हुशार मुलांच्या हुशारीचं रहस्य!

शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कार्यशाळा नियमित घेताना मला काही मुलखावेगळी निमंत्रणंही मिळतात.
school and college students
school and college students sakal

हुशार म्हटली जाणारी मुलं ही व्यक्तिमत्त्व विकासाच्या अनेक पायऱ्या ओलांडून पुढे जातात आणि इतर मुलं त्या पायऱ्या ओलांडण्याचा आळस करतात, ती मुलं आणि त्यांचे पालक व्यक्तिमत्त्व विकासाकडे दुर्लक्ष करतात, एवढाच काय तो दोघांमधला फरक आहे. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर आपण जितकं काम करू तितका त्यांच्या अभ्यासातल्या हुशारीवर सकारात्मक परिणाम होईल, यात शंका नाही...

शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कार्यशाळा नियमित घेताना मला काही मुलखावेगळी निमंत्रणंही मिळतात. त्यातलं एक निमंत्रण होतं हुशार मुलांशी बोलण्याचं! म्हणजे असं की मुंबईच्या एका उपनगरामध्ये सर्व शाळांसाठी एक स्पर्धात्मक उपक्रम राबवला जाई. त्यात प्रत्येक शाळेत पहिल्या दोन क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळत असे. त्यामुळे साहजिकच जवळपास १००पेक्षा अधिक मुलंही कार्यक्रमात सहभागी झाली होती. सोबत पालकांनाही आणण्याची मुभा असल्यामुळे डावीकडे सगळे पालक एकत्र बसले होते. उजवीकडे सगळे विद्यार्थी...

फोकस कसा वाढवायचा, या विषयावर मी या मुलांशी बोललो. त्यानंतर प्रश्नोत्तरे झाली. कार्यक्रम संपला; मात्र त्यानंतर काही मुलांशी मी बोलू लागलो. कारण मला या मुलांकडून खूप काही जाणून घ्यायचं होतं... आताचा कार्यक्रम अनौपचारिक असल्यामुळे थांबलेल्या मुलांचे पालकही आमच्या गप्पांमध्ये सहभागी झाले...

अभ्यासात चमकदार कामगिरी करून उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि अभ्यासात साधारण किंवा सुमार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नेमका काय फरक असतो, हे मला समजून घ्यायचं होतं. या विषयावर मी अनेक शिक्षकांशीही बोललो आहे आणि माझा याविषयीचा विचार हा अधिकाधिक परिपक्व होण्यास शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने बोलून मदतच केली आहे...

आपण साधारण कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांचा अ गट समजूया आणि चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ब गट समजूया...

मी इथे अंगभूत हुशारी किंवा तल्लख बुद्धी किंवा अफाट स्मरणशक्ती या विषयाबद्दल काहीच बोलत नाही. कुणाही मुलाच्या अंगात जी सामान्य स्वरूपाची अंगभूत हुशारी असेल,

त्या हुशारीसह मुलांना परीक्षेत चांगली कामगिरी करता येऊ शकते, इतपत आपले शालेय अभ्यासक्रम आणि परीक्षा या सोप्या असतात, हे प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. भले ब गटातील मुलं पैकीच्या पैकी मार्क आणत असतील; पण अ गटातील मुलांनाही चांगले मार्क मिळवण्याची संधी परीक्षेत असते. चांगले मार्क आणण्यात ही मुलं यशस्वी ठरत नाहीत. असं का घडतं?

ब गटातल्या मुलांची काही वैशिष्ट्य मला जाणवली. त्यांच्याशी बोलताना एक जाणवत होतं, की त्यांचा आत्मविश्वास अतिशय चांगला आणि उंचावलेला होता. आत्मविश्वास हा व्यक्तिमत्त्वाचा आणि अभ्यासाचाही पाया आहे. ज्या मुलांकडे आत्मविश्वास चांगला असतो, त्यांची कामगिरी आपोआपच चांगली होते, हे उघड आहे आणि सार्वत्रिक सत्य आहे. आत्मविश्वासामुळे ती स्वाभाविकच स्मार्टपणे वागत होती, स्मार्टपणे बोलत होती आणि स्मार्टपणे वावरत होती. साहजिकच त्यांची छाप पडत होती...

हा आत्मविश्वास एकाएकी प्रकटलेला नव्हता. पालकांशी बोलताना जाणवलं, की आपल्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. मुख्यतः मुलांना प्रोत्साहन देणं, मुलांच्या शंकांचं निरसन करणे किंवा त्यांना शंका विचारण्यासाठी प्रोत्साहन देणं, त्यांना हवी ती साधनसामग्री उपलब्ध करून देणं, मुलांसाठी वेळ काढणं, त्यांना अवांतर वाचनामध्ये मदत करणं अशा अनेक गोष्टी पालकांनी केलेल्या होत्या.

ब गटातल्या मुलांपैकी बहुतेक मुलं ही सेल्फ मोटिवेटेड होती. ती स्वयंप्रेरित होती. गमतीने मी त्यांना विचारलं की तुमच्यापैकी किती जण सकाळी उठून लवकर अभ्यास करता किंवा शाळेत जाता. बहुतेक मुलांनी हात वर केले. माझा पुढचा प्रश्न असा होता, की तुमच्यापैकी किती जणांना तुमचे आई किंवा बाबा उठवतात आणि किती जण स्वतःहून सकाळी उठता. आनंदाची गोष्ट म्हणजे जवळपास सर्वच मुलांनी हात वर करून सांगितलं की आमचे आम्ही उठतो आणि अभ्यासाला बसतो. काही मुलं तर चहा स्वतःचा चहा स्वतः करून घेत, मग अभ्यासाला बसत.

या मुलांबद्दल पालकांनी सांगितलेली अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी, की त्यांना अभ्यासाला बस, असं सांगण्याची वेळ कधीच आली नाही. बहुतेक मुलं ही स्वतःहून अभ्यासाला बसत. कोणता अभ्यास करायचा, तो किती वेळ करायचा, त्याचं नियोजन कसं करायचं, हे सर्व मुलांनीच ठरवलेलं असे आणि मुलं ते व्यवस्थितरीत्या पार पाडत.

शाळेचा अभ्यास, शिकवणीचा अभ्यास, स्वतःचा सराव यामध्ये त्यांना कधीच अडचण आली नाही. आपल्याला परीक्षेत चांगले गुण मिळायला हवेत, त्यासाठी प्रयत्न करायला हवेत, त्यासाठी कष्ट उपसायला हवेत याची या मुलांना तीव्र स्वरूपाची जाणीव होती आणि नुसती जाणीव नव्हती, तर त्यांच्या वर्तणुकीत ती सतत उमटलेली असे.

मुलं पालकांच्या दबावामुळे अभ्यास करतात, पालक त्यांना इतर ॲक्टिव्हिटीजपासून वंचित ठेवतात, मुलांवर अभ्यास करण्याचा, परीक्षेत मार्क मिळवण्याचा दबाव असतो वगैरे समजुती या खोट्या पडाव्यात, असं वातावरण मी अनुभवत होतो. अनेक पालकांनी मला असं सांगितलं, की आता अभ्यास थांबव आणि खेळायला जा,

असं आम्हाला मुलांना सांगावं लागतं. त्यांनी इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यावा यासाठीसुद्धा त्यांची मनधरणी करावी लागते. ही मुलं स्वतःहून अभ्यास करतात, स्वतःहून तो पूर्ण करतात आणि स्वतःमधली कमतरता भरून काढण्याचा स्वतःहून प्रयत्न करतात. पालकांचं प्रेशर, पालकांचा दबाव या गोष्टी मला त्या पालकांशी बोलताना अजिबात जाणवल्या नाहीत.

तिथं भेटलेले बहुतेक पालक हे सामान्य स्वरूपाची नोकरी करणारे होते. काही महिला पालक नोकरी करणाऱ्या होत्या, बाकीच्या गृहिणी होत्या. म्हणजे असं की ते पालक खूप हुशार, उच्चपदस्थ, अतिशय उच्चशिक्षित वगैरे नव्हते. ते सामान्य कुटुंबातून आलेले होते आणि सामान्य नोकरी करणारे होते. त्यामुळे पालक हुशार असतील, पालकांची पार्श्वभूमी जर उत्तम असेल तर मुलांची कामगिरी उत्तम होते हा निव्वळ गैरसमज असतो, हे लक्षात आलं.

अभ्यासाच्या वेळेत इतर कोणतेही काम करणं किंवा बाहेर जाणं ही मुलं टाळतात. अभ्यासाच्या वेळेत त्यांना कोणताही खंड किंवा डिस्टर्बन्स नको असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही मुलं वेळच्या वेळी अभ्यास करतात.

त्यांच्यामध्ये जणू अंगभूत टाईम मॅनेजमेंट असतं. सर्वसाधारण मुलं परीक्षा आली किंवा परीक्षा जाहीर झाली की अभ्यास सुरू करतात; पण हुशार मुलं ही अभ्यासाला आधी सुरुवात करतात म्हणून ती हुशार असतात! त्यांचं वेळेचं नियोजन, वेळेची आखणी अतिशय उत्तम असते.

नेटकेपणा हा त्यांचा आणखीन एक महत्त्वाचा गुण असतो. त्यांचं दप्तर लावणं, दप्तराची रचना, त्यांच्या कपाटातल्या पुस्तकांची रचना ही आखीव-रेखीव असते. साहजिकच बहुतेकदा त्यांचं अक्षरही नेटकं असतं. एकाग्रता हा त्यांच्यातला महत्त्वाचा गुण असल्यामुळे वाचताना, लिहिताना, अभ्यास करताना ते सहज एकाग्र होतात. साहजिकच अभ्यास, माहिती आणि ज्ञान ग्रहण करण्याचा त्यांचा वेग हा जास्त असतो आणि परिणामकारक असतो... चिकाटी, सातत्य, कुतूहल, जिज्ञासा हे त्यांचे आणखीन काही महत्त्वाचे गुण म्हणावे लागतील.

माझा अनुभव असा आहे, की शिक्षक जे वर्गात सांगतात ते तत्क्षणी सर्वांनाच जवळपास सारखं समजलेलं असतं. म्हणजे आकलनात प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम हा त्यानंतरच्या प्रक्रियेत आणि अनुषंगाने येणाऱ्या व्यक्तिमत्त्व विकासात असतो. हुशार म्हटली जाणारी मुलं ही व्यक्तिमत्त्व विकासाच्या अनेक पायऱ्या ओलांडून पुढे जातात आणि इतर मुलं त्या पायऱ्या ओलांडण्याचा आळस करतात,

ती मुलं आणि त्यांचे पालक व्यक्तिमत्त्व विकासाकडे दुर्लक्ष करतात, एवढाच काय तो दोघांमधला फरक आहे. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर आपण जितकं काम करू तितका त्यांच्या अभ्यासातल्या हुशारीवर सकारात्मक परिणाम होईल, यात शंका नाही... विशेषतः पालकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यामुळे मुलांची अभ्यासातली कामगिरी दोन-तीन पायऱ्या तरी उंचावेल हे नक्की!

हुशार म्हटली जाणारी मुलं ही व्यक्तिमत्त्व विकासाच्या अनेक पायऱ्या ओलांडून पुढे जातात आणि इतर मुलं त्या पायऱ्या ओलांडण्याचा आळस करतात, ती मुलं आणि त्यांचे पालक व्यक्तिमत्त्व विकासाकडे दुर्लक्ष करतात, एवढाच काय तो दोघांमधला फरक आहे. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर आपण जितकं काम करू तितका त्यांच्या अभ्यासातल्या हुशारीवर सकारात्मक परिणाम होईल, यात शंका नाही...

groomandgrow@gmail.com या ई-मेलवर तुमचे प्रश्न पाठवा आणि प्रेरणादायी मार्गदर्शन मिळवा... आम्ही प्रश्नकर्त्याचे नाव गोपनीय ठेवू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com