

New Marathi Books
esakal
मराठीमध्ये निसर्गपर ललितगद्याची एक क्षीण, परंतु, सातत्याने वाहणारी धारा आहे. दुर्गा भागवत, मारुती चितमपल्ली, व्यंकटेश माडगूळकर, शरदिनी डहाणूकर, श्री. द. महाजन या नावांनी गेल्या शतकात ही धारा खंडित होऊ दिली नाही. ही धारा संपन्नतेने पुढे नेणारे आणखी एक नाव म्हणजे, सीमंतिनी नूलकर. त्यांचे ‘फुलांचे जंगली प्रदेश’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले.
या पुस्तकात घडणारे वनसृष्टीचे दर्शन महाराष्ट्र किंवा देशापुरते सीमित नाही, तर विश्वात्मक आहे. लेखिकेला भटकंतीचा विलक्षण छंद आहे. त्यामुळे त्यांनी सगळीकडचा निसर्ग डोळे भरून पाहिला. ‘निसर्गावर केलेले भरभरून प्रेम’ असे या पुस्तकातील एकूण लेखांबद्दल म्हणता येईल. त्यातच त्या मायक्रोबायोलॉजीच्या पदवीधर असल्यामुळे त्यांच्या लेखनाला शास्त्रीय बैठक असून, वनस्पतिशास्त्राच्या संदर्भांमुळे त्यांचे गांभीर्य वाढले आहे. उदा. कचनार या वृक्षाची आणखी तीन नावे सांगून त्या म्हणतात, ‘या झाडाचे वेगळं वैशिष्ट्य म्हणजे, पानांतील छिद्रकांतून ते प्रदूषके शोषून घेतं. अस्थमा, अल्सर, सर्पविषावरचा उतारा असे चौफेर औषधी उपयोग आहेत, पण एक सूर्ख शराराभी होता है कचनारमें!’