अशीही परतफेड (सतीश पोरे)

सतीश पोरे
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

मार्डीकर यांना नाईक म्हणाले ः ""त्या विषयावर आता बोलायचं नाही. अहो, हास्ययोग मंडळामुळं आपण एकत्र आलो, हाही एक योगच आहे. सध्याच्या जीवनशैलीत कुणी कुणाकडं कामाशिवाय जात नाही. ज्येष्ठांचे वाढदिवस घरात साजरे होणं तर दूरच; पण अनेक घरांमध्ये कुटुंबीयही त्यांना फारसं विचारत नाहीत. त्यामुळं हास्ययोग मंडळाच्या सदस्यांना एकमेकांशिवाय पर्याय नाही.''

मार्डीकर यांना नाईक म्हणाले ः ""त्या विषयावर आता बोलायचं नाही. अहो, हास्ययोग मंडळामुळं आपण एकत्र आलो, हाही एक योगच आहे. सध्याच्या जीवनशैलीत कुणी कुणाकडं कामाशिवाय जात नाही. ज्येष्ठांचे वाढदिवस घरात साजरे होणं तर दूरच; पण अनेक घरांमध्ये कुटुंबीयही त्यांना फारसं विचारत नाहीत. त्यामुळं हास्ययोग मंडळाच्या सदस्यांना एकमेकांशिवाय पर्याय नाही.''

नेहमी सकाळी फिरायला जाणारी नाईक-कुलकर्णी यांची जोडगोळी घराबाहेर पडली. पुलाशेजारच्या उद्यानाजवळ चार-पाच लोक उभे होते. त्यांना पाहून ते थांबले. त्या चार-पाच लोकांमध्ये उभा असलेला एक माणूस उत्साहानं काहीतरी सांगत होता. नाईक-कुलकर्णी यांना पाहिल्यावर त्यानं स्वतःचा परिचय परत एकदा करून दिला ः "मी नामदेव काटे. शहरातल्या सात-आठ उद्यानांत मी हास्ययोग मंडळं सुरू केली आहेत. आता याही उद्यानात ते सुरू करण्यासाठीच मी आलो आहे.' अन्यत्र सुरू झालेल्या हास्ययोग मंडळांसंबंधी नाईक-कुलकर्णी यांनी ऐकलं होतं, त्यामुळं त्यांनीही लगेच या मंडळात यायचं ठरवलं.

ठरल्यानुसार, दुसऱ्या दिवशी प्रशिक्षक काटे बागेत आले आणि जमलेल्या ज्येष्ठांना काही व्यायामप्रकार शिकवून गेले. पहिल्या दिवशी आठ-दहा लोक बागेत आले होते; पण नंतर हास्ययोग मंडळातल्या सभासदांची संख्या वाढू लागली. शिवाय, रोजचा कार्यक्रम संपल्यावर एकमेकांच्या हाताला हात भिडवायचे, टाळी द्यायची व म्हणायचं ः "दहांना भेटा, पाचांना घेऊन या.' या निरोपाच्या शब्दांनी प्रत्येकजण "सक्रिय' राहू लागला.
"आज कुणी व्यायाम घेतला? काटेसर आले होते का?' असं उत्सुकतेनं विचारू लागला.
मग कुणीतरी म्हणालं ः ""अहो, रोज कोण आलं, कोण गेलं, कसं कळणार? प्रत्येकाकडून प्रवेशअर्ज भरून घ्या म्हणजे संबंधितांचं पूर्ण नाव, पत्ता, कौटुंबिक माहिती, वय, छंद कळतील.''
दुसऱ्यानं शंका काढली ः ""प्रवेशअर्जाच्या छपाईचा वा झेरॉक्‍स प्रती काढण्याचा खर्च कोण करणार?''
""मग प्रवेश फी ठेवा'' एकानं सूचना केली. भरपूर चर्चा होऊन दहा रुपये प्रवेश फी निश्‍चित करण्यात आली. तीही वसूल करणं ही काहीशी डोकेदुखीच ठरली. "आज सुटे पैसे नाहीत, विसरलो, उद्या-परवा मी गावाला जातोय, तेरवा नक्की देईन,' अशी उत्तरं सुरू झाली.
मग प्रवेश फीपोटी जमा झालेल्या पैशांचा हिशेब ठेवणं, ते बॅंकेत भरणं या कामांसाठी खजिनदार आला. अन्य व्यवस्था पाहण्यासाठी सेक्रेटरी आला. केवळ दोघांवरच सारी व्यवस्था कशी सोपवायची? मग अध्यक्ष आला.
हास्ययोग मंडळ सुरू झालं. वेळेपूर्वीच अर्धातास येऊन बसणारे कुलकर्णी म्हणाले ः ""आपण नुसतेच हास्ययोग मंडळाच्या निमित्तानं एकत्र येतो हे काही खरं नाही. थंडी वाढलीय. अधूनमधून चहापाणी व्हायला हवं.''
""त्याला काहीतरी निमित्त हवं,'' मार्डीकर म्हणाले.
""वाढदिवसासारखं दुसरं निमित्त नाही.'' देशमुख म्हणाले.
""कुणाचा वाढदिवस हे कसं कळणार?'' मोरे यांनी शंका उपस्थित केली.
""त्यात एवढा काय विचार करायचा? प्रवेशअर्जात जन्मतारीख लिहिलेली आहे. सेक्रेटरी सांगतील, आगामी वाढदिवस कुणाचा ते. त्यांनी सर्वांना चहा-कॉफी द्यायची,'' शिवणेकरबाईंनी मार्ग सुचवला.
""पण एखाद्याची ऐपत नसेल किंवा इच्छा नसेल तर?'' जोशी गुरुजींनी विचारलं.
""ऐपत नसायला काय झालं? जवळजवळ प्रत्येकाची तीन तीन, चार चार खोल्यांची घरं आहेत. चारचाकी गाड्या आहेत. पोरी, सुना-मुलं, चार चारआकडी पगारावर काम करत आहेत आणि स्वतःची पेन्शन नाही का?'' समुद्रे यांचा सात्त्विक संताप बाहेर पडला.

""हे पाहा, भांडू नका. परवा दिवशी माझा वाढदिवस आहे. उद्या ते मी जाहीर करतो. त्या दिवशी चहा-बिस्किटं मी देईन. त्यानंतर ज्यांचा वाढदिवस असेल त्यांनी तो अगोदर जाहीर करावा. सक्ती नको आणि जरी वाढदिवस असणाऱ्या कुणी चहा-कॉफी दिली नाही तरी आपण सर्वांनी त्याला शुभेच्छा द्यायच्या,'' तेंडुलकरां तोडगा सुचवला. ते मंडळाच्या संस्थापक-सदस्यांपैकी एक होते. ज्येष्ठ होते. त्यांनी सुचवलेला तोडगा लगेच मान्य झाला.
तेंडुलकरकाकांचा वाढदिवस झाला. त्यांनी सर्वांना चहा व पॅटिस दिलं. हास्ययोग मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते त्यांना शुभेच्छापत्र देण्यात आलं. त्यांच्या वाढदिवसानंतर आणखी दोघा-तिघांचे वाढदिवस झाले, त्यानंतर वडशेट्टीवारांनी विचारांचं पिल्लू सोडून दिलं ः "वाढदिवसानिमित्त चहा-पाणी दिलं जातं हे ठीक; पण मंडळाला छोटे-मोठे कार्यक्रम साजरे करायचे असतील तर पैसे नकोत का? तेव्हा वाढदिवसानिमित्त देणगी हवी. नाहीतर वाढदिवसानिमित्त झालेला आनंद द्विगुणित कसा होणार?''
वडशेट्टीवारांची प्रेरणा घेऊन घोलप यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त चहापान तर दिलंच, शिवाय मंडळाला एकशे एक रुपयांची देणगीही दिली. काहीजणांनी "आता हा देणगीचा वाईट पायंडा पडणार' म्हणून नाराजीचा सूर लावला; पण एकानं देणगी द्यायला सुरवात केली की ईर्ष्येपोटी अनेक लोक देणगी देतात, या वृत्तीतून सभासदमंडळी वाढदिवसानिमित्त नाखुषीनं का होईना देणगी द्यायला लागले.
मग "एवढीच वर्गणी का? यानं काय होणार?'चे वाद सुरू झाले. हिशेब विचारणाऱ्याला सेक्रेटरी व अध्यक्ष अडवू लागले. कारण, अध्यक्षच त्यांच्या मनाला येईल त्या वेळी काही लोकांना चहा द्यायचे, केळी द्यायचे, आणखीही काही खाद्यपदार्थ मागवायचे; पण या खर्चाची पावती नसायची. सेक्रेटरी रजिस्टरमध्ये फक्त "दिनांक अमुक रोजी एक डझन केळी, आठ चहा, त्यासाठी तमुक खर्च' एवढीच नोंद करायचे. अशा नोंदीला व खर्चाला नाईक यांचा आक्षेप असायचा. ते संरक्षण खात्याच्या अर्थ विभागातून सेवानिवृत्त झाले होते. त्यामुळे त्यांना हिशेब मागायची व तपासायची सवय होती.
नाईक यांना कविता करायचीही आवड होती. आर्थिक क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीला कविता करण्याचा छंद सहसा असत नाही; पण नाईक हे त्याला अपवाद होते. त्यांचं मन संवेदनशील होतं.

वाढदिवशी संबंधितांना दिल्या जाणाऱ्या शुभेच्छापत्रावरचा त्यांनी लिहिलेला मजकूर कृत्रिम, अप्रस्तुत व क्वचितप्रसंगी हास्यास्पदही असायचा. ज्याचा वाढदिवस असेल, त्याच्या गुणवैशिष्ट्यांवर आधारित कविता करून ते ती वाढदिवसाच्या प्रसंगी सादर करत. ज्याचा वाढदिवस असेल तो साहजिकच कविता ऐकून आनंदून जायचा. नाईक यांचंही कौतुक व्हायचं. हास्ययोग मंडळाच्या अध्यक्षांना नेमकं हेच आवडत नसे. नाईक यांचा मंडळाच्या जमा-खर्चाच्या हिशेबाची मागणी करण्याचा निरीच्छ गुण त्यांना "दुर्गण' वाटायचा.
बऱ्याचदा नाईक आणि अन्य काही मंडळी मंडळातर्फे आयोजिलेल्या कार्यक्रमाबाबत सूचना करत. त्या नेमक्‍या अध्यक्षांच्या विचारांशी जुळत नसत. कारण, "माझं तेच खरं' अशा वृत्तीचे ते होते. मात्र, त्यांना अर्थातच त्याची जाणीव नव्हती आणि फिकीरही नव्हती. नाईक यांच्याविषयीच्या द्वेषानं त्यांचं मन भरू लागलं. त्यांचा कधी सर्वांसमक्ष पाणउतारा करतोय असं त्यांना झालं.
"हा कवितेतून आपली प्रतिभा दुसऱ्याला दाखवतो काय? त्याला कवितेतूनच चांगलं सुनवायचं' असं अध्यक्षांनी ठरवलं. एक-दोघांच्या मदतीनं त्यांनी विडंबनकाव्य तयार केलं व ते नाईक यांच्या वाढदिवसाची वाट पाहू लागले. लवकरच अध्यक्षांना ती संधी मिळाली.

एक डिसेंबरला नाईक यांचा वाढदिवस होता. त्यांनी तसं दोन दिवस अगोदर बागेत जाहीर केलं होतं. पहिले दोन तास झाल्यावर अध्यक्षांनी सर्वांना बागेच्या एका कोपऱ्यात यायला सांगितलं. ते म्हणाले ः ""नेहमी नाईक आपल्यावर कविता करतात. आज आपण त्यांना "काव्यसुमनांजली' भेट देऊ या. नेहमीच्या शुभेच्छापत्रापेक्षा ही भेट चांगली, नाही का?'' अध्यक्षांनी छद्मीपणानं नाईक यांच्याकडं पाहिलं. अध्यक्षांच्या समयोचिततेचं सर्वांनी कौतुक केलं. आता अध्यक्षमहाराज कसला "आहेर' देतात, याकडं सर्वांचं लक्ष लागलं. त्यांनी त्यांच्या खिशातून एक तेलकट, चुरगळलेला चतकोर कागद काढला. सेक्रेटरीच्या हातात तो कागद देऊन ते म्हणाले ः ""मी आज चष्मा आणला नाही, तेव्हा आता तुम्हीच वाचा ही कविता...चांगल्या खणखणीत आवाजात वाचा.'' सेक्रेटरी तसे मुत्सद्दी नव्हते. सरळ मनाचे होता. बहुधा त्यांनी ती कविता अगोदर वाचली नसावी. अध्यक्षांचा कावा त्याच्या लक्षात आला नाही. त्यांनी वाचायला सुरवात केली ः
म्हणे, "केळी खाता...चहा पिता...बिलाचा नाही पत्ता
तुम्ही दिसता चोराच्या आळंदीचे, मी मात्र देवाच्या आळंदीचा
मी आहे एक सैनिक, वावगे मजला न खपे
वेळेवर न येता व्यायाम घेणे म्हणजे गुन्हा करणे...'
वगैरे वगैरे
पुढं नाईक यांच्या शारीरिक वैगुण्यांचं वर्णन करणाऱ्याही ओळी त्या कवितेत होत्या.
हा नाईक यांच्यावर थेटच हल्ला होता. वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जमलेले सभासद अवाक्‌ झाले. उत्तरादाखल नाईक म्हणाले ः ""हा शालजोडीतला - तोही फाटक्‍या शालजोडीतला- मार्डीकर यांचा म्हणजेच विद्यमान अध्यक्षांचा आहेर मी कधी विसरणार नाही. त्यांना व्यायाम घेणारा शिक्षक कसाही चालतो. गबाळग्रंथी, व्यायामप्रकार अवगत नसलेला, चुकीच्या पद्धतीनं शारीरिक हालचाली करणारा असला तरी तो अध्यक्षांना व सर्वांना चालणार असेल तर मी आक्षेप घेणारा कोण? माझ्या मिचमिच्या डोळ्यांचा त्यांना त्रास होतो, तसा त्यांच्या बटबटीत डोळ्यांचा मलाही त्रास होतो. माझं दर्शन त्यांना नको आहे, तसं मलाही त्यांचं दर्शन नको आहे. उद्यापासून मी माझं दर्शन देणार नाही,'' असं म्हणून ते बागेतून निघून गेले. त्यांची भूमिका पटल्यानं बरेचसे सभासदही निघून गेले.

दुसऱ्या दिवसापासून नाईक यांचं बागेत येणं बंद झालं. तिसऱ्या दिवशी अध्यक्ष मार्डीकर वगळता दहा-पंधरा सभासद नाईक यांच्या घरी जाऊन आले आणि त्यांची समजूत घालू लागले ः ""अहो, आम्ही त्यांना खूप झाडलं. काडीची अक्कल नाही अन्‌ लागलाय अध्यक्षपद भूषवायला! दरमहा घसघशीत पेन्शन घेणारा, स्वतःच्या वाढदिवसानिमित्त लिमलेटच्या गोळ्या वाटतो. म्हणजे कोण चेंगट आणि कोण उदार हे साऱ्यांना कळलं आहे. मंडळाच्या पैशाचा चहा कोण पितं हेही सर्वांना माहीत झालंय. तेव्हा नाईकसाहेब; तुम्ही मंडळ सोडू नका. मार्डीकर यांच्याकडं दुर्लक्ष करा. आमच्याकडं पाहा. रोज बागेत येत जा.''

पण नाईक यांचं मन बधलं नाही. त्यांनी बागेत तर सोडाच; पण बागेच्या दिशेनंही जाणं बंद केलं. लोकांना टीका नको, फक्त स्तुती हवी आहे. मनोभावे काम करण्यापेक्षा त्यांना चंगळवादी वृत्ती हवी आहे, अशी नाईक यांची समजूत झाली.
नाईक यांनी हास्ययोग मंडळाला रामराम ठोकला खरा; पण एके दिवशी त्यांच्या कानावर बातमी आली, की अचानक उद्‌भवलेल्या काही आजारामुळं अध्यक्ष मार्डीकर यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. नाईक तडक उठले. कुलकर्णी यांच्या घरी गेले. त्यांना म्हणाले ः ""चला, त्यांना भेटून येऊ या.''
""त्यांना म्हणजे कुणाला?'' कुलकर्णी यांनी आश्‍चर्यानं विचारलं. ""मार्डीकर यांना भेटायला जाऊ या रुग्णालयात. शस्त्रक्रियेबाबत काही अडचण निर्माण झाली आहे, असं तेंडुलकरकाका म्हणत होते.''
""पण... त्यांचं अन्‌ तुमचं वितुष्ट...'' कुलकर्णी यांनी शंका उपस्थित केली.
"" "वितुष्ट होतं,' असं म्हणू या आता आणि एक पाऊल आपण पुढं टाकू या, '' नाईक म्हणाले.
दोघंही रुग्णालयात गेले. मार्डीकर अतिदक्षता विभागात होते. डॉक्‍टरांच्या परवानगीनं दोघं आयसीयूत गेले. त्या दोघांना असं अचानक आयसीयूत आल्याचं पाहून मार्डीकर यांना आश्‍चर्य वाटलं. मनात अपराधीपणानं चलबिचल झाली, डोळे डबडबले.
""कसला त्रास होतोय?'' नाईक यांनी विचारलं.
""अहो, कालपासून लघवीच बंद झालीय. इथं तपासलं तेव्हा डॉक्‍टर म्हणाले, की तातडीनं ऑपरेशन करायला हवं,'' मार्डीकर खोल आवाजात म्हणाले.
तेवढ्यात रुग्णालयातली परिचारिका आली. रुक्ष आवाजात म्हणाली ः ""तुम्ही अजून ऍडव्हान्स भरलेला नाही; त्याशिवाय शस्त्रक्रिया होणार नाही आणि इथं थांबणार कोण रात्री? जे थांबणार असतील त्यांना पास घ्यायला सांगा.''
वातावरणात स्तब्धता पसरली. काय बोलावं ते मार्डीकर यांना सुचेना. बॅंकेतून पैसे कोण काढणार? बॅंकेला आज सुटी, उद्या सुटी. एटीएम कार्डही नाही. दोन्ही मुली विवाहित. त्या परगावी. बायकोची गुडघ्याची शस्त्रक्रिया झालेली. विक्षिप्त स्वभावामुळं नातेवाइकांचं येणं-जाणं नाही. हे सगळं नाईक यांना माहीत होतं. ते लगेच म्हणाले ः ""काळजी करू नका, मार्डीकरसाहेब. माझ्या घरी अन्य काही कामासाठी काढलेले पैसे आहेत. ते मी उद्या सकाळी इथं भरतो. रात्री झोपायलाही थांबतो मी. उद्या-परवाही कुणी आलं नाही तर मी थांबीन.''
""तेरवापासून मीही येतो रात्री थांबायला,'' कुलकर्णी म्हणाले.
मार्डीकर यांना अश्रू अनावर झाले. त्यांना एकदम हुंदकाच फुटला. कुलकर्णी यांनाही गहिवर अनावर झाला. नाईक यांनी मार्डीकर यांच्या कपाळावरून हात फिरवला आणि म्हणाले ः ""काही काळजी करू नका. तुमची शस्त्रक्रिया यशस्वी होईल.''
""चुकलं माझं नाईकसाहेब. मी तुमचा अपमान करायला नको होता.'' खजील झालेले मार्डीकर कापऱ्या आवाजात म्हणाले.

""त्या विषयावर आता बोलायचं नाही. अहो, हास्ययोग मंडळामुळं आपण एकत्र आलो, हाही एक योगच आहे. सध्याच्या जीवनशैलीत कुणी कुणाकडं कामाशिवाय जात नाही. ज्येष्ठांचे वाढदिवस घरात साजरे होणं तर दूरच; पण कुटुंबीयही त्यांना फारसं विचारत नाहीत. एवढंच नव्हे तर, काही काही ठिकाणी त्यांना त्रासही दिला जातो. त्यामुळं आपल्याला एकमेकांशिवाय पर्याय नाही. नातेवाईक मंडळी फक्त बिस्किटांचे पुडे अन्‌ नारळाचं पाणी देण्यापुरतीच! तेव्हा माझ्यावर, कुलकर्णी यांच्यावर व बागेतल्या म्हणजे हास्ययोग मंडळातल्या सभासदांवर विसंबून राहायला हरकत नाही. आता हास्ययोग मंडळ हेच आपलं कुटुंब!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satish pore write hasya yoga article in saptarang