

Satopanth Glacier
esakal
हिमालयाकडे पाहण्याचे अनेक मार्ग आहेत. काही जण त्याला आव्हान म्हणून पाहतात, काही सौंदर्य म्हणून, तर काहींना तो अध्यात्माचा मार्ग वाटतो. पण हिमालयाचं खरं स्वरूप या तिन्हींच्या संगमात दडलं आहे. पिंडारी हिमनदी आपल्याला हिमालयाची ओळख करून देते, चोराबरी आपल्याला सावधगिरी शिकवते आणि सतोपंथ हिमनदी आपल्याला हिमालयाच्या आध्यात्मिक आणि भौगोलिक गाभ्याकडे घेऊन जाते.
उत्तराखंडमधील गढवाल हिमालयात वसलेली सतोपंथ हिमनदी ही केवळ एक हिमनदी नाही, तर एक अनुभव आहे - उंचीचा, शांततेचा आणि निसर्गाशी संवाद साधण्याचा. बद्रीनाथच्या पुढे, अलकनंदा नदीच्या उगमाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ही हिमनदी आणि तिच्या जवळच वसलेला सतोपंथ तलाव आपल्याला भेटतात.
‘सतोपंथ’ या नावाचा अर्थच ‘सत्याचा मार्ग’ असा होतो. स्थानिक परंपरेनुसार या तलावाचा आणि परिसराचा संबंध त्रिमूर्तींशी - ब्रह्मा, विष्णू आणि महेश - जोडला जातो. तलावाचा आकार त्रिकोणी आहे आणि प्रत्येक कोन या तिघांचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे या प्रदेशाला धार्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे. पण या श्रद्धेमागे एक भौगोलिक वास्तवही दडलेलं आहे.