

Common Health Problems in Senior Citizens
esakal
डॉ. अविनाश भोंडवे - saptrang@esakal.com
वयाची साठी उलटलेल्या व्यक्तींना आपण ज्येष्ठ नागरिक म्हणून संबोधतो. या काळातल्या वाढत्या वयानुसार शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होते, अवयवांची कार्यक्षमता मंदावते, हाडांची झीज होते. शरीरातील अशा बदलांमुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रामुख्याने अनेक दीर्घकालीन आजारांचा आणि विकारांचा सामना करावा लागतो.
दीर्घकालीन आजार : असांसर्गिक आजारांमध्ये छुपे मारेकरी मानले जाणारे, उच्च रक्तदाब आणि मधुमेह ज्येष्ठांमध्ये सर्रास आढळतात. त्याचबरोबर रक्तातील कोलेस्टेरॉल वाढल्याने रक्तवाहिन्यांच्या आतला रक्ताभिसरणाच्या मार्गाचा अंतर्गत व्यास कमी होतो.
हृदयरोग आणि पक्षाघात : कोरोनरी आर्टरी डिसीज, हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर आणि मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित झाल्याने येणारा पक्षाघाताचा (स्ट्रोक) झटका या वयात गंभीर रूप धारण करू शकतो.
हाडांचे आणि सांध्यांचे विकार : ऑस्टिओआर्थरायटिस (सांधेदुखी) आणि ऑस्टिओपोरोसिस (हाडे ठिसूळ होणे) या विकारांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या चालण्या फिरण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे अनेकांना गुडघे दुखणे, पाठ आणि कंबर दुखणे अशासारखे विकार उद्भवतात. काही वृद्धांना किरकोळ पडल्याचे निमित्त होऊन, खुब्याच्या किंवा खांद्याच्या हाडांचे फ्रॅक्चर होते, परिणामी ज्येष्ठ नागरिक अंथरुणाला खिळून राहू शकतात.