहिलेली असते. कधीकधी रंगीत कड्याही वापरल्या जातात. कडीचे वजन पक्ष्याच्या एकूण वजनाच्या पाच टक्के असेल, याची दक्षता घेतली जाते. 

विंग टॅगिंग 
मोठ्या पक्ष्याच्या पंखावर रंगीत टॅग लावले जातात. या टॅगवर काही अक्षरे किंवा संख्या लिहिलेल्या असतात. ही सांकेतिक भाषा या क्षेत्रातील व्यक्तींना कळू शकतात. जीपीएस ट्रान्स्मीटर पक्ष्याची अधिक सखोल माहिती हवी असल्यास जीपीएस ट्रान्समीटरचा वापर केला जातो. छोट्या प्रजातींमध्ये हा ट्रान्स्मीटर बॅकपॅकसारखा पंखाखाली बसवला जातो, तर मोठ्या आकाराच्या पक्ष्यांमध्ये शेपटीला किंवा पायावर बसवला जातो. ट्रान्स्मीटर आणि सॅटेलाईटच्या मदतीने पक्ष्यांच्या प्रवासाविषयीची माहिती आपल्याला लगेचच उपलब्ध होते. 

मागोवा स्थलांतराचा 
पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञ बॅंडिंगपासून सॅटेलाइट ट्रॅकिंगपर्यंत अनेक पद्धती वापरतात. हे पक्षी प्रवासादरम्यान विश्रांतीसाठी उतरतात व शेवटी ज्या ठिकाणी जातात, अशी ठिकाणे शोधून त्यांचे जतन करण्यासाठी या माहितीचा उपयोग होतो. 

पक्षी निरीक्षणाची ठिकाणे 
महाराष्ट्रातील उजनी, वीर, पिंपळगाव, जायकवाडी, नांदूर, मधमेश्‍वर, राजेवाडी, मायणी, येरळवाडी येथील जलसाठे स्थलांतरित पक्ष्यांसाठी ओळखले जातात. चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यातही पाण्याची ठिकाणी हे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते जानेवारीचा पहिला आठवडा हा कालावधी पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी अगदी योग्य असतो. 

धोक्‍यात आलेले स्थलांतरित पक्षी सैबेरियन क्रौंच हा पक्षी भारतातून नामशेष झाला आहे, तर जगभरातही फार कमी ठिकाणी तो आढळतो. ग्रेटर स्पॉटेड इगल, लेसर स्पॉटेड इगल, पलास फिश इगल या काही गरुडांच्या जाती; तसेच नॉर्डमन्स, ग्रीनशांक, स्पूनबिल्ड, सॅंडपायबर या पक्ष्यांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. 

आर्टिक टर्न 
हा पक्षी सर्वांत जास्त सूर्य पाहिलेला पक्षी म्हणून ओळखला जातो. हा पक्षी उत्तर ध्रुवावरून दक्षिण ध्रुवावर आणि परत उत्तर ध्रुवावर स्थलांतर करत असतो. वर्षातला बराचसा काळ तो उडतच असतो. 

लिटल स्टंट 
हा अंगठ्याएवढा पक्षी न थांबता उत्तर ध्रुवावरून भारतात येतो. 

हमिंग बर्ड 
हा करंगळीएवढा छोटा पक्षी उत्तर अमेरिकेतून दक्षिण अमेरिकेपर्यंत न थांबता जातो.

अमूर ससाणा 
हा चीनमधून न थांबता भारतात येतो. काही काळ थांबून तो अरबी समुद्रावरून द.आफ्रिकेला जातो. परत जाताना आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवरून 
अरबस्थानातून चीनला जातो.

Web Title: Satish Pande write about birds migration

फोटो गॅलरी